Baap - 1 books and stories free download online pdf in Marathi

बाप.. - 1

गरिबी तशी पाचवीलाच पुंजलेली.अशिक्षित जोडपं बाप दारूच्या गुत्त्यावर काम करायचा आई लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची.मुलाच्या हव्यासापायी एक एक करत तीन मुली होऊन दिल्या अन चौथा मुलगा झाला.दारूच्या गुत्यावरच्या वादात कोयत्याने वार केले गेले बापावर गावगुंडांनी.पायावर झालेले वार पायाचा पंजा अर्धा तुटलेल्या अवस्थेत आई ने साडीच्या पदरात कसा तरी तो लपेटुन बापाच्या मित्राच्या रिक्षात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाला घेऊन आई पुण्यात रुबी हॉल ला गेली मुली घरी तशाच सोबत दोन वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली.जोडीला पैसा नाही,नातेवाईकांनी तर सावलीला ही उभ केलं नाही.त्यात नवरा मरणाच्या वाटेवर,सोबत लेकरू,घरी लहान मुलं शेजारच्यांच्या भरोवश्यावर सोडून आलेली.दिड महिना यातच गेला कसा तरी बाप वाचला.पण गाव सोडावं लागलं.या काळात फक्त आत्या उभी राहिली दवाखाना सगळा पाहिला,खाण पिन तिच्याकडून थोडा हातभार लागला.
आता रहायची पंचायत तीन मुली,एक मुलगा हा अपाहिज आता आयुष्यात उभं कस रहायचं.डोंगराएव्हढ्या संकटातही पुन्हा तीच बहीण कामी आली.ती राहत असलेल्या गावी घेऊन आली.गावसोडून आलेलं एक कुटुंब नवरा बायको तीन मुली अन एक जेमतेम दोन वर्षांचा मुलगा.गावच्या रस्त्याच्या बाजूला एक दहा बाय दहा च्या भाड्याने घेतलेल्या खोलीत संसार पुन्हा सुरू झाला.एका मुलीला दुसऱ्या बहिणीच्या इथं सोडलेलं तीन मुलांना घेऊन संकटातून वाट शोधण्याचा प्रवास सुरु होतो.जगण्याला जन्मताच नियतीचा शाप असतो काही लोकांना याला ही तो चुकणार नव्हता.आई मोलमजुरी करणं सुरू केली.बापाला कष्टाची काम होईना तर पुन्हा त्या दुसऱ्या गावच्या पाटलाकडे दारूचा धंदा होता बाप पुन्हा तिथेच कामाला जाऊ लागला.ज्या गोष्टीनी संसार,मुला बाळांचा घास मातीत मिळवला होता नियती पुन्हा त्या मातीत बरबटलेला घास भरवु पाहत होती.पर्याय ही नव्हता..जेमतेम दिवस पुढे सरकत होते आता बाप ही पायावर उभा राहिला..
मला अजूनही आठवतंय मी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचो त्याच्या बाजूलाच माझ्या बापाचा दारूचा गुत्ता होता.नकळत्या वयातही बहिणीचा हाथ धरून शाळेत जायचो तेव्हा चोरून बापाकडे नजर जायची.पांढऱ्या डब्यातून काचेच्या पेल्यात बाप काहीतरी विकताना दिसायचा.कधी खेळायला शाळेच्या मैदानात जायचो तेव्हा पंटर चा मुलगा,पंटर चा मुलगा म्हणून चिडवायची मोठी पोर.अशा विषारी वातावरणात ही मुलांना शिकवण्याचा ध्यास अडाणी आई बापाच्या मनात कायम होता.यातही चारही मुलांना शिकवलं मोठं केलं.न कष्ट चुकलं,अपमानाचे वार झेलून त्याला हसत सामोरं जात होती ही लोक.
दिवस बसून राहत नाहीत काळ बदलला.एकंदर सगळं छान सुरू होत.एक दिवस गुत्त्यावर धाड पडली पोलिसांची आधीच कल्पना होती तर बाप निसटला तिथून.चार पाच दिवस फरार झाला बाप माझा.त्याकाळी न फोन न काही पोलीस घरी यायचे ना ना प्रकारचे शिव्या घालायचे आई ला “कुठेय नवरा तुझा,मादरचोद कितीही पळाला तरी सापडलंच की मरोस्तोवर मारणारे त्याला सांगून ठेव त्याला” हे बोलताना आईच्या अंगावर धावून यायचा पोलीस.लहान होतो मी तो आईवर धावून आला की बिलगायचो आई ला मी.घरी यांचा लेकरा बायकोला होणारा त्रास पाहुन बाप हजर झाला.ज्या मालकाचा तो गुत्ता होता त्यानेही हाथ झटकले अन हा धंदा माझा नाही याचाच आहे असं बोलून सगळ्या केसेस बापावर पडल्या.पोलीस स्टेशन ला नवीन साहेब आला होता त्याकाळी तो रात्रीचा आरोपींना खूप मारायचा बाप आईला म्हणायचा लय मारील मला तो, भीती वाटतेय मला.
दोघांच्या रडण्याचा आवाज त्या रात्रीला ही चिरत होता.बाजूला झोपलेल्या आम्हा भावंडांच्या डोक्यावर हाथ फिरवत आई बाप रात्र रात्र रडत बसायचे.
अजूनही दिवस आठवतोय पुण्यात सात नंबर कोर्टात आणलं होतं बापाला.आई मला घेऊन गेली होती गळ्यातल मंगळसूत्र मोडून वकिलाला पैसे दिले होते.बापाला तिथं आणलं तर दोन्ही हात दाव्याने बांधले होते दोन पायावर कोर्टा बाहेर बसवलं होत.तिथं समोर मी बसलो होतो आई वकिलाच्या हाता पाया पडत होती. बाप नजर चोरून पहात होता माझ्याकडे.दुनियेसोबत माझ्या मुलाच्या नजरेत ही मी आज अपराधी झाल्याचं दुःख बापाच्या नजरेत दिसत होतं.बापाला त्या अवस्थेत पाहणं ते चित्र आजही माझ्या मनात तसच आहे.न विसरणारे घाव करत होत ते विदारक चित्र.कसाबसा जामीन झाला आम्ही तिघे घराकडे निघालो.बाजूच्या वडापाव च्या गाडीवर वडापाव खाताना बाप आई ला म्हणाला “सोडतो मी हे सगळं आता,हा धंदा, ही गुलामी,ही लाचारी आज हरलो मी”.
गावाकडे आल्यावर बापाने धंदा सोडला दुसऱ्या गावात एका कंपनीत वॉचमन ची नोकरी धरली.पाटलाचा परत येण्यासाठी धमक्या सुरूच होत्या पण बापाने मनाशी पक्क केलं होतं धंदा कायमचा सोडायचा अन तो निभावला ही.भविष्यात दुसरी नोकरी शोधली.हरलेल्या पाखराला नवपंख फुटू पाहत होते.संपलेल्या अस्तित्वार नशिबाच्या रेषा कष्टाने उमटवून लेकरांना मोठं केलं.शिकवलं आज थकलाय बाप माझा.पोलिसांच्या मारलेल्या जखमा मधे मधे पुन्हा जगणं असह्य करतात.आजच्या सुखवास्तू घराचा पाया किती संघर्षाचा आहे याची कल्पना करवत नाही.
लहानपणाचे ते व्रण आजही मनावर तशेच आहेत.कधी शुन्यात विचार करू लागलो की आजही शाळेत जाताना बाप विकत असलेल्या दारूचं दुकान,पोलिसांचे मारलेले बापाच्या अंगावरचे घाव,कोयत्याचे वार अजूनही तसेच काल घडल्यासारखे भासतात.म्हणतात time is the best medicine.. काही घाव आयुष्यभर पिच्छा सोडत नाहीत.कितीही आज हरलो तरी बापाकडे पाहिलं की पुन्हा उभं राहण्याची ऊर्जा भेटते. आजची पिढी बापाला तोंडावर बोलते तू काय केलं माझ्यासाठी..माझ्या तर डोळ्यांपुढं घडलं सगळं या प्रश्नाचं उत्तर माझ्या जगण्यावर लहानपणीच कोरून गेली ही नियती...क्रमशः....