Mrugajal - 1 books and stories free download online pdf in Marathi

मृगजळ - भाग 1

 

 

आठ वाजून गेले होते. कामवाल्या मावशींनी अचानक सुट्टी घेतल्याने मनीषाची घाई उडाली होती. त्यात सकाळी सकाळी चुलत बहिणीचा - समीराचा - फोन आला आणि ' असशील तशी ये.. ' ह्या रडक्या आवाजातील विनंतीनंतर मनीषाला राहवलं नाही. चुलत असली तरी बहीणच होती. भांड्याची जबाबदारी आपल्या मुलीवर टाकत, थोड्याश्या सूचना देऊन ती बेडरूममध्ये पळाली. कपाटातून लागेल ती ओढणी गळ्यात टाकत तिने पर्स उचलली आणि पळतच बाहेर निघाली.

 

सकाळची वेळ त्यामुळे निदान ऑटो वेळेवर मिळाली. पण ऑटोवाल्याचं साशंक नजरेने पाहणं तिला जास्तच खटकलं. त्याला नाही म्हटलं तर दुसरी रिक्षा मिळेपर्यंत वांधेच होते... कॅबची वाट पाहण्यात लेट होईल म्हणून तिने तो ऑप्शन टाळला. तसही ' रस्त्यात गर्दी असेल सो डोन्ट वरी ' असं स्वतःलाच समजावत तिने त्याच्या विचित्र नजरेकडे सपशेल दुर्लक्ष केलं. ऑटोवाल्याला पत्ता सांगून तिने आधी ऑफिसला सुट्टीचा मेल टाकला. आपल्या टीमला आजच्या दिवसाचा टास्क व्हाट्सअँप टाकून ती जरा रिक्षात टेकून बसली. सकाळ असल्याने रस्त्यावर ट्राफिक होतंच. तसं पाहायला गेलं तर दोन्ही बहिणींची घर अर्ध्या तासाच्या अंतरावर पण चार रस्त्यावरच्या सिग्नलने ते अंतर एक तासाच केलं होत. अजूनही लाल सिग्नल चमकत होता. सहजच टाईमपास म्हणून ती ही सवयीने टायमरसोबत काउंटिंग करत होती आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी चमकलं. तिची नजर आपोआप स्वतःवर गेली. स्वतःचे कपडे पाहून ती क्षणभर शरमली. डोक्यातल्या विचारांसोबत ती घरातल्या कपड्यांवरच निघाली होती. मगाशी रिक्षावाल्याचा विचित्र नजरेचा तिला लगोलग उलगडा झाला. तरी लेक निघताना काहीतरी म्हणाली होती पण.. जाऊदे. असं ठरवून दुर्लक्ष केलं तरी डोक्यातून विचार काही जात नाही. रोजच्या वापराचा धुवट लाल रंगाचा कुर्ता, काळा कॉटनचा पायजमा आणि हाताला लागलेली पण रंग लक्षात न आलेली पिवळी ओढणी.

 

" अरेरे.. मी का अशी वेंधळी आहे.." स्वतःच्या धांदरटपणावर मनातल्या मनात कपाळावर हात मारला. " एका पोरीची आई आहे मी.. तरीही अक्कल नाही मला... हुह.. आता तिथे गेल्यावर काम सोडून माझ्या ड्रेसिंग सेन्सवर कमेंट्स पास होणार.. देवा.. मी बोलेन कि घाईत निघाली.." तिने मनातच समीराला काय उत्तर द्यायची तिची तयारी चालू केली.

 

समीरा म्हणजे त्यांच्या खानदानातील मॉडेलच. ' मध्यमवर्गीय कुटुंबात नसती तर फिल्म इंडस्ट्रीत पोचली असती माझी पोर ' हा तिच्या आईचा अगदी नेहमीच डायलॉग. समीरा होतीच तशी. गोरापान नितळ रंग, तपकिरी पिंगट रेखीव डोळे, लांबसडक केस आणि नाजूक गुलाबी ओठ. शाळा कॉलेजमध्ये कायमच तीच एकटी प्रकाश झोतात असायची. तिच्यासोबतची मनीषा मात्र आपल्या सावळ्या रंगामुळे नेहमीच उपेक्षित राहिलेली. पण त्यांच्या आजोबांच्या धाकामुळे, केवळ अभ्यास एके अभ्यास करावा लागत असल्याने समीराच हिरोईन बनण्याचं स्वप्न अधुरच राहील. आरस्पानी म्हणावं असं सौंदर्य लाभल्याने तिच्यासाठी लग्नाच्या स्थळांची रेलचेल तशी बऱ्याच आधीपासून सुरु होती. ‘ सौंदर्य असताना शिक्षणाची काय गरज..?’ असं वाटल्याने एका उच्चं मध्यमवर्गीय घरात वयाच्या अवघ्या तेवीस वर्षात सून बनून मुंबईत आली. तिच्या नवऱ्याच्या घराची सुखवस्तू परिस्थिती आणि शानशौकीची सवय तिच्या चांगलीच पथ्यावर पडली. तिच्या नवनवीन फॅशनला नवऱ्याचाही पाठिंबा असल्याने तिच्या सौन्दर्याला आता वेगळाच तोरा येऊ लागला होता. त्या नादात ती सावळ्या मनीषाला मात्र नाव ठेवायचं सोडत नसे.

 

आपल्या समाजात अजूनही सौन्दर्याची व्याख्या कातडीच्या गोरेपणाशी होत असल्याने, मनीषाचा रेखीव चेहरा, मृगनयनी डोळे, चाफेकळी नाक इत्यादी सगळं सरसकट कुरुपतेच्या पारड्यात पडलं. येणारे जाणारे तिच्या रंगावरून तिला सतत टोमणे मारत असत. त्यामुळे तिला कधी स्वतःकडे विशेष लक्ष द्यावासदेखील वाटलं नव्हतं. ज्याची परिणीती तिच्या सो कॉल्ड आऊटडेटेड फॅशनसेन्समध्ये कधी झाली तिलाही कळलं नाही. फॅशन ह्या शब्दापासून कोसो दूर असणारी मनीषा अभ्यासात मात्र अत्यंत हुशार होती. ग्रॅज्युएशननंतर एम बी ए करत ती एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर रुजू झाली. दरम्यानच्या काळात समीराला एक तिच्यासारखीच सुंदर मुलगी झाली. नोकरीच्या चक्रात अडकल्याने आणि न पुसता येणारा डार्क रंग असल्याने मनीषाला मनासारखा जोडीदार मिळायला जरा उशीरच झाला. पण मिळालेल्या जोडीदाराला रंगरूपापेक्षा गुणवत्तेची किंमत जास्त असल्याने लग्नानंतरही तिची करियरमधील भरारी कायम राहिली. काही वर्षांत मनीषालाही मुलगी झाली पण तिचा रंगही सावळा असल्याने समीरासकट तिच्या आईनेही नाक मुरडलं. ' काय बाई हिचा रंग... आईवरच गेलीय बघ... कस काय होणार हीच देव जाणे..' बारशाला आशिर्वादाऐवजी असे कडवे बोल ऐकून मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं होत पण आपलीच माणसं म्हणून तिने सोडून दिल.

 

समीरा आणि तिच्या नवऱ्याने आपल्या मुलीला सियाला अगदी मॉडर्न पद्धतीने वाढवलं होत. तिची स्वतःची अधुरी राहिलेली स्वप्न ती सियात पाहत असावी कदाचित. त्यामुळेच सौंदर्यवान सियाला हट्टी आणि उद्धटपणाचं गालबोट लागलंच होत. बर कोणी काही सांगावं तर समीराचं बोलणं कोण ऐकेल म्हणून कित्येक वेळा मनीषाही सियाच वागणं न पटून गप्पच राहिली होती. याउलट मनीषाची मुलगी नित्या होती. घरातील आई वडिलांचे संस्कार आणि त्यांचे आदर्श समोर असल्याने तिचाही ओढा बाकी सर्वांपेक्षा अभ्यासाकडे जास्त होता. ' योग्य वयात योग्य त्या गोष्टी कराव्या ' अशी मनीषाची शिकवणच होती. त्यामुळे नित्याने कितीवेळा स्वतःला सावरलं होत.

 

विचारांच्या तंद्रीत मनीषा समीराच्या घरी जाऊन पोचली. रोजची मेकअप ल्यालेली आणि हसतमुखाने स्वागत करणारी समीरा आज भकास रडून सुजलेल्या चेहऱ्याने सामोरी आली. तिचे लालभडक डोळे पाहून ती रात्रभर झोपली नसावी हे मनिषाने ताडलं. समीरा रडत बसलीय म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं असावं ह्याचा अंदाज बांधण्याइतकी मनीषा हुशार नक्कीच होती.

 

" मनीषा...” नेहमीच तोरा उतरवून समीरा मनीषाच्या गळ्यात पडून रडू लागली.

 

" काय झालं.." मनीषाला समीराची अशी प्रतिक्रिया अजिबातच अपेक्षित नव्हती. साधी लिपस्टिकही टिश्श्यू पेपरने पुसणारी समीरा गबाळ्या मनीषाच्या गळ्यात पडून रडणं कधी मनिषाने स्वप्नातही पाहिलं नव्हतं.

 

“ मनीषा.. सिया... सिया लिव्ह इनमध्ये राहायचं बोलतेय..” रुमालाने डोळे पुसत समीरा कशीबशी उत्तरली.

 

" काय...?" आता मात्र मनीषाला शॉक बसला. इतकी स्मार्ट सिया असं काहीतरी करेल ह्याची मनीषाला अजिबातच कल्पना नव्हती.

 

" हा.. आणि भरीस भर म्हणून मी ना मागच्याच आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीने सियाच इंस्टाग्राम अकाऊंट दाखवलं... आणि तिचे ते फोटोज आणि व्हिडिओज पाहून मला चक्करच आली ग... मला तर तिने ब्लॉकच केलं होत.." समीरा नाक पुसत बोलू लागली.

 

" अच्छा..." मनीषानेही सियाच प्रोफाइल पाहिलं होत. तिचे प्रमाणापेक्षा जास्तच छोटे कपडे पाहून एक दोन वेळा तिने समजवायचा देखील प्रयत्न केला पण सियाच्या उलट उत्तराने तिची बोलती बंद केली होती.

 

" कस सांगू.. हे बघ.." समीराने तीच प्रोफाइल ओपन केलं. इंस्टाग्राम रिल्सवर तिचे बरेचसे छोट्या तंग कपड्यातील अश्लील वाटावे असे व्हिडीओज होते. कित्येक व्हिडीओजमध्ये तिने मुद्दामहुन आपल्या बॉडी पार्टसच्या हालचाली अधोरेखित होतील अश्या स्टेप्स केल्या होत्या. अगदीच अर्धनग्न वाटावं अश्या अवस्थेतील फोटो पाहून मनिषाच्याही तोंडच पाणी पळालं. त्या फोटोज आणि व्हिडीओजवर आलेल्या कमेंट्स वाचायचही तिला भान उरल नव्हतं. 

 

" हे काय आहे.. तुला कळलं नाही का.." मनिषाने आश्चर्याने विचारलं. मनीषाच्या एक दोनदा टोकण्यावरून सियाने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते. समीरालाही तिने आडून आडून सुचवलं होत त्यावर ' तुला फॅशन म्हणजे काय कळत का..' ह्या शब्दात समीराने तिला सुनावलं होत.

 

" नाही ना... माझ्या त्या मैत्रिणीने मला तीच अकाऊंट दाखवलं म्हणून कळलं... नाहीतर मी तर सियावर आंधळा विश्वास ठेवला होता... डान्स करण, मिम्स बनवणं…ठीक आहे पण सध्या कपड्यांचही भान असू नये का... ब्राच्या आकाराचा टॉप घालून ही स्वतःला मॉडेल म्हणवून घेतेय आणि त्याखालच्या कमेंट्स.. शी... आमच्याच सोसायटीतील कितीतरी मुलं मुद्द्दाम आमच्याभोवती का घिरट्या घालतात हे आज कळलं मला.." समीराला पुन्हा सगळं पाहून शिसारी आली.

 

" पण तुला तर सियाने मॉडेल व्हावं असं वाटत होत ना.. मग.. तिथे तर न्यूड फोटो शूट पण करतात.." मनिषाने मुद्दामच समीराची फिरकी घेण्याचं ठरवलं. सियाच्या मॉडर्न असण्यामागे समीराचाच तर हात होता. शाळेच्या वयातही सियाला वारंवार पार्लरमध्ये घेऊन जाण, तिची फिगर व्यवस्थित मेंटेन व्हावी म्हणून तीच डाएट मॅनेज करण, तिचा रंग अजूनच उजळावा म्हणून ट्रीटमेंट करण, तिला मेकअप शिकवण, शाळेच्या परीक्षा बुडवून ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पार्टीसिपेट करण आणि सोशल मीडियावर तिला प्रसिद्धी मिळावी म्हणून जीवाचा आटापिटा करणारी समीरा आता रडत का होती हे मनीषाला कळत नव्हतं. न कळत्या वयात तिने सियाकडून जे काही करवून घेतलं होत त्याचेच हे दुष्परिणाम होते.

 

" अग मॉडेल असती तर वेगळं होत. ते त्यांचं प्रोफेशन आहे.. आवश्यक ती काळजी घरत असतील. पण कशात काय नसताना आहे जे अंग प्रदर्शन तिने मांडलंय ते डोईजड आहे.." मनीषाचं तिरकस बोलणं समीराच्या डोक्यात गेलं नव्हतं.

 

" बर मी बोलून बघू का तिच्याशी..?” समीराशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. ती आपल्याकडून काही चूक झालाय हे मानायलाच तयार झाली नसती. तिला तर असं वाटत होत कि समीराला कपड्यांचा नाही तर लिव्ह इनमध्ये राहण्याचा प्रॉब्लेम असावा.

 

" आम्ही दोघेही बोलून झालोय तिच्याशी पण ती ऐकत नाहीये.. आम्ही आऊटडेटेड वाटतोय तिला.. तुझंपण काही ऐकेल का नाही देव जाणे.."  समीराने पुन्हा रडत नाकाशी रुमाल नेला. " तुला तर अजूनही जगात काय चाललंय त्याची माहिती नाही.."

 

समीराच्या बोलण्याचा मनीषाला प्रचंड राग आला. प्रसंग काय आहे त्यातही ती मनीषाला बोलायची संधी सोडत नव्हती. ' आह..' पण तरीही मनिषाने तिच्याकडे दुर्लक्ष करत सियाशी बोलायचं ठरवलं. सियासारख्या अति मॉडर्न विचारांच्या मुलीला मनिषासारख्या काकूबाईटाईप बाईचं किती पटेल ह्यात तर शंका होतीच... पण मोठी व्यक्ती म्हणून एकदा बोलणं हे कर्तव्य होत.

 

" हाय सिया.." बेडरूमच्या दारावर टकटक करत मनीषा हळूच आत डोकावली.

 

" हाय मावशी.. काय यार तू कसे कपडे घालून आलीस.." सियाची नेहमीची टकळी चालू झाली. ' आधी हिची आई.. आता ही... सकाळी सकाळी उगाच अपमान झाला... '... सियाच्या अश्या स्वागताचा मनीषाला रागच आला... पण तरीही मावशीपण निभवायचं होत.

 

" चुकलं बाबा.. पुढच्या वेळापासून शॉर्ट्स घालून येईन.." मनीषा हसतच बेडरूममध्ये आली. सिया मनीषाला बसायला खुर्ची देऊन पुन्हा लॅपटॉपमध्ये घुसली.  

 

" काहीही काय मावशी.. तशी तू त्याच्यातही हॉट दिसशील म्हणा पण नको आमचं मार्केट डाउन होईल उगाच.. पण काही बोल हा तू स्वतःला बरच मेंटेन केलंस का.. ते ही ऑर्गॅनिकली.." मनीषाकडे न पाहताच सियाची बडबड चालू होती. मनिषाने एकवार रूमवर नजर फिरवली. एखाद्या फिल्ममध्ये असावा असा तिचा बेडरूम सजवला होता. मागे एकदा समीरा बोलली होती कि सियाच्या बेडरूमच्या फक्त रिनोव्हेशनचा खर्च साडेतीन लाख रुपये आला म्हणून... किंमत ऐकून तर आपण उडालोच होतो. आता कुठे कॉलेजला जायला लागली होती पोरगी.. तिच्या हट्टासाठी इतकं महागडं रिनोव्हेशन... इथे आपण नित्याच्या शिक्षणासाठी पै पै जोडतोय इथे हे लोक शिक्षण फाट्यावर मारत रूमला सजावतायत...

 

" रूम छान आहे ग.." उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मनीषा बोलून गेली.

 

" थँक्स.. पण इतकाही खास नाहीये... अजून थोडा मॉडर्न हवा होता पण डॅडची ऐपत नाहीये ना..." सिया तोंड वाकड करत उत्तरली. ' ऐपत ' हा शब्द ऐकताच मनीषाला ठसका लागला. पोरीने बापाची ऐपत काढावी आणि ते ही स्वतः रुपयाही कमावत नसताना...

 

" असं बोलू नये ग..." मनीषा कसबस समजावणीच्या स्वरात उद्गारली. " तुझ्या डॅडने तर किती काय काय केलाय तुझ्यासाठी... आणि तूपण तर त्यांच्यावर प्रेम करतेस.. पाहिलेत मी तुझे व्हाट्सअँपचे स्टेटस..."

 

" स्टेटस म्हणजे काही खरं आयुष्य नसत ग... मला डॅडचे विचार नाही पटत... तो खूप ओल्ड स्कुल आहे.." सियाच्या स्वरात तसाच बेफिकीरपणा होता.    

 

" अच्छा.. असं का.. पण एक ना..एक बोलायचं होतं " सियाच तत्वज्ञान ऐकून मनीषाला हसू येत होत. हिच्याही नजरेत आपण अडाणीच आहोत तर...

 

" मम्माने बोलावलं का..?" सियाने डोळे मिचकावत विचारलं. इतक्या सकाळी मनीषाचं तिथे येणं हे नक्कीच सहज नव्हतं.

 

" हो.. मलाही कधीपासून बोलायचं होतं.." सियाला अंदाज आला आहे हे एका अर्थी बरंच झालं. नाहीतर सुरुवात कुठून करायची ह्याचही मनीषाला टेन्शन होत.

 

" ओह्ह गॉड.. तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे.. मी काही केलं तरी प्रॉब्लेम नाही केलं तरी प्रॉब्लेम.." सिया वैतागली.

 

" म्हणजे.." सियाच चिडणं साहजिक होत. पण ' प्रॉब्लेम ' कसला हे मनीषाला समजलं नव्हतं.

 

" मम्माला मला मॉडेल बनवायच आहे.. पण माझ्या कपड्यांवरून उगाच किरकिर करते.. माझं इन्स्टा पाहिलं तर आता माझ्या रिल्स आणि फोटोजचा पण इश्यू आहे... करू तर करू काय..?" सियाची चिडचिड तिच्या दृष्टीने चुकीची नव्हती.

 

" तुला काय वाटत... तुझे असे फोटोशूट आणि रिल्स पाहून तुला मॉडेलिंगसाठी ऑफर्स येतील..?" मनिषाने तिच्या डोळ्यात पाहत प्रश्न केला.

 

" तस नाही... फॉलोवर्स तर वाढतील... आपले फॅन्स असणं किती वॉव असत.. इट गिव्हज सेलिब्रेटीवाली फिलिंग..." मनीषा कदाचित सियाच्या आवडीचे प्रश्न विचारत होती. किंवा सियाला आपल्या अडाणी मावशीला ज्ञान देण्याची संधी मिळाली होती.

 

" अच्छा.. मस्त.. पण त्याचा उपयोग काय.. तुझे फॅन्स वाढले तर तुला काय पैसे वगैरे मिळणार का..? कि तू आपोआप सेलिब्रेटी होणार..? आणि हे सेलिब्रेटीच स्टेटस आयुष्यभर राहणार का..?" तिने सियाच्याच उत्तरावर प्रश्न केला. निदान तिच्या कलाने तिच्या मनात काय चाललंय हे कळलं तरी खूप होत.

 

" नाही ग... फक्त फॅन्स वाढतात.. कधी कधी ब्रॅण्ड्स त्यांच्या प्रोडक्टची ऍड करायला रिल्स किंवा टिकटॉक सेलिब्रेटीजची निवड करतात... तर त्यातून पैसे मिळतील ना... आणि तसही आज ना उद्या मॉडेल बनायचच आहे तर आतापासूनच फॅन्स नकोत का...?" सिया अजूनही स्वप्नातच होती. तिची सोशल मीडियाबद्दलची समज आणि ज्ञान किती तोकडं आहे हे मनीषाला समजलं. त्यामुळे सियाच चूकण चुकीच नव्हतं. त्याहीपेक्षा तिला समीराचा राग होता. मॉडेलिंगबद्दल तिने किती भरवलं होत सियाच्या डोक्यात.

 

" अच्छा... पण मला सांग ब्रँडला काहीतरी क्वालिटी कन्टेन्ट पाहिजे असेल ना... असाच रँडम कोणाला तरी ते थोडी ब्रँड अँबॅसिडर बनवणार... आणि तू जे काही अपलोड करतेस तो खरंच क्वालिटी कन्टेन्ट आहे का ग..? " मनीषाला सियाला कसही करून कात्रीत पकडायचं होत.

 

" अ... असं काही नाही ग... फॉलोवर्सपण मॅटर करतात ना..." मनीषाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे सियाला समजेना. पण मावशीला काय समजतंय म्हणून तिनेही काहीतरी उत्तर देऊन टाकलं.

 

" बरं.. असेल आणि तू जे लिव्ह इन मध्ये राहायचं म्हणतेयस हा तुझा बॉयफ्रेंड आहे का...?" बारीक नजरेने सियाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत मनिषाने पुढचा प्रश्न केला.

 

" हो.." सियाच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती. मावशीकडून इतका ऍडव्हान्स प्रश्न तिला अपेक्षित नव्हता.

 

" वाईट नको वाटून घेऊस पण तो काय करतो हे माहितेय का..?" मनिषाने मुद्दाम गरीब चेहरा करत विचारलं. उगाच सियाचा राग आकाशात पोचायला नको.

 

" मावशी प्लिज.. किती चौकश्या करणार अजून.. तू काहीही सांगितलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही..."' मावशीच्या अजून एक प्रश्नावर सिया भडकली. हे नक्कीच तिच्या मम्मीने करायला सांगितलं असणार...

 

" सॉरी ग बाळ.. मी जस्ट विचारलं.. तुझ्या बाजूने जर मम्मीपप्पांशी भांडायचं झालं तर मला माहित नको का..?" मनिषाने वेगळीच गुगली टाकली. मनातल्या मनात सियाला ते पटू दे म्हणून प्रार्थनाही केली.

 

" ओके... तो फोटोग्राफर आहे.." सियाला मनीषाचं बोलणं थोडाफार पटलं होत.

 

" अच्छा फोटोग्राफर आहे म्हणून बॉयफ्रेंड झाला वाटत.." मनीषा हसतच उद्गारली.

 

" काय मावशी तू पण.." मनीषाचा हा तीर बरोबर लागला होता. सियाने अप्रत्यक्षपणे ते कबूल करून टाकलं.

 

" अजून एक प्रश्न ना.. तुला त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये का राहायचं..?" आपल्या चेहऱ्यावर तसेच मिश्किल भाव ठेवत मनीषा मुख्य प्रश्नावर आली.

 

" अं... " सियाकडे ठोस असं उत्तर नव्हतंच. " म्हणजे तो माझा पोर्टफोलिओ बनवेल ना.. आणि आय ह्याव ग्रोन अप... मी एकटी राहू शकते ना..."

 

" बरं.. मोठी तर आहेसच... फॉरेनमध्ये तर पोर वेगळी राहतातच ना..." मनीषानेही सुरात सूर मिसळला.

 

" हा ना.. बघ तुला पण पटतंय ना... थँक गॉड... तू खूप ओपन माईंडेड आहेस मावशी.. सॉरी मी तुला चुकीचं समजत होती..." एव्हाना सियाचा मनीषावर विश्वास बसला होता.

 

" हो तर.. मी आहेच... पण माझ्या डोक्यात थोड्या शंका आहेत... विचारू का..? सिया बोलायच्या मूडमध्ये येत असलेली पाहून मनीषालाही बरं वाटलं.

 

" हा विचार ना..." सिया खांदे उडवत हसतच उत्तरली. मावशीच्या कोणत्याही प्रश्नाला आपण चुटकीसरशी उत्तर देऊ ह्याचा तिला आत्मविश्वास होता.

 

" हे लिव्ह इन मध्ये राहायचं म्हणजे तुम्ही दोघंच असणार मग घराची काम... त्याच काय करणार..? तुला तर किचनच काहीच माहित नसेल... आणि टॉयलेट बाथरूम साफ करणं, कपाट नीट लावणं, घरात कमीत कमी दोन वेळा तरी झाडू मारणं, सगळ्यावरची धूळ पुसणं, लाईट बिल, वायफायच बिल, घराचं भाडं, दूध, भाजी, किराणासामान आणि बरंच काही काही.. हे सगळी कस मॅनेज करणार..?" मनिषाने घाम फोडणारा प्रश्न केला.

 

" इतकं सगळ असत का..?" सियाच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.." बाई ठेवू ना त्याच्यासाठी.. त्यात काय..?" तिच्या घरात तिने लहानपणापासून कामाला बाई पाहिली होती. त्यामुळे घरात कामही असतात हे तिच्या गावीच नव्हतं.

 

" बाई ना जेवण, झाडू, भांडी, लादी हे सगळी करेल... जास्त पैसे दिलेस तर भाजीही घेऊन येईल पण बाकीचं काय...? बरं करशील कसतरी मॅनेज पण ती बाई किती पैसे घेईल ते तरी माहितेय का..? तुझं तर अजून कॉलेज बाकी आहे. फॉरेनमध्ये पोर निदान हॉटेल, कॅफेमध्ये वगैरे काम करतात. पण तू इथे इंडियामध्ये असं करशील का.. म्हणजे तुझ्या सेलिब्रेटी स्टेटसला ते पटेल का..?" मनिषाने तिला सत्य दाखवायचा चंगच बांधला होता.

 

" ओह्ह... पण.. उम्म.. तो पे करेल ना.." सियाला अजून काही सुचत नव्हतं. मावशीने सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे विचार केला तर लिव्ह इन म्हणजे झंझट वाटू लागली होती.

 

" त्याचा पगार किती आहे माहिती आहे का तुला..? " सियाच्या मनातील खळबळ मनीषा तिच्या चेहऱ्यावर वाचू शकत होती.

 

" पन्नास हजार आहे.. तो बोललेला मला..." सिया काहीस आठवून म्हणाली.

 

" अच्छा चल एक छोटासा हिशोब करूया..." मनीषा ओठात हसू दाबत बोलू लागली.

 

" कशाचा..?" सियाला हिशोब हाच शब्द नवीन होता. आजवर तिला कधी हिशोब मांडायची वेळच आली नव्हती.

 

" महिन्याच्या खर्चाचा... आता तुम्ही राहणार अंधेरीच्या पुढेच.. तिथेही लिव्ह इनसाठी रूम मिळणं मुश्कीलच त्यामुळे थोडासा चढ भाडं द्याव लागणार ना.. कमीत कमी वन बीएचके पाहिजेच. जास्त नाही पण आपण कमीत कमी भाडं पकडूया पंचवीस हजार..." मनिषाने तिथल्या टेबलवरचा कागद पेन घेत हिशोब लिहायला सुरुवात केली.

 

" क्काय..?" पंचवीस हजार हा आकडा ऐकून सियाला चक्करच आली.

 

" हो.. मी कमीत कमी बोललीय... आपल्याच एरियात वन बीएचके वीस हजारात जातो..." मनिषाने सियाचा चेहरा न्याहाळला. " आता हिशोबाकडे ये... किरणासामानाचे तुझं डाएटवाल सामान पकडून कमीत कमी पंधरा हजार तर कुठेच गेले नाहीत. भाजी, दूध, चिकन, मासे वगैरे पाच हजार तर असेच होतील. लाईट बिल, वायफाय, रिचार्ज वगैरेला अजून पाच हजर पकड... अय्या सॅलरी तर संपली.. बाकीचं कस करणार मग... तुझी शॉपिंग, मेकअप, हॉटेलिंग, पब... "

 

" मावशी बस.." सियाने वैतागून कानावर हात ठेवले. " मला नाही जायचं कुठे.." मनिषाने फक्त वस्तुस्थिती दाखवली आणि सियाने त्याच्यातच हार मानली.

 

" अगं पण..." मनीषाचं अजूनही समाधान झालं नव्हतं.

 

" नाही... मी इतका विचारच केला नव्हता. महिन्याचा इतका खर्च असतो हे मला आज समजतंय... डॅड कसा मॅनेज करत असेल... मला ना ऍक्च्युली त्याने फोर्स केला लिव्ह इनसाठी आणि मीपण युट्युबवर व्हिडीओज वगैरे येतात ना ते पाहून एक्साईट झालेली. त्यात ते लोक कस लिव्ह इन मध्ये राहतात. त्यांच्या पेरेंट्सला पण चालत ते.. ते पाहून माझे मॉम डॅड अगदीच आऊटडेटेड वाटायला लागलेले.." सियाच्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव तरळू लागले.

 

" मनोरंजनाचं विश्व् किती आभासी असत ते तुला आता मी सांगायला हवं का सिया... ते सगळ स्क्रिप्टेड असत ग... आणि अगदी ते खरंच राहत असतील तर त्यांच्याकडे इन्कमसोर्स पण असेल ना तगडा..." मनीषाचा सूर समाजावणीत बदलला.

 

" हो.. असेलच.." सिया निरुत्तर होती.

 

" आणि एक वाईट ते सांगू...?" मनिषाने पुन्हा परवानगी मागितली.

 

" हा बोल... " सियाला मावशीकडून अजून ऐकायचं होत. केवळ महिन्याचा हिशोब हि एकाच गोष्ट तिला नकार द्यायला पुरेशी नव्हती.

 

" तुमच्या रिलेशनशिपचा पाया काय आहे हे तुलाही माहित आहे.. इट इज जस्ट अ कॅज्युअल रिलेशनशिप... जास्तीत जास्त सहा महिने टिकेल.. मग काय..? त्यानंतर पुन्हा दुसरा पार्टनर शोधणार पुन्हा त्याचाशी लिव्ह इनचा संसार मांडणार... लिव्ह इनची व्याख्या मी तुला सांगायची गरज नाही ना.." मनीषा अजूनही सियाशी नजर मिळवायचा प्रयत्न करत होती.

 

" हम्म.." सियामध्ये मावशीकडे पाहण्याचं धाडस नव्हतं.

 

" स्वतःच्या इमोशन्सचा, शरीराचा बाजार नाही का झाला हा... ह्याच्यात तुझं करियरच स्वप्न तर तसही पूर्ण होणार नाही... एक वेळ अशी पण येईल कि स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी तुला दुसऱ्याच्या शरीराची भूक भागवावी लागेल..." मनीषाचे शब्द अडखळले.

 

" मावशी.." सियाचे डोळे भरून आले होते.

 

" ह्या मॉडेलिंग आणि फिल्मच्या क्षेत्रात नशीब आजमावायला दिवसाला हजारो लोक येतात. तुझ्यापेक्षाही सुंदर, शिकलेल्या, मॉडर्न आणि काही तर एक्स्पेरिएन्स्ड पण असतात.. पण त्यातल्या किती यशस्वी होतात माहितेय.. एक टक्का पण नाही... काही मागे निघून जातात तर काही दारू, ड्रग्जसाठी शरीराचा सौदा करत राहतात. काहींनी हाय प्रोफाइल एस्कॉर्ट बनायचा मार्ग स्वीकारलेला असतो. ह्या सगळ्या संज्ञा कदाचित नवीन असतील तुझ्यासाठी.. थोडं गुगल कर मग तुला वास्तव समजेल... तू अजूनही शिकतेस.. साधं ग्रॅज्युएशन पण पूर्ण नाही झालय तुझं, अजून दुनियेची ओळखही नाहीये तुला... तू त्या उरलेल्या नव्यान्नव टक्क्याचा भाग बनायचे चान्सेस नव्व्यान्नव टक्के आहेत..." मनीषाच्या आवाज वाढला होता.

 

" माझा वागणं किती मूर्खपणाच होत.." सिया आपलं तोंड दोन्ही हातात लपवत हमसाहमशी रडू लागली.

 

" हो अर्थातच.. तुझं हे जे फॉलोवर्स वाढवायचं टेक्निक आहे ना ते साफ चुकीचं आणि अश्लील आहे.. कधी स्वतःच्या फोटो खालच्या कमेंट्स वाचल्यायस का..? इतक्या घाणेरड्या कमेंट्स वाचून तुला झोपही लागणार नाही... तुझ्या सो कॉल्ड फॅन्सच्या नजरेत तू मॉडेल नाहीयेस तर ऑनलाईन उपलब्ध असलेली माल आहेस.. आणि हे माझे शब्द नाहीयेत तुझ्याच एका फॅनची कमेंट आहे ही..." मनीषाच्या मनात जेवढं काही होत ते ती सगळी बोलून झाली होती. सिया ज्या वयात होती तिथे सगळ्या गोष्टी पडखरपणे बोलण्याची आवश्यकता होती. आज जर मनिषाने दया दाखवली तर सियाच भविष्य अंधारात जाण्यापासून कोणीच वाचवू शकणार नव्हतं.

 

" शी... मी कधी कमेंट्स वाचल्याचं नाहीत.. कॉलेजमध्ये मला हॉट समजलं जात त्यामुळे मला वाटलं.." सियाला अश्रू आवरण कठीण होतं. आपल्याबद्दल अश्याही घाणेरड्या चर्चा होतं असतील ह्याच तिला भानच नव्हतं.

 

" मला वाटत मी जे बोलली त्यावर तू एकदा नीट विचार करावास... पाहिजे तर गुगल कर, एखाद्या चांगल्या मैत्रिणीशी चर्चा कर पण एकदा विचार कर... भावनेच्या आणि थ्रिलिंगच्या भरात काहीही करू नको.. आणि माझं मत विचारशील तर हे अभ्यासाचं वय आहे... त्यावर फोकस कर..." सियाचा चेहरा पाहून मनीषाला गलबलून येत होतं.

 

" मावशी मी खूप वाईट आहे का ग.." नेहमीच शिष्टपणा सोडून सिया मनीषाच्या कुशीत झेपावली. रडण्यासाठी तिला एका मायेच्या कुशीची नितांत गरज होती.

 

" नाही ग बाळ... हे वयच तस असत... माणूस हमखास चुकतोच आणि त्याने चुकावं म्हणून प्रयत्न करणारे काही दुष्ट लोक आजूबाजूला असतात. नाही कळत आपलं बरोबर आहे का चूक.. पण अश्यावेळी बोलायचं ना कोणाशीतरी.." मनीषा हळुवार सियाच्या केसावरुन हात फिरवत तिला धीर देत होती.

 

" माझ्या फ्रेंड्सला विचारलेलं मी... पण त्यांनी मला लिव्ह इनसाठी होकार दिलेला.." सिया हुंदके देऊ लागली.

 

" अगं.. तुझ्या मैत्रिणीचं वयही तुझ्याएवढं.. चूक बरोबर त्यांना कुठे कळतंय.. मी वेस्टर्न कल्चरच्या विरुद्ध नाहीये पण ते फॉलो करताना आपण कुठल्या संकटात तर नाही ना पडणार ह्याचा विचार करावा... तू वाटेल ते कपडे घाल... जग बदलतंय आम्ही पण बदलतोय.. पण त्यावर जे हावभाव असतात ते अश्लील वाटतात ग... तुझे मित्र मैत्रिणी कसे आहेत, काय विचार करतात त्यावर पण तुमचं वागणं अवलंबवून असत ना.. आणि दुसरे आजकालचे पेरेंट्स.. ते तर असं वागतात कि त्यांनाच बेबी झालाय.. पोरांचे सगळे हट्ट ऐकायचे, पाहिजे ते वेळेच्या आधी घेऊन द्यायचं, भरपूर पैसे द्यायचे, वयाच्या आधीच मोठं करायचं, त्यांच्याकडे मुलांना द्यायला पैसे असतात पण वेळ नसतो.. समीराच्या आईने हिरोईन बनण्याचं भूत तिच्या डोक्यात घातलं आणि तिने तुझ्या. तुला माहितेय समीरा किती हुशार होती. दहावीला पंच्याऐंशी टक्के होते. बारावीला एकोणनव्वद... ठरवलं असत तर काहीतरी बनली असती. पण नाही सौंदर्य निरखायच्या नादात तिने आपले बाकीचे गुण पाहिलेच नाहीत... तुझ्यासोबतही तोच इतिहास पुन्हा घडू पाहत होता..." मनिषाने अलगद हाताने आपले डोळे पुसले.

 

" मावशी.. तू खरंच ग्रेट आहेस.. जस तू समजावलंस मॉमने कधीच असं काही नाही समजावलं.. सारखं आपलं तुला मॉडेल बनायचंय हेच खा, एक्सरसाईज कर, असेच कपडे घाल, अशीच चाल, अशीच बस... सगळ्याची नुसती मोजमाप होती. पण त्यामागचं भयंकर वास्तव तिने कधीच सांगितलं नाही. तिला माझी काळजी नव्हती का...?" सियाने आपने रडून लाल झालेले डोळे मनीषाकडे रोखले.

 

" काळजी आहे ग.. म्हणून तर मला बोलावून घेतलं. आणि ह्या इंडस्ट्रीचं म्हणशील तर तिला स्वतःलाच माहित नसेल ग.. तेवीसव्या वर्षी लग्न झालं तीच.. नुकताच ग्रॅज्युएशन झालेलं. तिला काय माहिती असणार सांग. त्यात आमचं गाव म्हणजे अगदी खेड तुलाही माहित आहे. लग्नानंतर तुझ्या डॅडच्या हौशी स्वभावाने तिला तर सजायची फुल परमिशन मिळाली. पण शहरात येऊन, इतकी वर्ष राहून तिला ह्या शहराची काळी बाजू अजूनही समजली नाही बघ.. तीच लक्ष नेहमीच झगमगीकडे.." मनिश्या ओठातच हसली. तिच्याकडे पाहत सियादेखील हसली.

 

" मी कशी वागली ना तुझ्याशी..?" सियाला आपल्या आजवरच्या वागण्याचा पश्चात्ताप होऊ लागला.

 

" इट्स ओके.. चलता है... आतापण बघ ना मी कशी जोकर बनून आलीय.. येताना रिक्षावाला पण सदम्यात होता मला बघून.." मनीषाच्या वाक्यावर सिया खळखळून हसली.

 

" जशी पण आहेस गोड आहेस..." सियाने पुढे जात मनीषाला मिठी मारली. " तू ऑफिसमध्ये अशीच नाही ना जात .."

 

" ओ सिया मॅडम, मी ना व्हीपी आहे..." मनीषाने कुर्त्याची कोलार ताठ केली.

 

" सिरियसली...?" सियाला आज एकावर एक धक्के मिळत होते.  बावळटसारखी राहणारी आपली मावशी असाच काहीतरी कारकुनी काम करत असेल ह्या तिच्या कल्पनेला तडा गेला होता. 

 

" हा मग... ते पण सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनीमध्ये.. हे तुमचे सगळे फिल्मस्टार, मॉडेल्स वगैरे ह्यांच्याशी रोज उठणं बसणं असत... त्या दुनियेची झगमग आणि ग्रेसाईड दोन्हीही खूप जवळून बघतो आम्ही. मला प्रत्येकाच्या कारकिर्दीची माहिती आहे. म्हणून तर इतक्या कॉन्फिडेंटली सांगितलं ना मी तुला..." मनीषा मिश्किल हसली.

 

" वॉव... तू सगळ्या सेलिब्रेटीजला ओळखते.." सियाची एक्साइटमेंट पुन्हा वाढली.

 

" हा..." तिच्याकडे पाहून मनीषाला उगाचच विषय काढला असं झालं.

 

" तू तर ग्रेटेस्ट आहेस यार... मग मी सेलिब्रेटी बनू कि सेलिब्रेटींना मॅनेज करू..?" सियाने भुवया उडवत विचारलं.

 

" उम्म मला वाटत सेलिब्रेटी बनावस... ते इंस्टाग्राम रिल्सवाली नाही... कथ्थक डान्सर... जी तू आधी होतीस..." मनीषाला सियाच बालपण आठवलं.

 

" होईल का आता माझ्याने..?" सियाच्या निरागस नजरेत प्रश्न होता.

 

" प्रयत्नांती परमेश्वर..." मनिषाने तिच्या डोक्यावर हात ठेवत मुद्दाम तिचे केस विस्कटले.

 

" मावशी... थँक्स... तू आली नसतीस तर मी किती मूर्खपणा केला असता ना..." सियाने मनीषाचा हात पकडून ठेवला.

 

" ह्याच्या बदल्यात आईस्क्रीम तर हवं मला... आता तुझ्या मम्माला सांग तुझा बदललेला डिसिजन नाहीतर रडून रडून तिच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतील आणि डॅडच्या खिशाला मजबूत कात्री लागेल..." सियाला समजावून मनीषा समाधानी मनाने घरी निघाली. मुलांच्या जडणघडणीतला आपला वाटा आजकालचे पालक विसरत चाललेत. काही फॉलोविंग आणि मनोरंजनाच्या नावाखाली ते आपल्या मुलांच्या भविष्यासोबतही खेळतायत हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. सगळ्या गोष्टी योग्य वेळी, योग्य वयात होणं गरजेचं असत पण पालकांना आपल्या मुलांना वयाआधी मोठं करायची जी घाई झालीय ना त्याचे होऊ घातलेले विपरीत परिणाम त्यांना दिसत नाहीत का ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात त्यांनाच माहित...

 

 क्रमश: