Her so called freedom... - 1 in Marathi Women Focused by Dr.Swati More books and stories PDF | तिचे सो कॉल्ड स्वातंत्र्य... - 1

Featured Books
Categories
Share

तिचे सो कॉल्ड स्वातंत्र्य... - 1

आज सकाळचीचं गोष्ट.. आमच्या कामवाल्या मावशींनी घरी आल्या आल्या विचारलं ," अहो ताई , ऐकलं का तुम्ही सी विंगच्या त्या मालतीताई आहेत ना, त्यांनी म्हणे, नवऱ्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे ?? मला तर यावर विश्वासाचं बसत नाही बघा .... "

उगाचंच गॉसिपिंग नको म्हणून मी मावशींच बोलणं ऐकून न ऐकल्या सारखं केलं.

पण नकळत माझ्या मनातील विचारचक्र सुरू झालं....

आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या नात्यातचं अशी काही उदाहरणं बघतो किंवा ऐकतो की खूप सुखी, समाधानी दिसणाऱ्या स्त्रिया अचानक घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचलेल्या दिसतात ... त्यावेळी बहुंताश वेळी आपली भूमिका काय असते तर त्या स्त्रीवर गॉसिपिंग करणं...

अगदी सारासार विचार केला, त्यावेळी बहुंताश वेळी आपली भूमिका काय असते तर त्या स्त्रीवर गॉसिपिंग करणं...

आपण तरी करतो का अशा स्त्रीचा सहज स्वीकार ??

जिने स्वतःचं स्वातंत्र्य जपण्यासाठी किंवा तिला होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला असेल ...

चला ; खूप लांबचा विचार नको पण तिचे आईवडील, तिची मुलं ,इतर कुटुंबातील सदस्य तरी करतील का हे मान्य ?
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर 99% नाही..
अगदीच एखादा विरळा..

आणि हे जळजळीत सत्य ती जाणून आहे आहे ... आपण असं काही पाऊल उचललं तर आपल्या आईवडिलांना किती यातना होतील,आपला समाज त्यांना टोमणे मारून मारून हैराण करेल..
"मुलीला खूप शिकवलंत , स्वातंत्र्य दिलंत, आता बघा कशी पांग फेडतेय. कशाची कमी आहे तिला? चांगला नवरा आहे, स्वतःचं घर , मुलं, या सगळ्याचा विचार नाही आला का हिच्या मनात ? "

अगदी बरोबर.....

पण हे सगळं सुरळीत चालू असताना , एखादी का पोचते घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत ??..

लोकांना बाहेरून सगळ छान छान वाटत असलं तरी ती चार भिंतीच्या आत काय सहन करत असेल, काय माहीत?
हा त्रास शारीरिक असू शकतो किंवा मानसिकही ..

मानसिक कुचंबणेचा प्रत्यय बहुतांश स्त्रियांना येत असेल. मग ती गृहिणी असो की नोकरी करणारी....दोघींच्याही वाट्याला हा मानसिक त्रास कमी अधिक प्रमाणात येत असावा. गृहिणी असेल तर तुलनेने आर्थिक परावलंबित्व जास्त. शिकलेली असली तरी तिचा सगळा वेळ घरातल्याचं करण्यातच जात असेल...
कदाचित त्यामुळे तिला सगळ्याच गोष्टींत गृहीत धरलं जात असेल. हिला बाहेरच्या जगातलं काय कळतंय ? इथपासून ते तुला काय काम असतं ग? घरातच तर असतेस??.... अगदी इथपर्यंत..

घरातील कोणताही महत्वाचा निर्णय घेताना कदाचित तिचं मत विचारात घेतलं जात असेलच असं नाही. काही स्त्रिया हे अगदी स्वतः च्या अंतापर्यंत सहन करत असतील . कारण त्यांच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवलेल असतं की एकदा का स्त्री लग्नानंतर उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात आली की ,सरणावर जातानाच तो उंबरठा कायमचा ओलांडावा..

तर काही स्त्रिया एका टप्यापर्यंत हे सगळं सहन करतात पण कधी तरी त्यांची सहनशक्ती संपते आणि त्या घटस्फोटाच्या निर्णयास येऊन पोहचत असतील..
थोड्या फार फरकाने हीच गत नोकरी करत असलेल्यांची असावी. नोकरी म्हणजे फक्त ऑफिस जाणाऱ्या स्त्रियाच नाही.....
अगदी घरकाम करणारी किंवा ती प्रत्येक स्त्री जी काही ना काही काम करून पैसे कमावते,आपल्या संसाराला हातभार लावते; ती एक प्रकारे नोकरीच तर करत असते. त्यांना तर घर आणि ऑफिस दोन्हीकडे तारेवरची कसरत करावी लागत असेल. दिवस कसा सुरु होतो आणि कसा मावळतो हे त्यांचं त्यांनाच कळत नसेल.. घर आणि नोकरी ही कसरत करत असताना नवऱ्याच्या, मुलांच्या, सासरच्या मंडळींच्या सर्वच इच्छा पूर्ण करू शकतीलच असं नाही...
ही घरची मंडळी समजूतदार असतील तर ठीक नाहीतर त्यांचे टोमणे ऐकून तिचा जीव मेटाकुटीला येत असेल आणि ती सुद्धा कदाचित आयुष्यातील एका टप्यावर अति ताण सहन न होऊन घटस्फोटाच्या निर्णयास येऊन पोहचत असेल..
स्त्रीच्या मनाचा वेध घेण्याचा किती जण प्रयत्न करतात.. एका कवीने तिची ही व्यथा सुंदर रित्या मांडली आहे..

तन के भूगोल के परे
एक स्त्री के मन की गांठे खोलकर
कभी पढा हैं तुमने कभी उसके भितर का खौलता इतिहास?
अगर नहीं !
तो जानते क्या हो तुम
रसोई और बिस्तर के परे
एक स्त्री के बारे में ?

बरं,हे झालं मानसिक किंवा आर्थिक स्वातंत्र्याविषयी...

पण आता मी जो मुद्दा मांडणार आहे.. तो खूप नाजूक पण वास्तवाशी निगडित आहे..

स्त्रीची लैंगिक कुचंबणा..