Devayani Vikas and Keys - Part 15 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १५

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 

 

 

 

 

भाग १५

भाग  १४    वरून  पुढे  वाचा ................

 

“अरे  वा इथे पार्टी चालली आहे वाटतं. सुप्रिया मी तुझा इतक्या वर्षांचा मित्र, मला नाही सांगीतलस? एनी वे, आता मी आलोच आहे. नो प्रॉब्लेम.”

सुप्रियाला ते सहन झालं नाही. ती म्हणाली –

“हे बघ राजू, तू ज्या प्रकारे देवयानीशी वागतोस ते आम्हा कोणालाच आवडलेलं नाहीये. देवयानी माझी बाल मैत्रीण आहे आणि इथे मी तिची गार्डीयन  आहे. तेंव्हा तू आता इथे न थांबता निघून जावस हे उत्तम.”

“सुप्रिया हे तुझं बरोबर नाहीये. एखादी मुलगी आवडणं यात काय गैर आहे ? मला देवयानी आवडते म्हणून तिला मागणी घालतो आहे यात काय चूक आहे माझी? मी फ्लर्ट  करत नाहीये. मी जाम सिरियस आहे. तिला माझ्याशी लग्न कर म्हणतो आहे यात तुम्हाला राग का येतो आहे हेच  मला समजत नाही. माझ्या शिवाय इतरांमध्ये तिला विचारायची, ती कुवतच नाहीये त्याला, मला नाही वाटत की मी जबाबदार आहे म्हणून.” राजुनी आपली बाजू मांडली.

“तुझ्या याच विचार सरणीची आम्हाला आता भीती वाटायला लागली आहे.” सुप्रियानी संतांपून उत्तर दिलं. “तुला मानसोपचार तज्ञा कडे जाण्याची जरूर आहे. तू आता ताबडतोब इथून जा. हे मी शेवटचं निक्षून सांगते आहे.”

देवयानीला हे सगळं असह्य झालं. ती बेडरूम मधे गेली. ते पाहून राजू म्हणाला

की  “मी एकदा आणि शेवटचं देवयानीला विचारून येतो. नंतर कधीही मी तिच्या वाटेला जाणार नाही. विश्वास ठेवा.” आणि तो तिच्या मागो माग बेडरूम मधे गेला.

 

देवयानी पाठमोरी खिडकीशी उभी होती. राजूने जावून तिला पाठी मागून गच्च मिठी मारली. तिला आवळून धरत तिचं चुंबन घेण्याच्या प्रयत्नात होता. देवयानी अचानक झालेल्या हल्ल्याने बावचळून गेली. तिने असं काही होईल यांची कल्पनाच केली नव्हती. तिला क्षणभर काय होतेय तेच कळेना. तो पर्यन्त राजूने तिला वळवून आपल्या कडे ओढलं होतं. देवयानी सर्व बळ एकवटून त्याला ढकलायचा प्रयत्न करत होती पण तिचं बळ अपूर पडलं. राजूनी तिला घट्ट पकडलं होतं. देवयानीने ओरडून सुप्रियाला आवाज दिला. तिचा आवाज ऐकून सगळेच बेडरूम कडे धावले आणि त्यांनी पाहीलं की राजू तिचं जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न करत होता. सुप्रियाचे जे दोन मित्र तिथे होते त्यांनी राजुला मागे खेचलं आणि देवयानीची त्याच्या तावडीतून सुटका केली. त्याला चार दोन लगावल्या आणि दाराच्या बाहेर काढलं.

देवयानीच्या चेहर्‍याकडे बघवत नव्हतं विदीर्ण झालेला चेहरा कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण होतं ते. पार्टी चा सगळाच विचका झाला होता. कोणीच बोलत नव्हतं. फार मोठा आघात झाला होता. सगळ्यांनाच हे पचवणं  अवघड झालं होतं.

देवयानी रडत होती. सुप्रिया आणि लक्ष्मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. पुन्हा राजू आला तर काय करायचं? म्हणून दोघा मित्रांनी रात्रभर तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रिया हो म्हणाली. तिलाही जरा सुटल्या सारखं झालं.

“सुंदर असणं हा अपराध आहे का ग? देवयानी बऱ्याच वेळाने बोलली. आता ती जरा सावरली होती. “मी काय पब्लिक प्रॉपर्टी आहे का? कोणीही यावं आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न करावा?”

सुप्रिया काय कोणीच काही बोललं नाही. तिच्या प्रश्नांना कुणा जवळ उत्तर नव्हतं.

केंव्हा तरी रात्री सगळे जेवले. जेवणात कुणाचेच लक्ष नव्हतं. पोलिसांना सांगायचं का यावर बरीच चर्चा झाली. पण बदनामी देवयानीचीच झाली असती म्हणून मग आधी विकासला सांगू मग तो म्हणेल तसं करू. असं ठरलं.

 

सकाळी देवयानीनी विकासला फोन केला. विकास निघायच्या तयारीत होता. देवयानीचा कॉल बघून त्याला जरा आश्चर्यच वाटलं.

“काय ग इतक्या सकाळी सकाळी फोन केलास ? काय विशेष ?” – विकास

“तू आत्ता इथे येऊ शकतोस का?” – देवयानी

“आत्ता ? कसं शक्य आहे? मी ऑफिस ला चाललो आहे.” – विकास

“माहीत आहे मला ते. तरी मी म्हणते आहे की तू येऊ शकतोस का?” – देवयानी

“काय झालं आहे ते तर सांगशील?” – विकास

“फोन वर नाही सांगता यायचं. तू ये मग बोलू.” – देवयानी 

“हे बघ आत्ता आमची खूप महत्त्वाची मीटिंग आहे. चुकवता नाही यायची. बारा पर्यन्त संपेल. मग बॉस ला सांगून येतो साडे बारा पर्यन्त. चालेल?” – विकास

“ठीक आहे मी वाट बघते. घरीच ये.” – देवयानी

“ओके.” विकास म्हणाला 

“विकास आता येऊ शकत नाहीये. तो साडे बारा पर्यन्त पोचतो म्हणाला.” देवयानीनी सर्वांना अपडेट दिलं.

“ठीक आहे, मग आम्ही निघतो आता आणि आंघोळ वगैरे करून पुन्हा येतो. मग विकास आल्यावर काय ते ठरवू.” सर्वांच्याच आज सुट्ट्या लागणार होत्या. प्रत्येकाने आपापल्या ऑफिस मधे तसं कळवून टाकलं.

ते गेल्यावर देवयानी सुप्रियाला म्हणाली की “राजूला तुम्ही बेडरूम मधे कसं येऊ दिलं?”

“अग तो म्हणाला की ‘मी शेवटचं विचारतो जर तू नकार दिलास तर पुन्हा कधीही तुझ्या वाटेला जाणार नाही.’ आम्ही पण विचार केला की चॅप्टर संपत असेल तर काय हरकत आहे? सहजतेने निपटारा होतो आहे असं समजून आम्ही त्याला जाऊ दिलं. पण तो असा काही वागेल ह्याची आम्हा कोणालाच कल्पना आली नाही. “चुकलंच आमचं. माफ कर आम्हाला.” – सुप्रिया म्हणाली.

देवयानी यावर काहीच बोलली नाही. तिलाही कळत होतं की त्यांचा हेतु चांगलाच होता. पण राजूच वाईट वागला त्याला काय करणार? आता खरं तर तिला राजूची कीव यायला लागली होती. ती सुप्रियाला म्हणाली –

“सुप्रिया तुला काय वाटतं, राजू त्याच्या भूमिकेशी प्रामाणिक होता की उगाच माझ्या

बरोबर मजा मारायची म्हणून इतका मागे लागला होता? म्हणजे विकास म्हणतो तसं, प्रयत्न करून पहायचा, पोरगी पटली तर उत्तमच.” देवयानीनी विचारलं.

“ए बाई, तू आता राजूचा विचार करते आहेस की काय? विकासचं काय करणार आहेस? तुमचं लग्न ठरलं आहे हे विसरलीस का? हात जोडले बाई तुला.” सुप्रियानी खरंच हात जोडले.

 

“अग नाही,” देवयानी म्हणाली “तू काय वडाची साल पिंपळाला लावते आहेस. विकास च्या शिवाय इतर कोणाचा विचार सुद्धा माझ्या मनात येणं शक्य नाही. पण म्हणजे मी विचार करत होते की तो आज जसा काही वागला, ते गैरच होतं, पण त्याची भावना खरी असेल का? आणि असेल तर त्यात काही चूक नाही, असं मला वाटतं. विकास सुद्धा असच म्हणतो. एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं आकर्षण वाटणं नैसर्गिकच आहे. असं विकास म्हणतो. तो म्हणतो की एकदा लग्न झालं आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं की या सगळ्या गोष्टी इतिहास जमा होतात.”

“मग आता तुझ्या मनात काय आहे? तुमच्या लग्नाला अजून दोन अडीच महीने आहेत. त्यांच्या आधीच करायचा  विचार आहे का?” – सुप्रिया 

“करता आलं असतं तर किती छान झालं असतं. पण नाही करता येणार. हॉल मिळण्यात किती अडचणी येतात. त्यामुळे  ठरलं आहे ते ठीकच आहे न.”

“देवयानी, तू कुठल्या मातीची बनली आहेस ग? काल रात्रीची देवयानी आणि आत्ताची देवयानी किती वेगळ्या आहात. आज तू सगळ्या गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार करते आहेस आणि राजू बद्दल तुझ्या मनात अजिबात वैरभाव दिसत नाहीये.” सुप्रिया नवल वाटलं.

“हा सगळा विकासच्या सहवासाचा परिणाम आहे. तो खूप शांत आहे. अजिबात पॅनीक  होत नाही. तो नेहमी म्हणतो शांत राहूनच सोल्यूशन्स काढता येतात. अग त्याच्या घरचे पण सगळे असेच आहेत.” देवयानी म्हणाली.

“हो तू सांगितलं होतंस मला. तू नागपूरला गेली होतीस तेंव्हा बरेच प्रॉब्लेम निर्माण झाले होते. ठीकच आहे मग. आता विकासला येऊ दे मगच काय तो निर्णय घेऊ. बरं पण आता मला भूक लागली आहे. काही करूया? आत्ता विकास येईल, त्याचं पण जेवण व्हायचच असेल ना ? आणि ही दोघ पोरं! ती पण येऊ म्हणाले आहेत. त्यांचं पण करावं लागेल. त्यांना फोन करते आणि विचारते.” – सुप्रिया.

देवयानी म्हणाली, “आधी आपण सगळं आटपून घेऊ. मगच किचन मधे जाऊ.” आंघोळ करून फ्रेश झाल्यावर देवयानीनी आधी लक्ष्मीला उठवलं. लक्ष्मी अजून झोपलीच होती. तिला उठवलं. देवयानीचा टवटवीत चेहरा बघून ती ताडकन उठून बसली.

“सावरलीस? एवढ्या लवकर?” तिने विचारलं आणि देवयानीनी हसून मान हलवली. लक्ष्मी पण हसली.

मग सुप्रिया आणि देवयानी, दोघी स्वयंपाकाला लागल्या. तासा भरात सगळं स्वयंपाक तयार झाला, आणि मग त्या विकासची वाट बघत बसल्या. ती दोघं मुलं पण आली होती. देवयानीचा प्रफुल्लित चेहरा पाहून त्यांना पण समाधान वाटलं. आता कोणाच्याच डोक्यावर टेंशन नव्हतं. देवयानीची विचार करण्याची पद्धत पाहून त्यांना आश्चर्य वाटलं पण बरही वाटलं.

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

Share

NEW REALESED