Hold Up - 17 books and stories free download online pdf in Marathi

होल्ड अप - प्रकरण 17





प्रकरण १७
सौम्या आणि पाणिनी तिथून बाहेर पडल्यावर पाणिनी आपल्या गाडीत ड्रायव्हिंग सीट वर बसताच सौम्या ने विचारलं, “ आता पुढे काय सर? ”
“ आता आपण काही काळासाठी चक्क गायब व्हायचं सौम्या. पोलीस आपल्याला शोधायचा प्रयत्न करतील, आपल्या नेहेमीच्या हॉटेल मध्ये, ऑफिसात, कोर्टात वगैरे.”
“ पण सर, आपण नाहीना असं करू शकत. सोमवारी कोर्टात जावच लागेल आपल्याला.केस आहे.” सौम्या म्हणाली.
“ सोमवार यायला वेळ आहे, तो पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं असेल.” पाणिनी म्हणाला.
“ या शहरातले प्रसिद्ध फौजदारी वकील पाणिनी पटवर्धन यांनी मला जो कायदा शिकवलाय, त्या नुसार पलायन करणे हा गुन्हा केल्याचा पुरावा ठरतो.” सौम्या म्हणाली.
“ बरोबर शिकली आहेस सौम्या. परीक्षेत पास होण्या एवढे मार्क नक्की मिळवशील.” पाणिनी म्हणाला.
“ ते असू दे, पण पळून जायचा प्रयत्न करून आपण पोलिसांच्या हाती अलगद सापडू असं वागायचंच का आपण?”
“ आपण गायब होणार आहोत असं म्हणालो मी.पळून जाऊ असं नाही.आपण पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडतोय सौम्या.”
“ आणि आपण अशा जागी पुरावे शोधण्यासाठी जाणार आहोत की आपण तिथे असू असं पोलिसांना स्वप्नातही वाटणार नाही ? ”
“ एकदम बरोबर बोलते आहेस सौम्या !” पाणिनी म्हणाला.
“ आता कृपा करून सांगाल का मला आपण कुठे निघालो आहोत?”
“ विलासपूर.”
सौम्या संभ्रमात पडली.
“ हे बघ सौम्या, मी असं गृहित धरून चाललो की या प्रकरणात सारख्या दिसणाऱ्या दोन मुली आहेत. कदाचित जुळ्या बहिणी.पण आता मला असंही वाटायला लागलंय की त्या एकमेकींना ओळखत सुध्दा नसाव्यात.पण दिसायला सारख्या असाव्यात. म्हणून मी कनक ओजस ला सांगणारे की डॉ. शुचिष्मंत यांनी तिला ज्या हॉस्पिटल मध्ये दाखल केलं असेल तिथे जाऊन तिला नीट बघ आणि खात्री कर की तिलाच कनक ने साक्ष देण्यासाठी आपल्या ऑफिसात आणून ठेवलं होत ना, आणि त्याच वेळी आपण विलासपूर ला जाऊन तिथे राहणाऱ्या मुलीची माहिती घेऊ.याहून अधिक तर्क दृष्टया योग्य काय करू शकतो आपण सौम्या?” पाणिनी म्हणाला.
बोलता बोलता पाणिनी ने कनक ओजस ला फोन लावला.
“ कनक, एक काम कर तातडीने. सिया माथूर ला हॉस्पिटल मध्ये ठेवलंय तिला जाऊन भेट आणि मला सांग की याच मुलीला तू आपली साक्षीदार म्हणून माझ्या ऑफिसात बसवून ठेवलं होतंस ना , जी पुढे पळून गेली.”
“ पाणिनी तुला मी सांगितलं ना अॅम्ब्यूलन्स तिला घेऊन गेली पण तिला कुठेच अॅडमिट केलं गेलं नाही.” कनक उद्गारला.
“ तेव्हा नव्हतं. आता केलंय. डॉ. शुचिष्मंत यांनी.” पाणिनी म्हणाला आणि कनक ला काही बोलायची संधी न देता फोन बंद केला.
मोठा प्रवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी ते विलासपूर ला पोचले. कनक ने दिलेल्या पत्यावर जाऊन सिया माथूर च्या दारा समोर उभे राहिले. दाराची बेल दोन तीन दा वाजवली पण दार उघडले गेले नाही.
“ आता काय?” सौम्या ने विचारलं.
पाणिनी ने काही न बोलता आपल्या खिशातून बेशुद्ध पडलेल्या मुलीच्या खिशातून मिळालेली किल्ली बाहेर काढली आणि दाराला लावली.
दार उघडले गेले !
“ तुझ्या कडे ठसे मिळवायचे उपकरण आहे ना?” पाणिनी ने विचारलं.
“ आणलंय मी.”
दोघे आत आले. पाणिनी ने दार लावून घेतले.
“ मला भीती वाटते आहे सर. काहीतरी घडणार असे वाटते.”
खोली अत्यंत अस्ताव्यस्त झाली होती.भिंतीवरच्या फ्रेम वरचे फोटो अक्षरश: टरकावून फाडले होते.बेडरूम मधल्या गाद्या, पलंगपोस चाकूने फाडून उचकटून टाकले होते.किचन मध्ये अजूनच राडा होता.पिठाचा डबा पालथा करून पीठ जमीनीवर सांडले होते, साखर खाली ओतली होती.
“ कुणाला तरी काहीतरी हवं होतं इथलं.आणि ते शोधायला त्याच्याकडे फारसा वेळ नसावा.” पाणिनी म्हणाला.
“ सर, कपड्यांच्या कपाटाकडे बघा. तिचे कपडे बाहेर भिरकावून देण्यात आलेत, काही कपड्यांची शिवण सुध्दा उसवून टाकल्ये.” सौम्या उद्गारली.
“ आपल्याला यातून एक संदर्भ मिळतोय सौम्या.”
“ कसला?”
“ ते काय शोधत असावेत याचा.” पाणिनी म्हणाला.
“ काय?”
“ ती वस्तू आकाराने लहान, चपटी पण किंमती असावी. सौम्या, आपण आपले ठसे घ्यायचे काम करून टाकू. मला तुझ्या कडची पावडर दे.”
पाणिनी पटवर्धन ने ती पावडर वेगवेगळया वस्तूंवर टाकून चिकट पट्टीने संभाव्य ठसे उचलायला सुरुवात केली.
“ तुम्ही जमा करत असलेले ठसे सिया चे आहेत की इथे येऊन हे सगळे उध्वस्त करणाऱ्या अगांतुकाचे आहेत हे तुम्ही कसं शोधणार?” –सौम्या
“ ते आपण नंतर वेगवेगळे करू. अत्ता तरी मी ते गोळा करायचे काम करतोय.” पाणिनी म्हणाला.
टेबला वरची कागदपत्रे सुद्धा नाहीशी झालेली दिसताहेत.....”
अचानक पाणिनी बोलायचा थांबला.स्वयंपाक घरातून एकदम कसलातरी आवाज आला.सौम्या घाबरली.
“ कसला आवाज आहे हा? कोणी तरी मागच्या दारापाशी आहे की काय?”
“ मला वाटतंय पुढच्या दाराच्या इथे आवाज आला.” पाणिनी म्हणाला.
“ काय करायचं आता? आपण अडकलो आता.” सौम्या म्हणाली.
“ नाही सौम्या. एकतर या दाराला लॅच आहे. आणि ती मुलगी इथून तीनशे किमी. दूर आहे.” पाणिनी हळू आवाजात म्हणाला.त्याचं लक्ष पुन्हा तो आवाज येतो का याचा अंदाज घेण्यात गुंतलं होतं.
दाराला किल्ली लावल्याचा आवाज आला.त्याच्या आधी एकदा दारावर थाप टाकल्याचा आवाज आल्याचा भास पाणिनी ला झाला.त्याने सौम्या ला गप्प राहण्याची खूण केली आणि दोघेही दार उघडून कोणीतरी आत येण्याची वाट बघत बसले.
दार उघडलं गेलं आणि एक माणूस आत आला. आतल्या उजेडात त्या दोघांना पाहून तो दचकून एक पौल मागे सरकला.
“ ये, इथवर आला आहेसच तर आत आलास तरी चालेल.” पाणिनी म्हणाला.
“ कोण आहात तुम्ही? इथे काय करताय?” त्याने विचारलं.
“ या प्रश्नाचं उत्तर तू आम्हाला द्यायचं आहेस. आत ये आणि दार लावून घे. बाहेरच्या कोणाला कळायची गरज नाही तू इथे काय उदयोग करून ठेवले आहेस ते.” खोलीतल्या पडझडी कडे आणि अस्ताव्यस्त सामानाकडे हात दाखवून पाणिनी म्हणाला.
तो आत आला.
“ काय अर्थ आहे या सगळ्याचा?” पाणिनी ने विचारलं.
“ मला काहीही माहिती नाहीये.” तो म्हणाला.
“ तुला सिया माथूर माहित्ये?” पाणिनी म्हणाला.
“ तिची बहीण ओळखीची आहे माझ्या.”
“ तुला सिया माहीत नाही?” मुद्दामहून सौम्या कडे बघून पाणिनी ने त्याला पुन्हा विचारलं.
“ फक्त तिची बहीण मला माहित्ये.” तो म्हणाला.
“ आणि तेवढया ओळखीवर तू माझ्या फ्लॅट मधे घुसलास? किल्ली वापरून?” सौम्या ने आक्रमक पणे विचारलं.
“ माय गॉड, सॉरी मिस माथूर, मला कल्पना नव्हती तुम्ही इथे असाल म्हणून. तुम्ही इथे असणे अपेक्षित नव्हतं ...म्हणजे...” तो बावचळून म्हणाला.
“ आता शांतपणे बसून घे आणि मला सांग या घरात झालेल्या या राड्या बद्दल तुला काय म्हणायचंय ते.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही काय करताय ? ठसे मिळवताय?”
“ बरोब्बर. मी मिस माथूर ला मदत करतोय ठसे मिळवण्याच्या कामात. हा सगळा राडा कोणी घातलाय त्याचे ठसे.” पाणिनी म्हणाला.
तो माणूस आपलं डोक धरून मटकन खालीच बसला.भयंकर अस्वस्थ झाला.
“ मला... मला... यात गुंतवू नका प्लीज.माझ्या बायकोला यातलं काही कळलं तर फार म्हणजे फार अडचणीत येईन मी. माझं आयुष्य उध्वस्त होईल...हो..”
“ कोण आहेस तू? नाव काय तुझं? आणि कुठून आलास तू?” पाणिनी गरजला.
“ मी...मी ... माझं नाव गौतम पिसे.”
“ कुठून आलास तू? कुठे राहतोस?”
“ भांडवा.” गौतम म्हणाला.
“ तुझं ड्रायव्हिंग लायसेन्स दाखव.” पाणिनी म्हणाला.
गौतम पिसे ने आधी खिशातून रुमाल काढून आपला कपाळावरचा घाम पुसला. मग ड्रायव्हिंग लायसेन्स काढून पाणिनीच्या हातात दिलं.पाणिनी ने ते नीट तपासलं. त्याच्यावरचं नाव, पत्ता वगैरे.
“ यावर सातापाडी असं नाव लिहिलंय गावाचं ! आणि तू म्हणालास की तू भांडव्याला राहतोस.” पाणिनी म्हणाला.
“ नाही... म्हणजे माझा कायमचा पत्ता सातापाडीच आहे पण माझा व्यवसाय भांडव्याला असल्याने मी तिथेच जास्त असतो..खरं म्हणजे मी माझा पत्ता तुमच्या पासून लपवणार होतो पण तुम्ही ड्रायव्हिंग लायसेन्स पाहायला मागितलंत आणि माझा नाईलाज झाला. ”
“ ठीक आहे , आता मला सांग की तू इथे आलास कसा आणि कशासाठी?”
“ काल मला एका व्यवहारात पैसे मिळाले म्हणून जरा ऐश करायला मी मरुशिका क्लब वर गेलो होतो.तिथे एका बार बाले बरोबर खूप काळ घालवला.मला ती आवडली , तिलाही मी आवडलो. आम्ही एकत्र जेवलो, डान्स केला, नंतर ती मला एका ठिकाणी एका भपकेबाज गाडीतून जुगार खेळायला घेऊन गेली. मी तिथे बरेच पैसे गमावले पण ती जिंकत गेली.”
“ तिने जिंकलेल्या रकमेतली काही रक्कम तिने तुला उसनी दिली असेल ना? पुन्हा खेळायला.?” पाणिनी ने विचारलं.
“ बरोबर.”
“ ती म्हणाली असेल ना तुला की तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळे आहात?”
“ अगदी बरोबर.पण तुम्हाला कसं कळलं? ”
“ कसं कळलं ते सोडून दे.पुढे काय झालं?” पाणिनी म्हणाला.
“ मी तिला विचारलं की तिला कायमचं माझ्या बरोबर रहायला यायला आवडेल का? पण तिला एकदम रडू फुटलं.ती म्हणाली की मी इथून नाही जाऊ शकत.मी कायमची जखडली गेल्ये इथे. मला मदत करायची असेल तर भांडव्याला जाऊन माझ्या बहिणीच्या घरातून काही वस्तू आणि सामान घेऊन इथे विलासपूर ला पाठवण्याची व्यवस्था करशील का? ”
“ तिला नेमक्या काय वस्तू हव्या होत्या?” पाणिनी ने विचारलं.
“ युगुल हॉटेल मुंबई असे लेबल असलेली एक सुटकेस,काळ्या पांढऱ्या चेक्स असलेला एक ड्रेस,आणि कपाटाच्या उजव्या हाताच्या एकदम वरच्या ड्रॉवर मधल्या काही वस्तू. ” गौतम ने सांगितलं.
“ आणखी काही?”
“ नाही इतकंच.”
“ तू या वस्तू मिळाल्यावर काय करायचं होतं?” पाणिनी ने विचारलं.
“ सुट केस मधे सर्व वस्तू भरायच्या होत्या आणि या फ्लॅट ची किल्ली सुटकेस च्या कव्हर मधे टाकून मरुशिका क्लब वर ते कुरियर ने पाठवायचे होते.”
“ मथुर च्या नावाने?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही क्लब ची मालकीण, मरुशिका मतकरी च्या नावाने. ” गौतम पिसे म्हणाला.
पाणिनी ने पुन्हा त्याचे लायसेन्स काळजी पूर्वक पाहिले.
“ मी कोण आहे हे मी सिध्द करू शकतो, ” गौतम म्हणाला आणि बोलता बोलता त्याने टेबला वरचे एक दोन कागद घेतले. आपल्या खिशाला लावलेल्या बॉल पेन मधील रिफील बाहेर काढून त्याच्या नीब ची बाजू दातात धरून उपटली आणि रिफील च्या उलट्या बाजूला फुंकून शाई बाहेर काढून ती आपल्या बोटाला लावली आणि कागदावर बोटांचे ठसे उमटवले.
“ हे ठसे तुम्ही लायसेन्स काढताना मी दिलेल्या ठशांशी जुळवून बघू शकता.” गौतम म्हणाला.
पाणिनी ने तो कागद आपल्या खिशात ठेवला.
हात पुसण्यासाठी गौतम ने इकडे तिकडे बघितले.टेबला वरचा एक कागद घेतला , त्यालाच बोटे पुसली.हातावर काही डाग शिल्लक नाहीत हे पाहून कागदाचा बोळा फेकण्यासाठी केराच डबा आहे का हे पाहण्यासाठी आपली नजर इकडे तिकडे वळवली पण त्याला तो कुठे दिसला नाही तेव्हा त्याने तो आपल्याच खिशात टाकला.
“ इथे कुठे उतरला आहेस तू?” पाणिनी ने विचारलं.
“ हॉटेल आईना मधे.”
“ स्वतःच्या नावानेच बुकिंग आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ अर्थातच.”
“ गरज लागली तर आम्ही तुला पुन्हा फोन करू. तुझ्याकडची किल्ली मिस सिया माथूर कडे देऊन जा.” सौम्याकडे हात दाखवून पाणिनी म्हणाला.
गौतम ने मुक्त पणे ती सौम्या कडे दिली.
“ मला या सर्वातून बाहेर ठेवा, तुम्ही म्हणाल ते मी करीन.” तो म्हणाला.
“ समजलं मला. आता लगेच नीघ इथून.” पाणिनी म्हणाला.
एखाद्या पिंजऱ्यातून सुटका झालेला प्राणी जसं बाहेर येईल तसा गौतम तिथून निघून गेला.
“ हुश्य !! सुटलो एकदाचे. सर, माझे पायच लटपट करायला लागले होते पण मीच सिया माथूर असल्याचे भासवून तुम्ही त्यालाच बचावात्मक पवित्रा घ्यायला लावलात. आता पुढे काय?” सौम्या म्हणाला.
“ आपल्याला आता इथून तातडीने बाहेर पडायला हवंय.”
“ का?” सौम्या ने गोंधळून विचारलं.
“ त्या गौतम च्या डोळ्यात एक झाक दिसली मला सौम्या, तो दाखवत होतं एवढा घाबरला नसावा. अत्ता या क्षणी तो पोलिसांना फोन करत असेल तर मला आश्चर्य नाही वाटणार.” पाणिनी म्हणाला.
“ तो फारतर एखाद्या बार मधे जाऊन दारू ढोसत असेल. आपली भीती घालवण्यासाठी. ” सौम्या म्हणाली.
“ मला जो माणसाच्या स्वभावाचा अंदाज आहे, तो खरा ठरला तर तो बार मधे जाऊन दारू ढोसत नसेल तर भीती घालवण्याची गरज आपल्याला आहे. ” पाणिनी म्हणाला. आणि सौम्या ला घेऊन निघाला.
( प्रकरण १७ समाप्त.)