Hold Up - 14 books and stories free download online pdf in Marathi

होल्ड अप - प्रकरण 14





प्रकरण १४
तुरुंगात पाणिनी पटवर्धन ने आरोपी सुषेम इनामदार ची भेट घेतली.
“ कसा आहेस?” पाणिनी ने विचारलं.
“ ठीक.”
“ आज तुझ्याशी कोणी बोललं?” पाणिनी ने विचारलं.
“ खूप जण बोलले. पटवर्धन साहेब माझी पुतणी देवगिरी वरून तुम्हाला भेटायला आल्ये ना !” सुषेम इनामदार म्हणाला.
“ हो माहित्ये. आमची भेट झाल्ये.” पाणिनी म्हणाला.
“ तिच्याकडे पैसे आहेत.मी जर न्यायाधीशांना सांगितलं असतं की माझ्या पुतणी कडून मला पैसे घेण्यासाठी व्यवस्था करा तर त्यांनी केली असती पण मग मला दुसराच वकील बघावा लागला असता. तुम्ही मिळाला नसतात. मी तसे काहीच सांगितलं नाही त्यामुळे न्यायाधीशांनी तुम्हाला नेमले. माझे नशीब आहे. ”
“ असू दे.असू दे.” पाणिनी हसून म्हणाला. “ आणि पैशांची काळजी करू नका. मी मृद्गंधाला सांगितलंय की मी पैसे घेणार नाही याचे.”
“ पण तुमचे पैसे द्यावेच लागतील. तुम्ही मोफत काम करणं मला पटत नाही.”
“ मला सांगा तुमच्याशी कोण बोलत होतं दिवस भरात? ” पाणिनी ने विचारलं.
“मिहीर कर्णे नावाचा पोलीस माझ्याशी चर्चा करतोय.” सुषेम इनामदार म्हणाला.
“ काय म्हणणं आहे त्याचं? ”
“ तो म्हणतो, तुम्ही वकील म्हणून चांगलेच आहात पण तुम्ही जरा जास्तच लढाऊ बना दाखवता. तडजोडीला तयार नसता, बिलकुलच. तुम्ही जर तडजोड केली,आणि मी गुन्हा कबूल करायला तयार झालो तर डाका घालण्या ऐवजी चोरी च्या किरकोळ आरोपाखाली छोटी शिक्षा देता येईल. तेवढ्यात माझ्या जवळचा एक कैदी मला पटकन म्हणाला, सावध रहा, ते तुला अडकवायला बघताहेत.”
“ नंतर काय झालं?” पाणिनी ने विचारलं.
“ मला त्यांनी बाहेर मोकळ्या जागेत नेलं. तिथे एक महागडी गाडी उभी होती. त्यांनी मला विचारलं की ही गाडी ओळखीची आहे का?, पूर्वी पाहिली आहे का? मी सांगितलं की कधीच नाही पाहिली.पण माझ्या वकिलाशी , म्हणजे पाणिनी पटवर्धन शी बोलल्या शिवाय मी कोणतीही कबुली देणार नाही.”
“ मस्त उत्तर दिलंस. नंतर काय झालं?” पाणिनी ने विचारलं.
“ त्यांनी मला त्या गाडीच्या आत बसायला लावलं, पुन्हा बाहेर यायला सांगितलं, मग पुन्हा ड्रायव्हर च्या जागी बसवलं.”
“ बरेच लोक आजूबाजूने चालत गेले, सध्या वेषातील दोन अधिकारी ही त्यात होते.तेवढ्यात एक बाई क्लीनर बाजूचे दार उघडून आत येऊन बसली, बाहेरून एक अधिकारी ओरडला, नाही नाही, ही ती गाडी नाहीये. मग ती बाई मला म्हणाली , माफ करा, मला, चूक झाली. मी हसून म्हणालो ठीक आहे असू दे. मग ती बाहेर पडली.”
पाणिनी पटवर्धन चा चेहेरा काळजीत पडल्या सारखा वाटला.
“ पुढे मला त्यांनी तिथेच दोन तीन मिनिटं गाडीतच ठेवलं.त्या नंतर त्यांनी मला परत आत टाकलं.तुम्हाला सांगतो पटवर्धन, आधी टे माझ्याशी बरे वागत होते, पण त्या घटने नंतर त्यांचं माझ्याशी वागणंच बदललं., अत्यंत उर्मट आणि कडक असं त्यांचं वागणं झालं. ”
“ मिहीर कर्णे घाईघाईत आत आला तेव्हा मी त्याला विचारलं की त्याने माझ्या कडून जे अपेक्षित केलं होतं त्या तडजोडीनुसार मी सर्व सहकार्य केलं ना त्याला? तेव्हा तो उसळून म्हणाला, कसली तडजोड? आपल्यात असं काहीही ठरलं नव्हतो. हरामखोरा, तू सशस्त्र डाका घातलायंस आणि तुला त्याची जबर शिक्षा मिळेल. असं बोलून तो रागाने निघून गेला. ”
“ तुला ज्या गाडीत त्यांनी बसायला लावलं, ती गाडी तू आधी बघितली होतीस? किंवा ती गाडी कुठून आली तिथे ?” पाणिनी ने विचारलं.
“ कधीच नाही.”
“ आणि त्या,तुझ्या शेजारी चुकून बसले असे दाखवणाऱ्या बाईला?” पाणिनी ने विचारलं.
“ तिलाही कधीच नाही.”
“ जे चाललंय ते वाईट आहे आपल्या दृष्टीने. याचा अर्थ त्यांनी कोणीतरी असा साक्षीदार शोधलाय की जो, तू गुन्हा घडल्याच्या ठिकाणी तू होतास अस सिध्द करेल.मला ताबडतोब निघालं पाहिजे. ”
पाणिनी म्हणाला आणि जायला उठला, तो बाहेर जात असतानाच त्याला दिसलं की इन्स्पे.होळकर सुषेम इनामदार जवळ आला होता आणि त्याने त्याचा हात पकडला होता.
बाहेर येताच पाणिनी ने लगेचच कनक ओजस ला फोन लावला.आणि इनामदार बाबत जे घडलं ते सर्व त्याला सांगितलं.
“ अत्ता तुला फोन करत असतांना होळकर त्याला पकडताना मला दिसला कनक.” त्याने शेवटी सांगितलं.
“म्हणजे कनक, सुरुवातीला त्यांचे वागणे हे तडजोडीचे होते,म्हणजे त्याला कमी शिक्षा दयावी असं होतं पण नंतर मात्र त्याला टे कुठल्यातरी मोठया गुन्ह्यात अडकवणार असं वाटायला लागलंय. म्हणजे खुनाच्या वगैरे.” पाणिनी ने काळजी व्यक्त केली.
“ माय गॉड, पाणिनी ! त्या हिमानी दुनाखे च्या खुनात तर नाही ना त्याला अडकवू पहात ते? ”
“हे कुठून डोक्यात आलं तुझ्या कनक? ”
“ मी अत्ता बातम्या बघत होतो, त्यात दाखवलं की नावाच्या माणसाचा खून झाला होता काही दिवसांपूर्वी, त्याच्या खुन्याला पोलिसांनी शोधलंय आणि लवकरच ते त्याला अटक करणार आहेत. ”-कनक
“ कनक, तुझ्या पत्रकार मित्रांशी संपर्क कर आणि माहिती काढ. मी येतोच तिकडे लगेच.” पाणिनी म्हणाला आणि तडक निघाला.
पुढच्या दहाव्या मिनिटाला पाणिनी कनक च्या समोर होता, तेव्हा कनक फोन वर त्याच्या माणसाशी बोलत होता.हाताने खुणावत त्याने पाणिनी ला बसायला सांगितलं.
“ तो आहे ? खात्री आहे तुझी? तर मग पोलिसांना मोठाच ब्रेक मिळालाय म्हणायचा.त्यांनी मुद्दाम त्याला त्यात गुंतवायचा प्रयत्न केलं असेल असं वाटतंय का?.....ओके.ओके... थँक्स..”
पाणिनी काळजी पूर्वक कनक ओजस काय बोलतोय ते ऐकत होता. त्याला अंदाज आला होता.
“ तर मग पाणिनी असं आहे तर. माझा अंदाज खरा ठरलाय. तुझ्या अशीलावर दुनाखेच्या खुनाचा आळ आणलंय त्यांनी.”
“ त्याला पाहिलं आणि ओळखलं कुणी पण?” पाणिनी ने विचारलं.
“ ज्योतिर्मयी सुखात्मे नावाच्या एका मुलीने.ती तिच्या मैत्रिणी कडून घरी येत होती.घरा पासून दोन चौक अंतरावर असतांना एक करडया रंगाची गाडी तिच्या अगदी जवळून गेली. तिने दचकून पाहिले तर गाडीची पुहाची जाळी जरा फाटली होती, वाकली होती.ती गाडी थोडी पुढे जाऊन एका पार्किंग च्या जागी उभी राहिली. ” कनक म्हणाला.
“ लटांबर लावू नको, पुहे काय झालं ते नेमके पणाने सांग. आणि पटकन सांग.” पाणिनी म्हणाला.
“ त्या गाडीच्या डिकी मधे हिमानी दुनाखे चं प्रेत होतं ! ” –कनक ओजस
“ तुला कसं कळलं ?” पाणिनी ने विचारलं.
“ त्याच मुद्याकडे येतोय मी.”
“ पार्कींग ला गाडी लावल्यावर ती चालवणारा माणूस खाली उतरून डिकी उघडत होता, पण त्याला ज्योतिर्मयी सुखात्मे ची चाहूल लागली आणि त्याने पटकन डिकी बंद केली. गाडीला वळसा घालून तो पटकन ड्रायव्हर सिट वर बसला आणि इंजिन चालू ठेवलं.गाडीचे दिवे पण चालू केले.ज्योतिर्मयी ने घाबरून तिथून पळ काढला आणि आपल्या घरी आली.दुसऱ्या दिवशी त्याच पार्किंग मधे पोलिसांना उघड्यावर प्रेत सापडलं.”
“ लैंगिक अत्याचाराचा बळी?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही, पातळ अशा तारेने गळा आवळला होता. सराईत खुन्याने करावा तसा खून होता.”
“ ज्योतिर्मयी ने तिला दिसलेली घटना पोलिसांना कळवली?” पाणिनी ने विचारलं.
“ तिने जेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरात वाचलं, पोलिसांना प्रेत सापडल्याचं, लगेच ती पोलीस स्टेशन ला गेली.”—कनक ओजस म्हणाला.
“ हे सगळं कधी घडलं कनक?”
“ १३ सप्टेंबरला, मध्यरात्री पूर्वी थोडा वेळ.”
“ पुढे? म्हणजे त्याचा संबंध इनामदार शी कसा जोडला गेला?” पाणिनी ने विचारलं.
“ ज्योतिर्मयी ने केलेलं गाडीचं वर्णन, म्हणजे करडया रंगाची, पुढची जाळी फाटलेली,वाकलेली असणे हे वर्णन होल्ड अप मधील इनामदार ने वापरलेल्या गाडीशी जुळत होते.लगेचच इन्स्पे.होळकर ने ती गाडी पोलीस स्टेशनात हजर केली, त्यात इनामदार ला बसवलं, ज्योतिर्मयी ला आत जायला लावलं, लगेच तिने त्याला ओळखलं. ” कनक म्हणाला.
“ पण त्यांना प्रेत ठेवलेली करडया रंगाची पुढची जाळी फाटलेली,वाकलेली अशी गाडी मिळाली कुठे? कारण प्रेत सापडलं तेव्हा ते गाडीत नव्हतं, उघड्यावर पार्किंग मधे मिळालं होतं ना?” पाणिनी ने विचारलं.
“ खुनाच्या रात्री ती गाडी चोरीला गेली होती. खुनाच्या आधी काही तास. ती चोरीला गेल्याची तक्रार गाडीच्या मालकाने लगेचच केली होती,पण पोलिसांनी तेव्हा किरकोळ चोरी या नावाखाली त्याकडे फारसे लक्ष नव्हतं दिलं, पण खुनात वर्णन केलेली गाडी आणि चोरीच्या तक्रारीत वर्णन केलेली गाडी एकच आहे असं लक्षात येताच त्यांनी तातडीने हालचाल केली आणि ती शोधली. ”-कनक म्हणाला.
“ १३ सप्टेंबर होल्ड अप ची तारीख.” पाणिनी पुटपुटला.
“ पोलिसांचा कयास आहे की आरोपीनेच संध्याकाळी मरुशिका मतकरी आणि कुमठेकर ला लुटताना त्याच गाडीचा वापर केला. त्यांना लुटून तो त्या गाडीने हिमानी दुनाखे ला भेटायला गेला आणि तिचा गळा आवळला. त्याच गाडीत च्या डिकीत तिचे प्रेत टाकलं.”
“ तो का करेल असं?” पाणिनी ने विचारलं.
“ चोरी. मरुशिका वरचा डाका ही पैशासाठीच आणि हिमानी ला मारलं तेही पैशा साठीच. तिच्या पर्स मधे बरेच पैसे असावेत असा पोलिसांचा संशय आहे. त्यांना अजून ती पर्स सापडलेली नाही.”
“ या हिमानी दुनाखे ची पार्श्वभूमी काय आहे? ” पाणिनी ने विचारलं.
“ आता बरोब्बर प्रश्न विचारलास पाणिनी.” कनक म्हणाला. “ पोलिसांना फार काही समजलेलं नाही.ती एकटीच राहायची. आपल्या घरात ती कुणाला आणायची नाही. तीन महिन्या पूर्वीच ती इथे आली होती.”
“ कुठून आली होती ती? ” पाणिनी ने विचारलं.
“ मीरत. तिथे तिचे काही मित्र मैत्रिणी आहेत असे समजलं त्यांना त्यावरून तिची थोडी माहिती त्यांना मिळाली. तिचं लग्न झालं होतं पण ती विभक्त होती.मीरत सोडल्यावर तिने कुणाशीही संपर्क ठेवलेला नाही.” –कनक
“ त्या मृदगंधा इनामदार ला तोंड दाखवायला सुध्दा मी धजावणार नाही.” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी तुझं काम फक्त आरोपीला होल्ड अप च्या प्रकरणा पुरते मर्यादित आहे लक्षात ठेव.म्हणजे कोर्टाने तुला नेमलंय ते तेवढयाच कामासाठी. तो खुनात गुंतला असेल तर त्याला त्या आरोपातून सोडवायची जबाबदारी तुझी नाही. आणि मला नाही वाटत आता पोलीस इनामदार शी कुठली तडजोड करायला तयार होतील म्हणून.”-कनक ओजस म्हणाला.
“ तडजोड ! विसरा आता, ते त्याला चक्क खुनाच्याच आरोपाखाली अटक करून खटला चालवतील.ज्योतिर्मयी सुखात्मे ने त्यांची पटवलेली ओळख त्याने नाकारली नाही तर तो लटकलाच म्हणून समज. जर नाकारली तर ते त्याला उलट तपासणीत हवालदील करून टाकतील नाही नाही ते प्रश्न विचारून. त्याला विचारतील की त्याला या पूर्वी गुन्हेगार म्हणून अटक झाली होती हे खरं आहे की नाही? त्या हो म्हणावेच लागेल. मग ते विचारतील, की ज्या रात्री खून झाला त्याच दिवशी त्याला होल्ड अप करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला संशयित म्हणून पकडला होतं की नाही?मग त्याला ते होल्ड अप बद्दल विचारतील. बचाव पक्षाचे वकील म्हणजे मी किंवा जर दुसरा असला तर तो, या गोष्टीला संदर्भहीन म्हणून हरकत घेईल ,त्यावर सरकारी वकील म्हणेल की तो या दोन गोष्टींची सांगड घालतोय, यथावकाश. न्यायाधीश ते मान्य करतील. मग सरकारी वकील दाखवून देईल की होल्ड अप मधे वापरली गेलेली गाडी, आणि खुनात वापरलेली गाडी एकच होती. ”
“ थोडक्यात आता इनामदार चं अवघडच आहे.”-कनक म्हणाला.
“ पोलिसांनी एव्हाना मरुशिका मतकरी आणि कामोद कुमठेकर दोघांना ती गाडी ओळखायला लावली असेल.त्यांनी लगेचच पोलिसांना सांगूनही टाकल असेल की खुनात वापरलेली ही गाडीच आरोपी होल्ड अप च्या वेळी घेऊन आला होता आणि आम्हाला लुटल्यावर याच गाडीतून तो पळून गेला. ” पाणिनी म्हणाला.
“ एवढं सगळं माहिती आहे तरी तू या केस मधून माघार घेत नाहीयेस? ” –कनक
“ इनामदार माझं अशील आहे,त्याला मी वाऱ्यावर नाही सोडून देणार. मग आरोप होल्ड अप चा असो की खुनाचा.”
“ पाणिनी तू भिंतीवर डोकं आपटून घेतो आहेस. तुझा अशील या वेळेला दोषी आहे.”-कनक
“ न्यायाधीशांनी अजून तसं जाहीर केलेलं नाही.” पाणिनी म्हणाला.
“ करतील ते लवकरच.”
“ ते करे पर्यंत आरोपीला हक्क असतो, संधी असते, आपली बाजू मांडायची.ते मी करणारच आहे.” पाणिनी म्हणाला.
“ ज्या पद्धतीने घटना घडल्या आहेत, त्यातून तो निर्दोष असायची शक्यता नाही वाटत पाणिनी.”
“ तू त्याला पाहिलं नाहीस कनक, त्याच्या डोळ्यातली ती वेदना ! फार फार भोगलंय त्याने आयुष्यात. तो कुणाचा खून काय, चोरी पण करू शकत नाही.”
“ तू चेहेरा पाहून माणूस दोषी आहे की नाही ठरवतोस, दरवेळी तुझं बरोबर ठरलं असेल पाणिनी पण यावेळी नाही. तू चुकीचा माणूस निवडलायस.” –कनक
“ दर वेळी तू मला हेच बोलून दाखवलं आहेस. पण शेवटी माझा अंदाजच बरोबर ठरलाय. याही वेळी ठरेल कनक.” पाणिनी म्हणाला. आणि बाहेर पडला.
(प्रकरण १४ समाप्त)