Guntagunt - 3 books and stories free download online pdf in Marathi

गुंतागुंत भाग ३ (अंतिम)

गुंतागुंत  भाग  ३ (अंतिम )

भाग २ वरून पुढे वाचा ..........

करूणाला सकाळीच जाग आली. आता तिला फ्रेश वाटत होतं. ती उठून बसली. समोरच्या सोफ्यावर संजय झोपला होता. हा माणूस इथे का झोपला होता ? डॉक्टर म्हणाला होते की हा त्यांचा सहकारी आहे म्हणून. पण हा माझ्या खोलीत का झोपला आहे ? आणि नारायणराव  कुठे आहेत ? खरं तर त्यांनीच इथे असायला हवं होतं. ती खोलीच्या बाहेर आली. समोरच सिस्टर लोकांचं डेस्क होतं.

“सिस्टर माझ्या खोलीत कोण माणूस झोपला आहे ? असा कसा तो इथे आला ?” करुणाने तक्रार केली.

सिस्टर चक्रावून गेली. ती खोलीमध्ये धावली.

“अहो मॅडम हे तुमचे मिस्टर आहेत. तुम्ही ओळखलं नाही का ?”

करुणा आता वैतागली होती. ती संजय कडे अंगुली निर्देश करून म्हणाली. “हा काय प्रकार आहे ? हे माझे मिस्टर नाहीयेत. कोणीतरी दुसराच आहे.”

संजयला पण आता जाग आली होती.

“अग करुणा अस काय करतेस, मी संजय, मला ओळखलं नाही का ?”

“नाही. कोण तुम्ही ?” – करुणा.

नर्स मागची मागेच डॉक्टरांना बोलवायला धावली. मोठे डॉक्टर राऊंड घेत होते. नर्स नी त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. ते लगेच आले.

***

पोलिसांची एक जीप गस्तीवर होती. त्यांना मेसेज मिळाल्यावर लगेच ते आले. डेस्क वर जाऊन करुणा मोकाशी कुठे आहेत म्हणून चौकशी केली. मोठे डॉक्टर तिथेच सूचना देत थांबले होते. त्यांनी वाचारलं

“काय झालं साहेब, करुणा मोकाशी ४ नंबर च्या रूम मधे आहेत. पण झालं तरी  काय ?”

“तिथेच चला सर्व स्पष्ट होईल.” .- इंस्पेक्टर वागळे

“हं करूणांबाई मी PSI वागळे. काय प्रॉब्लेम आहे ?”

“हे,” नारायण कडे बोट दाखवून करुणा म्हणाली, “माझे पती आहेत अस सगळे म्हणताहेत. पण साहेब अस नाहीये. माझ्या नवऱ्याचं वय २५ आहे हे तर पन्नाशीचे आहेत. आणि हे, नक्कीच ते नाहीत. मी माझ्या नवऱ्याला ओळखत नाही अस म्हणायचं आहे का तुम्हाला ?”

आता वागळे कन्फ्युज. समोरची बाई तर चाळिशीच्या वरची दिसतेय आणि नावाऱ्याचं वय सांगते आहे २५. त्यांना कळेना की हे काय प्रकरण आहे ते. पण त्यांचा पोलिसी दिमाग झपाट्याने काम करायला लागला होता.

“नारायणराव ही कशावरून, तुमची बायको आहे ? तुमच्या जवळ काही प्रूफ आहे का ?” - वागळे.

“हो साहेब लग्नाचा फोटो आहे.” नारायण राव म्हणाले. “आमची दोन मुलं आहेत. हवं तर लग्नाचं सर्टिफिकेट पण आहे. शेजारी पाजारी आहेत पण हे सगळं घरी आहे.”

“ओके ताबडतोब घेऊन या. आम्ही इथेच थांबतो.” वागळे नारायणरावांना म्हणाले. नारायण राव लगेच निघाले, मग करुणा कडे वळून म्हणाले “करुणा बाई तुम्ही चिंता करू नका. आता आम्ही आलो आहोत आणि या प्रश्नांची तड लावल्या शिवाय जाणार नाही.”

सगळं टेंशन सहन न झाल्यामुळे करूणाचे डोळे मिटले.

तासाभरात नारायण सर्व घेऊन आला. बरोबर मुलं आणि एक शेजारी जोडपं पण आलं होतं.

करूणाने फोटो पाहिला आणि किंचाळली. “अहो ही, मी नाहीये. माणूस तोच आहे पण मी नाहीये.”

वागळे नर्स ला म्हणाले की “आरसा घेऊन या.”

आरसा दाखवल्यावर करुणा पुन्हा किंचाळली. “अहो काय केलं तुम्ही, दोनच दिवसांत  माझं रूप पालटलं ? काय प्रकार आहे हा ?”

आता मात्र कुजबूज सुरू झाली. बाईला बाहेरची बाधा झाली आहे असाच सुर होता सर्वांचा. वागळ्यांनी सर्वांना चूप बसवलं.

“करूणाबाई या फोटोत जी बाई आहे त्या तुम्ही नाही अस म्हणायचं आहे का तुम्हाला ?” वागळ्यांनी विचारलं.

“हो.” – करुणा.

“तुमचं नाव काय आहे. ?” – वागळे.

“करुणा संजय मोकाशी.” – करुणा.

“कुठे राहता तुम्ही, पत्ता काय आहे ?” – वागळे.

“१०२, गुप्ता कॉलनी राजापेठ अमरावती.” – करुणा ठाम पणे म्हणाली. तिला कळताच नव्हतं की आपलं नाव आणि पत्ता का विचारताहेत हे पोलिस.  

आता सगळ्यांनाच वेड लागायची पाळी आली.

“विंचुरकर राजापेठ पोलिस स्टेशनला फोन लावा. करुणा मोकाशी तिथे आहेत का ? याची चौकशी करायला सांगा. मॅटर अर्जंट आहे म्हणून सांगा.” – वागळे.

***

मोठे डॉक्टर आल्यावर त्यांनी संजयला विचारलं की “अजूनही परिस्थिति सुधारली नाही का ?”

संजय ने मान हलवली. तेवढ्यात तिथे पोलिस आले.

“करुणा मोकाशी कोण आहे ? आम्ही तुमच्या घरी गेलो होतो तर तुम्ही अॅडमिट आहात अस कळलं म्हणून इथे आलो.”

“तुम्ही कशाला इथे आला आहात ?” संजय ने विचारलं.

“तुम्ही कोण यांचे ?” – पोलिस.

“मी तिचा नवरा.”

“काय प्रॉब्लेम झाला आहे ?” - पोलिस

“अहो प्रॉब्लेम वेगळाच आहे आणि डॉक्टर त्याचीच तपासणी करताहेत. पण तुम्ही इथे कसे आलात ?” संजय ने विचारलं.

“आम्हाला पुण्याच्या हॉस्पिटल मधून पोलिसांचा फोन आला आहे की तिथे अॅडमिट असलेल्या बाई आपलं नाव करुणा संजय मोकाशी रहाणार अमरावती अस सांगत आहेत.” – पोलिसांनी सांगितलं.

आता काय करायचं ? सगळेच किंकर्तव्ययमूढ अवस्थेत उभे. कोणालाच काही कळत नव्हतं की आता काय करायचं ते.

पोलिसांनी विचारलं “बाई तुमचं नाव आणि पत्ता काय आहे ?”

“करुणा नारायण मोकाशी रहाणार पुणे.” – करुणा.

“इथे अमरावतीच्या दवाखान्यात तुम्हाला कुणी आणलं ?” – पोलिस.

“मला माहीत नाही पण सगळे म्हणतात की ह्यांनी” अस म्हणून करुणा ने संजय कडे बोट दाखवलं.

आता अदला बदल झाली हे सगळ्यांना कळलं. पण काय करायचं ते कळत नव्हतं.

शेवटी सर्वानुमते अस ठरलं की नारायण आणि संजय दोघांनी एकमेकांशी बोलावं आणि काय ते ठरवावं. यांच्यासाठी त्यांना आजचा दिवस देऊ. नाहीच काही तोडगा निघाला तर उद्या बघू.

***

आमरावतीची सगळी कहाणी ऐकल्यावर पुण्यात सुद्धा तसंच करण्याबद्दल सहमति झाली. आणि गोष्टी दुसऱ्या दिवसांवर ढकलण्यात आल्या .

***

यमदूतांनी आपलं काम बरोबर केलं आहे की नाही हे पहाण्यासाठी अधिकाऱ्याने पुण्याला आणि आमरावतीला फेरफटका मारला, आणि झालेला सगळा गोंधळ त्यांच्या लक्षात आला. त्यांनी दोन्ही दूतांना बोलावून चांगलं फैलावर घेतलं. ताबडतोब सगळं पुन्हा पहिल्या सारखं करा नाहीतर दोघंही नरकात गेलेच म्हणून समजा. असा सज्जड दम भरला. त्याच रात्री सर्व जण गाढ झोपतील अशी व्यवस्था करून दोन्ही दूतांनी प्राणज्योतींची अदला बदल करून टाकली. या कानांचं त्या कानाला देखील कळलं नाही.

***

दुसऱ्या दिवशी सगळं काही नॉर्मल. दोघी करूणांना गेल्या दोन दिवसांत काय काय घडलं ते काहीच आठवत नव्हतं. बाकीच्या सर्वांनी पण खोलात न शिरण्याचा शहाणपणा दाखवून आनंद साजरा केला.

******समाप्त.********

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com