A true hero behind the scenes books and stories free download online pdf in Marathi

पडद्यामागचा खरा हिरो

नमस्कार मंडळी.

1 जानेवारी 2023 , नवीन वर्षांचा पहिला दिवस आणि त्यासोबत डबल धमाका म्हणुन रविवार , रविवार आला  म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस. त्यामुळे आई बाबा, मुलं आणि पत्नी असे आम्ही सर्वजण एकत्र असण्याचा  दिवस. नाही तर इतर दिवशी आम्ही जॉब वाले आमच्या कामात व्यस्त , आई बाबा त्यांच्या ओल्ड एज सोसायटी ग्रुपमध्ये व्यग्र , आणि बायकोची मुलामागे धावण्याची लगबग.या सर्वातून रविवार हा एक दिवस कुठे आमच्या वाटय़ाला येतो , आणि मग मी त्याचा पूरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करतो.

दुपारची जेवणं आटोपल्यावर एक छानसे पुस्तक माझ्या हातात पडले….आणि ते वाचता वाचता अचानक एक ओळ समोर आली “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” ….खरंच लिहिणाराने किती मार्मिक आणि योग्य शब्दात आईचे महत्त्व पटवून दिले आहे..आईशिवाय या जगात जन्म नाही.आणि तीने केलेल्या संस्काराला कशाचीच तोड नाही. अस आईचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आयुष्यात असत.

या सर्व गोष्टींचा विचार मनात घोळत असताना बेडरूमचा दरवाजा वाजला.कोण आहे म्हणून मी उठून बघनार इतक्यात बाहेरून आवाज आला , अरे सोन्या झोपला आहेस का? जागा असशील तर मला माझ्या चश्मा कुठे ठेवला आहे हे शोधून देशील का? मी आणि तुझ्या आईने  खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठे मिळत नाही,  तू जरा बघशील का? मी बेडवरुन उठणार , इतक्यात तोच आवाज परत पुटपुटला…..बरं राहू दे.आठवड्याभराचा थकवा तुला आला असेल तू आराम कर.माझा मी शोधत बसतो.मला चश्माची तशी काही  र्अरर्जन्सी नाही….तू झोप शांत.[अर्थात ते बाबा होते] एवढं बोलून बेडरूमचा दरवाजा पुन्हा आडोसा करून ते बाहेर निघून गेले.

खरतर बाबांना चश्मेशिवाय दिसत नाही.तशातच ते चश्मा न मिळवता आणि मला माझ्या झोपेच्या स्वाधीन करून निघून गेले.खर्या अर्थाने मला काही झोप लागेना.मनात खूप विचार येऊ लागले आणि समुद्रातल्या वादळासारखे ते थैमान घालू लागले.

आई विषयीची कविता, चारोळी , कथा- चित्रपट आपण नेहमीच बघत असतो , वाचत असतो. या सर्वांमध्ये आईचं प्रेम ,तिची ममता , तिचा त्याग , हे सर्व काही  लेखकाने हुबेहूब पानावर उतरवण्याचा प्रयत्न केलेला असतो.

 पण त्या “बापाचं” काय?

वडिलांविषयीची कविता , चारोळी , कथा किंवा एखादा चित्रपट माझ्या दृष्टीस तरी आजतागायत नाही.कदाचित माझं वाचन कमी पडत असेल….

पण सत्यात खरंच एवढ काही लिहून ठेवले आहे का बापाविषयी?

कधी त्या व्यक्तीला बनवल आहे का कुणी रोल मॉडल? त्यांच्या कथांमध्ये, सिनेमामध्ये , कवितामध्ये……???

असतीलही कदाचित पण फार तुरळक.

का बरं असं असेल?

आई आपल्या लेकराला नऊ महीने आपल्या उदरात वाढवते.निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे ती.

पण एक बाप आपल्या लेकरांना आयुष्यभर आपल्या विचारांमध्ये वाढवत असतो.त्याच्या संगोपनाची पूर्व आणि भविष्यातली प्रत्येक तयारी तो कायमच करत असतो. ते मात्र आपल्या दृष्टीस कधीच पडत नाही.

आई वडील ,  या दोघांना परमेश्वर समान हाडामासाच्या गोळ्याने आकार देतो..दोघांना एकसारखच हृदय देतो…पण त्या हृदयातील भावना व्यक्त करायला त्याने आईला मोकळीक दिली, पण बापाला दिली नाही.असं का बरं?

बघाना आईचं प्रेम , राग  , लाड तिने केलेली प्रत्येक गोष्ट तिच्या भावनाद्वारे आपल्यापर्यंत पटकन पोहोचते , कारण ती व्यक्त होत असते.

बापाचं तसं नाही . त्याच्या मनात कितीही प्रेम असलं आणि त्याला ते व्यक्त करावं असं वाटतं राहील तरी आईसारख व्यक्त होणं त्याला जमत नाही , म्हणून त्याचे त्त्याच्या प्रत्येक मुलांवर का कमी प्रेम असते? अजिबात नाही.

लेक सासरला जाताना तिची आई तिला खंबीर मनाने निरोप देते. पण तेवढा खंबीर किंवा कठोर मनाचा बाप मी कधीच पाहिला नाही. त्याच्या डोळ्यात कुटुंबातल्या इतर सर्व व्यक्तीपेक्षा दोन अश्रू नक्कीच जास्त असतात.आणि त्याने ते दाखवलं नसलं तरी तो मायेचा झरा त्याचा हृदयात कायम वाहत असतो.

मुलगा नापास झाला किंवा शाळेत कॉलेजात हवी तशी प्रगती करू शकला नाही तर आयुष्यभर बापाला त्याच्या भविष्याची चिंता लागून राहते.आणि म्हणूनच की काय शालेय शिक्षण पूर्ण करण्या करता त्याला आपल्या लेकरासोबत कठोर व्हावेच लागते आणि ते योग्यच आहे असं मला वाटतं.

स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही तो आपल्या लेकरांना सर्वोत्तम शिक्षण आणि योग्य ते लाड पुरवण्यासाठी कधीच मागे हटत नाही. हे सर्व करत असताना पैशांची गणित जुळवता जुळवता त्याची किती नाकीनऊ होत असेल याचा थांगपत्ता तो आपल्याला कधीच लागू देत नाही आणि आपण मात्र त्याला नेहमीच गृहीत धरून चालतो.

आई जेव्हा, घर , कुटुंब, मुलं, त्यांचा सांभाळ करण्यात मग्न असते , आणि स्वतःच्या इच्छा अपेक्षांचा त्याग करत असते , त्याचवेळी आपला बाबाही कुठेतरी , उंबरठ्याबाहेर कितीतरी गोष्टींची सांगड घालण्यात गुंतलेला असतो.यावर आपली दृष्टी कधी पडत नाही…

आयुष्याची खरी गणित ही शाळा कॉलेजनंतर उलगडत जातात.आणि ती सोडवता सोडवता आपल्याला झालेले समज – गैरसमज खूप काही शिकवण देऊन जात असतात. कधी कधी मी स्वतःला थोडा जास्त भाग्यवान समजतो. कारण आयुष्यातले असे धडे शिकताना मला कुठे लांब किंवा कुणा अनोळखी व्यक्तीशी संपर्क करण्याचा योग आला नाही किंवा तशी गरजही भासली नाही.कारण हे सर्व अनुभव मी माझा जवळच्या आणि सभोवतालच्या लोकांकडूनच मिळवत होतो.

“वडीलधाऱ्या” माणसांचा नेहमीच आदर करावा हे शाळेत शिकवलेले वाक्य आज जीवनात प्रत्यक्षात उतरवताना या आजुबाजूच्या लोकांनीच मला मदत केली… ती कशी बरं.?

वडीलधाऱ्या या शब्दामागे वडील हा शब्द आला आहे आणि  याचा अर्थ किती जणांना नक्की समजलं आहे?

आणि समजला असला तरी किती जण ते प्रत्यक्षात उतरवतात? फारच थोडे…

वडीलधाऱ्या मणजे वडील आणि त्यांच्या वयाचा सर्व व्यक्तींचा आदर हा झालाच पाहिजे असा आग्रह आपण मुलांवर कधी करतो का? आजची जनरेशन तर बापाला अरे तुरे करण्यात महानता समजते हे कितपत योग्य आहे?

तुम्हाला आठवतं का कधी तुम्ही तुमच्या बाबांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत?

कधी त्यांना घट्ट मिठी मारून बाबा आय मिस यू सो मच असं बोलून त्यांच्या मनाचा वेध घेतला आहे?…बहुधा नाहीच. किंवा फारच कमी.

 आणि म्हणूनच , जगातला प्रत्येक बाप हा माझ्यासाठी “पडद्यामागचा खरा हिरो” आहे.

 

पडद्यामागचा हा.. हीरो

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि कुटुंबांच्या सुखासाठी किती ठिकाणी झुकला असेल.? वाकला असेल.

कित्येक वेळा उपाशीपोटी किंवा अर्धपोटी झोपला असेल?

वा वेळप्रसंगी क्कोणापुढे त्याने  कितीवेळा  हात पसरले असतील?

या अशा बऱ्याच गोष्टींची उत्तरे आपल्याला कधी कळलीच नाहीत.आणि त्या हिरोने कधी आपल्यापर्यंत येऊच दिली नाही.

कारण त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती.आणि ती म्हणजे शो मस्ट गो ऑन. तो असतानाही आणि नसतानाही.

आणि हे सर्व घडत असते ते फक्त पडद्याआड. [म्हणजेच आपल्या दृष्टीआड.]

अशा या पडद्याआड हिरोची अनेक रूपे मी बघितली. माझ्या जीवनात आणि सभोवताली अनेक उदाहरणं पाहिली. [अर्थात अनेक बाप लेकर आणि त्याच्या नात्याच्या रुपात]

पण त्या सर्वातून मला एक गोष्ट कायम सतावत राहिली ,  ती म्हणजे त्या लेकरांना त्यांचा बाप खरंच कसा आहे हे कधी कळल असेल का? किंवा जेव्हा  कळल असेल तेव्हा खूप उशीर होउन गेला.. असेल का?

 

एक बाप असाही…..

वडिलोपार्जित कुठली ही शिदोरी नसताना एक व्यक्ती गावासारख्या ठिकाणाहून मुंबईत येते…..शिक्षण घेऊन चांगल्या सरकारी पदावर रुजू होते. बायको-मुले यांचा सर्वतोपरी सांभाळ करते.सर्व मुलांचे संगोपन, शिक्षण, लग्न, संसार सर्वकाही थाटामाटात पार पाडते.. त्यांना स्स्थिरस्थावर होण्यास मदत करते. पण हे सर्व करता करता स्वतःसाठी तो बाप कधी जगलाच नाही…

ऐपत असताना स्वतःची कोणतीच हाउस मौज करत बसला नाही.आणि काळाच्या ओघात कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने पीडित होऊन जगाचा निरोप मात्र त्याने घेतला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व काही तो त्याच्या लेकरांच्या झोळीत टाकत राहिला.

असा बाप  मी कधीच विसरणार नाही.

 

एक बाप असाही…..

स्वतःचे शिक्षण स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करणारा. मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यावर झोपून  दिवस काढलेला.सरकारी नोकरीतून कुटुंब चालवता चालवता मध्यपानाच्या काहीसा आहारी जाऊन देखील लेकरांसाठी – कुटुंबासाठी काहीच कमी न पडू देणारा. मुलांच्या प्रत्येक स्वप्नांवर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि त्यांना ठामपणे पाठिंबा देणारा.

पैशाने श्रीमंत नसला तरीही माणसाची खरी श्रीमंती ही त्याने जोडलेल्या माणसांवर आणि प्रेमावर अवलंबून असते हे शिकवणारा एक बाप माझ्या हृदयाच्या कोपर्यात कायम घर करूनआहे.

 

एक बाप असाही…..

मुलाच्या एका हाकेला आसुसलेला.एकाच घरात राहून देखील, मुलाने बरीच वर्ष संवाद न केल्याने मनांतून मुसमुसणारा बाप मी जवळून अनुभवला आहे. काय अपेक्षा होती त्या बापांची? मुलांनी शिक्षण पूर्ण करावे इतकीच…पण हे त्या मुलाला योग्य वेळेस नं कळावं? यासारख दुर्भाग्य नाही.

 

एक बाप असाही…..

स्वतःच्या पत्नीला देवाज्ञा झाल्यावर , दुसरे लग्न करून नवीन संसार उभारणारा. पण त्याचबरोबर स्वतःचा लेकरांना आणि सावत्र लेकरांना समान माया जपणारा बाप माझ्या परिचयाचा आहे.कधी त्या बापानें त्या दोन मुलांमध्ये भेदभाव निर्माण केला नाही आणि सावत्रपणा जाणवू दिला नाही.

 

एक बाप असाही…..

अचानक नोकरी गेल्यामुळे आणि नशिबाने जास्त सात न दिल्याने  प्रापंचिक आणि आर्थिक परिस्थिती दुबळी असताना देखील आपल्या लेकरांना शिक्षणासाठी प्रेरित करणारा , त्यांचे मनोबल वाढवून , असेल त्या परिस्थितीशी सामना करून मुलांना मोठ करणारा हा बाप मी जवळून पाहिला आहे.

 

या सर्वांना पाहिल्यावर माझ्या मनात फक्त एकच गोष्ट घडते ती म्हणजे “आदर”. त्या सर्व पुरुषांचा जे कधी कुणाचे वडील होते आणि आजही आहेत.

हां आदर… केवळ ते वयाने मोठे म्हणजे वडीलधारे आहेत म्हणून नाही.पण ते करत असलेल्या त्यांच्या प्रत्येक चांगल्या कार्याबद्दल आणि त्यांच्या प्रत्येक निस्वार्थी त्यागाबद्दल.

 

आजची ही नवीन पिढी बापाला डॅड आणि आईला मॉम असं त्यांच नामकरण करणारी.त्यांना जर मला काही सुचवायचे असेल तर ते इतकेच…..

 

माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण आहे..कारण आई नसली तर आईच्या प्रेमाची उब कदाचित मावशी भरून काढू शकते , पण आजतागायत बापाला रिप्लेसमेंट कुणीच नाही…..म्हणून बाप हा बापच असतो. त्याच्या आणि त्याच्या वयाच्या सर्व वडीलधार् या लोकांचा भीतीयुक्त वजा प्रेमयुक्त आदर हा झालाच पाहिजे.
 

आधी स्वतःच्या वडिलांना जाणा.त्यांच्या मनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांच्या वडिलांविषयी आपलं मत व्यक्त करा.कारण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रत्येक व्यक्तीला आणि कुटुंबालाही असतात.
 

तुम्ही जर त्यांच्यापासून लांब राहत असाल तर तुमच्या रोजच्या बिझी शेड्यूलमधून रोज एकदा तरी त्यांना कॉल करा. त्यांची चौकशी विचारपूस करा.शक्य असेल तर त्यांना अधूनमधून भेटत जा.
 

आज आपल्याला फुकट सल्ले देण्यासाठी सगळेच तयार असतात.पण जगाचे सल्ले घेण्याआधी त्यांच्याशी बोला.तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्यांना ते विचारा….त्यांच्या परीने ते नक्कीच तुमची मदत करतील आणि त्यामागे त्यांचा कुठलाही स्वार्थ असणार नाही.
 

तुमचे प्रेम जर तुम्हाला शब्दात व्यक्त करता येत नसेल तर त्यांच्यासाठी गिफ्ट घेत चला.आणि त्यातून तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. बघा त्यांना नक्की आवडेल.
 

त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आणि केवळ रक्ताची नाती आहेत म्हणून त्यांच्याशी प्रॉपर्टी/ईस्टेट/जमीनजुमला यावरून कोणताही वाद किंवा अपेक्षा करू नका. शेवटी त्यांनी जे कमावल आहे  ते त्यांच्या हिमतीवर. त्यांनी मिळवलेल्या कर्तुत्वाचे धडे घेऊन , मेहनत करून स्वतः.ते सर्व मिळवण्याचा प्रयत्न करा.
 

एखाद्या मुद्यावर तुमची मत जुळत नसतील तर शांततेने बोलाचाली करा.तुमचा आवाज वाढवून स्वतःचे म्हणणे खरे करून घेऊ नका. यात तुमचेच नुकसान आहे.
 

 जीवनात परफ़ेक्ट असे काहीच नसते त्यात आपणही आलोच…काही बाबतीत त्यांचे चुकतही असेल….पण   त्याकडे  दुर्लक्ष करा….त्तुमचा बाप जसा असेल तसा त्याचा स्वीकार करा
 

आपल्या जन्माच्या वेळेस तो त्यांचं नाव लावून आपल्याला या जगाशी ओळख करुन देतो.पण आपण आपले कर्तृत्व एवढे मोठे करून दाखवावे की , लोकांनी तुमच्या बाबाना तुमच्या नावाने ओळखले जावें.
 

– आणि सर्वात शेवटी …”पितृ देवो भव” या श्लोकाचा अर्थ फक्त समजून घेण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्षात अनुभव करा.

कारण त्यांच्या पायाशी खरंच स्वर्ग आहे आणि आपल्या सुखाची ,  प्रगतीची दारे इथूनच उघडी होत असतात.. या सत्याचा स्वीकार करा.

 

माझ्यासाठी तरी………….

जशी आई =   आत्मा + ईश्वर

तसा  बाप =   बाबा + परमेश्वर

धन्यवाद.