Geet Ramayana Varil Vivechan - 18 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 18 - थांब सुमंता, थांबवी रे रथ

देवी सीतेची विनंती अखेर श्रीराम मान्य करतात व त्यांना आपल्या सह येण्यास अनुज्ञा देतात.

लक्ष्मण सुद्धा उर्मिला देवींचा निरोप घ्यायला त्यांच्या कक्षात जातात.

"उर्मिले तुला कळले असेलच की भ्राताश्री ला वनवासात जावे लागते आहे व त्यांच्यासोबत मी सुद्धा जाणार आहे. मी इथे नसताना पिताश्री माताश्री यांची काळजी घे. स्वतःची काळजी घे.",लक्ष्मण कुमार

"देवी जानकी जर भ्राताश्री सोबत येऊ शकतात तर मी आपल्या सवे का येऊ शकत नाही? विवाहापश्चात पत्नीने आपल्या पतीसोबतच राहणे उचित होणार नाही का? देवी जानकींना एक नियम व मला एक नियम असे का?",उर्मिला देवी

"देवी जानकी हट्ट करून भ्राताश्रीं सोबत येणार आहेत परंतु तू तो हट्ट करू नयेस असे मला वाटते.
वनवासात मी श्रीरामांचा अनुज म्हणून नव्हे तर एक सेवक, एक अंगरक्षक म्हणून जाणार आहे. देवी जानकी येत असल्याने जबाबदारी वाढली आहे त्यात तू आली तर आणखी जबाबदारी वाढेल व तू सोबत असताना मी माझ्या कर्तव्याचे नीट पालन करू शकणार नाही. भ्राताश्री कडे कदाचित माझं दुर्लक्ष होऊ शकेल. आणि वनवासातील कष्टप्रद आयुष्य तुझ्या वाट्याला येऊ नये असे मला वाटते. म्हणून तू राज प्रासादात राहणेच इष्ट होईल. पतीची आज्ञापालन करणे हे सुद्धा पत्नीचे कर्तव्यच आहे तेव्हा मी जे सांगितलं ते ऐक त्यातच आपलं कल्याण आहे.",लक्ष्मण कुमारांनी असे म्हंटल्यावर उर्मिला देवी नाराज होतात तेव्हा त्यांची अवस्था बघून लक्ष्मण म्हणतात,

"माझ्या आठवणीत उगीच शोक करत बसू नको. दुःख करशील तर चौदा वर्षे चौदा युगाप्रमाणे भासतील पण प्रसन्न चित्त ठेवशील तर चौदा वर्षे चौदा क्षणाप्रमाणे भर्रकन सरून जातील. आपण शरीराने भलेही दूर असू पण मनाने मी इथेच तुझ्याजवळच असेंन. पतिपत्नी चे मनं जर एकरूप झाले असतील तर शरीर जवळ असले काय! किंवा दूर असले काय! काय फरक पडतो? तेव्हा आता हसतमुखाने मला निरोप दे.",लक्ष्मण

उर्मिला देवी पतीची आज्ञा मान्य करतात आणि त्यांच्या म्हणण्याखातर त्यांना हसतमुखाने निरोप देतात.

त्यानंतर श्रीराम, देवी सीता व लक्ष्मण दशरथ राजाचा निरोप घ्यायला येतात. तिघांनीही आपापले भरजरी वस्त्रं, आभूषण दान केलेले असतात भगवे वस्त्र परिधान केलेले असतात.
राजा दशरथ हतबल अवस्थेत असतात. शेवटचा प्रयत्न म्हणून ते कैकयी ला अजूनही तुझे वर मागे घे असे म्हणतात पण कैकयी काही बधत नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज होतो.

तेव्हा ते कैकयी ला "मला ह्या कुलक्षिणीचे तोंडही बघायचे नाही", असे म्हणून सेवकांच्या मदतीने आता देवी कौसल्येच्या कक्षात आलेले असतात.

त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत असतो. त्यांना भूतकाळातील प्रसंग आठवतो. श्रावणकुमाराच्या वडिलांचा श्राप खरा झाला असतो. ते मुकपणेच तिघांनाही आशीर्वाद देतात. श्रीराम त्यांना धीर देतात. व कैकयी चा निरोप घ्यायला येतात. इकडे कैकयी आनंदित झालेली असते. निरोप घेऊन ते तिघे राज प्रसादाच्या बाहेर पाऊल ठेवतात.

बाहेर मंत्री सुमंत यांनी रथ तयार ठेवला असतो त्यात ते तिघेही विराजमान होतात. एकवार ते तिघेही राज प्रासादाकडे बघून नमस्कार करतात. अयोध्येतील धूळ खाली वाकून कपाळाला लावतात व प्रस्थान करतात.

त्यांना जाताना बघून इकडे भावनातिरेकाने व दुखहतिरेकाने देवी कौसल्या मूर्च्छित होतात. राजा दशरथ ह्यांची अवस्था सुद्धा ह्यापेक्षा वेगळी नसते. सेवक सेविका त्यांच्या कडे धावतात.

इकडे थोडा रथ पुढे गेला असतो तेवढ्यात तिथे अयोध्येतील संपूर्ण प्रजा श्रीरामांना भेटायला येते. सगळी जनता सुमंत यांना रथ थांबविण्याची विनंती करतात.

"श्रीरामा, देवी सीता थांबा तुमची चरणधुळ आमच्या मस्तकी लावू द्या. हे काय अघटित घडले आहे. श्रीराम राज्यपदी बसण्याची स्वप्ने आम्ही बघत असता हे विपरीत काय घडले? सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले श्रीराम व उषेप्रमाणे पवित्र असलेली जानकी माई अयोध्येत नसतील तर अयोध्या अंधकारात राहील. अयोध्येची जनता तुम्ही नसताना अनाथ होईल. कुठे आहे ती नीच कैकयी जिच्या मुळे हा अनर्थ घडला आहे. तिच्या हट्टा खातर भरत राज्यपदी बसेल पण प्रजाच त्याला राजा म्हणून मान्य करणार नसेल तर काय उपयोग?

भरत एका कळाहीन राज्याचा राजा बनेल कारण अयोध्येचे भाग्य तर श्रीराम व जानकी सोबतच गेलं असेल. अश्या कलाहीन राज्यात आम्हाला राहवणार नाही तेव्हा श्रीरामा आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन चला.", सगळे प्रजाजन

श्रीरामांनी सर्वांचा नमस्कार स्वीकारून सगळ्यांना समजावले,

"प्रजाजनहो तुमच्या भावना मला कळतात पण तुम्हाला मी माझ्यासोबत वनवासात नेऊ शकत नाही तेव्हा हा व्यर्थ हट्ट सोडा. माझ्यावर जसा आपला लोभ आहे तसाच भरतावर सुद्धा ठेवा तो सुद्धा एक चांगला राजा म्हणून सिद्ध होईल हा विश्वास ठेवा. राजा दशरथ देवी कौसल्या राजप्रासादात असताना तुम्हाला अनाथ का वाटावं? आपण व्यर्थ चिंतीत होऊ नका. इथवर तुम्ही आले आहात आता इथूनच आपल्या स्थानी परत जा आणि मला जाऊ द्या.",असे म्हणून श्रीराम रथ पुढे नेण्यास सांगतात.

काही लोकं परत घरी जातात पण काही जण रथाच्या मागे मागे जात राहतात. त्या दिवशी कोणाच्याच घरात दिवा लागत नाही कुठेच चूल पेटत नाही. सगळी अयोध्या अंधारात असते आणि सगळ्यांच्या अंतःकरणात दुःखा चा अंधकार भरून राहतो. सगळे मनोमन कैकयी ला शिव्या श्राप देतात.

(धन्य श्रीराम व त्यांच्यावर भक्ती करणारे धन्य ते आयोध्यावासी. रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम🙏)

*****************************
ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले गीतरामायण मधील आठरावे गीत :-
राम चालले, तो तर सत्पथ
थांब सुमंता, थांबवि रे रथ

थांबा रामा, थांब जानकी
चरणधूळ द्या धरू मस्तकी
काय घडे हे आज अकल्पित!

रामराज्य या पुरी यायचे
स्वप्न लोचनी अजुन कालचे
अवचित झाले भग्न मनोरथ

गगननील हे, उषःप्रभा ही
श्रीरघुनंदन, सीतामाई
चवदा वर्षें का अस्तंगत?

चवदा वर्षें छत्रहीनता
चवदा वर्षें रात्रच आता
उरेल नगरी का ही मूर्च्छित?

कुठें लपे ती दुष्ट कैकयी?
पहा म्हणावे हीन दशा ही
अनर्थ नच हा, तुझेच चेष्टित

करि भरताते नृप मातोश्री
रामा मागे निघे जयश्री
आज अयोध्या प्रथम पराजित

पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता
सोडुन रामा, कोठे जाता?
सवे न्या तरी नगर निराश्रित

ये अश्रूंचा पट डोळ्यांवर
कोठें रथ तो? कोठे रघुवर
गळ्यांत रुतली वाणी कंपित
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


Share

NEW REALESED