Sanskari Date's 'Fajitwada' in Marathi Comedy stories by Shivraj Bhokare books and stories PDF | संस्कारी डेटचा 'फजितवाडा'

Featured Books
Categories
Share

संस्कारी डेटचा 'फजितवाडा'

कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाचा एक स्वघोषित 'सल्लागार' मित्र असतो. माझा असाच एक मित्र होता— 'बबड्या'. त्याचं स्वतःचं अफेअर कधी टिकलं नाही, पण पूर्ण कॉलेजला प्रेमाचे धडे तोच द्यायचा. एकदा बबड्याने मला गळ घातली, "आदि, बघ... जर तुला रियाला पटवायचं असेल, तर तुला काहीतरी 'डिफरंट' करावं लागेल. कॅफे, मूव्ही जुनं झालंय रे, तिला एखाद्या धार्मिक ठिकाणी ने!".                                  
  आणि मी, मूर्ख शिरोमणी, त्याच्या सल्ल्याला बळी पडलो. मी रियाला विचारलं, "रिया, उद्या विनायकी चतुर्थी आहे, आपण मंदिरात जाऊया का?"
तिने आश्चर्याने पाहिलं, "बापरे! तू इतका धार्मिक आहेस? नक्की जाऊया!" तिला वाटलं मी संस्कारी आहे, पण तिला काय माहिती की माझ्या संस्कारांचा रिमोट कंट्रोल बबड्याच्या हातात होता.
दुसऱ्या दिवशी मी सकाळी ६ वाजता उठलो. कपाळावर टिळा, अंगात पांढरा कुर्ता (जो मी शेवटचा शाळेच्या गॅदरिंगला घातला होता) असा अवतार करून मी तिला घ्यायला गेलो. रिया सुद्धा छान पंजाबी ड्रेसमध्ये आली होती. तिला पाहून माझ्या पोटात गिटार वाजू लागली.
आम्ही मंदिरात पोहोचलो. गर्दी इतकी होती की असं वाटत होतं, जणू देवाने 'बाय वन गेट वन फ्री' ची ऑफर दिली आहे. रांगेत उभं राहिल्यावर खरी मजा सुरू झाली.
माझ्या मागे एक 'काकू' उभ्या होत्या. त्यांच्या हातात नारळ आणि फुलांची पिशवी होती. त्या काकू इतक्या जोरात ढकलत होत्या की मला वाटलं, त्या मला ढकलून थेट मोक्ष मिळवून देणार की काय!
"काकू, जरा दमानं घ्या, देव कुठे पळून जात नाहीये," मी हळूच म्हणालो.
काकू ओरडल्या, "अरे लेकरा, दर्शन लवकर झालं तरच पुण्य मिळतं, तुला काय माहिती?"
रिया माझ्याकडे बघून हसत होती. मी तिच्याशी रोमँटिक बोलायचा प्रयत्न केला, "रिया, बघ हे वातावरण किती शांत आहे ना?"
तेवढ्यात बाजूच्या लाऊडस्पीकरवर जोरात गाणं वाजलं— "शेंदरू लाल चढायो..." आणि माझ्या वाक्याचा अर्धा भाग त्या गाण्यातच विरघळला.
थोड्या वेळाने आम्ही गाभाऱ्याजवळ पोहोचलो. आता मला रियाला इम्प्रेस करायला काहीतरी भारी बोलायचं होतं. "रिया, तुला माहितीये? गणपती बाप्पाला २१ मोदक का प्रिय आहेत?"
रिया उत्साहाने म्हणाली, "का?"
मी सांगणार तोच, मागून काकूंनी असा एक धक्का दिला की मी थेट जाऊन भटजींच्या अंगावर पडलो!
भटजी रागाने ओरडले, "अरे बाळ, देवाला नमस्कार करायचा असतो, मला नाही!"
सगळी पब्लिक हसायला लागली. रियाने तोंड दाबून हसू आवरलं. माझा तो 'संस्कारी' स्वाभिमान तिथेच धुळीला मिळाला.
दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आता वेळ होती 'प्रसाद' खायची. मला वाटलं मोदक मिळतील, पण नशिबाने तिथे 'खिचडी' वाटत होते. आम्ही रांगेत उभे राहिलो.
माझ्या हातात खिचडीचा द्रोण आला. मला वाटलं आता तरी थोडं रोमँटिक बोलूया. "रिया, ही खिचडी आणि तुझी मैत्री दोन्ही सारख्याच आहेत... एकदम मऊ आणि चविष्ट!"
(बबड्याने शिकवलेला हा डायलॉग खरं तर कॉफीसाठी होता, पण मी तो खिचडीवर मारला!)
रियाने एक चमचा खिचडी खाल्ली आणि म्हणाली, "आदि, यात मीठच नाहीये रे!"
माझा रोमँटिक फुगा तिथेच फुटला.
आम्ही मंदिराच्या पायऱ्यांवर बसलो होतो. तिथल्या शांततेचा फायदा घेत मी शेवटी हिंमत केली. "रिया, खरं सांगू तर मला तुला काहीतरी सांगायचंय..."
ती शांतपणे माझ्याकडे बघत होती. वारा सुटला होता, तिचे केस उडत होते, एकदम 'करण जोहर'च्या सिनेमासारखा सीन तयार झाला होता.
मी श्वास रोखून म्हणालो, "रिया, आय रिअली लाईक यु..."
तेवढ्यात... तिथल्या एका 'माकडाने' झेप घेतली आणि रियाच्या हातातली खिचडीची पिशवी पळवली!
रिया ओरडली, "अरे! माझी खिचडी!" आणि ती त्या माकडाच्या मागे धावायला लागली.
मी तिथेच पायरीवर बसून विचार करत होतो— 'माकड' तो होता की मी?
शेवटी रिया हसत हसत परत आली आणि म्हणाली, "आदि, आजची डेट ना माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट आणि 'फनी' डेट होती. तू कितीही प्रयत्न केलास ना संस्कारी बनायचा, तरी तू 'अतरंगी'च राहशील!"
तिने माझ्या गालाला हलका स्पर्श केला आणि म्हणाली, "पण मला हा अतरंगी आदिच आवडतो."
त्या दिवशी मला समजलं, प्रेमात 'परफेक्ट' होण्यापेक्षा 'रिअल' राहणं जास्त गरजेचं असतं. आणि हो, बबड्याचा सल्ला घेणं मी त्यानंतर कायमचं बंद केलं!
------------------------------

टीप (सावधान!):

वर वाचलेल्या कथेचा आणि माझ्या खऱ्या आयुष्याचा दुरदूरपर्यंत काहीही संबंध नाही (हो, अगदी त्या माकडाचा सुद्धा नाही!). त्यामुळे ही स्टोरी वाचून मला कोणीही जज करू नका. नाहीतर माझ्या घरी चहाचा हिशोब द्यायला तुम्हाला यावं लागेल! ही कथा फक्त आणि फक्त तुम्हाला हसवण्यासाठी आणि तुमची करमणूक करण्यासाठी लिहिली आहे.
जर तुम्हाला ही खिचडी स्टोरी आवडली असेल, तर लाईक करा आणि जर तुम्हालाही असा एखादा 'बबड्या' नावाचा मित्र असेल, तर त्याला खाली टॅग करा! पुढच्या अशाच अतरंगी गोष्टीसाठी मला Follow करायला विसरू नका! 😜🙏"