Kondan Parva One - Part 24 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 24

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 24

ताण 


" तुमचा समीकरणाचा तास झाला का या आठवड्यात? तू वर्गसमीकरणं सोडवलीस का बीजगणितातली?" रामदास विचारत होता.



" हो केलीत की. का रे? " मी म्हणालो.


" अरे खूप मुलांच्या डोक्यावरून गेलं सर शिकवताना. तूला जमलं?? " त्याने विचारलं.


" हो जरा प्रॅक्टिस केली घरी जाऊन. जमलं. थोडं फास्ट होण्यासाठी आणखी प्रॅक्टिस लागेल. " मी बोललो. कारण या वर्षी त्रिकोणामिती आणि वर्गसमीकरणे जरा किचकट डोकं खाऊ होतं.


"आणखी एक गोष्ट आहे.. मी कधीही या विषयावर बोललो नाही तुझ्याशी. पण बोलावं वाटलं." तो म्हणाला.


"ती कोणती रे?" मी न कळून विचारलं.


" गेले काही दिवस मी पाहतोय. म्हणजे गैरसमज नको करुन घेऊ. पण तुझी मैत्रीण सुनेत्रा डान्सची तयारी करतीये ना गॅदरिंग ची? तर त्या आर्टस् च्या बेंडेताई मुलींचा डान्स बसवतायत. शाळा सुटल्यावर एक तास थांबवून प्रॅक्टिस घेतात मुलींची. तो सुटेपर्यंत हा सचिन तिची वाट बघत ग्राउंडवर असतो. उगाच पोरं जमवून खेळत बसतो. ती सुटली की निघतो आणि मग दोघे एकत्र चालत जातात. मी सुद्धा गेल्या आठवड्यात थांबत होतो आमच्या नाटकाच्या तालमीसाठी तेव्हा रोज दिसत होतं. " तो बोलला.


"रामदास.. सुनी आणि सचिन फ्रेंड्स आहेत. मला ती तिच्या इतर मित्र मैत्रिणींशी कितीवेळ घालवते? काय करते? कसं निभावते? याबद्दल काहीही वाटणं चूक आहे. ती माझी पण सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. ती स्वभावाने मनमोकळी आहे. त्यामुळं मला त्यात काहीही प्रॉब्लेम नसायला हवा." मी म्हणालो आणि मला खरंतर त्याने तसं बोलणं इरिटेट करत होतं.

"अरे पण.. तू आणि ती तर..." 

रामदास बोलतच होता. मी त्याला अडवलं.


" आ!! आ!! पुढे काहीही बोलू नकोस. आम्ही खूप घट्ट मित्र आहोत. त्याला इतर काहीही म्हणू नकोस. कसलाही अंदाज लावू नकोस. " मी म्हणालो.


" बरं. ठीक आहे. पण एक मनापासून सांगू का? सचिनचं असं वागणं वेगळं वाटतं. तुम्ही दोघे एकत्र असलात की इतकं काही वाटत नाही. तुम्ही एकदम खेळीमेळीने वावरत असता. पण तो सचिन सतत तीला काहीतरी भरवून दिल्यागत बोलताना दिसतो. ती शांत असते हा बडबडत असतो. मला जरा वेगळं वाटतं रे.. सुनेत्रा हुशार आहे.. मला तिची अभ्यासातली आणि इतर गोष्टींमधली बुद्धी भारीच माहिते. त्या सचिनच्या नादाला लागणं तीला सूट नाही करत. तो वयाच्या पुढं जाऊन वागण्याचा प्रयत्न करतो असं दिसतंय. खूप पुढचं बघून चाललाय तो. " रामदास परत एकदा सविस्तर बोलला.


" रामदास.. अजून खूप वेळ आहे रे सगळ्याच गोष्टींना. सुनीला सचिनने कितीही काही भरवलं किंवा काय.. तीला ज्या गोष्टी पटत नाहीत ती त्या करणार नाही. मी खूप छान ओळखतो तीला. ती मला सगळं सांगते. आणि हो.! सचिन तिच्याशी एकट्यात बोलतो वैगरे हे ती मला बोललीये. त्याला अभ्यासाचं मार्गदर्शन करत असते ती. त्यामुळं जाऊ देत. एवढं काही नाही." मी बोललो.


" मला एवढंच वाटतं की तिच्या आणि तुझ्या दोघांच्याही बाबतीत काही चुकीचं घडू नये. मी तर एवढंही म्हणेन. माणसाने ने जे सोबत आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्यावं.. हे असले वायफळ लोकं जवळ भटकून देऊ नये... तुमच्या दोघांकडे पाहून वाटतं की मैत्री किंवा इतर कसलंही नातं असावं तर असं गाढ आणि समजूतदारपणाचं असावं आणि हा सचिन समजूतदार नक्कीच नाही. मी तूला आत्ताच सावध करतोय, समजून घे." तो बोलला आणि गेला.


सुनी गेले दोन आठवडे डान्सची प्रॅक्टिस करत होती हे ती मला बोललेली. पण येताना सचिनसोबत असतो हे नाही. मी तीला काही विचारायला जाणार नव्हतो. कारण यावर मी माझी भूमिका स्पष्ट ठेवली होती. तीने मला कसलंही स्पष्टीकरण का द्यावं? काही वावगं जाणवलं तर सपोर्ट सिस्टीम म्हणून मी कधीही आणि काहीही करायला सदैव तयार होतो. तिने एका शब्दात सांगावं " जाडू असं असं झालंय." पण जोवर ती बोलत नाही तोवर मी तिच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणं मला पटत नव्हतं. सुनी काही बोलली तर बघू... असं मी त्यावेळी ठरवून शांत राहिलो.


🍁🍁🍁🍁


" सुने.. चल बॅडमिंटन खेळू. " मी म्हणालो. रविवारी सकाळीच मी तिच्याकडे गेलो. ती बाहेर ओट्यावरच होती. आवरून वैगरे बसलेली.

" जाडू.. उम्म्म!! आज नको रे, आज खरचं मूड नाहीये. " ती म्हणाली.

" बाहेर नको तर मग chess? " मी विचारलं.

" नको... जरा गणिताची प्रॅक्टिस करायचीये." ती म्हणाली.

" अरे वाह आज अभ्यासाचा मूड आहे होय. मी पण करतो मग. एकत्र करू. " मी नेहमीसारखं बोललो.


" अरे तीला पल्लवीकडे जायचंय. तिच्या घरी अभ्यास करणारेत." बाहेर काही कामासाठी आलेल्या काकू म्हणाल्या.

"असं होय. Ok मग. चल येतो गं. " असं म्हणून मी निघालो. पण सुनिकडे पाहता तिच्या आईकडे बघून तिने वैतागल्यागत तोंड केलेलं मला दिसलं. मला काही कळलं नाही.

आईकडचं पुस्तक वाचावं म्हणून तिच्या कपाटात धुंडाळलं तर तिने अजून ती बदलली नव्हती. रविवारी अर्धा दिवस वाचनालय सुरु असतं हे मला माहित होतं. तिचं मेम्बरशिप कार्ड घेऊन मी निघालो. बाजारात चांगली अळूची पाने दिसली तर घेऊन ये असंपण आईने सांगितलं होतं.

वाचनालयात जाऊन मी पुस्तके घेतली. बाजाराकडे येताना जाणार होतो. मार्केटच्या अलीकडे, गणेश चौकात एक थिएटर होतं. अनमोल नावाचं. तिथे "दिल तो पागल है" सिनेमाचं पोस्टर झळकत होतं. माझं लक्ष गेलं. हळूहळू सायकल चालवत मी जात होतो. पोस्टरखाली थिएटर समोर लोकांची गर्दी होती. मी पुढे जाणारच होतो. तितक्यात माझ्या डोळ्यासमोर काही चमकलं. मी थबकलो.

सुनी?? सोबत स्नेहा, पल्लवी आणि सचिन. ते चौघे तिथे उभे होते. म्हणजे सकाळी ती सिनेमाला जाण्यासाठी आवरून तयार झाली होती. स्नेहा आणि पल्लवी सोबत होत्या. अभ्यासाचा तिने बहाणा बनवला होता. पण मग मला का नाही बोलली ती?? मी तीला अडवलं असतं का? असं का करत चाललीये सुनी?माझ्याशी खोटं बोलून काही करायला माझं दडपण घ्यायची काय गरज आहे तीला? मला वाईट ती सचिन आणि मैत्रिणींसोबत जाण्याबद्दल वाटत नव्हतं. तिने घरी आणि मला ही गोष्ट न सांगण्याबद्दल होतं. आजवर तिने असं कधीच केलं नव्हतं. मला तिच्याशी बोलणं गरजेचं होतं आणि ते मी नक्कीच करणार होतो.

🍁🍁🍁🍁

त्यादिवशी मी परत तिच्याकडे गेलो नाही. मन रमवण्यासाठी वाचण्याचा प्रयत्न केला पण मूड येईना. अस्वस्थपने सगळा दिवस घालवला. सोमवारी उठून माझा व्यायाम वैगरे रुटीन आटपत शाळेत आलो. 

प्रार्थना संपवून सगळे वर्गात आले. सचिनकडे बघून पल्लवी आणि स्नेहाने smile दिल्याचं निरीक्षण मी नोंदवलं. त्याआधी त्याला ओळख देत नव्हत्या. कालपासून बहुतेक. सुनी वर्गात आली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. पण कोण जाने का मला तिचं ते हसणं खूप खोटं वाटलं. रुक्षता म्हणजे काय ते सुनीने माझ्याकडून कधीच अनुभवलं नव्हतं. मी चेहरा सरळ ठेवला आणि विषयाचं पुस्तक काढू लागलो.

मधल्या सुट्टीत मी लवकर उठून रामदासकडे जाऊन त्याच्या वर्गातल्या ग्रुपसोबत त्यादिवशी डबा खाल्ला. सुनीशी चकार शब्द बोललो नाही. डबा खाऊन झाल्यावर ती आली होती. 

" जाडू कुठे गेला होतास? " तिने विचारले.

" अ मध्यें बसलेलो. रामदास कडे." मी म्हणालो.

" अच्छा! का रे..? मला वाटलं की... " ती म्हणत होती.

" फार काही वाटत असतं तूला. इतकं काही वाटून घ्यायची गरज नाहीये. जा जागेवर, बेल झालीये. " मी तीला मध्येच तोडत म्हणालो.

" अरे काय झालं?? असं का बोलतोयस? " ती विचारू लागली.

" जागेवर जा. " मी थोडं करड्या आवाजात बोललो. 

" काय गं नेत्रा काय झालं? " सचिन तितक्यात तिथन जात होता तो पचकला.

" तू तर पाहिला निघ इथून. सटक चल." मी बोललो.

तो सुनीकडे एकदा आणि माझ्याकडे एकदा पाहून गेला.

सुनीला मी तिच्या जागेकडे बोट दाखवलं. ती गेली.

तिच्याशी बोलायचं असं मी ठरवलेलं. पण माझीच ईच्छा होईना. न जाणो का पण आत एक राग उसळून येत होता. मी का रागावलो होतो? परवाच्याच दिवशी मी रामदासला समजावलं होतं मी की तिने तिच्या फ्रेंड्स सोबत कसं राहावं तिचा प्रश्न आहे. तरीसुद्धा आज माझं असं झालं होतं. ही असुया होती की सुनीने मला ग्राह्य न धरता लपवून एखादी गोष्ट करने हे मला खपत नव्हतं. मैत्रीत असा अधिकार असू शकतो?? हे ही मला उमगत नव्हतं. मी करावं तर काय करावं आणि नाही करावं तर ते योग्य आहे का ह्याचाही निर्णय माझ्याकडून होत नव्हता.

शाळा सुटली मी लगबगीने निघून गेलो. आज घरीपण जायचा मूड नव्हता. सरळ सायकल टेकडीकडे दामटली. माऊलाईच्या कुशीत माझं सांत्वन करण्याची निराळी किमया होती. तिथलं सानिध्य मला शांत करत असायचं. आज मला त्याची नितांत गरज होती. 

स्वतःला शांत करत संयमीत विचार करणं गरजेचं होतं. 
सुनी माझ्यासाठी महत्वाची व्यक्ती आहे.
कधीतरी तिचाही राग येणं स्वाभाविक आहे.
पण तो राग मनात धरून तिचा तिरस्कार करणं संपूर्ण चुकीचं आहे.
मी तिचं कोंदण बनण्याच्या प्रयत्नात तिच्या श्वासाना कोंडण्याचा जीवघेणा प्रकार माझ्याकडून होऊ देणं अशक्य आहे. 
हे स्वतःला समजावणं अतिशय गरजेचं होतं.


🍁🍁🍁🍁


तू कितीही डागण्या दिल्यातरीमा
झी होणारी आग मी बघेन
तू माझ्यापासून कितीही दूर गेली तरी
तूझं माझ्यातलं अस्तित्व मी जपेन..


- क्रमशः


शब्दभ्रमर 🍁🍁