Silence Please - 11 books and stories free download online pdf in Marathi

सायलेन्स प्लीज - प्रकरण 11

प्रकरण ११


संध्याकाळ होत होती.मोठ्या कार्यालयीन इमारतीत ऑफिस बंद होताना चालू असते तशी गडबड ऐकू येत होती.पॅसेज मधे घरी जाण्याची घाई झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बुटाचे आवाज प्रतिध्वनित होत होते, मधेच लिफ्ट च्या दाराची उघड झाप होत होती. पाणिनी पटवर्धन हे सर्व शांत पणे ऐकत होता.पुढील अर्धातास हे सर्व आवाज एक एक करत विरळ होत गेले आणि पाठोपाठ हा आवाजाचा लोंढा जणू रस्त्यावर अवतरला.आता त्याचे स्वरूप बदलले होते.आता मोटारींचे इंजिन चालू झाल्याचे आणि हॉर्न चे कर्कश्य आवाज येऊ लागले. पाणिनी ला रोजची या आवाजाची सवय होती, त्यातूनही मन एकाग्र करायची त्याला सवय होती.अत्ता सुध्दा त्याच्या ऑफिस मधे तो येरझाऱ्या घालत विचार करीत होता.त्याची ही सवय सौम्या ला माहिती होती.ती दाराचा आवाज न करता आत आली आणि खुर्चीत बसली.
“ घरी जा सौम्या, तुला आता करण्यासारखे काम नाहीये लगेच.उद्या बघू.” फेऱ्या मारता मारता सौम्या कडे न बघताच पाणिनी म्हणाला.
सौम्या ने मानेनेच नकार दिला. पाणिनी ने तिच्याकडे न बघितल्याने त्याला तिचा नकार कळला नाही.हे लक्षात येताच सौम्या म्हणाली, “ नाही जाणार मी.काहीतरी घडेल असं माझं मन सांगतंय.”
दारावर टकटक झाली. टक .... टकटक .... टकटकटक.....विशिष्ट लकबीने ती वाजली त्यावरून ओजस आल्याचे दोघांनी ओळखले. सौम्या ने दार उघडून ओजस ला आत घेतले.
“ लंब्याचवड्या शर्यतीत चालायचा सराव करतो आहेस की काय ? ” पाणिनी ला फेऱ्या मारताना बघून ओजस म्हणाला.
“ या घाणेरड्या प्रकरणाच्या उत्तराच्या दिशेने चालायचा प्रयत्न करतोय कनक ” पाणिनी म्हणाला.
“ तुला थोडा आधार वाटेल अशी बातमी देतो ” कनक म्हणाला. “शेफाली ला रात्री तीन ला आलेल्या फोन चा शोध घेतला आम्ही. तो फोन मरुद्गण ने एका पब्लिक फोन वरून केला होता. हे सिध्द झालंय.रात्री तीन वाजून एक मिनिटांनी.”
“ त्या फोन चे रेकोर्ड घेऊन ठेव कनक.” पाणिनी म्हणाला. “शेफाली वर नजर ठेवताहेत ना तुझी माणस ? ”
“ हो ,काळजी नको करू. ती तुला भेटायला का आली होती इथे? ” कनक ने विचारलं
“ घटस्फोट रद्द करण्याच्या तिच्या दाव्याला मी विरोध करू नये असं तिच म्हणणं आहे.तसं कबूल केलं मी तर ती त्याची पत्नी म्हणून कायम राहील .त्याच्या बदल्यात नवरा मानसिक दृष्टया दुर्बल आहे,रात्री झोपेत फिरतो अशी साक्ष ती द्यायला तयार आहे ,म्हणजे विहंग ने हेतुपुरस्सर खून केला नाही तर झोपेत त्याच्या हातून झाला असं आपल्याला सिध्द करायला आणि त्याची शिक्षा कमी करायला ती आपल्याला मदत करेल असा तिचा प्रस्ताव आहे. , यात तिचा फायदा असा की विहंग मानसिक दृष्टया दुर्बल आहे हे सिध्द झालं की तिला पालक या नात्याने त्याची मालमत्ता ताब्यात घेता येईल.” पाणिनी म्हणाला.
“ छान प्रस्ताव आहे नाही का? ” कनक हसून म्हणाला.
“ फारच छान ! ” पाणिनी म्हणाला.
“ विहंग विरुद्धची केस म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्याचा बळी असं नाही वाटत तुम्हाला ? ” सौम्या ने पाणिनी ला विचारलं.
कनक ओजस ने आपल्या खिशातून छोटी वही काढून त्याची पणे चाळली. “ दुर्वास ने पत्रकारांना मुलाखत दिली आहे.त्यात तो शपथपूर्वक म्हणतो त्याने त्या रात्री तीन च्या सुमारालाच अंगणातून एका व्यक्तीला चालताना पाहिलं. तो विहंग खोपकर च होता. त्याच्या हातात काहीतरी चमकताना त्याला दिसलं.तो चाकू असावा असं त्याला वाटतंय पण त्याची खात्री नाही.”
“ पण तो त्याचा आधीचा,म्हणजे पोलिसांना दिलेला जबाब कसा काय बदलू शकतो? ” सौम्या ने विचारलं.
“ अंदाज..... तो म्हणू शकतो की आधी मला वाटलं की सव्वा बारा वाजले होते पण नंतर लक्षात आलं की मोठा आणि लहान काटा बघताना माझी जरा गल्लत झाली होती. प्रत्यक्षात सव्वा बारा नाही तर तीन वाजले होते रात्रीचे. आधीच्या जबाबाचे वेळी, झोपेत चालणारी व्यक्ती कोण होती याचा अंदाज होता पण खात्री नव्हती कारण विहंग ला तसे करण्याचे कारण नव्हते या विचाराने मी आधी त्याचे नाव घेतले नव्हते पण नंतर विचार केला की पोलिसांना खरी माहिती दिली पाहिजे .विहंग च्या हेतू बद्दल विचार करणे बरोबर नाही. ..... अशी भूमिका दुर्वास घेईल. पाणिनी ने खुलासा केला.”
“ पण उलट तपासणी त तुम्ही हे सर्व चव्हाटयावर आणालच ना? ” सौम्या ने विचारलं. “ तेव्हा त्याचा खोटे पण उघडा होईलच.”
“ सौम्या, अशी ही माणसं असतात ना त्यांना आपण खोटं बोलतोय याचं भानच नसतं.त्यांना वाटत असतं की आधी काहीही सांगितलं असल तरी अत्ता मी कोर्टात सांगतोय हेच खरं आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे जाणून बुजून खोटी साक्ष देणं ? ”
“ हो तसच, पण आधी सांगितलेलं चुकीचं या समजुतीतून खोटी साक्ष. अर्थात या माणसाला मी फाडून खाईन उलट तपासणीत.मी न्यायाधिशांच्या मनात हा विचार नक्कीच घालीन की रात्री तीन वाजता केलं गेलेला फोन आणि दुर्वास चं रात्री तीन वाजता उठणं याचा परस्पर संबंध आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ अशी शक्यता नाही का ,की मरुद्गण ने परस्पर फोन लावला असेल, दुर्वास ला न सांगता.? ” सौम्या ने शंका व्यक्त केली.
“ सौम्या, ज्या अर्थी आज सकाळी ते सर्व एकत्र होते,त्या वरून सिध्द होतं की दुर्वास ला विश्वासात न घेता मरुद्गण ने परस्पर फोन लावला नसणार.दोघांना एकमेकांच्या हालचालीची माहिती असणार.” पाणिनी म्हणाला.
“ आणखी एक...” कनक ओजस म्हणाला. “ चाकू ड्रॉवर मधून नेमका कधी गायब झाला असं हर्षद ला वाटतंय? ”
“ संध्याकाळी,केव्हातरी.मला नेमकेपणाने माहीत नाही. पण का विचारतो आहेस तू हे?” पाणिनी म्हणाला..
“ कारण मला वाटतय की आर्या ने जेव्हा ड्रॉवर ला कुलूप लावलं तेव्हा चाकू ड्रॉवर मधे होता असं आपण दाखवू शकतो. ”कनक ओजस म्हणाला.
“ कसं काय? ” पाणिनी म्हणाला..
“ खानसामा बल्लव .” कनक म्हणाला. “ माझ्या एका माणसाने ,आपण पेपर चे पत्रकार आहोत असं भासवून बल्लव ची मुलाखत घेतली.त्याला महत्व दिल्यामुळे तो खुष होऊन काहीही सांगायला तयार होता.त्याने सांगितलं की त्याच्या खोलीत जायच्या आधी त्याला काहीतरी हवं होत म्हणून त्याने ड्रॉवर उघडला होता तेव्हा त्याला तो चाकू तिथे असल्याचं पक्क आठवतंय. ”
“ वेळ काय पण त्याची? ” पाणिनी म्हणाला..
“ वेळ नक्की सांगता येत नाहीये त्याला पण तो म्हणतो की डिश उचलल्या गेल्या नंतर.पण आता त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याला वाटतंय की हर्षद खांडवा ला गेल्या नंतर.आता हे जर खर असेल तर ड्रॉवर मधून चाकू काढला गेला असला तरी आर्या ने ड्रॉवर ला लॉक लावण्यापूर्वी तो पुन्हा आत ठेवला गेला होता ! ” कनक ओजस म्हणाला.
“ पण कोण अशा प्रकारे चाकू काढून घेईल आणि पुन्हा आणून ठेवेल? आणि का असे करेल? ” पाणिनी म्हणाला..
ओजस ने खांदे उडवले.
“ बल्लव च्या त्या मुलाखतीला फारसा अर्थ नाही.वैयक्तिक मी त्याच्यावर फार विश्वास ठेवायला तयार नाही कनक.” पाणिनी म्हणाला. “ हर्षद खरं बोलत असणार. जर आर्या ने ड्रॉवर ला लॉक लावण्यापूर्वी चाकू आतच असेल तर विहंग ने तो बाहेर काढायची शक्यता नाही. कारण त्याची एकच किल्ली होती. काहीतरी गडबड आहे या झोपेत चालण्याच्या भानगडीत. बरं मला सांग कनक, आपल्या कडे येऊन गेल्यावर शेफाली कुठे गेली? ”
“ सरळ तिच्या वकिलाकडे. ”
“ आणि नंतर ? ” पाणिनी म्हणाला..
“ खांडवा ला जायला निघाली.”
“ तुझा माणूस मागावर आहे ना? ” पाणिनी म्हणाला..
“ दोघेजण ठेवलेत.” ओजस म्हणाला.
“ तुझं म्हणणं आहे की त्या चाकू च्या मुठीवर कोणाचेच ठसे नाहीत ? ” अचानक पाणिनी ने विचारलं.
“ विहंग खोपकर शी संबंध जोडला जाईल असे कुठलेच ठसे नाहीत. खरं म्हणजे जे काही ठसे आहेत ते अस्पष्ट आहेत .पोलिसांचे म्हणणे आहे की कोणीतरी एखाद्या चादरीला किंवा उशीला पुसून टाकले असावेत........म्हणजे तू आणि आर्या च्या हातून चुकून पुसले गेले नसतील तर. म्हणजे पत्रकारांनी ही माहिती थेट ठसे तज्ज्ञांकडून मिळवली आणि मला ती पत्रकारांकडून समजली ” ओजस म्हणाला.
“ सर त्यावर जर विहंग चे ठसे नसतील तर पोलीस त्याला कसे काय अडकवू शकतात ? केवळ त्याच्या उशीखाली चाकू सापडला म्हणून तो दोषी नाही ठरणार ना ? ” सौम्या म्हणाली.
“” फिरून फिरून पुन्हा सर्व विषय दुर्वास कडेच येतो.त्याने विहंग ला ओळखल्याचा जबाब जर मी खोटा पडू शकलो तर ही केस मी सहज जिंकेन अन्यथा मला झोपेत चालण्याच्या सवयी वर अवलंबून रहावे लागेल आणि तसं करायचं म्हंटल तर विहंग च्या ताब्यात तो चाकू कसा आला हे सिध्द करत बसावं लागेल.झोपायला जाण्यापूर्वी ड्रॉवर मधून त्याने चाकू काढून आपल्या उशीखाली ठेवला असेल तर त्याने झोपेत चालत असताना खून केलं असावा या बचावाला अर्थ राहणार नाही.तसा त्याने झोपायला जाण्यापूर्वी काढून घेतला नसेल तर ड्रॉवर ला कुलूप असताना आणि त्याची एकमेव किल्ली आर्या कडे असताना त्याला चाकू मिळणारच नाही.” पाणिनी म्हणाला.
पाणिनी विचारात पडत पुन्हा फेऱ्या मारायला लागला.
“मला वाटत पाणिनी ,रात्री तीन च्या फोन च्या मुद्यावर तू हे विहंग विरुद्ध चे प्रकरण कमकुवत करू शकतोस.इतर फार काही करायची गरज नाही.” ओजस म्हणाला.
“ तो फोन कॉल विहंग चा जीव वाचवेल पण मला तो चाकूचा मुद्दा बेचैन करतोय.काहीतरी निसटतंय. ....काय बर ....” स्वत:शी बोलल्या सारखा पाणिनी पुटपुटला.
अचानक त्याने हलकेच शिट्टी वाजवली ! फेऱ्या मारायचा थांबला.
“ काय रे काय झालं? ” कनक ने विचारलं
“ माझा सिद्धांत आहे , म्हणजे साध्या भाषेत. विचाराची एक दिशा सुचल्ये असं म्हण ” पाणिनी म्हणाला.
“ वॉटर प्रूफ आहे का? ”
“ अत्ताच नाही सांगता येणार. भोक असतील तर बुजवावी लागतील.” पाणिनी म्हणाला.
अचानक पाणिनी सौम्या कडे वळून म्हणाला, “ सौम्या, तू आणि मी मिळून एक नाटक करायचं आहे.”
सौम्या खुष झाली. “ बोला काय करायचं ? ”
“ कनक गेल्यावर मी सांगीन.”
“ अरेच्च्या ! ” कनक ओजस उद्गारला. “ एवढा वाईट आहे का मी? ” कोचावरून उठत कनक म्हणाला आणि बाहेर जायला निघाला.
त्या चौघांची मैत्री शाळेपासून होती. पाणिनी ,सौम्या,कनक आणि इन्स्पे.तारकर. एकमेकांना काहीही बोलत असत ते , त्याचा राग कोणालाच येत नसे. चौघेही आपापल्या क्षेत्रांत प्रामाणिक होते.मैत्री आणि कर्तव्य परस्परांच्या विरोधात नाही आलं कधी.
“ कनक, आमच्या नाटकात एक भूमिका तुला करायला देऊ शकतो मी , म्हणजे तू आमच्यावर जळणार नाहीस. ! ” पाणिनी म्हणाला.
“ मी अत्यंत निर्लज्ज आहे पाणिनी ” ओजस म्हणाला “ तुझ्या एवढाच ! ”
पाणिनी ला हसू आलं. “ मला सेक्रेटरी मुलीशी,म्हणजे प्रांजल वाकनीस शी बोलायचं आहे.तुला कितपत शक्य आहे तिला इथे आणणं लगेच ? ”
“ जमेल, ” ओजस म्हणाला. “ या केस शी संबंधित प्रत्येकावर माझ्या माणसांची नजर आहे.”
“ तिच ज्याच्याशी लग्न ठरलंय, त्या उदित पेंढारकर चं हार्ड वेअर चं दुकान आहे ना? ” पाणिनी म्हणाला..
“ बहुतेक ” ओजस म्हणाला. “ का बरं ? ”
“ का ते विचारू नको.” पाणिनी म्हणाला.
“ माझी एवढीच भूमिका आहे का या तुमच्या नाटकात? ”
“ भूमिका जेवढी कमी तेवढं पाठांतर कमी, आणि पर्यायाने त्रास कमी. ” पाणिनी खवचट पणे म्हणाला.
( प्रकरण ११ समाप्त.)