जया देव तारी - भाग ०२
म्हाजनाचे लग्न उंच वयात झाले. त्याला हारोहार अकरा मुलीच झाल्या. अकरावी मुलग़ी झाली त्या बाळंतपणानंतर म्हाजनाची बायको अंथरूणाला खिळली. साताठ महिन्यांच्या भरीला तिने गुट् केले. त्यावेळी म्हाजन साठीच्या जवळ पोचलेला होता. त्यावेळी कानडी मुलखातले काही ब्राह्मण आतून पैसे घेवून कोकणात कुठेही, बिजवर, तिजवर, भुके कंगाल , व्यंगी कोणालाही मुलगी देत. अशी कामे करणारे काही मध्यस्त असायचे. पावसाळी चिव्याच्या काठ्या तोडून कोल्हापूर मिरजेकडे व्यापाऱ्याला घालणाऱ्या लखू देवधराची नी म्हाजनाची बरेच वर्षांची दोस्ती होती. मुली पुरवणारा अथणीचा शंभू देसाई नावाचा मध्यस्त लखूच्या ओळखीचा होता. म्हाजनाशी सल्लामसलत करून लखूने देसायाला गळ घातली. त्या स्वस्ताईच्या काळात मुलीच्या बापाला अडेजशे रुपये आणि स्वत:ला पाचशे रुपये मोबदला द्यायची अट देसायाने घातली. म्हाजन गडगंच पैसेवाला. त्याने काही खळखळ न करता आगाऊ रक्कम दिली. मार्गशिर्षात पहिल्याच मुहूर्तावर म्हाजनाने आपल्या लग्नाचा बार उडवला. लग्न झाले तेंव्हा म्हाजनाची बायको नुकतेच न्हाण आलेली जेमेतेम चौदा वर्षाची होती. या लग्नसंबंधाच्या निमित्ताने देसायाच्या म्हाजनाकडे बऱ्याच खेपा व्हायच्या. देसाई आला की रांधपाचे काम तो करी. तो उत्तम आचारी होता. म्हाजनाची त्याच्यावर मर्जी बसली.
म्हाजनाचे लग्न झाले त्याच वर्षी त्याच्या तीन आणि चार नंबरच्या मुलीना मागणी आली. त्या संबंधात शंभु देसायाचा महिनाभर म्हाजनाकडेच मुक्काम पडलेला होता. कभिन्न काळा वर्ण, भरभक्कम उंची, घट्ट्मुट्ट पिळदार शरीर यष्टी , भेदक नजर , माथ्यावर घेरेदार संजाबातून लटकणारी दोन वीत लांबीची भरभक्कम शेंडी आणि घाटाकरचे पाटील ठेवतात तशा झुपकेदार गलमिशा असलेला शंभू देसाई आचारी जमलेल्या अबालवृध्दांचे लक्ष वेधून घेत होता. दोन्ही मुलींची लग्ने एकाच मांडवात झाली. जिलबीचे प्रयोजन योजलेले होते. पंचक्रोशीतली ब्राह्मण मंडळी आणि गावतल्या बारा वाड्यांमधले बापये, पोराबाळांची फटावळ घेवून ‘जेवाण झोडूक’ आलेले होते. मध्यान्ही पासून तो अवेळ संध्याकाळ पर्यंत पंगती उठत होत्या. आलेल्या सगळ्यानी देसाई आचाऱ्याची वाखाणणी केली. त्यानंतर त्या आसमंतातून पैसेवाल्या सावकार लोकांकडून देसायाला स्वयंपाकाच्या सुपाऱ्या मिळायला लागल्या. तानमान बघून म्हाजनानी त्याला गोठ्याच्या बाजूचे दोन खण भाडं न घेताच रहायला दिले. त्याच्या निर्वाहासाठी देवराईच्या जवळचा दोन खंडी भात पिकणारा खोतभाटल्याचा पाच एकर शेतजमिनीचा तुकडा बक्शिस्पत्र करून दिला. देसायाने बायकापोरांसह बिऱ्हाड थाटले. त्याने अथणीहून दोन बल्लवाचार्य आणून बाळगले. ते आल्यावर म्हाजनाने देसायाला वाड्याच्या माग़िदारी ओसरी वरच्या दोन खोल्या दिल्या आणि देसायाचा म्हाजनाच्या वाड्यात शिरकाव झाला. त्याची बायको म्हाजनाच्या घरात रांधप करायला लागली. देसायाचे कुटूंब म्हाजनाच्या पंगतीलाच पुक्खा झोडायला लागले. म्हाजनाची बायको अल्लड वयाची . शत दारिद्र्यातून सावकाराच्या घरात आलेली. अंगावर सुपभर दागिने मिरवीत होवळत रहायची. तिला मराठी जेमतेमच येत होतं म्हणून खोतीण बाई.... खोतीण बाई करीत पुढे पुढे करणाऱ्या देसायणीशी तिचे चांगलेच सूत जमले.
प्रभु मिराशाची मोठी माड पोफळीची बाग. बाराखंडीची शेती, सगळा बारदाना सांभाळण्यासाठी कायमचे चार गडी नी सहा पैरी कामाल होती. देवपुजेला अंतु भटाला वर्षासन देलेले होते. रांधप करायला राधाक्का नी गंगू आक्का यायच्या. देसायाचा वाड्यात रहिवास झाल्यावर त्याने देवपुजा स्वत:कडे घेवून भट बंद केला. हळू हाळू मिराशांच्या कारभारात लक्ष घालून आपला जम बसवायला सुरुवात केली. अलिकडेच म्हाजनाचा दम्याचा विकार बळावला होता. अमावास्या पौर्णिमेला त्याला अशी हावशी लागे की श्वासावरोध झाल्यामुळे तो जे फांजे मारी त्याचा आवाज पाळंदीत आयकायला जायचा. त्याच्या दिमतीला दिवसरात्र गडी ठेवावा लागे. तो आल्याचा रस, एरंडेल नी मधाचे चाटण चाटवीत राही. फांजे मारून खोत एतका हैराण व्हायचा की त्याला झाड्याला खोरणापर्यंत जायचेही त्राण नसे. म्हणून सुपात राख़ टाकून आंथरुणातच द्यावे लागे. दोन दिवसानी आपसूकच दम्याचा जोर कमी व्हायला लागे नी पूर्ण आराम पडे. देवस्थानाच्या मानापानावरून दात्याने करणी कर्तुक करून ही विवशी आपल्या मागे लावून दिली म्हणून अमावास्या पौर्णिमा धरून दम्याचा जोर वाढतो असा मिराश्याचा ग्रह झालेला होता.
ज्येष्ठ्या अमावास्येला दात्याची पाळी संपून श्रावण्या प्रतिपदेपासून मिराशाची वर्सल सुरू झाली. यापूर्वी पाळी बदलली तरी लंगडा मिराशी काही देवावर पाणी घालायला जात नसे. त्यामुळे दात्येच पूजा चालू ठेवीत असत. पण शंभू देसाई आला नी वर्सल बदलल्यावर त्याने दात्याला भयरा करायचा या इराद्यानेच ईश्वराच्या गाभाऱ्याला कुलूप घातले. दत्तंभटाने गाभाऱ्याला कुलूप बघितल्यावर दत्तू गुरवाला हाक मारली. गुरव आला. त्याला आदल्या दिवशी शंभू देसायाने वाड्यावर बोलावून देवाच्या गाभाऱ्याला कुलूप घालायचे नी मिराशांकडून हुकूम आल्याशिवाय कोणालाही गाभारा उघडून द्यायचा नाही अशी सक्त ताकिद देलेली असल्याने गुरव गाभारा उघडून देईना. “तुमी खोतांकडे जाऊन तेंची परवानगी घ्या. तेंचा हुकूम आल्याशिवाय मी गाभारा उगडून देवू शकत नाही, ” असे उत्तर गुरवाने दिले. (क्रमश:)