विलक्षण ३सकाळी मी थोडा लवकर उठलो.पूजा आटोपून मीपुजारींना जिथे कागद सापडले होते तिथे गेलो.मी ठरवलं होतं की त्या शेजारच्या गुराखी काकांना घेऊन तिथे थोडं खोदकाम करावे पण माझ्या लक्षात आलं की त्यामुळे गावात चर्चा झाली असती.वेगवेगळ्या अफवा उठल्या असत्या त्या पेक्षा मी स्वतः खोदकाम करायला सुरुवात केली.मी माझी नेहमीच हत्यारे सोबत घेऊनच आलो होतो.त्यात छोटी कुदळ..हातोडा ..छिन्नी...ब्रश...भिंगे...इ. मी ती जागा हळूहळू मोकळी केली.फूटभर खोल खोदून ही काही हाती लागले नाही.मी थोडं पुढे खोदकाम सुरू केलं.साधारण पाऊण एक फूट खोल गेल्यावर मला काहीतरी चकाकल्यासारख वाटलं.तिथे काहितरी होत हे नक्की! मी आता काळजी पूर्वक माती बाजूला करु लागलो.हळूहळू एक अर्धा फूट लांब आयताकृती वस्तू दिसली.मी ती बाहेर काढून साफ केली.ती एक पान सुपारी ठेवायची पितळी पेटी होती.बारकाईने पाहताना त्यावर नाव कोरलेले दिसले.ते नाव कन्नड मध्ये होत.नाव होत " लता पुजारे" त्यावर तारीख कोरलेली होती १४ नोव्हेंबर १९३२.नाव वाचताच मी प्रचंड दचकलो. कोटणीसांचा जुना वाडा पाडून पुजारींनी हा नवा बंगला बांधला तो वर्षभरापूर्वी तर मग जमीनीखालच्या १९३२ च्या पान सुपारीच्या पितळी पेटीवर ' पुजारी ' हे नाव कसे? माझा मेंदू तर्क करून थकला. कदाचित हा कसला तरी योगायोग असावा की साधारण ९४ वर्षांपूर्वी तिथे कोणीतरी 'लता पुजारी 'राहत होती.एक नक्की आधी सापडलेलं लिखाण हे याच लता पुजारेंनी केलं होतं.मी ती पितळी पेटी उघडली.आत एक नक्षीदार पितळी अडकित्ता होता.सुबक आणि सुरेख! आत सहा छोट्या डब्या कदाचित त्यात पानाबरोबर खायच्या वस्तू ठेवल्या जात असाव्यात. मला एक मोठा सुगावा लागला होता.मी तिथून टेकडी जवळ गेलो.एका खोलगट भागात जुन्या वाड्याचे सामान टाकलेलं दिसलं पण त्यात जादा करून दगड... अर्धवट तुटलेलं खांब... तुळया... खिडक्या होत्या.एक वाड्यांच्या बांधकामा वेळी कोरलेली पाटी होती .त्यावर १८७५ असे साल होते.पण मला उपयोगी पडेल असं त्यात काहिच नव्हते.मी पुन्हा बंगल्यावर आलो फ्रेश झालो. ओरसला नेहमीच्या जागेवर जेवण घेतले. तेवढ्यात मला पुजारेंचाफोन आला. ते भलतेच उत्साहित झाले होते." रत्नकांत,ऐक....कालच मी आणि उज्वला आमच्या कर्नाटकातील मूळ गावी म्हणजे खानापूरला आलोत.माझी आई सध्या तिथे राहते.इथेमाळ्यावर साफसफाई करताना मला एक जुनी वही सापडली.त्यातही लिखाणासाठी तिचं लिपी वापरली आहे. ती वही माझ्या आत्येची आहे.ती साधारण १९८५ साली वयाच्या ऐंशीव्या वर्षी वारली."" लता पुजारे....नाव ना त्यांचं?" मी विचारले. पलिकडे काही क्षण शांतता पसरली.कदाचित माझ्या तोंडून नाव ऐकल्यावर ते आश्चर्य चकित झाले असावेत." तू..तुला हे नाव कसं कळाल?"मी फक्त हसलो.आता मला उत्सुकता होती ती वही वाचण्याची कदाचित त्यात पुढील घटनांचा उल्लेख असावा." पुजारे मला ब-याच गोष्टींचा उलगडा झालाय.पण मला ती वही वाचायची आहे.एक काम करा त्या वहीच्या प्रत्येक पानांचे फोटो मारा व मला पाठवा.फोटो स्पष्ट असले पाहिजेत." मी म्हणालो.खरं तर मी खूप उत्तेजीत झालो होतो.एका घराण्याच्या अज्ञात इतिहासाचा मला उलगडा करायचा होता.मी तिथून पुन्हा बंगल्यावर आलो. मी रघुनाथ पुजारेंच्यामेसेज ची वाट बघत होतो.साधारण अर्ध्या तासाने मला पुजारेंकडून त्या वहीच्या पानांचे फोटोज् आले.मी सगळे फोटो नजरेखालून घातले.एखाद दुसरा फोटो सोडला तर इतर स्पष्ट कळत होते.तेवड्यात त्यांचा फोन आला." रत्नकांत,फोटो बरोबर आहेत ना? खूप कष्ट करावे लागले.नव्या पिढी सारखं नाही जमत आम्हाला."" खरच ,अगदी व्यवस्थित आहेत." मी वेळ न दवडता कामाला लागलो.लॅपटॉप...दोनमोबाईल फोन...कागद...पेन... पेन्सिल घेऊन मी काम सुरू केले.एक- एका शब्दांशी व अक्षरांनी मी झुंजत होतो.लता पुजारेंनी हे असं लिहण्याची कारणही माझ्या लक्षात आले.कोणा चुकीच्या माणसाच्या हाती ही वही लागली तर त्याला ते सहज कळू नये हा उद्देश होता.सदर लिखाण हे डायरी प्रमाणे होत.दोन तासात मी पहिल पानांचं भाषांतर केले.लता पुजारे या प्रसुती तज्ञ होत्या.बेळगावात त्यांचं शिक्षण झालं होतं.त्या नंतर सावंतवाडी संस्थानात नोकरीला होत्या.तिथून त्या कोटणीसांच्या दुसर्या सुनेच्या पहिल्या बाळंतपणासाठी काही दिवस वाड्याच्या पाठिमागे असलेल्या घरात दहाबारा दिवस राहिल्या होत्या. त्या घराचा व तिथल्या माणसांचा अनुभव त्यांना वाईट आला होता. पण गौरीचे आणि तिचे सूर जुळले होते.गौरीच्यादुस-या बाळंतपणासाठी ती जायला उत्सुक नव्हती.पण गौरीची स्थिती खुपचं नाजूक होती म्हणून ती महिनाभर आधी तिथे येऊन राहिली होती.या वास्तव्यातच तिने ते कागदावरचे लिखाण केले होते.वहीतले लिखाण हे नंतरचेखानापूरात केलले होते.मला सापडलेली ती पितळी पेटी ही बाळंत विड्याची असावी.लता पुजारी जी पेशाने डॉक्टर होती ती पानं - सुपारीची पेटी जवळ बाळगेल हे शक्यच नव्हते. रात्री जेवण झाल्यावर मी पुन्हा उरलेली पाने वाचण्याचा प्रयत्न सुरू केला. मी बेडरूम मधला टेबल लॅम्प आणून त्यांच्या प्रकाशात काम सुरू केले.( उद्देश एवढाच होता की माझ्या व्यतिरिक्त जे कोणी इथे वावरत होते त्याला त्रास होवू नये.)मला गौरीच्या बाळंतपणाच्या दहाव्या दिवशी काय झालं ते जाणून घ्यायच होत. मी भाषांतर करणे सुरू केले.एका शब्दाला अनेक पर्याय ठेवून मी वाक्य पडताळून पाहत होतो.मी जसं जसा पुढे सरकत होतो तसतसे माझे डोळे विस्फारत होते. संतापाने माझे अंग थरथरत होते.अंगाचा थरकाप उडवणारी माहिती त्या वहीत होती.तेवड्यात मला जाणिव झाली की कोणीतरी माझ्या पाठिमागे उभं आहे.माझ्या अगदी जवळ कोणाचतरी अस्तित्व मला जाणवत होतं.टेबल लॅम्पच्या प्रकाशाच्या पिवळ्या वर्तुळाला आता निळा- जांभळा रंग आला होता.बाजूच वातावरण अत्याधिक गार झाल होत.मी मनावर संयम ठेवून मागे वळून बघणे टाळले.मला त्या अमानवीय शक्तीला राग येईल असं वागायचं नव्हते.मी भाषांतरीत केलेली दोन पाने वाचू लागलो.लता पुजारे यांनी लिहिलं होतं -----' गौरीच्या बाळंतपणाच्या दहाव्या दिवशी विश्वंभरांनीचंद्रकांताला रत्नागिरीला पाठविले.सगळ्या नोकरांना जेवणही दिले तर काही जणांना सुट्टी दिली.तेव्हाच शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली होती.गौरीची स्थिती अजूनही बरीच नव्हती.पण तिची मुलगी मात्र गोरी- गुटगुटीत होती.काहितरी अघटीत घडणार पण नेमकं काय हे कळत नव्हतं व अंदाजही येत नव्हता.नम्रताला जाणून बुजून विहिरीत ढकलले होते अशी कुजबुज मी ऐकली होती.या वेळीही या छोट्या मुलीसोबत तसंच काहितरी घडणार तर नव्हतं ,ना?त्या रात्री मी मला दिलेल्या छोट्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत होते.पण डोळ्यात झोप नव्हती. छातीत सारखं धडधडत होतं.अचानक माझ्या खोलीचा दरवाजा कुणीतरी वाजवला.मी प्रचंड दचकले .दरवाजा उघडू की नको हे मला कळत नव्हते.मी घाबरलेली होते." बाई...लवकर दरवाजा उघडा." एक थरथरता अधिरअसा आवाज मला ऐकू आला.आवाज स्त्रीचा होता.मी थरथरत दरवाजा उघडला.बाहेर सूर्यकांतची पत्नी भामिनी उभी होती.तिच्या हातात एका छोट्या चादरीतगुंडाळलेल काही तरी होत.माझ्या हाती ती गुंडाळी देतती म्हणाली ----" बाई,ही गौरीची मुलगी.शक्य होईल तेवड्या लवकर हिला इथून घेऊन चला.तिचा जीव धोक्यात आहे."" काय झालं?" मी हळू आवाजात विचारले." त्यांनी गौरीचा गळा दाबून तिला मारलंय.हिला अफू पाजलीय. आता ते खोली पेटवून देणार आहेत.मी माझ्या नव-याच आणि सास-याच बोलणं ऐकलं आणि जीवावर उदार होत मागच्या दरवाजाने आत जावून पाळण्यातून हिला उचलून आणलय.लवकर इथून चला. दूर कुठेतरी हिला घेऊन जा.त्यांनी बाळंणतणीच्या खोलीतला कंदिलउलटा करून रॉकेल शिंपडलय कधिही आग भडकेल."तिने हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून माझ्याकडे दिल्या .ती तशीच वळत झपाझप निघून गेली.मी वाड्याकडे पाहिले. पाठीमागच्या खोलीत आगीच्या ज्वाळा मला दिसल्या.मी माझ्या खोलीतली माझी कातडी बॅग उचलली खांद्याला लावली आणि त्या अंधारात सुसाट धावत सुटले.मला लवकरात लवकर त्या वाड्यापासून आणि त्या गावापासून दूर जायचे होते.मध्येच मी मागे वळून पाहिले तर आगीच्या मोठ्या ज्वाळा लवलवताना दिसत होत्या.थोडा कोलाहलही माझ्या कानी पडला. ती रात्र माझं आयुष्य बदलणारी ठरली.'
हे सगळं वाचल्यावर मी सुन्न झालो.माणूस तेव्हा आणिआताही अंधार युगात वावरतोय असं मला वाटलं.स्रीयांना...मुलींना गुलामा सारखं वागवलं जातंय.त्यांच्यावर अत्याचार होतायत. सुनेला आणि छोट्या दहा दिवसांच्या मुलीला मारणारी माणसं किती उलट्या काळजाची आणि विकृत असतील नाही !मी सुस्कारा सोडून टेबल लॅम्प बंद केला. एक गार वा-याचा झोत माझ्या अंगावरून गच्चीच्या दिशेने गेला.-----*****-----*****-----*****-----****
भाग३ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे