Angadiya - 3 books and stories free download online pdf in Marathi

अंगडिया स्टोरी - भाग ३

 अंगडिया स्टोरी

भाग  ३

भाग २  वरुन पुढे वाचा ......

थैला अजूनही सीलबंद होता. पंचनामा करून त्या थैल्याची नोंद करण्यात आली. सर्व जणांचे बयाण पण नोंदवण्यात आले. थैला मुकेश अंगडियाचा  होता हे स्पष्ट झालं होतं. आता प्रश्न हा होता की चोरी होऊनही संबंध दिवसभरात मुकेश भाईंनी पोलिस स्टेशन मधे तक्रार का नोंदवली नाही. ती केली असती तर आत्ता पर्यन्त शहरातल्या सर्व ठाण्यांना त्यांची माहिती मिळाली असती. रात्र बरीच झाली होती रात्रीचे 3 वाजले होते, म्हणून साहेबांनी विचार केला की उद्या सकाळी सकाळी मुकेश भाईंना बोलाऊन घेऊ. मग सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

सकाळी पोलिसांनी फोन करून मुकेशभाईंना गणेश पेठ पोलिस स्टेशन ला बोलाऊन घेतलं. मुकेश भाईंना आता सुचेना की काय करावं ते. त्यांनी किरीटभाईंना फोन लावला.

“क्या हुवा मुकेश भाई? बॅग  मिली क्या?” – किरीट भाई

“बॅग  तो मिली, पर पुलिस को, अभी फोन आया था थाने बुलाया हैं.” – मुकेश भाई.

“ठीक हैं जाकर देख लो.” – किरीट भाई.

“किरीट भाई आप समझे नाही. वो लोग पूछेंगे की कम्प्लैन्ट क्यूं नहीं किया, तो क्या जवाब दूंगा?” – मुकेशभाईंना कळत नव्हतं की किरीट भाई एवढे शांत कसे राहू शकतात, गळ्याला इथे फास लागायची वेळ आली आहे. यांना कळत कसं नाही.

“बोल देना, जिंदगिमे पहली बार ऐसा कुछ हुआ हैं, दिमाग घूम गया था कुछ सूझ नहीं रहा था. आप अंगड़िया हो, कोई गुनाह तो नहीं किया हैं ना?” – किरीटभाई.

“किरीटभाई, बॅग पोलिसांच्या ताब्यात आहे, उघडल्यावर त्यात ५० लाखांच्या नोटा दिसतील, मी काय जबाब देऊ? ते मला सोडणार नाहीत.” मुकेशभाई.

मग किरीट भाईंनी मुकेश चा क्लास घेतला आणि पोलिसांशी नेमकं काय बोलायचं ते सांगितलं. आता मुकेश भाईंना जरा धीर आला आणि मग ते पोलिस स्टेशनला गेले.

“या मकेश भाई तुमचीच वाट पाहतो आहोत. बसा. काल तुमच्या माणसाकडून ही बॅग चोरट्यांनी पळवली. तुम्हाला माहीत नाही का?”-  इंस्पेक्टर साहेब.

“माहीत आहे साहेब, माझ्या माणसाने सांगितलं मला.” – मुकेश

“मग तुम्ही कम्पलेंट का नाही केली?” - साहेब.

साहेब, इतकी वर्ष मी हे काम करतो आहे, असं कधीच झालं नाही, त्यामुळे माझं डोकच काम करत नव्हतं. आज सकाळी मी जाऊन इतवारी ठाण्यात तक्रार करणारच होतो.” – मुकेश.

“काय आहे या बॅगेत?” – इंस्पेक्टर साहेब.

“नाही माहीत साहेब. साहेब,” मुकेश म्हणाला “आम्ही अंगडिया आहोत, म्हणजे खाजगी पोस्टमन, लोकांची पत्रे आणि वस्तु, जे काही असेल ते त्या त्या ठिकाणी फक्त पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. पत्रात काय मजकूर आहे किंवा कोणची वस्तु आहे हे आम्हाला माहीत नसतं. योग्य ठिकाणी डिलीव्हरी केली की आमचं काम संपलं.”

“नेहमीच १० रूपयांच्या नोटेची अदला बदल करता का?” – साहेब.

“नाही साहेब ती अदला बदल नसते. मी नंबर कळवला होता, तो नंबर किरीट भाईंनी थैला घेऊन येणाऱ्या माणसाला म्हणजे दिनेशला सांगीतला. मी आमच्या माणसा  बरोबर ती नोट पाठवली. खात्री करून दिनेश ने ती नोट घेतली आणि द्वारकाला बॅग दिली आणि हे नेहमी नाही, कधी कधी महत्वाचे कागद पत्र किंवा जमिनीचे किंवा प्रॉपर्टी चे मूळ कागदपत्र किंवा मोला महागाच्या  वस्तु असतील तरच होतं.” – मुकेश

“काल काय येणार होतं?” – साहेब.

“महत्वाचे कागद पत्र आहेत एवढाच निरोप होता साहेब.” मुकेश म्हणाला आणि त्यांनी किरीट भाई कडून आलेला टेलेक्स मेसेज दाखवला.

“तुम्ही नोटे वरचा नंबर कसं कळवला ?” – साहेब.

“टेलेक्स करून.” – मुकेश.

“किरीट भाईंना बॅग मध्ये काय आहे हे माहीत असेल?” – साहेब.

“नो चान्स. त्यांना पार्टीने ज्या सूचना दिल्या असतील त्या प्रमाणे त्यांनी मला दिल्या. ते पण माझ्या सारखेच अंगडिया आहेत, फक्त त्यांची कंपनी खूप मोठी आहे.”- मुकेश

“कोणाला डिलीव्हर करायची आहे बॅग?” – साहेब.

“साहेब, बॅग मध्ये बऱ्याच लोकांचा पत्र व्यवहार असतो, बॅग उघडल्या शिवाय ते  कळत नाही. आणि साहेब, जवळपास सगळेच लोकं आमच्या ऑफिस मध्ये येऊन आपलं पत्र किंवा वस्तु घेऊन जातात. अगदी एखाद दसरी होम डिलीव्हरी असते, ती सुद्धा अधून मधून.” – मुकेश.

“ठीक आहे. सांगोळे जाऊन पांच लोकांना घेऊन या. त्यांच्या समोर बॅग उघडू.” -साहेब.

“साहेब, कशाला, आमची बॅग आम्हाला देऊन टाका आणि संपवा विषय.” – मुकेश

“मॅटर पोलिसांकडे आल्यावर असं संपत नाही. तमच्या किरीट भाईंना फोन लावा. बघू त्यांनी कोणाचे पार्सल पाठवले आहे ते” असं म्हणून साहेबांनी टेबला वरच्या फोन कडे निर्देश केला.

“साहेब, ट्रंक कॉल लावावा लागेल.” – मुकेश.

“हरकत नाही. लावा.” – साहेब.

“लावला असता पण माझ्या जवळ नंबर नाहीये. सगळे नंबर ऑफिसच्या डायरी मध्ये असतात साहेब.” – मुकेश.

“आत्ता ऑफिस मध्ये कोण आहे?” – साहेब.

“द्वारका” – मुकेश.

“तुलसीराम  साहेबांच्या ऑफिस मध्ये जा आणि टेलीफोन डायरी घेऊन ये. आणि हो, द्वारकाला पण  सोबत घेऊन ये.” - इंस्पेक्टर साहेब गंगाधर लगेच निघाला.

“साहेब, मी इथे असतांना द्वारकाला कशाला बोलावलं?” – मुकेश.

साहेबांनी काही उत्तर दिल नाही. मुकेशची पुन्हा विचारायची काही हिम्मत झाली नाही. सांगोळे पाच लोकांना घेऊन आला. मग इंस्पेक्टर साहेबांनी मुकेशला बॅग उघडायला सांगितली.

बॅग उघडल्यावर, ती  रिकामी करण्यात आली. बरीच पत्र होती, एक दोन पार्सल होते, एकावर “औषधे” असं लिहिलं होतं. आणि अजून एक सीलबंद थैली होती. त्याला एक पत्र अटॅच केलं होतं. त्यावर कीर्ती भाईंचा पत्ता होता. फोन नंबर पण लिहिला होता. इंस्पेक्टर साहेबांनी ते पार्सल उचललं. म्हणाले, “हेच ते महत्वाचं पार्सल आहे का?”

“पत्रात काय लिहिलं आहे ते वाचल्यावरच समजेल. असं कसं सांगणार?” – मुकेश.

इंस्पेक्टर साहेबांनी पत्रावर जो फोन नंबर दिला होता त्यावर फोन करून किर्तीभाईंना बोलावून घेतलं. किर्तीभाईंना काहीच कल्पना नव्हती, त्यामुळे ते आले तेंव्हा खूप गोंधळलेले होते. आल्या आल्या त्यांनी विचारलं. “काय झालं साहेब? कशा साठी बोलावलं मला?”

“ह्या मुकेश भाईंना ओळखता का?” – साहेब.

“हो साहेब, हे अंगडिया आहेत, आणि आमचे व्यावसायिक संबंध आहेत.” – किर्तीभाई.

“यांच्याकडे ही बॅग आली आहे, त्यात तमच्या नावाचं पार्सल आहे. चोरट्यांनी ही बॅग पळवली होती, ते पकडल्या गेले. या बॅग मध्ये असं काय आहे, की चोरट्यांना ही बॅग चोरावीशी वाटली?” – साहेब.

“या बॅग मधून पन्नास लाख रुपये येणार होते. पण हा व्यवहार तर कोणालाच माहिती असण्याची शक्यता नव्हती, मग चोरांना कसं कळलं?” – किर्तीभाई.

“पन्नास लाख? या बॅग मध्ये? किर्तीभाई, बॅग उघडा.” – साहेब.

किर्तीभाईंनी सील तोडलं आणि बॅग उघडली. बॅगेत खरंच नोटांची बंडलं नीट बांधून ठेवली होती.

“हा काय प्रकार आहे किर्तीभाई? एवढी कॅश? काय व्यवहार आहे हा?” – साहेब.

“साहेब, आम्ही सराफ आहोत. हिऱ्या मोत्याच्या दागिन्यांचा व्यापार असतो आमचा. ५० लाख ही मोठी रक्कम आहे, पण आमचा व्यवहार बघता, ही खूप मोठी नाहीये. ही बॅग चोरीला गेली नसती तर कोणाला काही कळलं पण नसतं.” - किर्तीभाई.

“पन्नास लाखांचा असा कोणता व्यवहार झाला आहे की ज्याची किंमत अदा केल्या गेली? कॅश चा व्यवहार दिसतो आहे, म्हणजे बिल झालंच नसेल. मला सेल्स टॅक्स  आणि इन्कम टॅक्स या दोन्ही डिपार्टमेंट ला कळवावं लागेल.” – साहेब.

“साहेब, व्यवहार अजून व्हायचा आहे. ही अडवांस म्हणून पाठवलेली रक्कम आहे.” – किर्तीभाई.

“कोणचा व्यवहार आहे? आम्हाला जरा डीटेल मध्ये सांगा.” साहेब.

“साहेब, अश्या गोष्टी षट्कर्णी व्हायला नकोत म्हणून पूर्ण माहिती अगदी वेळेवरच दिल्या जाते. तूर्त आम्हाला एवढंच माहिती आहे की, २०० – ३०० वर्षे जुन्या आणि अप्रतिम दागिन्यांचा लिलाव होणार आहे. नागपूर मधे हा लिलाव होण्याची शक्यता आहे. असा जेंव्हा लिलाव असतो, तेंव्हा त्यात करोडो रुपयांची उलाढाल होत असते, म्हणून ही माहिती साधारणत: गुप्त ठेवली जाते. आणि फक्त संबंधित लोकांनाच त्यांची माहिती दिल्या जाते. त्या लिलावात भाग घेण्या साठी ही रक्कम पाठवली आहे.” – कीर्तीभाई    

“कोणी पाठवली आहे ही रक्कम? आणि तुम्हाला कशाला पाठवली?” - इंस्पेक्टर साहेब.

“त्रिलोकचंद सराफ यांनी पाठवली आहे. सूरतला यांची मोठी पेढी आहे. हीऱ्यांचे मोठे व्यापारी आहेत. आमचे जूने व्यावसायिक संबंध आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जाणार आहोत. जर त्या वेळेस त्यांना इथे येणं जमलं, तर ते स्वत: पण येऊ शकतात” – किर्तीभाई.

“लिलाव कोण करणार आहे?” – इंस्पेक्टर साहेब.

“आत्ता तरी मला माहीत नाही साहेब, पण हे लिलाव करणारे सरकारमान्य असतात. सरकार दरबारी त्यांची नोंद असते. असे लिलाव होतात तेंव्हा सर्व बाबी ठरल्यावर सरकारला त्यांची माहिती कळवल्या जाते. त्यांच्या कडून ओके आल्यावरच लिलावांची तारीख आणि स्थळ जाहीर होतं. योग्य वेळी पोलिसांना पण सूचना दिल्या जाते. लिलाव कोण करणार हे, समोरची पार्टी कोणाला कॉंट्रॅक्ट देते त्यावर अवलंबून आहे. ते त्रिलोक भाईंना पण माहीत असण्याची शक्यता नाही.” – किर्तीभाई.

“जर कोणालाच काही माहिती नाही, तर त्रिलोक भाईंना कशी कळली?” - इंस्पेक्टर

“एका मर्यादित सर्कल मध्ये ही बातमी पसरवली जाते. सुरवात कुठून होते हे कधीच कळत नाही, पण कोणी त्या फंदात पडत नाही. सगळे आपापल्या परीने तयारीत असतात.” – किर्तीभाई.  

क्रमश:.....

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.