Kondan Parva One - Part 38 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 38

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 38

संभ्रम 


मी रविवारी सकाळी नऊला घरातून प्रज्ञाकडे निघाले होते. तिच्या बहिणीचा साखरपुडा होणार होता चारपाच दिवसांनी. तर प्रज्ञाला घागरा निवडायला मदत करण्यासाठी तिच्या घरच्यांसोबत ती मला चल म्हणाली होती. जाडूपासून हा प्लॅन मी लपवला होता. पण याला कुठला डिटेक्टिव्ह चावला होता देव जाने. निम्म्या रस्त्यात पण आले नव्हते तर जाडुने सायकल आडवी घातली. मी केवढ्याने दचकले. 


"सुने ss!! अजिबात नाही जायचंय कुठे!! सरळ घरी चल." जाडू मला ओरडत होता.

"असं काय करतो रे जाडू? जाऊ दे कि.. " मी त्याला विनवत होते.

" ती प्रज्ञा बघेल तिचं. तीला काय कोंणी नाहीये का घरात? घागऱ्याचे सॅम्पल बघायला तू कशाला हवीस? अजिबात नाही जायचं. घरी चल quadratic equation करायचं ठरलं होतं ते कोण करणारं? तुझा नाना??" जाडू ओरडत होता.

" काय रं ए? कोण तू? का पोरीला वरडतोय? कुठं चल म्हणतोय? बघू का तुझ्याकडं? " रस्त्यावरून जाणारी एक आजीबाई जाडूला ओरडू लागली. तीला काहीतरी वेगळं वाटलं.

" हिला दहावीचं वर्ष आहे तरी कळेना. निघालिये मैत्रिणीकडं timepass करायला. बरं झालं तू आली.. तूच चल आजे. आज तुझ्या गणिताचा अभ्यास घेतो." जाडू आजीला हाताला धरून म्हणाला.

"बया.. मला गिनीत शिकविणार व्हय.. बया!!" आजी आश्चर्य चकित होऊन म्हणाली.

माझा घरी येईपर्यंत हसून हसून जबडा दुखतं होता.
त्याने मला घरी यायला भागच पाडलं. माझे आई बाबा पण ते बघून दंग झाले होते.. पण माझ्या हसण्याचं कारण त्यांना काही कळेना.

"ही कार्टी आमचं ऐकत नाही. तूच बरोबर सरळ करतो तीला." असं म्हणत जाडूचंच कौतुक करत बसले.

"खडूस कांद्या. प्रज्ञा जीव घेईल माझा उद्या." मी म्हणाले.

"गप गुमान अभ्यास कर चल. बारा नंतर तू, मी आणि श्वेता जाऊ टेकडीवर. आज पावसाळी पिकनिक छोटीशी. ती सॅन्डविचेस बनवून आणणारे. Lunch on टेकडी." जाडुने मस्त प्लॅन बनवला होता. 

आम्ही मस्तपैकी भुरभूर पावसात टेकडीवर भिजलो. मंदिरात बसून सॅन्डविच आणि रस्त्यात घेतलेले गरम वडे खाल्ले. तिथं बसून गाणी गायली. आमचे काही किस्से श्वेताला सांगितले आणि तिचे ऐकले. त्या कोंदट दुकानात जाऊन घागऱ्याची टेकडी बघत बसण्यापेक्षा हे खूपच भारी होतं. जाडूच ऐकणं बनतं बऱयाचदा....

🍁🍁🍁🍁

पुढच्या रविवारी जाडूच्या घरी मी आणि श्वेता गेलो. तिकडे काकूंनी बनवलेले गरमागरम अप्पे खाल्ले. मग तुटून अभ्यास केला. तीनचार तास अभ्यास केल्यावर शिणल्या मनाला तजेला द्यायला आम्ही भर पावसात चालत चालत गावभर फेरी मारली. मला पावसात चालायला आवडायचं जाडूला माहित होतं. श्वेतासुद्धा एक वेगळा अनुभव म्हणून आली. मग आम्ही तिघे भैरोबाच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतलं. भिजतच कट्ट्यावर बसून गप्पा मारल्या आणि घरी परतलो.

🍁🍁🍁🍁

प्रत्येक रविवारी जाडू मला आता व्यस्त ठेऊ लागला होता. आणि इतर दिवशी...??

"पल्लवी रडक्या तोंडाने बघत होती का? मग तूला काय तीला बघता कळवळा येऊन रडायला आलं कि काय? बघू देत तीला.. तू समोर सरांकडे, फळ्याकडे आणि नाहीच कुठं जमलं तर, माझ्याकडे बघत जा. समजलीस??"

"काय म्हणत होता गं सचिन? वही मागितली का? उद्या सकाळी परत कर म्हणावं. दुसरं नाही ना काही बोलला?"

"Extra क्लास टॉपर्सचे घेतात शाळेत. माहिते ना तुला सुने? कशाला त्या आशाला घेऊन गेलीस सरांकडे? ती पहिल्या दहा मध्यें नाहीये. हे त्यांनी क्लिअर करुन पण त्यांच्यासोबत वाद घालत बसलीस. किती उद्योग तूला? उगाच नाही त्याच्या फाटक्यात पाय नको घालत जाऊ." 

"शनिवारी संध्याकाळी लायब्रॅरिमध्ये चल माझ्या सोबत. पुस्तकं चाळ तिथं बसून. नको त्या रेश्माच्या घरी. तीला रडकीला सतत तिच्या मारक्या आईचं आणि घाबरट बाबांचं गाऱ्हाणं तूला सांगायचं असतं. नाही जायचं.,"

"ओ काका ss!! ही सुनी बघा काय म्हणतीये. आरतीच्या मावशीच्या डोहाळ जेवणाला जायचंय हिला. काय गरज आहे का? तिकडं त्या जिगर संस्थेने विद्यापीठाच्या कुलगुरूंचे व्याख्यान ठेवले आहे, अभ्यास आणि तणावमुक्तीसाठी रंगमंदिरला. चल म्हणतोय तर येईना. सांगा हिला, ओरडा नायतर." 

"रविवारी नाही जायचं कोणाकडे. आपलं ठरलंय ना?"

"तिकडे आज नको. भूगोल उरकू."

"तू कशाला हवीस तिथं? आज अर्थशास्त्र कर गपचूप."

"काय काम आहे सचिनचं? मी येतो चल."

"जाडू जाडू जाडू ssss..." माझा जाडू नावाचा आयुष्याचा सगळ्यात लाडका अवयव ठणठण ठणकून बोंबलत होता. हा आता मित्र कमी आणि सासू जास्त झाला होता.

सतत माझ्या मागे लागून लागून त्याने मला सगळ्यांपासून अलिप्त करण्याचा चंग बांधला होता. त्यामुळं मला बऱ्याच जणांची नाराजी झेलावी लागत होती. पोरीं समजून घेत होत्या. पण सचिनची अवस्था बिकट झाली होती. 2-3 मिनिटं तो माझ्याशी बोलायला लागला कि जाडुने जागा सोडलेली असायची. सचिन आणि माझं कामाच बोलून झालं कि जाडू सरळ मला म्हणायचा. 

"झालं?" 
मी मान डोलवायचे आणि जागेवर जायचे.

जाडुने त्याच्यासोबत अभ्यास करायला लावून मला पहिल्या सराव परीक्षेत शाळेत तिसरी आणली. दुसरा जाडू आणि पहिली श्वेता होती. आम्ही तिघे मित्र एकामागे एक खूप कमी मार्जिननें टॉप करतं होतो. पण ईर्षा आमच्या आजूबाजूला जराही फटकत नव्हती. उलटं आमचं एकमेकांशिवाय गाडं पुढे सरकत नव्हतं.

मला सतत बीजी ठेऊन मी कंटाळणार नाही याची पण काळजी त्याने घेतली होती. हिंडणं, फिरणं, मस्ती, मजा सगळं चाललं होतं. पण त्याला एक शिस्त होती आणि ती जाडुने आणली होती. त्याने स्वतःचा अभ्यास सांभाळून मला पण एका साचेबद्ध आयुष्यात रमवत आणली होती. त्याला मागे पल्लीमुळं झालेली गोष्ट खोलवर लागली होती. या महत्वाच्या वर्षी तो कसल्याच कारणाने आमच्या अभ्यासात आणि प्रगतीत बाधा येणार नाही असं बघत होता. ते पूर्ण वर्ष मी त्याचं ऐकणार असं त्याला बोलले होते. पण...

"सुनी!!" प्रीती भेटली मला शाळेत.

"काय गं प्रीती?" मी विचारलं.

"दोन दिवस झाले सचिन शाळेत आला नाहीये. कळलं नाही का तूला?" तिने विचारले.

"अरे हो. खरंच कि. का गं?" मी विचारलं. जाडुने मला इतकी गुरफटवून टाकली होती कि सचिन शाळेत नाहीये हे ही माझ्या लक्षात आलं नाही.

"बरं नाहीये त्याला. खूप आजारी आहे." ती म्हणाली. ती त्याच्या घराच्या एरिया मध्यें राहायची. तीला कोणाकडून तरी कळलं.

"अरे बापरे!! होका? नाही गं काही माहित खरंच. मी हल्ली अभ्यासात आणि रुटीनमधेच गुंतले होते. " मी म्हणाले.

"तूला माहित असावं म्हणून सांगितलं गं बाकी काही नाही." ती म्हणाली.

माझ्या मनाला चुटपुट लागली ना पण त्यामुळे. सचिनला बरं नाही. सहसा कधी तो आजारी पडला असं ऐकलं नव्हतं. पावसापाण्यात सुद्धा त्याला त्याची कामे सांभाळून शाळा बघावी लागतं होती. मग असं घडणं स्वाभाविक आहे. मला त्याला भेटायची तीव्र ईच्छा झाली होती. कसं करू कळेना.
जाडूचा पहारा तोडणं अशक्य होतं. 

त्या दिवशी शाळा सुटल्यावर आमचा विशेष मार्गदर्शनाचा एक तास होता. 

"चल सुने! Extra क्लास." जाडू म्हणाला.

" डोकं दुखतंय आज. " मी म्हणाले.

"डोकं? कशाने?" त्याने विचारलं.

" डब्यात लाल चणा होता आज. पित्त झालंय बहुतेक. " मी म्हणाले.

थापा मारायचं माझं skill जाडूला निटंसं माहित होतं. पण मी तोंडच असं केलं कि तो म्हणाला," बरं चल घरी सोडतो तूला. " 

" कशाला? मी जाते. तू जा क्लासला नको बुडवू. मला सांग नंतर काय झालं ते. मला जरा झोप काढायची गरज आहे. नाहीतर अजून आजारी पडेन." मी म्हणाले.

" ठीके. सावकाश जा गं. भेटतो नंतर. " तो म्हणाला.

🍁🍁🍁🍁

"प्रीती!! हा सचिन कुठे राहतो दाखवतेस का?"  मी तीला गाठलं.

"चल माझ्या सोबत." ती म्हणाली.

सायकल ताणत मी तिच्यासोबत माळवाडीकडे निघाले. हा भाग तसा मुख्य गावापासून दूर होता. कॅनॉलच्या कडेने जाताना भीती वाटत होती. सटकून पाण्यात पडण्याची. इथेच तर श्रद्धाला सचिनने वाचवली होती. तो प्रसंग परत एकदा आठवून सचिनबद्दल कौतुक दाटून आलं. न जानो का त्याच्या भेटीची तीव्रता वाढली. गेले तीन महिने पाच मिनिट पण बोलले नव्हते त्याच्याशी. आज भेटून त्याला नीट विचारपूस करणं गरजेचं होतं. माळवाडीत आल्यावर मी दुकानातून एक बिस्कीटचा पुडा घेतला. प्रीतीने मला लांबून त्याचं म्हणजे त्याच्या मामाच घर दाखवलं.

येतेस का असं तीला विचारलं तर नको म्हणाली. मग मी एकटीच गेले. ते घर दोन खोल्यांचं होतं. वरती पत्रा होता आणि विटकामावर प्लास्टर सुद्धा केलं नव्हतं. पावसाची हलकी भुरभूर सुरु झाली. मी पटकन जाऊन दारं वाजवले.

सचिन होता.
"नेत्रा?! तू इकडे कशी?" तो म्हणाला.

" आत येऊ? " मी विचारलं.

"अ! हो.. हो ये.." तो म्हणाला.

मी सॅन्डल काढून आत गेले. बाहेरच्या खोलीत एक पत्र्याची खुर्ची आणि वाकलेली लोखण्डी खाट होती. एक पत्र्याचं कपाट आणि एक trunk. घरात पिवळा 100 चा दिवा जळत होता. खाली थंड शहाबादी फरशी.

सचिन खुर्चीवर बसला. मी खाटेवर टेकले. 
"घरं कसं सापडलं तूला?" त्याने विचारलं.

मी बॅग मधून बिस्कीटचा पुडा काढला आणि त्याला दिला.
प्रीतीने सांगितलं तूला बरं नाहीये म्हणून तू शाळेत नाही आलास 2-3 दिवस. 

"काय होतंय. रे तूला?" मी विचारलं.

" तब्येत बरी नाही हे खोटं आहे. तसा बहाणा बनवला होता मी. कारण वेगळंच आहे. दोन तीन दिवस झाले इथं खूप टेन्शनच वातावरण झालंय. त्यामुळं माझं शाळेत यायचं मनं करतं नाहीये. सगळं सोडून.. तूला पण सोडून, गावाला जावं वाटतंय. बस झालं. मला नाही जमतं आता. " असं म्हणून तो ओंजळीत तोंड खुपसून रडू लागला.

" सचिन काय झालं अरे का रडतोय? "  मी उठून त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला म्हणाले.

"मामीने खूप भांडणं केलं मामाशी. तिच्या माहेरी निघून गेलीये. ती म्हणते मला सांभाळायला जमत नाही. माझ्या रहायचा, खायचा खर्च वाढतोय. शिवाय तीला घरात वावरायला अडचण होतीये. एकतर माझं शिक्षण बंद करून मला रंगाच्या कामाला लावा किंवा गावाला पाठवा. दहावीच्या वर्षीचं तिने हा गोंधळ घातलाय. माझं काय होणार कळत नाहीये. तिकडं आई कशेबशे पैसे जोडून पाठवत असते. मी पण पेपरलाईनचे पैसे मामाला देतो. पण मामी समाधानी नाही. तीला मी नको इथं." सचिन आणखी रडायला लागला.

सचिनला असा कमजोर मी कधीच बघितला नव्हता. त्याच्यावरची परिस्थिती खूपच बिकट होती. मला खूप कसतरी वाटलं. कसं समजाऊ कळेना.

"त्यात तू गेले दोन तीन महिने माझ्याशी बोलणं सोड पण साधं माझ्याकडे बघत पण नव्हतीस. मी कोणाला माझी अडचण सांगू असं झालं. मित्र आहेत. पण त्यांचे आधीच इतके उपकार घेतलेत अंगावर. किती निर्लज्ज सारखा सतत स्वतःचं रडगाणं रडणार? किमान तुझ्याशी बोलून स्वतःवर असलेला या ताणाला घालवण्याचा मार्ग तरी सापडला असता. पण ते ही होतं नाहीये." सचिन म्हणत होता.

सचिनला मानसिक आधाराची गरज होती. त्याला माझी गरज होती. त्याची हिंमत वाढवणं गरजेचं होतं. माझी त्याच्याशीही मैत्री होतीच कि. मग त्या मैत्रीच्या अनुषंगाने सचिनचा माझ्याकडे काही मागण्याचा हक्क बनत होता. मी त्याच्यासाठी त्याच्यासोबतही असणं गरजेचं होतं.

पण जाडू?? आणि त्याचा तो माझ्यासाठीचा हट्ट?? त्याचं काय??...

🍁🍁🍁🍁

द्विदल अवस्थेला या मनाच्या
कशी सावरू मी स्वतःच्या
मन बावरे उधळते अगतिक
पण रोखती तुझ्या रेषा कुंपणाच्या 🍁🍁

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁