थोडसं मनातलं..! in Marathi Letter by Priyanka Kumbhar-Wagh books and stories PDF | थोडंसं मनातलं..!

Featured Books
Categories
Share

थोडंसं मनातलं..!

आज तब्बल दोन ते अडीच वर्षांनी पुन्हा काहीतरी लिहायला सुरुवात करत आहे. या दोन ते अडीच वर्षांत आयुष्यात खूप काही महत्वाच्या घटना घडल्या. धावपळीच्या जीवनातून म्हटलं थोडा वेळ काढू आणि तुमच्याशी आज संवाद साधूया.

इंजिनीअरिंग झाली आणि मी जॉब च्या शोधतच होते, की तितक्यात कोविड सुरू झाले. त्यामुळे जॉब शोधणे थोडे कठीण होऊ लागले. सगळे घरीच बसले होते मग घरातल्यांसोबत वेळ खूप छान जाऊ लागला. नवनवीन पदार्थ करून खाऊ लागलो आणि ऑनलाईन ॲप्सवर पोस्ट करून नातेवाईकांना दाखवू लागलो. गप्पा रंगू लागल्या. घरातल्या घरात बसून खेळ खेळायला लागलो. मजा मस्ती सुरू झाली. अगदी धम्माल केली. हळू हळू नंतर कंटाळा यायला लागला.

अर्थातच कामाच्या शोधत तर होतेच शिवाय अभ्यासही सुरू होता. पण दिवसभर किती अभ्यास करणार. शेवटी मग मी वाचन सुरू केले. इंटरनेट वरून वेगवेगळे ॲप डाऊनलोड केले आणि वाचनास सुरुवात केली. कथा कादंबरी वाचता वाचता मी त्यात इतकी गुंतून गेली की, दिवसरात्र एक करून मी संपूर्ण पुस्तक वाचू लागली. नंतर हळू हळू इतर लेखकांप्रमाणे आपणही काहीतरी लिहायला हवे अशी प्रबळ इच्छा मनात येऊ लागली. खरंतर अगदी शाळेत असल्या पासून मला लिहायला आवडायचे. इयत्ता सहावी सातवीत असताना मी काही कविता ही लिहिल्या होत्या.

ऑनलाईन माध्यमांद्वारे ज्या कथा मी वाचू लागली होती त्या लेखकांना मेसेज करून मी त्यांच्याकडून काही टीप्स घेऊ लागली. त्यातील काही लेखकांच्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा लिहायला सुरुवात केली.

पावसाळ्याचे दिवस सुरु होते. घराबाहेर इतकं सुंदर वातावरण होतं की त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही. त्या सुंदर क्षणांचा आस्वाद घेत असताना अचानक मनात एक आले.
चल काहीतरी लिहूया आज...
मग काय?
लगेच वही आणि पेन घेऊन खिडकी जवळ जाऊन बसले आणि बाहेरच्या रोमँटिक वातवरणाचा अनुभव घेत घेत मनात कवितेच्या ओळींची जुळवणी सुरू केली.

भास
या मुसळधार पावसात
अवचित तुझे येणे
तुझा तो अल्लडपणा
माझ्या मना मोहून जाणे

अन् वारा तो ही बेधुंद वाहे
जणू गातो आहे गीत प्रेमाचे
तुझ्या त्या कोमल स्पर्शाने
विसरून गेली भान जगाचे

मग येऊनी भानावरती
माझेच मला उमलणे
अवचित तुझे असे येणे
हा भास आहे हे कळणे
हा भास आहे हे कळणे

भास ही माझी पहिली वहिली कविता मी लिहिली. कविता लिहिल्यावर ही कविता सगळ्यांना आवडेल का अशी मनात एक भीती होती. कविता लिहून झाल्यावर ती मी माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना इंटरनेटद्वारे शेअर केली. सगळेजण अगदी कुतूहलाने विचारू लागले की ही कविता तू लिहिली आहेस का? काहीजण तर असे विचारू लागले की इतकं छान मराठी तुला खरंच येतं का? वाटतच नाही की ही कविता तू लिहिली आहेस.

सगळ्यांचे प्रश्न, शंका यांचे निरसन करता करता दिवस कसा गेला हे काही कळलेच नाही.सगळ्यांना आपण लिहिलेली कविता खूप आवडली याचं मनाला एक वेगळच समाधान मिळालं होतं आणि प्रोत्साहन सुद्धा.

हळू हळू रोज काहीतरी नवीन लिहायला सुरुवात केली. कधी शेरोशायरी तर कधी लेख, कधी कविता तर कधी चारोळ्या. अचानक कथा लिहायचे सुचले आणि मग मी विचार करू लागली. काय लिहायचं, कसं लिहायचं, विषय कोणता निवडायचा, लोकांपर्यंत आपले विचार कसे पोहचवायचे या सगळ्यासाठी मी सतत विचार करू लागली.

सगळं अगदी छान सुरळीत सुरू झाले होते. मुलगी वयात आली म्हंटल्यावर घरात तिच्या लग्नाविषयीच्या चर्चा सुरू होणे सहाजिकच असते. मग काय झाली सुरुवात स्थळ बघायला.
बघता बघता लग्न जमलं. साखरपुडा झाला. नोकरी सुद्धा लागली. या सगळ्या गोंधळात वर्ष कसे निघून गेले हे कळले सुद्धा नाही. आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली आणि मी लिखणापासून आपोआप दुरावली गेले.

लग्नसराई सुरू झाली. नवीन साड्या, कपडे, दागिने यांची खरेदी सुरू झाली. नोकरी सांभाळून सुट्टीच्या दिवशी या सगळ्या गोष्टींमध्ये दिवस कसे जायचे हे कळलेच नाही.

देव,अग्नी, ब्राह्मण यांच्या साक्षीने, सनई चौघड्याच्या गजरात, नातेवाईक आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने माझे लग्न पार पडले. नवीन संसार सुरू झाला आणि सगळ्यांची मनं जपता जपता माझी तारेवरची कसरत सुरू झाली. खरंतर यातच संसाराची खरी मजा.

वाचकांच्या सतत समीक्षा यायच्या. पुढचा भाग प्रकाशित केव्हा करणार? कथा पुढे का लिहिली नाही? असे बरेच प्रश्न वाचक विचारू लागले. लिखाण करायला बराच काळ उलटून गेल्याने मी पुन्हा कधी प्रयत्न करायला गेली तरी काही सुचत नव्हते. शेवटी आज मनाची पूर्ण तयारी केली आणि पुन्हा सगळ्या अपूर्ण कथा कविता स्वतः वाचून काढल्या. इतक्या दिवसांनी वाचत असल्यामुळे हे सगळं मी स्वतः लिहिलं आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता.

जवळ जवळ दोन अडीच वर्षानंतर मी पुन्हा काहीतरी लिहिणार आहे. खरंतर अर्धवट सोडलेल्या गोष्टींना पूर्णत्वाला घेऊन जाणे थोडे कठीणच असणार आहे. तरीही मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेन. माझ्या सगळ्या अपूर्ण कविता, कथा मी पूर्ण करणार आहे. लवकरच मी अपूर्ण ठेवलेली आणि प्रकाशित केलेली माझी पहिली वहिली प्रेमकथा "चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची" ही कथा पुन्हा लिहायला सुरुवात करणार आहे.

तुम्ही सगळ्यांनी या आधी या कथेला जसा प्रतिसाद दिला तसाच या पुढेही द्याल याची मला खात्री आहे. तुमचे प्रेम माझ्या लिखाणावर असेच राहील आणि तुम्ही ते समिक्षांद्वारे व्यक्त कराल अशी मला आशा आहे. सर्वांना एक विनंती आहे की ही कथा सुरुवाती पासून पुन्हा एकदा पूर्ण वाचा म्हणजे पुढील भाग वाचायला आणखी मजा येईल.

आपण पुन्हा एकदा लवकरच भेटू. धन्यवाद!!!

(टिप : या लेखाची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांची असून , या लेखाचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय हा लेख ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )