Devayani Vikas and Key - Part 22 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २२

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

 

भाग   २२

भाग  २१  वरून  पुढे  वाचा ................

 

“विकास राव, काय सुंदर सजवला  आहे तुम्ही फ्लॅट.” घरी आल्यावर फ्लॅट च निरीक्षण करतांना देवयानीची आई म्हणाली

“आई, तुम्ही मला राव वगैरे म्हणू नका. विकासच म्हणा . आणि हे सगळं क्रेडिट देवयानीचं आहे तिनेच खूप मेहनत घेतली आहे. तिने तिला हवा तसा, तिच्या स्वप्नातला फ्लॅट सजवला  आहे. माझी मदत फक्त ती सांगेल ते आणून द्यायची एवढीच आहे.”

देवयानीच्या आई, बाबांना विकास चा फ्लॅट खूपच आवडला.

देवयानीनी गेले तीन महीने फ्लॅट सजवायला अपार मेहनत घेतली होती, त्यामुळे, आई चा  अभिप्राय ऐकतांना तिचा उर भरून आला होता. नंतर देवयानी स्वयंपाकाला लागली. आणि आई, ती ज्या सहजतेने ती सगळं करत होती ते कौतुकानी पहात होती. विकास किचन मधे आला आणि त्यांनी विचारलं

“देवयानी, तू बॅग  भरून ठेवली आहेस ना ?”

“हो. तू आणतो आहेस का ?” – देवयानी.

“हो मी जाऊन घेऊन येतो. तुम्ही मारा गप्पा निवांत.” – विकास. 

“बॅग कशाला ?” आइनी  विचारलं.

“अहो, तुम्ही असे पर्यन्त देवयानी इथेच राहील तुमची काळजी घ्यायला. तिने सुट्टी घेतली आहे. तुम्हाला शॉपिंग करायला मदत करेल.” – विकासनी सांगितलं.

विकास जाऊन देवयानीची बॅग घेऊन आला. जेवण झाल्यावर, मग गप्पा गोष्टी, काय, काय खरेदी करायची यांची उजळणी करता करता केंव्हा रात्रीचे बारा वाजले हे कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी विकास तर ऑफिस ला  गेला. आणि हे तिघ खरेदीला निघाले.

तीन दिवस, फिर फिर फिरणं चाललं होतं. बरीचशी कामं आटोपली होती. आता दागिने, त्यांची डिझाईन बघून ऑर्डर द्यायची होती त्या करता निघाले. सगळं आटोपून घरी येतांना रिक्शा एका स्पीड ब्रेकर वरून जोरात उसळली आणि उलटली. देवयांनीचे बाबा, वरच्या लोखंडी बारला धडकुन  रस्त्यावर फेकल्या गेले. पाठी  मागून एक कार येत होती. ती करकचून ब्रेक दाबून थांबली पण बाबांच्या पायांवरून गाडीचं चाक गेलच. बाबा बेशुद्ध झाले होते. आई आणि देवयांनीला किरकोळ लागलं होतं. कार वाला सज्जन होता, थांबला होता. त्यानीच, त्याच्याच कार मधून बाबांना हॉस्पिटलला नेलं.

बाबांना ताबडतोब ICU मधे   भरती केल्या गेलं. X- RAY, MRI वगैरे तपासण्या साठी लगेच कार्यवाही सुरू झाली. Blood samples घेऊन झाले. देवयानी आणि देवयानीच्या आई वर प्राथमिक उपचार करून झाले. आता बाबांच्या निदानाची वाट होती. देवयानीने विकासला फोन  केला.

“हेलो, विकास, देवयानी बोलते आहे.”

“काय झालं? तुझा आवाज असा का येतोय? रडतेयस की काय?”- विकास.

“विकास तू लवकर इथे ये. खूप भयंकर घडलंय.” – देवयानी.

“देवयानी आधी शांत हो. तू काय म्हणतेयस, आणि मी कुठे यायचं, मला काही कळत नाहीये.” विकास म्हणाला.

“अरे आम्ही घरी परतत असतांना ऑटो रिक्शा ला अपघात झालाय. स्पीड ब्रेकर  वरून रिक्शा उलटली. बाबा बाहेर फेकल्या गेले आणि त्यांच्या पायांवरून कार च चाक गेलं. बाबा बेशुद्ध आहेत. त्यांना हॉस्पिटल ला अॅडमिट केलं आहे. तू ताबडतोब  ये इथे. आई पण खूप घाबरली आहे. माझाही गोंधळ उडाला आहे. मी एकटीच आहे रे इथे.” देवयानीनी रडवेल्या आवाजात सांगितलं.

“मी लगेच निघतो. पोचायला जेवढा वेळ लागेल तेवढाच.”- विकास

विकास लगेच बॉस ला सांगून निघाला. तो पण येऊन पोचला. सगळे बाहेर थांबले होते. देवयानीने आत्ता पर्यन्त धीर धरला होता आणि ती आईला समजावत होती पण विकास आल्यावर तिचा धीर सुटला. तिचा पण आवाज रडवेला झाला होता. विकासने तिला धीर दिला.

“देवयानी, आई आता मी आलो आहे मी बघतो काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. धीर धरा. डॉक्टर आल्यावरच कळणार आहे किती गंभीर दुखापत आहे ते.”- विकासने त्यांना  धीर दिला.

 

थोड्या वेळाने डॉक्टर सांगत आले की डोक्याला मार लागला आहे पण जखम नाहीये, मुका मार आहे. आणि इंटरनल ब्लीडिंग पण दिसत नाहीये. उलट्या होत नाहीयेत तेंव्हा काळजीचं कारण नाहीये. पाय फ्रॅक्चर झाला आहे, पायाचं हाड पायाच्या बाहेर आलं आहे त्यामुळे त्वरित ऑपरेशन करावं लागणार आहे. तुम्ही लवकर सर्व formalities पूर्ण करून या. विकास लगेच उठला.

आता लॉबी मधे देवयानी आणि तिची आई या दोघीच उरल्या होत्या.

“देवयानी, कसं होईल ग आता.” – कावेरीबाई.

“अग आत्ताच डॉक्टर सांगून गेले न की काळजीचं काही कारण नाहीये म्हणून.” देवयानीनी आईला धीर दिला. आणि बघ “डोक्याला लागलेला मार गंभीर असता तर गोष्ट वेगळी होती. पण तसं नाहीये त्यामुळे जरा धिराने घे. आणि विकास आहेच न बरोबर. तो करेल सगळी धावपळ.”

“अग पण पाय तुटला आहे आता किती दिवस अंथरुणांत पडून राहावं लागेल कोणास ठाऊक.” – कावेरीबाई.

“त्याची फारशी चिंता करू नकोस आई. आम्ही आहोत न काळजी घ्यायला.”- देवयानी म्हणाली. “बरं आता मी सुरेशला फोन करून माहिती देते. तो पण ताबडतोब निघेलच इकडे यायला. तो अजून डॉक्टर झाला नसला तरी  त्याला कळेलच नक्की काय परिस्थिती आहे ते.”

“हो बाई, कर लवकर त्याला फोन.”

देवयानीने सुरेश ला फोन केला.

“हेलो सुरेश, देवयानी बोलते आहे.”

“काय झाली का सगळी खरेदी ? कपडे , दागिने सगळं झालं ?”- सुरेश

“अरे खरेदीचं काय घेऊन बसला आहेस. बाबांना अपघात  झाला आहे आणि त्यांना अॅडमिट केलं आहे. पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि त्यांचं आता लगेच ऑपरेशन होणार आहे. तू लगेच निघून ये.” – देवयानी.

“अरे असं अचानक काय झालं. देवयानी तू मला सविस्तर  सांग काय घडलं ते. मी आत्ता रात्रीची बस आहे का बघतो आणि असेल तर लगेच निघतो.” – सुरेश.

“तू आधी बूकिंग कर मग मी तुला सर्व सांगते. निवांतपणे.” – देवयानी.

“विकास असेलच न तिथे?”- सुरेश.

“अर्थातच. तोच सगळी धाव पळ करतो आहे.” – देवयानी.

“बरं ठेवतो आणि बूकिंग झाल्यावर तुला कॉल करतो.” – सुरेश 

“आई, सुरेशला कळवले आहे. तो कोणच्या  बस चं बूकिंग मिळतं आहे का ते बघतो आहे. येईलच त्याचा फोन थोड्या वेळात.” देवयानीनी आईला सांगितलं.

थोड्या वेळाने सुरेशचा फोन आला.

“देवयानी, बसचं तर काही जमलं नाही. मी विचार करतो आहे की सरळ टॅक्सी करावी म्हणजे  सकाळ पर्यन्त तिथे पोचून जाईन.” सुरेशनी आपला विचार बोलून दाखवला.

“अगदी बरोबर. बस मिळाली असती तर बरंच झालं असतं पण आता नाहीये तर सरळ टॅक्सी कर. जास्त विचार करत बसू नकोस. पैसे ट्रान्सफर करू का?”- देवयानी म्हणाली.

“नाही आहेत माझ्या जवळ. तू टेंशन घेऊ नको. तिथे आल्यावर बघू. तू फक्त एक कर घराचं लोकेशन पाठवून दे. आणि अॅड्रेस पण.” – सुरेश.

“पाठवते.” – देवयानी.

विकासने फॉरमॅलिटीज पूर्ण केल्यात आणि ५०००० पेमेंट पण केलं. आल्यावर त्यांनी डॉक्टर ला शोधलं आणि सर्व फॉरमॅलिटीज पूर्ण केल्याचं सांगितलं.

“हो कळलं आम्हाला. आम्ही ऑपरेशन ची तयारी करायला घेतली आहे. आता तुम्ही स्वस्थ बसा. काळजी करू नका. सर्व ठीक होईल.” डॉक्टर म्हणाले.

देवयानीनी विकासला सांगितलं की सुरेश टॅक्सी ने निघतो आहे. सकाळ पर्यन्त पोहोचेल.

“अग  इतक्या तातडीने कशाला बोलावून घेतलं त्याला. मी आहेच न.”- विकास.

“तू आहेसच रे. पण सुरेश आला तर आईला जरा आधार वाटेल म्हणून बोलावलं. किती झालं तरी तू होणारा जावई आहेस. थोडा संकोच तर वाटेलच ना.” – देवयानी.

“मला असं वाटलं की त्याची आता परीक्षा जवळ आली आहे, आणि मी आहेच इथे म्हणून. अजून काही नाही. पण ठीकच आहे आईंना नक्कीच आधार  वाटेल.”- विकास.

“तेच तर. तोच विचार मी केला. कितीही झालं तरी तो MBBS च्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यामुळे तो आला की जरा बरं वाटेल.” – देवयानी.

“ते आहेच. त्याला आपल्या पेक्षा जास्तच कळेल. बरं, देवयानी, आई बाबांना कळवू का?”- विकास.

“अरे त्यांना कशाला टेंशन देतोस. ते तिकडे नागपूरला. उगाच काळजी करत बसतील.” – देवयानी.

“हो, पण कळवायला नको का?” – विकास.

“कळवायला तर हवच. थांब आईलाच  विचारते.” – देवयानी.

“आई, विकास म्हणतो आहे की  नागपूरला कळवतो म्हणून. ठीक आहे न?”

“हो. ठीकच आहे. त्यांना कळवायलाच हवं.” – कावेरीबाई.

विकासने घरी फोन केला. रात्रीचे नऊ वाजले होते त्यामुळे बाबा घरी आले होते. भैय्या अजून यायचा होता. विकास ने त्यांना परिस्थितीची कल्पना दिली.

“म्हणजे आता त्यांचं ऑपरेशन चालू आहे का ?”- विकासचे बाबा.

“हो. बहुधा तीन चार तास लागतील असं डॉक्टरांच्या बोलण्या वरून वाटतंय.”- विकास.

“ठीक आहे. कुठे उतरले आहेत? आपल्याच फ्लॅट वर ना?” – बाबा.

“हो. आणि उद्या सुरेश पण सकाळी पोचतोय.”- विकास.

“हे मात्र चांगलं झालं. घरचाच डॉक्टर असला की काळजी नसते. आता तर देवयानी आणि तिची आई दोघंही तिथेच असतील ना?” – बाबा.

“हो.” – विकास. 

“एक कर. रात्री त्यांना घरी पाठवून दे. जरा आराम करू दे त्यांना.” – बाबा.

“हो बाबा  तसंच करतो.” – विकास.

“ठीक. अपडेट दे उद्या. ऑपरेशन झाल्यावर काय परिस्थिती आहे ते कळव.”- बाबा.

“हो.” – विकास.

 

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.