Beg Pack tour to Karnataka - 2 in Marathi Travel stories by Dr.Swati More books and stories PDF | बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 2

Featured Books
Categories
Share

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 2
पहाटे लवकर स्टेशन येणार असल्याने न चुकता मोबाईल मध्ये गजर लावला .. रात्री गाढ झोप लागल्याने सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं..
गाडी अगदी वेळेवर "होन्नावर"ला पोहचली म्हणून बरं ,नाहीतर आमचं पूर्ण दिवसाचं वेळापत्रक कोलमडलं असतं..

प्लॅटफॉर्मवर अजून अंधार होता... स्टेशनच्या मुख्य इमारतीत तेवढे दिवे दिसत होते.. सारी सृष्टी अजून धुक्याची दुलई पांघरून सकाळच्या झोपेत गुडूप होती..

आमची बस अगोदरच येऊन उभी होती.. इथून आम्हाला अंदाजे 60 कि. मी. प्रवास करायचा होता..जोग फॉलच्या थोड आधी "ट्रिनिटी होम स्टे " मध्ये आमची फ्रेश होण्याची सोय केली होती..

सुरवातीला थोडा वेळ बाहेर काहीच दिसत नव्हतं.. बसची काच सरकवून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला,पण थंड हवेच्या झुळकेने सर्वांगावर शहारे आणले.. आधी बरं वाटलं ,नंतर मात्र हुडहुडी भरली मग थोड्या वेळाने काच बंद करून घेतली..

हळू हळू उजाडायला लागलं.. वातावरण ढगाळ असल्याने सूर्यदेवांनी अजून आपलं दर्शन दिलं नव्हतं.. झाडं,वेली, जंगल, पक्षी, मध्येच लागणार एखादं गाव यांना जाग यायला लागली होती..

रस्ता घाट वळणांचा असला तरी सुस्थितीत असल्याने गाडी सुसाट वेगाने धावत होती..
गाडीचा वेग जरी जास्त असला तरी बस चालक खूप काळजीनं गाडी चालवत होता.. प्रत्येक वळणावर न चुकता हॉर्न वाजवत होता.. मी खूप दिवसांनी असा जबाबदार चालक बघितला..

दोन्ही बाजूला घनदाट जंगल आणि मधोमध रस्ता.. तुरळक प्रमाणात वाहतूक..
जागोजागी लावलेले प्राण्यांच्या अस्तित्वाचे फलक... हा भाग कर्नाटक मधील 'शरावती अभयारण्यात" मोडत असल्यानं माणसांची वस्ती खूपच कमी जाणवली.. नजर जाईल तिथपर्यंत उभ आडव जंगल स्वैर वाढलं होतं.. तरतऱ्हेची झाडं वेली फोफावली होती.. माड ,सुपारी वृक्षांची कोण उंच वाढतोय यासाठी जणू स्पर्धाच लागली होती...

असा मस्त प्रवास चालू असतानाच एका ठिकाणी बस थांबली.. उजव्या हाताला अतिशय नयनरम्य देखावा होता..
सगळे पटापट खाली उतरले..

डोंगर रांगांमधून शांत वाहणारी नदी आणि तिच्यावर उतरलेले ढग.. त्या ढगात ती नदी मध्येच अदृष्य होत होती.. हिरवा पांढरा रंग एकमेकांत स्वतःचं अस्तित्व विसरून मिसळले होते..
स्वर्ग म्हणतात तो हाच असेल बहुतेक!!
तिथून हलावसच वाटतं नव्हतं पण पुढील दिनक्रम बाकी असल्याने काळजाच्या एका कुपीत ते दृश्य साठवून तिथून पुढे निघालो..

अर्धा तासात आम्ही "ट्रिनिटी होम स्टेला' पोहचलो.. प्रसादने सगळ्यांना पटापट फ्रेश होऊन घ्यायला सांगितलं.. कारण इथ जर आमच्यापैकी कोणी उशीर केला असता तर एक तरी पॉइंट नक्कीच राहिला असता..
पण सगळे खूप समजूतदार असल्याने अर्धा पाऊण तासात फ्रेश होऊन बसमध्ये बसलेही..

आधी पोटोबा मग विठोबा!!... या उक्तीप्रमाणे आम्ही जवळच असणाऱ्या स्थानिक हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो.. हॉटेल छोटे असले तरी सगळे पदार्थ गरम गरम तयार केलेले होते.
इडली, वडा , डोसा आणि सोबत गरमागरम फिल्टर कॉफी किंवा चहा..
पोटभरून खाल्लं कारण संपूर्ण दिवस भटकंतीचा असल्यानं अंगात ऊर्जा गरजेची होती..

आता दिवसातील पहिला पॉइंट, "जोग फॉल" कडे आम्ही कूच केलं.. तिथून दहा पंधरा मिनिटातच आम्ही जोग फॉलच्या गेटजवळ पोहचलो..
गेटजवळ उतरल्यानंतर अगदी पाचच मिनिटात आपण फॉलसमोर उभे ठाकतो..

"जोगचा धबधबा" हा भारतातील तिसरा मोठा धबधबा आहे. मेघालयातील ३३५ मीटर उंचीचा "नोहकालिकाई" आणि गोव्यातील ३१० मीटर उंचीच्या "दूधसागर" धबधब्यांची उंची याच्या २५४ मीटर उंचीपेक्षा जास्त आहे..
जोग फॉल हा अतिशय घनदाट अशा सदाहरित शरावती अभयारण्यात आहे..

"शरावती" नदीचा उगम तीर्थहळ्ळी तालुक्यात अंबुतीर्थ नावाच्या ठिकाणाहून झाला आहे. प्राचीन आख्यायिकेनुसार, सीतेची तहान भागविण्याकरिता पाणी मिळविण्यासाठी श्रीरामांनी या ठिकाणी आपल्या धनुष्यातून या ठिकाणी बाण (शर) मारला आणि तेथून पाणी उसळले. त्यावरून शरावती हे नाव रूढ झाले.

ही पश्चिमवाहिनी नदी १२८ किलोमीटर प्रवाहित होऊन "होन्नावर" येथे अरबी समुद्राला मिळते. जिल्ह्याच्या वायव्य सरहद्दीवर ही नदी पश्चिमेला वळते. याच ठिकाणी जोग गावाजवळ प्रसिद्ध "जोग फॉल " (गिरसप्पा धबधबा) आहे.

येथे नदीपात्र बऱ्यापैकी रुंद असून, चार स्रोतांनी धबधब्याचे पाणी खाली कोसळते. "राजा", "रोअरर', "राणी" व "रॉकेट" या नावांनी हे प्रपात प्रसिद्ध आहेत.

आम्ही सप्टेंबर महिना अखेरीस गेल्याने धबधब्याचे पाणी खूप जास्त नव्हते.. पण त्याचे हे शांत, संथ, पांढर शुभ्र रूपही डोळ्यांना आल्हाददाक वाटत होते..
ऐन पावसाळ्यात जर इथे भेट दिली तर या धबधब्याचे रौद्र रूप नक्कीच अनुभवायला मिळेल..

धबधब्याच्या पायथ्याशी जाऊ देत नाहीत त्यामुळे व्ह्यू पॉइंट वरूनच आपल्याला त्याचे दर्शन घ्यावे लागते..

या ठिकाणी अर्धा एक तास सहज मोडतो..

आता आम्हाला जवळ जवळ १०० किलोमीटर प्रवास करून "याना केव" बघण्यासाठी जायचे होते..