भाग एक
आज सकाळपासून घरात एकच गडबड चालली होती . आई , मोठी काकू आणि छोटी काकू तीघी मिळून स्वयंपाक घरात राबत होत्या . ती आपलं सगळं आवरून बाहेर आली तर घराचा नकाशा च बदललेला होता . तिने आई ला विचारलं.....
" आई !! नाश्ता देते का , मला लैब ला जायला उशीर होतोय . "
आई ने स्वयंपाक घरातून बाहेर येऊन म्हटलं ...
" सरू !!! मी काय म्हणते , आज लैब ला नाही गेली तर चालणार नाही का . "
" का गं , काही काम होतं का ... " सरू म्हणजे सरीता ने विचारलं . तसं घरच्यांची तयारी बघून तिच्या लक्षात आलं होतं काय प्रकार सुरू आहे ते .
" अगं ते .... मंगळवारी बाबा त्यांच्या एका मित्रा च्या घरी गेले होते ना , तर तिथे तुझ्या साठी एक स्थळ कळवलं त्यांनी . आज ते तुला बघायला येणार आहेत . म्हणून म्हटलं...थांबली असतीस तर... " आई ने कचरतच सांगितले .
" आई !! अगं तुला किती वेळा सांगितलं , कशाला या भानगडीत पडते . मागचे अनुभव कमी आहेत का गाठीशी की एक अजून नकार पाहिजे तुला ... मला ना कंटाळा आला आहे आता या सगळ्या चा . " सरीता जरा चिडून च बोलली
तेवढ्यात मोठी काकू स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि बोलली...
" त्यात काय एवढं .... अगं मुलीच्या जातीला या सगळ्यातून जावं च लागतं गं . हल्ली तर चांगल्या गोऱ्यापान मुलींना सुद्धा नकार मिळतात त्यात तू तर ... " मोठी काकू पुढे बोलता बोलता थांबली
" नाही हां वहिनी ... माझ्या ताई ची मुलगी , मुला कडच्यांनी फक्त तिचा रंग पाहून पसंत केली ... गोरा रंग, सुंदर डोळे , धरधरीत नाक , लांब सडक केस . शिक्षण जरा कमी होतं पण तिच्या रुपाने ती उणीव भरून काढली... " छोटी काकू हात पुसत , पुसत स्वयंपाक घरातून बाहेर येत बोलली .
" बरं का सरू !!! रंग जर सावळा असला ना तर बाकी काहीही कितीही चांगलं असुदे लग्ना च्या बाजारात भाव मिळत नाही अगं . " मोठी काकू बोलली .
आई च्या डोळ्यात पाणी आलेलं तिने बघितलं आणि तिला अजून राग आला .
" आई !!! तुला किती वेळा सांगितलं माझ्या लग्नाचा बाजार मांडू नको म्हणून .... मी माझ्या पायावर उभी आहे मला कोणाच्या आश्रयाची किंवा दये ची गरज नाही . आणि हे सारखं सारखं माझ्या साठी लोकांपुढे हात जोडणं बंद करा ..." इतकं बोलून सरिता ने चपला घातल्या कार ची किल्ली घेतली आणि घरा बाहेर जाऊ लागली .
" अगं सरू !! काही खाऊन तरी जा ... " आई ने हाक दिली .
" काही नको !!! पोट भरलं माझं . " इतकं बोलून सरिता चालायला लागली . तशी आई तिच्या मागे गेली .
' सरू मी काय म्हणते ...बेटा आज शेवटच , फक्त माझ्या साठी म्हणून घरी लवकर ये . मी तुला वचन देते आज नंतर मी तुला कधीच काहीच सांगणार नाही . "
आई चा केविलवाणा चेहरा बघून सरिता च्या पोटात गोळा आला . तिने आई चा हात हातात घेतला आणि बोलली ...
" आई !!! फक्त तुझ्या साठी ... बरं का... "
सरिता... बायो टेक्नॉलॉजी PhD , एका मोठ्या इन्स्टिट्यूट मधे रिसर्च सायंटिस्ट . चांगला पगार . हुशार , सुस्वभावी , आणि दिसायला... मोठे सुंदर डोळे , धरधरीत नाक, सुंदर कोरीव ओठ , लांब सडक दाट काळेभोर केस , उत्तम बांधा , उत्तम उंची चेहऱ्यावर सरस्वती चे तेज . आणि रंग सावळा ... पण दुर्दैवाने लग्नाच्या बाजारात तिचे बाकीचे गुण तिच्या रंगामागे दबून जायचे .त्या मुळे आता ती सुद्धा वैतागली होती
खरं बघितलं तर तिला खरंच कोणाच्या उपकाराची गरज नव्हती . तिला असा मुलगा पाहिजे होता जो तिच्या रंगाची नाही तर तिच्या इतर गुणांची कदर करणारा असेल ...पण...असो ती त्या मनस्थितीत च लैब मधे गेली .
" काय गं सरू ... काय , झालं चेहरा का पडला आहे तुझा . " वनिता ने विचारलं . वनिता सरिता ची घट्ट मैत्रीण .
" काही नाही गं ...आज संध्याकाळी एक अजून नकार पचवायची तयारी करायची आहे . " सरिता उसन हसू आणत बोलली .
" काय यार सरू ...तू घरच्यांना स्पष्ट का सांगत नाही ..की बास झालं आता हे . अगं काय कमी आहे तुझ्यात . तुझ्या सारखी मुलगी मिळायला भाग्य लागतं सरे ... नको गं असा स्वतः चा सारखा अपमान करुन घेऊस ... अगं तुझ्या पेक्षा कमी शिकलेल्या मुलांने सुद्धा तुला फक्त रंगामुळे नकार दिला ... याला काय अर्थ आहे ... मला ना त्यांच्या पेक्षा तुझा जास्त राग येतो ...घे ना एकदाचा निर्णय ...बोल मोकळेपणाने . मला जर का भाऊ असता ना तर मी कधीच तुला माझी वहिनी केली असती ....ऐक माझं सरिता...." वनिता जीव तोडून बोलली .
" मी आज सांगून आले आई ला ...हे शेवटचे आहे म्हणून . बघू आता काय होतं . बरं चल बरीच कामं बाकी आहेत आपली . " वनिता आणि सरिता कामा विषयी चर्चा करत पुढे निघून गेल्या .
सरिता आई ला वचन दिल्याप्रमाणे लवकर घरी आली . आपल्या रूम मधे जाऊन तिने तोंडावर पाणी मारले . तोंड पुसत ती बाहेर आली तर आई तिच्या साठी साडी घेऊन उभी होती .
" सरु !! ही साडी नेस ... हा रंग तुझ्यावर खुलून दिसेल . आणि हो जरा थोडा मेकअप...." सरिता ने आई ला मधेच अडवले...
" आई !!! मी कितीही मेकअप केला तरी मी गोरी होणार नाही त्या मुळे . मी आहे तशीच व्यवस्थित आवरून येते . तू हो पुढे मी आलेच . "
सरिता ने तिचं सगळं व्यवस्थित आवरलं तिने व्यवस्थित साडी नेसली , कानात खेड्यांचे कानातले घातले एक बारीक चेन गळ्यात घातली , छोटी खड्यांची टिकली कपाळावर लावली , हलकं लिपस्टिक लावलं , एका हातात घड्याळ , दुसऱ्या हातात खड्यांच्या दोन बारीक बांगड्या , केसांची सैलसर वेळी घातली . तिने एकदा स्वतःला आरशात बघितलं .आज तिने एक निर्णय घेतला होता आणि ती तशीच वागणार होती . तेवढ्यात तिला बाहेरून बोलवण्यात आलं . तिने पुन्हा एकदा स्वतःला. आरश्यात बघितलं आणि बाहेर निघून गेली . तिच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आत्मविश्वास दिसत होता . ती जाऊन मुलाकडच्याना नमस्कार करून बसली . तिला तिच्या आई ने पाया पडायला खुणावले पण तिने लक्ष दिले नाही .
समोर एक वयस्कर बाई , एक वयस्कर पुरुष , एक तिच्या पेक्षा वयाने चार पाच वर्ष लहान मुलगी आणि दोन समवयस्क मुलं बसली होती .
सरिता चे वडील बोलले ...
" मी आपली माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो ... आमचं एकत्र कुटुंब आहे .... हे माझे मोठे भाऊ , या वहिनी, हे दोघे त्यांची मुलं आणि सुना . ही सरिता ची आई , माझ्या पत्नी , हा माझा धाकटा भाऊ त्याची पत्नी हा त्यांचा धाकटा मुलगा . यांच्या मोठ्या मुलीचं मागच्या वर्षी लग्न झालं ."
" मी सुद्धा परिचय देतो . ह्या माझ्या पत्नी , ही माझी मुलगी , हा माझा मुलगा , आणि हा माझ्या मुलाचा अगदी जवळ चा मित्र... मित्रा पेक्षा भाऊ च समजा त्याला . " मुलाचे वडील बोलले .
" अं.... तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता . " सरिता चे वडील बोलले .
" इतकं शिक्षण झाले आहे , तर घर काम , स्वयंपाक पाणी तर जमतं च नसेल . " मुलाची आई तोऱ्यात बोलली .
" नाही हो वहिनी... तसं अजिबात नाही. . आमची सरू अगदी सर्वगुणसंपन्न आहे . तिला सगळं येतं . " सरिता ची आई बोलली .
" आम्हाला काय हिच्या कमाई ची गरज नाही . पण हिला नोकरी करायची असेल तरी आमची काही च हरकत नाही ....." मुलाचे वडील बोलले.
" बरं मुला , मुलीला बोलू देऊयात का ... सरिता चे मोठे काका बोलले ... नाही म्हणजे दोघांना एकमेकांचे विचार कळतील ना . त्यांची पसंतापसंती झाली की मग आपण पुढचं बोलू . "
" त्याची काहीच गरज नाही , आमचा मुलगा काही आमच्या शब्दाबाहेर नाही . आपण मुद्यांच बोलुयात का ...?? " मुलाची आई बोलली .
" हो ... हो ... चालेल ना . "
सरिता ला आत पाठवण्यात आलं .
क्रमशः
>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<