Unsaid in Marathi Love Stories by क्षितिजा जाधव books and stories PDF | अनकथित

Featured Books
  • Ishq ka Ittefaq - 5

    सिया की आँखों से निकले वो गर्म आंसू कबीर के हाथ पर गिरे, तो...

  • कब्र नंबर 13

    मेरे गाँव में सबसे पुरानी चीज़ मंदिर नहीं है। मेरे दादा जी न...

  • तुमसे मोहब्बत है - 2

    रात का वक्त…सड़क पर पसरा हुआ गहरा सन्नाटा…और उसी सन्नाटे को...

  • नया युग - 4

    वहां बैठे लोग रुद्र को हैरानी के साथ देखने लगाते है |शायद लो...

  • नभवंशी - 1

    भाग -1 || प्रोलॉग••••••••••°°°°°°°°°°••••••••••चम चम करती चा...

Categories
Share

अनकथित

प्रत्येक घरात काय चाललंय माहितेय का?
इकडं एक बाप असतो… पोरगं मजबूत व्हावं म्हणून दिवसभर कडक राहणारा… कठोर राहण्याचा प्रयत्न करणारा.
आणि तिकडं एक पोरगं असतं… जे आयुष्यभर फक्त एवढंच दाखवायचा प्रयत्न करत असतं ‘बाबा, मी वाईट नाही रे… मी योग्य आहे… तुमच्या अभिमानाचा लायकआहे…
पण गंमत बघा… दोघांनाही एकमेकांवर प्रेम असतं… फक्त दाखवता येत नाही!

काय करणार, इथंच तर सगळं गणित बिघडलं आहे

बापाला वाटतं जास्त प्रेम दाखवलं तर पोरगं बिघडेल…
आणि पोराला वाटतं अजून काहीतरी मोठं केलं तरच बाबा खुश होईल…

अहो आई-बापांनो… एक गोष्ट लक्षात घ्या…पोरगं हसतंय म्हणून ते आनंदात आहे असं नसतं बरं का…!
आतून काय वादळ चाललंय त्याच्या मनात, हे बाहेरून दिसतच नाही कधी…
पोरगं गेलंय तिकडं मुंबईला, पुण्याला शिकायला…
बाप इकडं गावाकडं कष्ट करून पैसे पाठवतोय…
आणि तिकडं पोरगं काय…?

कधी कधी दोन वेळचं नीट खात पण नाही…
पैसे वाचवायला वडापाव खाऊन झोपत असतं…
आणि पुण्यात तर अशी लई पोरं-पोरी आहेत बघा…
एकाच टायमाची मेस लावतात…
बस्स! का तर बापाला परत पैसे मागावे लागू नयेत…
रात्री भूक लागते… पण मन म्हणतं
‘अजून किती दिवस मागायचे रे पैसे… बस्स, एवढ्यातच निभावून नेऊ आता…’
आणि बापाचं पण कधी लक्ष जात नाही…
महागाई किती वाढलीये…
पण पोरगं अजून त्या दोन हजारात हॉस्टेल, मेस, प्रवास, नोट्स… सगळं कसं काय मॅनेज करत असेल…?
अहो, पोरं सांगत नाहीत म्हणून त्यांना त्रास नसतो असं नाही…
कधी कधी ती फक्त एवढ्यासाठी गप्प बसतात
आपल्या बापाच्या डोक्यावर अजून ओझं नको वाढायला…’”
परीक्षा, करिअर, नोकरीची टेन्शन, घरच्या अपेक्षा, पैशाचा ताण…
आणि त्यात स्वतःला सिद्ध करायची धडपड…
अहो, आजकालची पोरं शांत दिसतात… पण आतून तुटत असतात रे…
आणि आपल्या भारतात तर लहानपणापासून काय शिकवलं जातं?
‘मर्द रडत नाही…’
‘पुरुष कधी हार मानत नाही…’
‘भावना दाखवायच्या नसतात…’
अरे मग ते पोरगं कोणाकडे जाईल हो मन मोकळं करायला?
म्हणून कितीतरी पोरं रात्री एकटं रडतात…
रूममेट्सचं टेन्शन, मित्र दुरावणं, एकटेपणा, अपयशाची भीती…
आणि आतून एकच विचार ‘आपल्या आई-बापाला अभिमान वाटेल असं आपण काहीच करू शकलो नाही…’
अहो पण जीवन म्हणजे फक्त आई-बापाला अभिमान वाटावा म्हणून जगणं नसतं…
जीवन म्हणजे रोज थोडं थोडं स्वतःला समजून घेत जगणं असतं… पडणं असतं… पुन्हा उठणं असतं…
आणि आई-बापांनो… पोरांना नेहमी उपायच हवेत असं नसतं हो…
कधी कधी त्यांना फक्त एवढंच ऐकायचं असतं
‘पोरा… काही झालं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत…’
बस्स! हे एक वाक्य…
पोराला पुन्हा जगाशी लढायची ताकद देऊन जातं…
आणि कठोर शब्द?
ते आयुष्यभर मनात काट्यासारखे अडकून राहतात…”
“स्वतःवर शंका करत बसतात, ते यशाच्या पायरीवर धडपडत दहा पावलं पुढे जायचं तर पाचच जातात, तेही परत परत मागे वळून बापाकडे बघत… बापाच्या डोळ्यात अभिमान शोधत राहतात.”
“तेच बापानं सांगितलं ‘ए, तू चाल पुढं… मला माहितीये, तू मोठं काहीतरी करणार. पडायचं तेवढं पड, पण मी आहे मागे.’ मग कशाला ते पोरगं स्वतःवर शंका घेईल? पुढं बघून, बापाचा आवाज ऐकून, १० नव्हे तर ५० यशाच्या पायऱ्या चढेल.”

पाच वर्ष झाली तरी कितीतरी पोरांनी महिन्याचे पाच हजाराच्या वर एक रुपया घेतलेला नाही…
दोन टायमाची मेस एक टायमावर आली…
चहा बंद झाला…
फिरणं बंद झालं…
नवीन कपडे बंद झाले…
पण ते दोन हजाराच्या वर जाणार नाहीत…
का माहितेय…?
कारण त्यांना माहित असतं
तिकडं बाप आधीच कर्ज, शेती, काम, जबाबदाऱ्यांनी थकलेला आहे…
मग पोरगं स्वतःचं पोट मारतं…
पण बापाला फोन करून एवढंच म्हणतं
‘हो बाबा… सगळं व्यवस्थित चाललंय… काळजी करू नका…’

आणि ये म्हाताऱ्या…
तुला माहितीय का तुझं पोरगं दोन टायम जेवतंय का एक टायम…?
कधी विचारलंस का त्याला ?

“उत्तर काय…?
नाही… विचारलंच नाही…

का तर अरे, हा म्हातारा ज्या वयात वाढला ना…
त्या वयात त्याला कोणी शिकवलंच नाही की प्रेम म्हणजे काय…

त्याच्यासाठी काय होतं प्रेम…?
‘ये अभ्यास कर…’
‘मोठा हो…’
‘रडायचं नाही…’
‘काहीतरी करून दाखव…’

बस्स! हाच प्रेमाचा प्रकार त्यानं पाहिलेला…

कारण त्याच्या बापानं पण त्याच्याशी तेच केलं होतं…
म्हणून हा पण आयुष्यभर असंच समजत राहिला
बापाचं प्रेम फक्त काहीतरी करून दाखवल्यावरच मिळतं…
म्हणून आज तो स्वतःच्या पोरावर प्रेम करतोय…
पण त्याला ते प्रेम बोलून दाखवता येत नाहीये…
त्याला वाटतं कठोर राहिलं की पोरगं मजबूत बनेल…
पण आतून ना…
तो म्हातारा पण प्रेमासाठी तहानलेलाच असतो…”

“अहो… आई-बापांची पूर्ण चूक आहे असं पण म्हणता येत नाही बरं का…कारण त्यांना पण कुणी शिकवलंच नव्हतं हो प्रेम कसं करायचं ते…
मुलांशी मोकळं कसं बोलायचं…भावना कशा दाखवायच्या…पोराला जवळ घेऊन ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ हे कसं म्हणायचं…हेच कुणी त्यांना शिकवलं नव्हतं…
त्यांच्या काळात काय होतं…?राग म्हणजे प्रेम…कठोरपणा म्हणजे काळजी…आणि शिस्त म्हणजे संस्कार…
त्यांच्या आई-बापांनी जसं त्यांना वाढवलं…तसंच वाढवणं म्हणजे योग्य पालकत्व असं ते समजत राहिले…
कितीतरी बाप स्वतःचं दुःख, अपमान, संघर्ष आयुष्यभर गिळून जगले…रडले पण एकटे…तुटले पण कोणाला सांगितलं नाही…
म्हणून आज ते आपल्या पोराला पण एकच सांगतात ‘कठोर रहा… मजबूत बना…’

का तर त्यांना वाटतं…जगाशी लढायला पोरगं तयार होईल…

पण अहो… काळ बदलतोय आता…प्रेम म्हणजे फक्त पैसे पाठवणं, फी भरणं, जबाबदाऱ्या पूर्ण करणं एवढंच नाही…प्रेम म्हणजे पोराचं मन समजून घेणं पण आहे…
पोराला अन्न द्या, शिक्षण द्या, भविष्य द्या…पण त्याच्यासोबत दोन प्रेमाचे शब्द पण बोला…
कारण कधी कधी हो…एक प्रेमळ शब्द…हजार कठोर सल्ल्यांपेक्षा जास्त ताकद देऊन जातो…”

मुलांनो… आता निर्णय तुमच्या हातात आहे बरं का…
त्या आई-बापांवर राग धरून बसणार का आयुष्यभर…?
ज्यांना प्रेम कसं व्यक्त करायचं हेच कुणी शिकवलं नव्हतं…
अहो, त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय पाहिलं…?
प्रेमाच्या नावाखाली कठोर शब्द..
त्यांच्या आई-बापांनी जसं त्यांच्याशी वागलं…
तसंच वागणं म्हणजे प्रेम असतं असंच त्यांना वाटत राहिलं…
त्यांना जे मिळालं… तेच त्यांनी पुढे दिलं…
पण आता तुम्ही वेगळं करू शकता…
तुम्ही ती पिढी बनू शकता जी हा कठोरपणाचा वारसा इथंच थांबवेल…
अरे, आई-बापांना ते प्रेमाचे शब्द द्या जे त्यांनी कधी ऐकलेच नाहीत…
फोन करा त्यांना…
विचारा ‘...., जेवलास का…?’

त्यांना पण जाणवू द्या की प्रेम म्हणजे फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करणं नसतं…
प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं असतं…
कारण जर आपणच बदल घडवला नाही ना…
तर हाच राग… हाच कठोरपणा… ह्याच वेदना पुढच्या पिढीत पण जाणार…

आणि वडिलांनो… आता तुमची पण वेळ आहे…
जे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी तुम्ही स्वतःच्या बापाकडून शोधत राहिलात आयुष्यभर…
तेच आता आपल्या पोरांना द्या…
त्यांना फोन करा…
‘पोरा, कसा आहेस…?
‘जेवलास का…?’

अहो, पोरांना नेहमी मोठे सल्ले नको असतात…
त्यांना फक्त एवढं जाणवायचं असतं
‘माझा बाप माझी काळजी करतो…’
तुमच्या पोरांसाठी असे बाप बना…
आणि उद्या असे आजोबा बना…
जे प्रेम व्यक्त करायला घाबरत नाहीत…

ज्या प्रेमळ शब्दांची तुम्ही स्वतः वाट पाहिली…
ते शब्द आपल्या पोरांना ऐकवा…
त्यांचं कौतुक करा…
त्यांना जवळ घ्या…
मनमोकळं बोला…
मग बघा…
तीच पोरं जगाशी किती ताकदीने लढतील…
कारण त्यांना माहित असेल
‘घरी आपली माणसं आपल्या पाठीशी आहेत…’

अहो, कठोर शब्द आणि भावनिक अंतर किती वेदना देतं हे तुम्हाला माहितीय…
मग तीच वेदना पुढे देऊ नका…
कारण पोरं जसं प्रेम पाहतात…
तसंच पुढे आपल्या पोरांवर करतात…
जर त्यांनी फक्त राग पाहिला…
तर तेही प्रेम व्यक्त करायला घाबरतील…
पण जर त्यांनी समजूतदारपणा, मोकळेपणा आणि प्रेम अनुभवलं…
तर तीच ऊब पुढच्या पिढीत जाईल…
कोणीतरी एकाने हा बदल सुरू करायला हवा…
आणि कदाचित…
तो बदल तुम्हीच असू शकता…

एका प्रेमळ फोनने…
एका समजून घेणाऱ्या वाक्याने…
एवढंच विचार , ‘जेवलास का?’