Radha - Ranga - 3 - last part books and stories free download online pdf in Marathi

राधा - रंगा - 3 - अंतिम भाग

३.

देवीची जत्रा दोन आठवड्यांवर आली होती. संत्याने बैलांकडून चांगला कसून सराव करून घेत होता. सातारचा त्याचा मावसभाऊ मावशीला घेऊन आला होता. बारामतीला मोठ्या डॉक्टरांकडे दाखवायचं होतं. चार पाच दिवस इथेच असल्यामुळे संत्याने त्याच्याकडून बैलांचा सराव करून घेतला होता. त्याचा मावसभाऊ सातारच्या निंबाळकरांच्या शर्यतीच्या बैलगाडीवर ड्रॉयव्हर होता. साहजिकच त्याला शर्यतीच्या सगळ्या खाचाखोचा माहिती होत्या. त्याने निंबाळकरांचा बैलगाडा सलग तीन वर्षे जिल्ह्यात पहिल्या नंबराने जिंकण्याचा विक्रम केला होता. चार पाच दिवस त्याने बैलांचा आणि संत्याचाही सराव करू घेतला. त्याने संत्याला शर्यतीच्यावेळी लक्षात ठेवण्यासारख्या खूप गोष्टी सांगितल्या. बैलांना मारायचं किंवा दारू पाजायची नाही. टोच्या लावायचा किंवा शेपटी पिरगळायची नाही. छकड्याची चाकं चांगलं वंगण देऊन चालती ठेवली पाहिजेत. ड्रॉयव्हरचं लक्ष दुसऱ्या छकड्यावर असता कामा नये. आपल्या बैलांवर असलं पाहिजे. बैल एकदा का ड्रॉयव्हरचे मित्र झाले कि, शर्यत हा हा म्हणता सहज मारता येते. चाकोरी मोडू नये म्हणून बैलांना कसं आपल्या काबूत ठेवायचं? बैलांची वेसण कधी आवळ्याची, कधी नाही? याचे बारीक सारीक तपशील, लहान सहान गोष्टी, खाचा खोचा त्याने संत्याला सांगितलं. लहानपानपासूनच माठ डोक्याचा संत्या. काही गोष्टी डोक्यात शिरल्या तर बऱ्याच डोक्यावरून गेल्या.

        रंगानेही यावर्षी चांगली तयारी केली होती. मागच्या वर्षी थोडक्या अंतराने फायनल मारता आली नाही. पण या वेळी मात्र रंगाने आजूबाजूच्या गावच्या जत्रेत हजेरी लावली होती. शर्यतीत भाग घेऊन फायनल मध्ये पहिल्या दुसऱ्या नम्बराने बाजी मारली होती. खुर्द कोऱ्हाळ्याच्या शर्यतीमध्ये पहिल्या राउंड मध्ये संत्या आणि रंगाची बैलं होती. संत्याने शर्यत कमिटीशी वाद मांडला. त्याला दुसऱ्या शर्यतीत छकडा पळवायचा होता. तिथंही रंगा संत्याची वादावादी झाली. खोमणे पाटील, बापू पाटलांचे म्हणजे रंगाच्या वडिलांचे शाळेपासूनचे मैतर. त्यांनी मध्यस्ती करून वाद मिटवला. दुसऱ्या शर्यतीतील एक गाडा बदली या शर्यतीत देण्यात आला. तीनही फेऱ्यांत रंगाच्या छग्या बग्याने आघाडी घेत खोमणे पाटलांच्या बैलगाडीला मात दिली होती. खोमणे पाटलांनी बापू पाटलांना आलिंगन दिलं. फेटे उडवले गेले. ढोल ताशे वाजवले गेले. गुलाल उधळला, जल्लोष केला. बापू पाटलांना आणि बैलगाड्याबरोबर आलेल्या सगळ्यांना घरी नेऊन आग्रहाने बकरं खायला घातलं. घरी आल्यावर साऱ्या वस्तीतून बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

       सावतामाळी मंदीराला प्रदक्षिणा घालून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक मरीआईदेवीच्या परिसरात आली. देवळासमोर अलकामावशी, हौसाक्का औक्षणाचं ताट घेऊन उभ्या होत्या. राधालाही जसं समजलं तशी ती आवरून आली. मावशीपाशी थांबली. नाना, मछिंदरने छकड्याचे बैल सोडले. रंगा आणि बैल मंदिरासमोर उभे राहिले. रंगाने राधाकडे कटाक्ष टाकताच ती लाजली. मंदिरात जाऊन रंगाने देवीचं दर्शन घेतलं. बाहेर आल्यावर हौसाक्का, अलकामावशीने रंगाला आणि बैलांनाही ओवाळलं. बाजूला बंड्याही उभा होताच. रंगाने वाकून दोघींच्या पायांना स्पर्श केला. आशीर्वाद देत मावशी म्हणाली,

"रंगा. लई मोठं काम केलंस पोरा. आता आपल्या गावाची शर्यत जिकली कि ब्येस काम हुईल."

"व्हय मावशे. या बारीला नक्की मारणार."

राधानेही मावशीच्या हातून ताट घेत रंगाचं औक्षण केलं. बैलांच्या कपाळावर गुलाल लावला. बाजूला उभ्या बंड्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या आनंदाला पारावर नव्हता. नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्याच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. एवढ्या कोलाहलातही रंगा म्हणाला,

"हे शेवटचंच... पुढच्या वेळी वाड्यासमोर औक्षण करायचंय. तयारी ठेव."

त्याच्या अशा बोलण्याने राधा लाजली. मावशीच्या मागे लपली. सगळ्यांचा निरोप घेऊन रंगा पारावर उभं राहून संत्या आणि त्याचे टवाळ दोस्त चाललेला प्रसंग पाहत होते. डोळ्यांतून असूया आणि रागाच्या ठिणग्या उडत होत्या.

-----

        दुपार टाळून गेली होती. मरीआईदेवीचे मंदिर फुला तोरणांनी, लाईट्सच्या माळांनी सजलं होतं. लाईट्सच्या झगमगाटाने आणि विद्युत रोषणाईमुळे जत्रा उजळून निघाली होती. बाजूला मोठा आकाशपाळणा फिरत होता. जत्रेत आलेल्या खेळणीवाल्यांकडे मुलांची गर्दी दाटली होती. खाऊगल्ली मध्ये पोराटोरांनी गर्दी केली होती. पाहुणे - राव्हळे, गावकरी जत्रेची मजा लुटण्यात दंग झाले होते.दुसरीकडे ओढ्याच्या पलीकडे बनकरांच्या शेतात शर्यतीचे आयोजन केले होते. चार चार बैलगाड्यांच्या तीन शर्यती पहिल्या राऊंड मध्ये होणार होत्या. त्यातून जिंकणाऱ्या बैलगाड्या फायनलला. पहिल्या शर्यतीत रंगाची बैलगाडी होती. दुसऱ्या शर्यतीत संत्या होत्या.

रंगाच्या बरोबर आणखी तीन छकडे होती. चाकोरीमध्ये येऊन तयार झाले. स्टेजवरून शर्यत चालू करण्यासाठी पुकारलं गेलं. निशाणधारी माणसाने पिवळं निशाण खाली केलं. शर्यत चालू झाली. लोकांनी एकच जल्लोष केला. शिट्ट्या वाजवून, फेटे रुमाल उडवून, गुलाल उधळून वातावरण दणाणून सोडलं. एवढा वेळ ओढून धरलेले बैलांचे कासारे ढिल्ले सोडले गेले. हा हा म्हणता म्हणता बैल वेगाने धावू लागले. स्टेजजवळ ढोल ताशे पथक वाजत होतं. रंगाच्या छ्ग्या - बग्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. बैलांच्या पाठीवर थपडा पडत होत्या. शेपट्या पिरगाळल्या जात होत्या. बैल जीव खाऊन शक्तीनिशी धावत होते. बाकीच्या छकड्यांना माग टाकत रंगाने मोठ्या फरकाने बाजी मारली. बाजूला प्रेक्षकांमध्ये उभ्या असलेल्या संत्या आणि त्याच्या दोस्त मंडळींमध्ये काळजी दाटली होती.

दुसऱ्या शर्यतीत संत्या होता. शर्यत सुरु झाली. शंभरेक पावलं अंतरावर संत्याचे बैल मागे पडले. मावसभावाने सांगितलेलं संत्या पार विसरून गेला होता. खिशातला टोचा बाहेर काढून त्याने बैलांच्या पाठीवर कचाकच रोवायला सुरुवात केली. बैल मोठ्याने हंबरू लागले. टोच्याचा मार चुकवण्यासाठी वेगानं दौडू लागले. अंतिम रेषा जवळ येत होती. सातत्याने बैलांच्या शेपट्या तोंडात धरून चावायला सुरुवात केली. बघता बघता वेग वाढला आणि काहीश्या फरकाने रंग्याने नम्बर मारला. फायनलमध्ये जागा मिळवली. पण मावसभावाने सांगितलेले सगळे नियम धाब्यावर बसवून. बैलांना त्रास देऊन.

तिसरी शर्यतही संपली. अर्ध्या तासात फायनल सुरु होणार होती. तोवर बैलांना पाणी चारा खायला टाकून संत्या आणि त्याचे दोस्त झाडाखाली बसले.

"संत्या. लगा. त्ये रंगाची बैलं लै डेन्जर हाईत. लई आवघड हाय लका."

"व्हय लका. या बारीला आपुन काय जिकत नाय."

"ये. **** *** चांगलं बोलताच येत नाय का तुला. ****", सणसणीत शिव्या हासडत संत्या ओरडला.

"बबन्या, पिंट्या मी काय सांगतोय त्ये नीट ऐका."

संत्या दोघांच्या कानाला लागत सांगू लागला. दोघांनी संत्याच म्हणणं ऐकून घेतलं आणि डोकं हलवलं.

"सांगितलेलं काम झालं पायजे. कुणालाबी न कळता. बिनबोभाट."

"संत्या, तू काळजीच करू नगं. तू फक्त शर्यतीव ध्यान दे.", पिंट्या पाठीवर थाप मारत म्हणाला.

फायनाच्या गाड्या चाकोरीमध्ये जाऊ लागल्या. संत्याच्या शेजारी रंगाचा छकडा उभा होता. छग्या - बग्याला धरून तिमा, गुलब्या उभे होते. पिंट्या, बबन्या रंगाच्या छकड्याजवळ गेले. उजव्या चाकासमोर पिंट्या उभा राहिला. रंगाशी काहीबाही बोलण्याचं नाटक चालू झालं.

"पाटील. या बारीस लम्बर मारला पायजे राव. म्हंजी. तुम्हीच लम्बर मारणार."

उसनं हसू चेहऱ्यावर आणत रंगा नुसताच हुंकाराला. पाठीमागे बबन्याने रंगाच्या छकड्याच्या चाकाची कुणी काढून खालून लावली. अन काहीही झालं नसल्याच्या अविर्भावात संत्याच्या बैल धरून उभा राहिला. पिंट्याचं कामं झालं होतं. तो हि तिथून सटकला. काम झालं होतं. संत्या मनोमन आनंदून गेला. 'हि शर्यत आज मी मारणारच.' म्हणून खुश झाला.

इशारतीवाला झेंडा घेऊन स्पिकरवर बैलगाड्या सोडण्याच्या आवाजाकडे कान देऊन उभा होता. एक मिनिट असाच गेला. स्पिकरवर पुकारा झाला आणि पुढच्याच क्षणी झपकन झेंडा खाली आला. एवढा वेळ ओढून धरलेले बैलांचे कासरे ड्रायव्हरांनी एकसाथ ढिल्ले सोडले. पाठीवर थाप पडताच बैलं उधळली. शर्यत सुरु झाली. मागच्या तीन वर्षांपासून रंगानं हे स्वप्न पाहिलं होतं. छग्या आणि बग्याच्या रूपानं पाटील घराण्याची इज्जतच जणू चाकोरीतून दौडत होती. मागोमाग संत्याची बैल होतीच. उजव्या चाकाची कुणी कधीच गळून पडली होती. कुणी नसल्यामुळे कण्यातून चाक मोकळंच फिरत होतं. पण रंगाचं लक्ष तिकडं होतंच कुठं!

        अर्धे अधिक अंतर पार झालं होतं. छग्या आणि बग्याने मैदान मारलं होतं. बाकीच्या गाड्या बऱ्याच मागे होत्या. आजूबाजूला बघ्या लोकांमध्ये एकाच जल्लोष होता. आरडाओरडा, शिट्ट्या मधेच ढोल ताशे ढणढणत होते. साऱ्या गावाचं लक्ष आता आघाडीवर धावणाऱ्या रंगाच्या गाडीकडे खिळलं होतं. क्षणाक्षणाला आतुरता वाढू लागली. संत्या चवताळून बैलांच्या शेपट्या पिरगाळत होता. दाताने चावत होता. जोरजोरात पाठीवर थापा मारत होता. इकडे रंगा नेहमीप्रमाणे बैलांना चिथावणी देत हाकत होता.

        रंगाच्या आवाज बैलांच्या कानावर पडत होता. पाठीवर थाप पडताच दोघेही आणखी जोमाने दौडू लागले. आता फक्त दीडशेक मीटरचं अंतर बाकी होतं. संत्या बराच मागे पडला. अन आक्रीत घडलं, चाकोरीतल्या एका ढेकळावरून रंगाबाच्या छकड्याचं चाक गेलं. उजवी बाजू जरा वर उडाली अन दाणकन खाली आपटली. रंगाबाने स्वतःला सावरायच्या आतच सट्कन कण्यातून चाक निसटलं. छकडा एका बाजूला वेगाने आदळला. त्या जोरदार धक्क्याने रंगाबाच्या हातातले कासरे सुटले. तो छकड्यातुन बाजूला फेकला गेला. बाजूच्या चाकोरीच्यासाठी मारलेल्या कच्यातून एक दगड बाहेर आला होता. रंगाबाचं डोसकं त्याच्यावर आपटलं. रक्ताची चिळकांडी उडाली. रंगाबाचे डोळेच पांढरे झाले. अंगातली सगळी शक्ती एकदमच निघून गेल्यासारखं झालं. हे चित्र बघणाऱ्या लोकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

रंगाला खाली पडलेलं बघताच संत्याला चेव चढला. बैलांना जोरजोरात पाठीवर थपडा मारू लागला.संत्याने बैलांच्या शेपट्या पिरगाळल्या आणि जल्लोषात अंतिम रेषा पार केली. फायनल जिंकली.

          रंगाला खाली पडलेलं पाहताच छ्ग्या बग्या जागीच थांबले. गाड्या पुढे निघून जाताच लोकांनी मैदानात धाव घेतली. रंगाच्या आजूबाजूला लोकांनी गर्दी केली. कुणीतरी डोक्याचा फेटा काढून रंगाच्या डोक्याला गुंडाळला. रंगा अजूनही अर्धवट शुद्धीवर होता. त्याची नजर छग्या बग्याकडं होती. बैल रंगाच्या जवळ आले. रंगाबाच्या डोळ्यांसमोर अंधार दाटु लागला. बैलांकडे बघत कसबसं रंगा म्हणाला.

"माझ्या राजांनो... माफ करा मला... म्या... म्या..", वाक्य पूर्ण व्हायच्या आताच रंगाची शुद्ध हरपली. डोळ्यांसमोर राधाचा चेहरा तरळला. त्याने तिची मनोमन माफी मागितली.

रंगाबाला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. डोक्यातून खूप रक्त वाहिलं होतं. पण दवाखान्यात न्यायच्या आधीच रंगाची प्राणज्योत विझून गेली होती. तिमाच्या मांडीवरच रंगाने शेवटचा आचका घेतला.

रंगा गेल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. संत्याने फायनल जिंकली होती पण तिथं बक्षीस द्यायलाही कुणी उपस्थित नव्हतं. रंगा गेला हे त्याच्यासाठी चांगलंच होतं. राधा आणि त्याच्या मधली आडकाठी बाजूला झाली होती.

-----

        रंगाचं अचेतन शरीर सरणावर जळत होतं. हवेचा झोत येताच आग उसळत होती. बाजूला उभ्या असलेल्या नानाला आगीचा दाह जाणवत होता. पण रंगा जाण्याचं दुःख त्यापेक्षा कितीतरी मोठं होतं. मछिंदर, गुलब्या, इजुआण्णाने नानाला खाली घेतलं. खालच्या लाकडी बाकावर बसवलं. दोन्ही पाय वर घेऊन त्यात डोकं खुपसून डबडबल्या नेत्रांनी आगीच्या ज्वाळांकडे पाहत होता. 

        रात्रीचे अकरा बारा वाजले असतील. मरीआईच्या देवळामागच्या घरातून एक तरुणी हळूच दरवाजा बंद करून बाहेर आली. डोळे आसवांनी डबडबलेले होते. सावकाश पावलं टाकत मसणवट्यातील सरणाच्या आगीच्या दिशेने चालत होती. उंच कठडयावर धडाडून रंगाचं सरण जळत होतं. कठड्याखाली बाजूला रॉकेलचा डबा ठेवलेला होता. नाना, गुलब्या, मछिंदर बसलेल्या बाकाजवळ ती आली. हातातला गाठ मारलेला रुमाल तिने नानाच्या हातात दिला. चालत कठड्याजवळ गेली. डब्यातलं रॉकेल अंगावर ओतलं आणि कुणालाही काही कळायच्या आत तिने स्वतःला रंगाच्या सरणावर झोकून दिलं. कसलाही आवाज नाही, किंकाळी नाही की वेदना नाहीत. ना काही हलचाल. आयुष्यभराचा जोडीदार, ज्यानं आयुष्यभराची साथ देण्याचं वचन दिलं होतं. तोच असा अर्ध्यावर डाव मोडून गेला होता. त्याच्याशिवाय जगण्याचा विचार तिने स्वप्नातही केलं नव्हता. ते दुःख, त्या वेदना आगीच्या ज्वाळांपेक्षा कितीतरी मोठ्या होत्या.

रॉकेलमुळे आग आणखीनच धडाडून पेटली. तिघेही उठून विस्फारल्या नजरेनं पाहत होते. भीतीनं थिजून गेले होते. नानाने हातातला रुमाल पाहिला. गाठ सोडून आतमध्ये असलेलं लॉकेट चमकलं. डोळे पुसून त्याने ते हातात घेतलं. निरखून पाहीलं. सोन्याचं मोरपंख, त्यावर लहान अक्षरे कोरलेली होती.
'राधा - रंगा'

        आगीच्या साक्षीने राधा रंगा एक झाले. कायमचे. शरीराने जरी वेगळे असले तरी त्यांचे आत्मे एकच होते. परमेश्वर तरी त्यांना कसं वेगळं करू शकणार होता!

 

~ समाप्त ~