Angadiya - 4 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

अंगडिया स्टोरी - भाग ४ - अंतिम भाग

अंगडिया स्टोरी

भाग  ४ (अंतिम)

भाग ३  वरुन पुढे वाचा ......

“लिलाव कोण करणार आहे?” – इंस्पेक्टर साहेब.

“आत्ता तरी मला माहीत नाही साहेब, पण हे लिलाव करणारे सरकारमान्य असतात. सरकार दरबारी त्यांची नोंद असते. असे लिलाव होतात तेंव्हा सर्व बाबी ठरल्यावर सरकारला त्यांची माहिती कळवल्या जाते. त्यांच्या कडून ओके आल्यावरच लिलावांची तारीख आणि स्थळ जाहीर होतं. योग्य वेळी पोलिसांना पण सूचना दिल्या जाते. लिलाव कोण करणार हे, समोरची पार्टी कोणाला कॉंट्रॅक्ट देते त्यावर अवलंबून आहे. ते त्रिलोक भाईंना पण माहीत असण्याची शक्यता नाही.” – किर्तीभाई.

“जर कोणालाच काही माहिती नाही, तर त्रिलोक भाईंना बातमी  कशी कळली?” - इंस्पेक्टर

“एका मर्यादित सर्कल मध्ये ही बातमी पसरवली जाते. सुरवात कुठून होते हे कधीच कळत नाही, पण कोणी त्या फंदात पडत नाही. सगळे आपापल्या परीने तयारीत असतात.” – किर्तीभाई. 

“कशाचा काही पत्ता नाही, अन त्रिलोक भाई तुम्हाला ५० लाख कॅश पाठवतात, हे काही पटत नाही. लिलावा साठी तुम्हाला पैसे पाठवले म्हणता, मग असे किमान २५ लोकं तरी भाग घेणारे असतील म्हणजे सर्व मिळून हा ४० ते ५० कोटींचा व्यवहार होणार असं दिसत आहे. २५-३० माणसं आणि ५० कोटीचा मामला आणि पोलिसांना साधी सूचना पण नाही? मला तर वेगळाच संशय येतो आहे. यात हवाला व्यवहाराचा वास येतो आहे. हवाला हे बेकायदेशीर कृत्य  आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. ” – इंस्पेक्टर.

“काय साहेब, कुठून कुठे पोचलात! साहेब आम्ही सचोटीने व्यवहार करणारी माणसं आहोत, आज पर्यन्त छोटासा सुद्धा डाग पडला नाही आमच्यावर. तुम्ही हे काय बोलता आहात?” – आता किर्तीभाई चिंतेत पडले होते, त्यांना कळत नव्हतं की यातून कसे सुटायचे ते. मुकेश भाई गप्पच बसले होते, त्यांच्या तर ताकदी बाहेरचं काम होतं हे. त्यांनी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता.

“किर्तीभाई, आमचाही समज तसाच होता, पण तुम्ही काळ्याचं पांढरं करायचं काम अंगावर घेतलं आहे, हे कळल्यावर, आता परिस्थितीत फरक पडला आहे. हे ५० लाख मी जप्त करत आहे आणि हवाला रॅकेट मध्ये सामील असल्याच्या संशयावरून तुम्हाला, मुकेशभाईंना आणि द्वारकाला अटक करत आहे.” इंस्पेक्टर साहेब असं म्हणाले आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपल्या केबिन मध्ये निघून गेले.

रात्री उशिरा, मिळालेली सर्व माहिती नीट संगतवार लावून, इंस्पेक्टर साहेब, एसपी साहेबांना भेटायला गेले. सर्व ऐकून घेतल्यावर एसपी साहेबांना सुद्धा यात हवाला चा  संशय वाटायला लागला. ते स्वत: पोलिस स्टेशनला आले. आता ते स्वत: किर्तीभाईंची चौकशी करायला बसले. रात्री एक वाजे पर्यन्त प्रश्नोत्तरं झाल्यावर सुद्धा किर्तीभाई पोलिसांच्या माहितीत काही भर घालू शकले नाही.

बाहेर आल्यावर एसपी साहेब इंस्पेक्टर साहेबांना म्हणाले “मला असं वाटतं की यांना खरंच फारशी माहिती नसावी. कोणाला पैसे द्यायचे हे, सूरतवाले कदाचित नंतर दुसऱ्या पत्रात सांगतील किंवा फोन करून सांगतील.”

“मग आता पुढची अॅक्शन काय घ्यायची?” – इंस्पेक्टर.

“उद्या त्यांना कोर्टासमोर उभं करा आणि रिमांड मागून घ्या. उद्याच तुम्ही पण सूरतला निघा, आणि ते कोण त्रिलोकभाई आहेत त्यांची सूरत पोलिसांकडे चौकशी करा आणि नंतर त्याला सुद्धा चौकशी वर घ्या. बघू काय माहिती मिळते ते. सूरत पोलिसांना पूर्ण कल्पना द्या आणि त्यांच्यावर नजर ठेवायला सांगा.” – एसपी साहेब.

“ठीक आहे साहेब. उद्याच मेल ने निघतो.” – इंस्पेक्टर.

इंस्पेक्टर साहेब दुसऱ्या दिवशी रिमांड चं काम झाल्यावर दुपारी मेल ने मुंबईला निघाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते दोन च्या सुमारास सूरतला पोचले. सुरतच्या पोलिस मुख्यालयात पोचल्यावर त्यांनी संबंधित एसपी साहेबांची गाठ घेतली.

“मी इंस्पेक्टर धनशेखर.” इंस्पेक्टर साहेबांनी आपली ओळख दिली, आणि कशा करिता ते सुरतला आले आहेत ते सविस्तर सांगीतलं. एसपी साहेबांना  काही नवल वाटल्याचं दिसलं नाही, पण त्यांनी धनशेखरांचं म्हणणं शांत पणे ऐकून घेतलं. मग म्हणाले,

“धनशेखर साहेब, हे सूरत आहे. जगातलं हीऱ्यांच्या व्यापाराचं प्रमुख केंद्र. इथे ५० लाखांची उलाढाल ही किरकोळ समजली जाते. त्रिलोकभाई हे इथल्या एका प्रतिष्ठित आणि प्रमुख पेढीचे संचालक आहेत. तुम्ही म्हणता तसे लिलाव होत असतात. ज्या वेळेस असे लिलाव होतात, त्या वेळेस सुरक्षेच्या कारणं साठी पोलिसांना त्यांची सूचना दिली जाते. पण हे ही खरं आहे, की ही सूचना अगदी शेवटच्या क्षणी मिळते, कुठल्याही कारणास्तव गोष्ट षट्कर्णि होऊन काही अघटित घडू नये म्हणून ही गुप्तता पाळल्या जाते. इथे सुरतला या गोष्टी सर्वांना माहीत आहेत. तुम्ही टेंशन घेऊ नका. हवं तर आपण त्रिलोकभाईंना भेटू. तुमचं समाधान करून घ्या.”

त्रिलोकभाईंनी मान्य केलं की त्यांनी ५० लाख लिलावा साठी पाठवले म्हणून. “येत्या महिन्या भरात असा लिलाव होऊ घातला आहे, अशी बातमी जवाहिऱ्यांच्या वरच्या वर्तुळात फिरते आहे. ऐन वेळेस रोख रक्कम कमी पडू नये, म्हणून थोडी रोख मी आधीच पाठवून दिली आणि बाकी रक्कम मी स्वत: जेंव्हा लिलावास उपस्थित राहीन, तेंव्हा घेऊन जाईन.” त्रिलोकभाईंनी  सर्व तपशीलवार सांगीतलं.

त्रिलोकभाईंनी जे काही स्पष्टीकरण दिलं त्यावर इंस्पेक्टर धनशेखरांचा विश्वास बसला नाही, पण सूरत पोलिसांचं समाधान झालेलं दिसलं होतं, म्हणून ते काही बोलले नाहीत. नागपूरला आल्यावर त्यांनी एसपी साहेबांची भेट घेतली. एसपी साहेबांनी सर्व शांत पणे ऐकून घेतलं आणि मग म्हणाले, “म्हणजे यात मला मुकेश अंगडिया चा काहीच संबंध दिसत नाहीये. मला यात कीर्ती भाईंचा पण काही हात असेल असं वाटत नाही, कारण त्यांना फक्त लिलावा बद्दलच सांगण्यात आलं होतं. जर हवालाचा प्रश्न असेलच, तर ते नंतरच उघड होणार होतं. माझ्या मते कुठलाही ठपका न ठेवता, त्यांना सोडून द्या.”

“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब, पण हे प्रकरण शांत झाल्यावर, नंतर जर त्रिलोकभाइं कडून काही सूचना आल्या, तर जो व्यवहार होईल, त्यावर आपण कसं लक्ष ठेवणार? साहेब, असं झालं तर प्रकरण आपल्या अंगावर शेकणार.” – इंस्पेक्टर

“खरं आहे, या किर्तीभाईंना नजरेच्या टप्प्यात ठेवा. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. जे काही आहे ते थोड्याच दिवसांत बाहेर येईल. ज्याला ५० लाख घ्यायचे आहेत, तो फार काळ गप्प बसणार नाही. मुकेशभाईंना जरा दम द्या. हे असले कारभार करू नका म्हणून.” – एसपी साहेब.

मग इंस्पेक्टर साहेबांनी मुकेशभाई, कीर्ती भाई आणि द्वारका तिघांनाही सोडून दिलं.

“साहेब, ते ५० लाख आम्हाला केंव्हा मिळतील?” – किर्तीभाई.

“ते पैसे तुमचे आहेत? ते तर त्रिलोकभाईचे आहेत. तुम्ही का मागत आहात? त्यांनी डिमांड केल्यावर आम्ही ते त्यांना देऊ.” -  इंस्पेक्टर साहेब.

“पण साहेब, ते त्यांनी मला पाठवले आहेत आणि ते त्यांनी पत्रात स्पष्ट लिहिलं आहे. त्यामुळे ते पैसे तुम्ही आम्हाला द्या.”- किर्तीभाई.

“तुम्ही तसा अर्ज करा. आम्ही विचार करू.” इंस्पेक्टर साहेबांनी विषय संपवला.

दुसऱ्या दिवशी किर्तीभाईंनी  रीतसर अर्ज केला. आठ दिवसांनी इंस्पेक्टर साहेबांनी उत्तर दिलं की “हवालाच्या संदर्भात तपास आणि चौकशी चालू आहे. ती पूर्ण झाल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.”

बऱ्याच दिवसांनंतर किर्तीभाई पुन्हा अर्ज घेऊन गेले. इंस्पेक्टर साहेबांनी पुन्हा तेच छापील उतर दिलं.

शेवटी मॅटर कोर्टात गेलं. कोर्टाने पोलिसांना पैसे अडकवण्याचं कारण विचारलं, पोलिसांनी हवालाचं कारण सांगून तपास चालू असल्याने, मुद्देमाल वापस करता येणार नाही, असं सांगीतलं. त्यावर कोर्टाने तपासाच्या प्रगती बद्दल विचारलं. त्यावर पोलिसांचं असं उत्तर होतं की, ही हवालाची फार मोठी यंत्रणा असून, आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा गुंतलेले असू शकतात, अश्या परिस्थितीत जर यात मिळालेले धागे दोरे उघड केले तर त्याचा तपासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर कोर्टाने निर्णय दिला की,

“ही रक्कम पोलिसांनी कोर्टात जमा करावी. जर लिलाव नागपूरला झाला आणि त्याची तारीख जाहीर झाली तर त्यावेळेस, किर्तीभाई आणि त्रिलोकभाई यांनी शपथ पत्रासह अर्ज करावा. त्यावेळेस कोर्ट विचार करेल आणि ही रक्कम त्यांना वापस करण्यात येईल.”

बराच काळ उलटून गेला, अजून लिलाव काही जाहीर झाला नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे पण अद्याप तरी काही सुगावा लागला नाही.

समाप्त

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.