Coffee and much more in Marathi Love Stories by manasvi Manu books and stories PDF | काॅफी आणि बरंच काहीं

Featured Books
Categories
Share

काॅफी आणि बरंच काहीं

बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. काचेच्या खिडकीबाहेरचे जग धूसर झाले होते, पण हॉटेलच्या आतल्या एका कोपऱ्यातल्या टेबलावर मात्र एक वेगळीच शांतता पसरली होती. निनाद तिथे पोहोचला, तेव्हा समृद्धी आधीच येऊन बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव होता—थोडी ओढ, थोडी हुरहूर. निनादला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू उमटले.

"हॅलो!!! कशी आहेस...?? " निनादने आपली बॅग बाजूला ठेवत विचारले.

"हाय!!! मी बरी आहे. तू कसा आहेस? अरे... बस ना..." समृद्धीने समोरील रिकामी खुर्ची दाखवत म्हटले. निनाद बसला खरा, पण त्याचे लक्ष अजूनही मोबाईलच्या स्क्रीनवर आणि हातातील घड्याळाकडे होते.

तिने त्याचा हा अस्वस्थपणा टिपला. निनादने विचारले, "तू मला असं अचानक कसं काय बोलावलं? काही तातडीचे काम होते का?"

समृद्धीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसून म्हणाली, "☺️ !! कारण हल्ली तू बोलावल्याशिवाय येत नाही ना.... म्हणून. काळजी करू नकोस, मी तुझा जास्त वेळ नाही घेणार." तिच्या स्वरात टोमणा नव्हता, तर एक हतबलता होती.

निनादला थोडे अवघडल्यासारखे झाले. तो स्वतःची बाजू सावरत म्हणाला, "अगं!!! तसं काहीच नाही ग. पण खरंच ऑफिसमध्ये कामाचा व्याप इतका वाढला आहे ना की, आजकाल स्वतःसाठीसुद्धा वेळ नाही मिळत."

"ठीके रे!! मी समजू शकते," समृद्धी अत्यंत शांतपणे म्हणाली. "तसंही तुला समजून घेणं हे एकमेव काम आहे जे मला व्यवस्थित जमतं. मग ते तुझं कामात गुंतणं असुदे, कामाच्या गुंत्याचा बहाणा असुदे किंवा कधीकधी तुझं..‌... 'डोकं फिरलंय म्हणून बोलायचं नाही'.... हे वागणं असुदे. मी आजवर सगळं काही समजून घेत आले आहे आणि पुढेही समजून घेत राहणार."

तिचे हे शब्द निनादच्या मनाला कुठेतरी टोचले. त्याला वाटले की ती त्याच्या प्रेमावर शंका घेत आहे. तो जरा आवाज चढवून म्हणाला, "तुला नक्की काय म्हणायचं आहे...??? माझं तुझ्यावर प्रेम नाही... की मला तुझी काळजी नाही...?? आपण एकत्र राहतो, मग तुला असं का वाटावं?"

समृद्धीने टेबलावर ठेवलेल्या निनादच्या हातावर आपला हात ठेवला. तिचा स्पर्श उबदार होता. ती म्हणाली, "प्रेम आहे ना निनाद!!! मी कुठे नाही बोलले. तुझं प्रेमही आहे माझ्यावर आणि काळजी पण आहे तुला माझी. पण जे सध्या आपल्यात नाहीये, तो म्हणजे पूर्वीसारखा सहज संवाद! आधी आपण कारणाशिवाय बोलायचो, तासनतास गप्पा मारायचो. आता एकत्र बोलण्यासाठी आपल्याला विषय शोधावे लागतात, कारणं शोधावी लागतात."

तिने खिडकीबाहेर वाहणाऱ्या नदीकडे पाहिले आणि पुढे म्हणाली, "मी कुठेतरी ऐकलं होतं की, प्रेम तोवरच खूप जपलं जातं जोवर ते मिळत नाही. एकदा का ते मिळालं आणि नात्याला लग्नाचा शिक्का बसला की मग त्याची किंमत हळूहळू कमी होऊ लागते. आपण आपलं नातं 'फॉर ग्रँटेड' (गृहीत) धरू लागतो. कारण मनाला माहित असतं ना, आता ही व्यक्ती कुठेही जाणार नाही, कायमची आपलीच आहे. पण निनाद, तुला सांगू? प्रेम ना या बाहेर वाहणाऱ्या नदीसारखं असतं."

"नदीसारखं?" निनादने न समजून विचारले.

"हो. नदीला जसं वेगाने वाहण्यासाठी मोकळी जागा आणि जिवंत ठेवण्यासाठी भरपूर पाऊस पाहिजे ना, तसंच आपल्या प्रेमालासुद्धा एका पावसाची गरज असते—भावनांच्या पावसाची! दोन मनांमध्ये मोकळी जागा पाहिजे असते, एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत जाणाऱ्या प्रवाहासाठी. जर नदीला या दोन गोष्टी मिळाल्या नाहीत, तर जशी ती हळूहळू आटत जाते, तसंच प्रेमही आटत जातं. तुला कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते? या सगळ्या धावपळीत, आपल्या नात्यातली 'मी' कुठे तरी हरवत चालली आहे असं नाही वाटत तुला... आणि जर मीच हरवले, तर आपण तरी कसे उरणार?"

समृद्धीचे हे बोलणे निनादच्या थेट काळजाला भिडले. तिच्या डोळ्यांतील साचलेले पाणी आणि आवाजातील आर्द्रता पाहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. तो इतके दिवस ज्याला 'संसार' समजत होता, तो केवळ एक यांत्रिक दिनक्रम बनला होता.

निनादने समृद्धीचा हात घट्ट पकडला. त्याचे डोळेही पाणावले होते. तो म्हणाला, "आय एम रियली सॉरी समृद्धी... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला फक्त इतकंच माहीत होतं. तू माझी बायको आहेस, घरातच आहेस, हे माहीत असल्यामुळे मी तुला गृहीत धरत गेलो. पण मी विसरलोच होतो की मी आणि तू मिळून 'आपण' झालो आहोत. जर 'आपण' मधली तूच हरवून गेली, तर मग माझ्या असण्याला काय अर्थ आहे? खरंच माझं चुकलं. मला माफ कर. तू वेळीच मला सावध केलंस आणि सावरलंस. आता निदान तू आणि मी एकत्र राहून 'आपण' जपू."

समृद्धीच्या चेहऱ्यावर आता सुटकेचे आणि आनंदाचे हसू उमलले. ती म्हणाली, "अरे!!! मी नाही सांगणार तर मग दुसरं कोण सांगणार तुला?"

त्यांच्या मनातील साचलेले ढग आता विरघळले होते. बाहेरचा पाऊस आता आणखी जोमाने पडू लागला होता. आता त्या नदीला वेगाने वाहण्यासाठी भरपूर मोकळी जागा होती आणि पाऊस धो-धो पडत असल्याने नदीला पाणीही भरपूर होते. अगदी तसेच, निनाद आणि समृद्धीच्या नात्यातही भावनांचा पाऊस पडला होता आणि त्यांच्यात पुन्हा तोच जुना संवाद वाहू लागला होता.

ते दोघे त्या नदीकाठावरील रेस्टॉरंटमध्ये एकमेकांकडे पाहत बसले होते. वेटरने टेबलावर दोन कप गरम कॉफी ठेवली. आता त्यांच्यासमोर केवळ कॉफी नव्हती, तर त्या दोन कप गरम "कॉफी आणि बरंच काही" मधे त्यांचे पुन्हा नव्याने बहरलेले नाते होते.

समाप्त.