Geet Ramayana Varil Vivechan - 33 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 33 - पळविली रावणें सीता

छिन्न विच्छिन्न रथा समोरून आणखी पुढे गेल्यावर श्रीराम व लक्ष्मणांना एक महाकाय गरुड पक्षी मरणासन्न अवस्थेत दिसतो. त्याला बघताच कदाचित ह्यानेच सीतेला भक्षिली असावी अशी शंका श्रीरामांना येते. हा सुद्धा सुवर्ण मृगाचे रूप घेणाऱ्या मायावी राक्षसासारखा एखादा मायावी राक्षस असावा असे त्यांना वाटले. त्यामुळे ते त्याच्यावर बाण मारण्यासाठी रोखतात ते बघून तो महाकाय पक्षी म्हणतो,

"हे रघुनाथा जो आधीच मरणाला टेकलेला आहे त्याला आपण का मारता आहात? मी पक्षीराज जटायू आहे. सूर्यदेव यांचा जो सारथी अरुण आहे त्याचा मी पुत्र जटायू आहे. मी दशरथ राजाचा मित्र आहे.


आज माझी जी ही अवस्था झालीय ती सीता देवींना वाचवण्यासाठी जे मी शर्थीचे प्रयत्न केले त्यामुळे.

तुमच्या प्रिय पत्नी सीता देवींना तो क्रूर नृशंस दैत्यराज रावण पळवून घेऊन गेला आहे.


जेव्हा मी राणी सीता रथात जाताना पहिली तेव्हा त्यांच्यासोबत न श्रीराम होते न लक्ष्मण ते बघताच मला कळले की त्या नक्की संकटात आहेत. मी माझी संपूर्ण शक्ती एकवटून रथाचा मार्ग रोखण्यासाठी उडालो.


त्या रथात रावणाला बघताच मला त्याचा कपटी हेतू कळला. त्याच्या हातांना मी कडकडून चावलो. त्याच्या डोक्यावर,तोंडावर मी पंखांनी हल्ला केला. रामाच्या राणीला वाचवण्यासाठी मी प्राणपणाने त्या नराधमाशी लढलो. पंखांनी त्याच्यावर झडप घालून मी त्याचे मुकुट तोडून टाकले. तो मला मारण्यासाठी धनुष्यवर बाण तयार करायला धजावताना मी त्याच्या हातावर एवढ्या जोरात प्रहार केला की त्याचे धनुष्य तुटून पडले. त्याचे सगळे बाण मी पाडून टाकले.


त्या असुर रावणाच्या सर्वांगाला मी चोच मारून मारून घायाळ केलं. माझे दगडा सारखे कठीण पंखा चे तडाखे मारून मारून मी त्याला हैराण केलं. तरीही रथ पुढे पुढेच जात असल्याने ह्या हल्ल्यात मी त्याच्या रथाच्या सारथीला हाणून खाली पाडले. त्यामुळे रथ थांबला आणि सारथी खाली गाढवांच्या लाथा खात मेला.(ह्यात रावण राक्षस असल्याने त्यांच्या रथाला घोड्यांऐवजी गाढव जोडलेले होते असे स्पष्ट होते.)


त्यानंतर मी सीता देवींना रावणापासून दूर करून रथातून उतरवलं. आणि मी माझा मोर्चा रथकडे वळवला. रथावर तडाखे देऊन देऊन मी रथ मोडून टाकला. त्याचे चाकं तोडून टाकले. सगळे गाढवं एकमेकांच्या अंगावर पडले. रावण रथातून पडला. रथ अंगावर पडल्याने सगळे गाढवं मरून सारथीच्या मृतदेहाजवळ पडले. रथाचे छत्र धुळीत खाली पडले. मी यथाशक्ती शर्थीची लढाई केली पण शेवटी त्या दुष्टाने पौलस्तीने (रावणाने)

(रावण हा पुलस्त ऋषींचा पुत्र असल्याने त्याला पौलस्ती सुद्धा म्हणतात. रावणाचे वडील जरी ऋषी असले तरी माता राक्षस असल्याने रावणात राक्षसी दुर्गुण आले.)

माझ्यावर खडग दात ओठ खाऊन उगारले आणि माझे दोन्ही पंख छाटले. सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या त्या पाहून सीता देवी भीतीने थर थर कापू लागल्या. त्यांची ती अवस्था पाहून मला दुःख होत असूनही मी पंख नसल्याने काहीही करू शकत नव्हतो. शेवटी कुठल्याही पक्षाची शक्ती त्याचे पंख छाटल्यावर कुठे उरते? मी निष्प्रभ झालो होतो. रावणाने पुन्हा सीता देवींना कवेत घेतलं ते पाहून माझा तडफडाट झाला पण मी हतबल होतो.


माझे प्राण माझ्या डोळ्यात एकवटले होते. मी बघितलं त्या रावणाने पुष्पक विमानात बसवून सीता देवींना आकाशमार्गे नेलेलं आहे. तुझी लाडकी सम्राज्ञी सीता आक्रोश करीत होती. रावणाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती पण त्या क्रूर रावणाचे कठोर हृदय त्या पतिव्रता स्त्रीचा आक्रोश ऐकून द्रवले नाही.


एवढं लढूनही मी रावणाला सीता देवींना दूर नेण्यापासून वाचवू शकलो नाही ह्याचा मला अत्यंत खेद आहे. कसंही करून ही बातमी आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी मी तग धरून थांबलो होतो पण आता मी प्राण सोडतो. असे म्हणून जटायूने प्राण सोडला. त्याच्या उघड्या चोचीत श्रीरामांनी जवळचे थोडे पाणी ओतले.


जटायूने केलेल्या घटनेचे वर्णन ऐकून, देवी सीतेची अवस्था, जटायूची अवस्था व रावणाचा क्रूरपणा पाहून

श्रीरामांच्या डोळ्यातून सीता देवींच्या काळजीने करुणेची अश्रू , जटायू प्रति कृतज्ञेचे अश्रू आणि रावणाप्रति प्रतिशोधाचे धगधगते अंगार फेकणारे अश्रू वाहू लागले. त्यांनी मनोमन रावणाला धडा शिकविण्याचा,त्याची अवस्था बिकट करण्याचा पण केला.


(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)


ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे तेहतीसावे गीत:-


मरणोन्मुख त्याला का रे मारिसी पुन्हा रघुनाथा?

अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता


पाहिली जधी मी जाता

रामाविण राज्ञी सीता

देवरही संगे नव्हता

मी बळे उडालो रामा, रोधिले रथाच्या पंथा


तो नृशंस रावण कामी

नेतसे तिला का धामी

जाणिले मनी सारे मी

चावलो तयाच्या हाता, हाणिले पंख हे माथा


रक्षिण्या रामराज्ञीसी

झुंजलो घोर मी त्यासी

तोडिले कवचमुकुटासी

लावू नच दिधले बाणा, स्पर्शूं ना दिधला भाता


सर्वांगा दिधले डंख

वज्रासम मारित पंख

खेळलो द्वंद्व निःशंक

पाडला सारथी खाली, खाइ तो खरांच्या लाथा


सारुनी दूर देवीस

मोडिला रथाचा आस

भंगिले उभय चक्रांस

ठेंचाळुनि गर्दभ पडले, दुसऱ्याच्या थटुनी प्रेता


लोळले छत्रही खाली

युद्धाची सीमा झाली

मी शर्थ राघवा, केली

धावला उगारुन खड्गा, पौलस्ती चावित दाता


हे पंख छेदिल्यावरती

मी पडलो धरणीवरती

ती थरथर कापे युवती

तडफडाट झाला माझा, तिज कवेत त्याने घेता


मम प्राण लोचनी उरला

मी तरी पाहिला त्याला

तो गगनपथाने गेला

लाडकी तुझी सम्राज्ञी, आक्रंदत होती जाता

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


Share

NEW REALESED