Devayani Development and Key - Part 39 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ३९

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ३९         

भाग  ३८ वरून  पुढे  वाचा ......

 

“हो ग, पण मला ते आत्ता पटतेय. त्या वेळी मी राजूच्या प्रेमात पूर्ण अडकून गेली होती. मला काही दिसतच नव्हतं. या देवयानीनी तिच्यावर राजू मुळे आलेला प्रसंग पण सांगीतला होता, मला सावध करण्याचा प्रयत्न केला होता देवयानीने, पण मी तिच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आता त्याची फळं भोगतेय. काय करू ग मी आता. इथे माझं मन थाऱ्यावर राहणार नाही आणि माझ्या देशात मला पाय ठेवायला जागा नाही.” पूर्णिमा बोलता बोलता रडायला लागली. देवयानी आणि सेजल दोघींच्या कडे याचं सोल्यूशन नव्हतं. त्या गप्प बसल्या.

थोड्या वेळाने राजेश आला. पण गप्पा मारण्याचा कोणाचाच मूड नव्हता. राजेशच्या  ते लक्षात आलं. तो म्हणाला,

“चला आपण बाहेर जेवायला जाऊ, जरा मूड हलका होईल.”

“अरे पण पूर्णिमाला अशी सोडून नाही जमणार यायला.” – सेजल. 

“अग मी सगळेच जाऊ म्हणत होतो. खरं तर पूर्णिमासाठीच म्हणत होतो. काय पूर्णिमा चलणार का?” – राजेश.

सेजलच म्हणाली की “चला जाऊया, मूड पण फ्रेश होईल. चल पूर्णिमा बाहेर गेल्यावर जरा फ्रेश वाटेल. चल ग देवयानी. राजेश म्हणतो आहे ते पटलं मला.” देवयानीला पण ते पटलं. मग सगळे जण बाहेर पडले. पूर्णिमाची जेवणावरची वासनाच उडाली होती. ह्या लोकांनी तिला थोडं फार खायला घातलं. जवळ जवळ जबरदस्तीच केली म्हणाना. यायला बराच उशीर झाला साडे अकरा बारा वाजले होते. आल्यावर देवयानीनी नागपूरला फोन लावला.

“हॅलो देवयानी, कशी आहेस?” अश्विनी म्हणाली. आणि देवयानीचा जरा गंभीर चेहरा पाहून म्हणाली, “अग काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?”

नाही, का हो ?

“अग तुझा चेहरा उतरलेला दिसतो आहे म्हणून.” – अश्विनी. 

“अहो काही विशेष नाही. जरा असंच इकडे माझ्या पार्टनर चा थोडा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून. बाकी काही नाही.” – देवयानी. 

“सेजल ला काय झालं?” – अश्विनी.

“सेजल नाही, पूर्णिमा. माझी दुसरी पार्टनर. आम्ही तिघी आहोत.” – देवयानी.

“आधी तू कधी हिचा उल्लेख केला नाहीस म्हणून माहिती नाही. नवीनच आली  आहे का?” – अश्विनी.

“नाही.” देवयानी म्हणाली. “जुनीच आहे. पण इतके दिवस ती इथे राहत नव्हती. आता आली आहे.”

“प्रॉब्लेम सिरियस आहे का?” भैय्या ने विचारले.

भाऊजी, तुम्ही या वेळी घरी कसे?

“अग लॉक डाऊन आहे, सगळं बंद आहे. ते सोड, तू काय सांगत होतीस?” – भैय्या.

“अहो ते इतकं महत्वाचं नाहीये.” देवयानीनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. “सोडून द्या. विकास चं काय अपडेट आहे ?”

“अग. आज सकाळीच जाऊन भेटून आलो. आता इंजेक्शन चे तीन डोस लागले आहेत ना, चांगली सुधारणा आहे. मी गेलो तेंव्हा उठून बसला होता आणि नाश्ता

करत होता. छान बोलला माझ्याशी.” – भैय्या.

“अरे वा, किती छान. पण भाऊजी, तुम्ही तर म्हणाला होता की आत मध्ये भेटायला जाऊ देत नाही म्हणून.” – देवयानी.

“अग हो पण मी आज डॉक्टरांना खूपच गळ  घातली, मग ppt किट घालून त्यानी  मला जाऊ दिलं. जास्त वेळ नाही बसू दिलं. पण आता ठीक आहे.” – भैय्या.

“ऑक्सिजन सुधारतो आहे का?” – देवयानी

“हो आज पाहीलं तेंव्हा ऑक्सिजन लावल्यावर ९९  होतं आणि काढल्यावर ९२-९३ येत होतं.” भैय्या सांगत होता. “डॉक्टर म्हणाले की आज पुन्हा X-RAY काढणार आहेत, त्यांच्यात कळेल पॅच किती कमी झाला आहे ते. बाकी आणखी काही टेस्ट पण आज होणार आहेत. डॉक्टर म्हणाले की सर्व ठीक असेल तर ४-५ दिवसांत सुट्टी देऊ म्हणून.”

“आणि भाऊजी, थकवा कसा आहे? गेला का?” देवयानीची काळजी तिच्या स्वरात डोकावत होती.

“नाही, थकवा बराच आहे. डॉक्टर म्हणाले थकवा जायला वेळच लागतो. पण आता बाकी परामीटर्स चांगले आहेत. आज टेस्ट केल्यावर कळेलच. उद्या याल तेंव्हा सांगेन.” – भैय्यानी सांगितलं. पुढे म्हणाला “अग मी सांगितलं, विकासला की आम्ही  सतत तुझ्या संपर्कात असतो आणि तू भारतात येणार आहेस आणि पांच जुलै चं तिकीट आहे. आणि हे कळल्यावर इतका खुश झाला की चेहऱ्यावर सुद्धा तरतरी आली.”

देवयानी समाधानाने हसली. पण त्या हसण्यात जीव नव्हता. आणि ते अश्विनीला पण जाणवलं.

“चला ठीकच आहे. ठेवू?” – देवयानी.

“नको.” आता अश्विनी म्हणाली.

“नको?” – देवयानी.

“नको. काल किती हसरा आणि प्रसन्न चेहरा होता तुझा. आज काय झालं ते सांगितल्याशिवाय फोन ठेवू नको. आम्हालाही कळायला हवं.” – अश्विनी. 

“अहो वहिनी, इथले, प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही ऐकून काय करणार?” – देवयानी.

“तरी पण सांग.” – अश्विनी.

आता देवयानीचा नाईलाज झाला. मग तिने रूम चा दरवाजा लावून घेतला. मग पूर्णिमाची कथा सविस्तर सांगितली.

अश्विनी नी सुस्कारा सोडला. म्हणाली

“काय एकेक प्रॉब्लेम्स असतात. आम्हाला तर कल्पनाही करवत नाही, की असंही घडतं, आणि ते ही एका मराठी मुली बाबत असं होतं तेंव्हा फार वाईट वाटतं.”

“बघा, मी म्हंटलं होतं ना इथले प्रॉब्लेम्स वेगळेच असतात. तुम्ही जाणून घेऊन काय करणार?” – देवयानी म्हणाली आणि सुस्कारा सोडला.

“खरं आहे. पण देवयानी पण आमची चिंता वेगळीच आहे. आम्हाला तुझा कोमेजलेला चेहरा बघवत नाही. तू या गोष्टी फारश्या मनाला लावून घेऊ नकोस. कारण या बाबतीत तू काय, कोणीच, काहीही करू शकत नाही. तिने स्वत:च स्वत:ला सावरायला हवं. बरं असो. तुझी तयारी कुठवर आली आहे?” – अश्विनी.

“चालू आहे हळू हळू. बरं वाहिनी, रात्र बरीच झाली आहे आणि उद्या सकाळी जायचं आहे. ठेवू का आता?” – देवयानी.

“उद्या तर शनिवार आहे, मग कुठे जायचं आहे?” – अश्विनी.

“अहो, तुम्हाला सांगितलं ना, पूर्णिमाचं सामान आणायला जायचं आहे, राजेश येणार आहे आमच्या बरोबर.” – देवयानी.

“ओके. चल. बाय.” – अश्विनी. 

दुसऱ्या दिवशी हे लोक राजूच्या फ्लॅट वर जाऊन पूर्णिमाचं सामान घेऊन आले. राजू काही बोलला नाही. खाली मान घालून बसला होता. सगळ्यांच्याच लक्षात आलं की त्याला फार अपराधी वाटतं आहे म्हणून. पण आता करण्या सारखं काही शिल्लक नव्हतं. पूर्णिमाच्या मनातून तो पार उतरला होता. पूर्णिमाने  त्याच्या कडे एकदा सुद्धा बघितलं नाही.

घरी आल्यावर सुद्धा पूर्णिमा शून्यात नजर लावून बसली होती. सध्या तरी तिची अवस्था त्रिशंकु सारखी झाली होती. निराधार आणि अधांतरी. समोर फक्त अंधार होता. नोकरी अजून तरी होती पण तिच्या कामावर परिणाम झाला, तर ती ही जाण्याची खूपच शक्यता होती. तिला हे सगळं कळत होतं. स्वत:ला सावरायला पाहिजे हे ही कळत होतं, पण कितपत जमेल याची तिलाच शंका होती. राजूने दिलेला धक्का तिला सहन होत नव्हता. पार कोलमडून गेली होती ती. दिवस तसाच उदासवाणा गेला. देवयानीला  सुद्धा इतकं उदास वाटत होतं की नागपूरला फोन करून अपडेट घ्यायची सुद्धा इच्छा नव्हती. तिने फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि झोपायला गेली.

दूसराही दिवस तसंच उजाडला. उदासवाणा. रात्रभर कोणाचीच झोप व्यवस्थित झाली नव्हती. आणि आज अजूनच अवघड होतं. आज रविवार होता. रोज कामाच्या गडबडीत दिवस निघून जायचा पण आज रिकामपण होतं. आठवड्या भराची साचलेली कामं उरकता उरकता अर्धा दिवस तर निघून गेला. तरी सेजलने थोडी हुशारी केली आणि पूर्णिमाला कामाला लावलं. म्हणाली,

“पूर्णिमा आज आम्हाला बरीच कामं आहेत. तू आज किचन सांभाळतेस का?”

पूर्णिमाने मान हलवली. त्यामुळे ती पण जरा व्यस्त झाली.

जेवताना सेजल आणि देवयानी पूर्णिमाच्या स्वयंपाकाची तारीफ करत होत्या.

“सेजल, देवयानी, तुम्ही इतकी तारीफ करू नका, मला माहीत आहे मी स्वयंपाकात काय दिवे लावते ते. मी म्हणजे काही देवयानी नाहीये.” आणि पूर्णिमा हसली. चार दिवसा नंतर प्रथमच पूर्णिमा हसली होती. सेजल नी तर उठून तिला मिठीच मारली.

“माय डियर कशी आहेस तू?” – सेजल.

“एकदम फाइन. ” आणि पूर्णिमा पुन्हा हसली.

“अग, अगss, एकदम इतका बदल कसा झाला?” – सेजल. 

“मी न किचन मध्ये बराच वेळ होते ना. तेंव्हा विचारच करत होते. आणि मग एकदम उजेडच पडला. अग फसवलं राजूने, अपराधी पणाची बोच त्याला यायला पाहिजे. मी का उदास बसली आहे? मी भोळे पणाने म्हण, की मूर्खपणाने म्हण, फसली त्याच्या  जाळ्यात. पण ती चूक होती, अगदी घोडचूक होती, अपराध नव्हता. मी मनापासून राजूवर प्रेम केलं. त्याचा त्यानी गैर फायदा घेतला. अपराध तर राजूने केला मग मी का माझं आयुष्य वाऱ्यावर सोडू? ज्ञान प्राप्तीच झाली म्हण ना.” आणि स्वच्छ, मन मोकळं हसली.

मग सेजल आणि देवयानी दोघी जणी उठल्या. आणि मग तिघी जणींचे  अनेक स्मायलिंग सेल्फी निघाले. आता चिंता नव्हती. मग सेजल नी राजेशला फोन केला.

राजेशला पण झालेली डेवलपमेंट ऐकून आनंद झाला. तो लगेच आला. आणि मग सगळे जणं long drive वर गेले. सर्व जणं दिवस भर नुसते वारा प्यायल्या सारखे हुंदडत होते. जेवून खाऊन परत यायला बरीच रात्र झाली होती. आल्यावर सगळे थकून गेले होते पण आनंदी आनंद होता.

रात्री देवयानीनी फोन लावला.

“हॅलो. कशी आहेस देवयानी?” – अश्विनी.

“आज कशी दिसते आहे मी वहिनी ” – देवयानी.  

“मस्त. अग आम्हाला अशीच खुशीत असलेली देवयानी पाहायला आवडते. लगता हैं की सब बादल छट गए हैं.” – अश्विनी.  

“हो वहिनी, पूर्णिमा आता पूर्व पदावर आली आहे. आज आम्हाला राजेश नी long drive वर नेलं होतं. खूप मजा केली आम्ही.” – देवयानी. 

“हं. ते दिसतच आहे स्पष्ट. छान झालं. लवकरच सावरली पूर्णिमा.” – अश्विनी. 

“हो वहिनी, आता सर्व ठीक आहे. बरं पण विकासची काय हाल हवाल? भाऊजी पुन्हा भेटले का त्याला?” – देवयानी.

“नाही पण डॉक्टर म्हणाले की रिपोर्टस  छान आले आहेत आता काळजीचं काहीच कारण नाहीये. ऑक्सिजन मास्क काढून, लेवल ९८ आली आहे. आता ४८ तास त्याला बिना ऑक्सिजन सपोर्ट ठेवतील. जर सगळं ठीक असेल तर दोन दिवसांनंतर डिस्चार्ज देऊ असं म्हणत होते.” – भैय्या.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.