Vilakshan - 5 in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | विलक्षण - 5

Featured Books
Categories
Share

विलक्षण - 5

विलक्षण ५ त्या रात्री मी थोडा निवांत होतो.माझ्या समोर कोणतंहीकाम नव्हतं.खूप प्रवास केल्याने मी थकलो होती.पडल्या पडल्याच मला झोप लागली .त्या रात्री मला जाग आली नाही.सकाळी सहा वाजता जाग आली ती समोरच्या शेवग्याच्या झाडावर किलबिल करणा-या पक्षांमुळे.मी उठून खिडकीची काच सरकवली. शेवग्याला छान पिवळा फुलोरा आला होता.त्यावर चिमण्या आणि बुलबुल पक्षी भिरभिरत होते. सकाळच्या या प्रहरी त्यांचा आवाज मन उत्साहित करत होता.गाणी गुणगुणत मी माझी कामे पूर्ण केली.सगळ आटोपल्यावर मी पुन्हा पुन्हा काम सुरू केले.दुपार पर्यंत रघुनाथ पुजारी येणार होते.त्या पूर्वी सगळी जुळवाजुळव करावी लागणार होती.मी टेबलावर, मूळ कागद...त्यांचं भाषांतर... बाळंत विड्याची पेटी.... आणि ते वाळे ठेवले. बाहेर स्वच्छ ऊन पडले होते.हलका वारा सुटला होता.मी डोळे मिटून खुर्चीवर बसून सगळ्या प्रकरणाची मनात बांधणी करत होतो.तेवढ्यात तो चिरपरिचित हवेचा झोत माझ्या अंगावरून गेला.मी दचकलो... म्हणजे ती ...ती... आलीय.     पण आता तर रात्र नाहिय. भर दिवसा सकाळच्या नऊ वाजता! काहितरी वेगळं घडत होते जे मला अपेक्षित नव्हते.मी डोळे उघडले. ती समोरच्या टेबलावर बसली होती.विरविरीत... धूसर... अश्या आकारात.मी ठेवलेल्या वस्तूंकडे तिची मान वळली होती.काही क्षण असेच गेले.माझ ह्रदय धडधडत होते." तू कोण आहेस?"माझ्या कानी आवाज आला. त्या आवाजात राग होता...संताप होता.पण तरीही तो आवाज गोड होता.सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रथमच ती चक्क माझ्याशी संवाद साधत होती.माझे डोळे विस्फारलेले व तोंड उघडेच राहिले." तू इथं का आलास? या घराशी तुझा संबंध काय?"पुन्हा प्रश्न आला." मी ,एक इतिहास संशोधक आहे.या घराचे मालक रघुनाथ पुजारे यांनी मला इथं पाठवलं आहे."ती आकृती हसली. त्या हसण्यात असं काहीतरी होतं की अंगावर शहारे आले." या पूर्वी सुध्दा इथे काहिजण मालक म्हणून आले होते पण पळून गेले.तुलाही जावं लागेल."" मी जाणारच आहे. पण सगळं निस्तारून.पण तुम्ही कोण? आणि दिवसा ढवळ्या इथे अश्या?"मी उलट प्रश्न केला." माझ्या सारख्यांना दिवस -रात्र असा काही फरक नसतो.तो तुम्हा माणसां साठी असतो."" तुम्ही गौरी...?गौरी चंद्रकांत कोटणीस ना?"समोरच ते मानवी आकार धारण केलेले विरल आणि तरल द्रव्य थरथरले. एक बोचरी शांतता पसरली." गौरी कोटणीस...! हो." एक थंडगार उसासा ऐकू आला." ही पितळी पेटी आणि हे वाळे तूझ्या कडे कसे आले?"मी हलकेच हसलो." हे लता पुजारेच्या खोलीत सापडले. खरं तर मला तुमचा सगळा इतिहास माहीत आहे.कदाचित तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी सुध्दा...पण तुम्ही तुमच्या मूळ रूपात मला दिसू शकता?"" का ? आणि ‌तुला असं काय माहित आहे जे मला माहित नाही.आणि तूला मला का पाहायचं आहे?"" मला उत्सुकता आहे. जिने विश्वंभर कोटणीसांसारख्या क्रूर... पाताळयंत्री माणसाला उघड विरोध केला.ठामपणे त्यांच्या समोर उभी  राहिली .ती आहे कशी हे पाहायचंय?"" त्या  विरोधाच फळ मला मिळालं...अर्धवट जीवंत असताना जळण्याच ...! आणि माझी कोवळी पोर त्या धगधगत्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली...त्या त्या दोन चांडाळांनीतिला जाळलं..."तिचा आवाज कातर झाला होता." पण...पण मी त्यांना सोडलं नाही.."तिचा आवाज आता लखलखत्या खंजीराच्या पात्या सारखा धारदार होता." म्हणजे....! तुम्ही त्यांना..."" मी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा दिली....ऐकायचं तूला...? ऐक !"     ती धूसर पारदर्शक आकृती उभी राहिली.काही क्षणांसाठी नाहिसी झाली.मग भोव-यासारखे आजूबाजूच्या हवेचे थर गरगर फिरत राहिले.अगदी वावटळ उठावी तसे.सोबत एक विलक्षण आवाज येत होता.मग हळूहळू हवा शांत झाली.नंतर जे समोर दिसले त्याने मी अचंबित झालो.मी धडकन खुर्चीवरून उठून उभा राहिलो.गौरी कोटणीस माझ्या समोर आपल्या ख-या रुपात उभी होती. मी भ्रमीत झाल्यागत बघत राहिलो.गोल चेहरा...सरळ नाक ...काळे स्वप्नाळू डोळे..कपाळावर गोल ठसठशीत कुंकू..काळेभोर घनदाट केस जे उजव्या खांद्यावरून समोर सोडलेले..अगदी कमरे पर्यंत तो केस संभार पसरला होता. गळ्या बरोबर बांधलेलं मंगळसूत्र...निळे नऊवारी लुगडे व त्याच रंगाचा ब्लाऊज... डोक्यावर पदर ..माझं लक्ष वेधून घेतले ते गो-यापान तळहातावर व पावलांवरच्या मेहंदीने. माझ्यासमोर अस्सल खानदानी व शालीन सौंदर्याचेजितेजागते ( ? ) उदाहरण होते.एवडी सुंदर व शहाणी सून असूनही तिला जाळण्याचा अघोरी प्रकार करणारा विश्वंभर व सूर्यकांत किती उलट्या काळजाचे असणार याची मला जाणीव झाली. ती पुन्हा टेबलावर बसली." बस, ऐक मी त्यांना कशी शिक्षा दिली ते...!"

-----------*******--------******------*****( गौरीच्या आत्म्याने सांगितलेली हकीकत)गौरीने स्तनपान करून मुलीला पाळण्यात ठेवले वती स्नानगृहात गेली.चेह-यावर पाण्याचे हबकारे मारुनतिने टॉवेलने चेहरा पुसून काढला.आरश्यात आपलं रुप न्याहाळत ती क्षणभर थांबली.तिचा चेहरा थोडा मलूल झाला होता.चंद्रकांत घरी नव्हता.त्यामुळे ती थोडी उदास होती.महिना भरापूर्वी नम्रता विहिरीत पडून सगळ्यांना सोडून गेली होती.नोकरांची कूजबूज तिच्या कानावर येत होती.त्याकडे दुर्लक्ष करून ती आपल्याच नशिबाला दोष देत होती.या सगळ्यात एकच व्यक्ती अशी होती की जिच्याशी ती आपलं दुःख व्यक्त करू शकत होती ती म्हणजे डॉ.लता.पण ती सुद्धा ठराविक वेळी येत होती तिला तपासून औषध देत होती.सूचना देत होती.डॉ.लता तिच्यासाठी खूप मोठा आधार होता.    ती पुन्हा बाळंतणीच्या खोलीत आली. कोटणीसांच्यावाड्यात एकूण पंचवीस खोल्या होत्या.प्रत्येक खोल्यांना तीन - तीन दरवाजे होते. काही खोल्या दरवाज्यांनी एकमेकांना जोडलेल्या होत्या.नवीन माणूस या भूलभुलैयात फसून जायचा.ती विश्रांती घेण्यासाठी पलंगावर कलंडली.तिला कसलीतरी चाहूल लागली तिने डोळे उघडले.पलंगाजवळ सूर्यकांत उभा होता.तो नशेत होता . त्याचे डोळे लालबुंद झाले होते.त्यात वासनेची विखारी ठिणगी स्पष्ट दिसत होती.गौरीच्या काळजात धस्स झाले.गौरी जागी झाली हे पाहून तो बिथरला.गौरी उठे पर्यंत त्याने डाव्या हाताने तिचे तोंडदाबून धरलं तर उजव्या हाताने गळा दाबला.गौरी धडपड करत उठण्याचा प्रयत्न करत होती पण अशक्तपणामुळे तिला ते जमत नव्हते. तिला ओरडताही येत नव्हते.या झटापटीत गौरीचा श्वास गुदमरला. गौरी ओरडली तर गोंधळ होईल या भयाने त्याने आपली सगळी ताकद वापरली.त्याचा राकट पंजा गळ्याभोवती अधिक घट्टपणे आवळला गेला..गौरीची वाचण्यासाठीची धडपड... पलंगावर पायांचा आपटण्याचा आवाज....हात दाबून वर उठण्याचा केविलवाणा प्रयत्न...फुटणाऱ्या बांगड्या ... हळूहळू तिची तडफड बंद पडली. ..आचके देत ती हात पाय ताणत ती जागीच गार झाली. गौरी निपचित पडली हे पाहून सूर्यकांतची नशा उतरली.तो खूप घाबरला.    तो तसाच डावीकडच्या दरवाज्यातून बाहेर गेला.मधल्या अरूंद जागेतून जलद गतीने जात त्यानेविश्वंभरच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.बापाने दरवाजा उघडताच तो आत शिरला . दरवाजा बंद करीत त्याने काय घडलं ते बापाला सांगितले.विश्वंभरने डोक्याला हात लावला.काहीतरी भयानक घडले आहे हे त्याच्या लक्षात आले. पाताळयंत्री विश्वंभर विचार करु लागला.वासनेच्या आहारी जावून नशेत त्याने धाकट्या भावजयला मारले होते.यातून कसं बाहेर पडायचे याचाच तो विचार करत होता.खरतर विश्वंभर ने सूर्यकांतला गौरीला धमकावण्यासाठी आणि नव्या मुलीला उचलून आणण्यासाठी पाठवले होते.पण गौरीच्या सौंदर्यावर भाळून तिच्यावर बळजबरी करण्याचा त्याने प्रयत्न केला.यापूर्वी सुध्दा त्याने तसा प्रयत्न केला होता.त्यावेळी गौरीने त्याला खूप सुनावलं होते.पण घरातवादविवाद नको म्हणून तीने चंद्रकांताला काही सांगितले नव्हते. पण भामिनीला व डॉ.लता यांना याबद्दल कल्पना दिलेली होती.भामिनीला प्रचंड संताप आला होता पण ती काहीच करू शकत नव्हती.उलट ती रोजच त्याचा अत्याचार तोंड दाबून सहन करत होती." हे,बघ झाल्या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही. आपण खोलीत आग लावायची.कंदिल भडकून आग लागली हे जगाला सांगायचं."विश्वंभर म्हणाला." त्या लहान मुलीची काय करायचं. तिला आधी बाजूला करावं लागेल."" तू मूर्ख आहेस ! खोलीत असलेली मुलगी वाचली आणि आई जळून मेली हे कोणालाच पटणार नाही."" म्हणून त्या मुलीला पण..."" होय.हिच नामी संधी आहे. एवीतेवी मुलगी आपल्याला नकोच आहे. तिलाही जळू दे...आयती ब्याद टळेल.चल आपल्याला बाळंतीणीच्या खोलीत जायचे आहे. रॉकेलचे दोन डबे  सामानाच्या खोलीतून घेऊन जावूया.चल, घाई कर.सोबत अफूची गोळी घे."     दोघांनीही तोंडावर कपडा बांधला.     विश्वंभर व सूर्यकांत रॉकेलचे डबे घेऊन गौरीच्या खोलीत शिरले.कोप-यात ठेवलेल्या कंदिलाच्या मंद प्रकाशात पलंगावर अस्ताव्यस्त पसरलेल्या गौरी कडे त्यांनी पाहिले.विश्वंभर जराही आवाज होवू न देता पाळण्याजवळ गेला.झोपेत हसणार्या त्या मुलीच्या तोंडांत त्याने अफूची लहान गोळी सरकवली.तोपर्यंत सूर्यकांतने पलंगावर व संपूर्ण खोलीतरॉकेल पसरवलं.लाकडी पाळण्यावर...अबोध मुलीवर सुध्दा रॉकेल टाकले .विश्वंभरने सगळे कपडे...तसेच  गुंडाळी करून ठेवलेल्या  अस्सल कापसाच्या मोठ्या गाद्या जमीनीवर टाकल्या.कोप-यातला कंदिल घेऊन त्याची काच काढली व वात मोठी करुन पलंगाच्या बाजूला कलंडून ठेवला." चल... पळ." विश्वंभर मुलाला म्हणाला.दोघे झटपट बाहेर पडले.सूर्यकांत दरवाजा बाहेरून बंद करू लागला." अगदी बुद्धू आहेस.बाहेरून दरवाजा बंद होता हे कोणाला कळले तर आग मुद्दाम लावली असं होईल.थोडा दरवाजा उघडा राहू दे हवेने आग भडकेल. नंतर दरवाजा जळणारच आहे."दोघेही त्वरित तिथून आप -आपल्या खोलीकडे गेले.तो पर्यंत कंदिलाचा भडका उडाला होता.पलंगाजवळ आगीने पेट घेतला होता.खर तर गौरी मृत झाली नव्हती...तर मृत्यूशी ती झुंजत होती.पण तेवढ्यात उडलेल्या आगीच्या भडक्याने तिचा पलंग चहूबाजूंनी पेटला . तिच्या नाका - तोंडांत धूरघुसला.ठसका लागून तिचे डोळे अर्धवट उघडले.चारी बाजूला लागलेली आग पाहून तिने उठण्याचा प्रयत्न केला.पण तिला उठता येईना.खोलीभर धूर झाला होता.तिला समोरचा पाळणाही दिसेना.सगळीकडे अग्नीचे तांडव सुरू झाले होते.रॉकेलचा गंध तिला जाणवला होता.पाळण्याची लाकड जळून ती पडण्याचा आवाज ऐकून तिला धक्का बसला व ती पुन्हा बेशुद्ध पडली.बघता- बघता संपूर्ण पलंग पेटला.गौरीच्या कपड्यांनी पेट घेतला.पसरुन ठेवलेल्या कापसाच्या गाद्या...बाजूच लाकडी कपाट  पेटले.सगळीकडे आगीच्या ज्वाळा... आणि धुराचे लोट पसरले होते.       कोणातरी नोकराला जाग आली.वर उठणार्या ज्वाळा आणि धूर बघून त्याची बोबडी वळली.नेमक्या कुठच्या खोलीत आग लागली हेच कळेना.त्याने तोंडावर हात ठेवून बोंब ठोकली.तसा सगळा वाडा जागा झाला.नोकर -चाकर, घरातली माणसं ओरडत धावली.आरडाओरड ऐकून शेजारच्या माणसांनी मदतीसाठी धाव घेतली.-----*****-------*****------*****------****

भाग पाच समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे पुढच्या भागात गौरीचा अनोखा सूड.