Farmer's Diary 2026 in Marathi Motivational Stories by Namrata tryambak pagar books and stories PDF | शेतकरी बाईची डायरी 2026

Featured Books
Categories
Share

शेतकरी बाईची डायरी 2026

नमस्कार मैत्रिणींनो... राधे राधे 🙏 

    मी नम्रता एका छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगी खरं सांगू का शेतकऱ्याचे जीवन खूप कष्टमय व संघर्षाचे असते हे मला माझ्या अनुभवातून कळाले.

     पहाटेला कोंबड्याने बांग दिली की चार वाजता उठायचं विठ्ठलाला स्नान घालुन नित्यनेमाची देवपूजा करून आईला घर कामात मदत करने हि रोजची सकाळची दैनंदिनी सुरुवात..🙏

    एके दिवशी मी शाळेतून घरी आले दप्तर घरात ठेवलं व शेताच्या रस्त्याने शेतात जायला निघाले.शेतात पोहोचल्यावर इकडे तिकडे बघू लागले मला आई काही दिसेना तेवढ्यात माझं लक्ष लांब वरच्या शेतात गेले आई तिथं वाकून काहीतरी काम करत होती. मी आईकडे गेले व आईला विचारले.. आई काय करते आहेस तू इथे एवढ्या उन्हात त्यावर आई म्हणाली बाई दिवस डोक्यावर आले पेरणीचे दिवस सुरू झाले कपाशीच्या बीया लावते जमीनीत.. आपलं शेतकऱ्याचं उठन बसन या काळ्या आई वरतीच असतं. शेतीचे उत्पन्न चांगलं आलं म्हणजे तुमची शाळेची फी भरायला आम्ही मोकळे..

    आईचे शब्द ऐकून माझे डोळे पाणवले मी म्हणाले आई आमच्या शिक्षणासाठी तू आणि बाबा किती कष्ट घेतात गं. चल आज मी पण तुला कामात मदत करते आणि मी आईकडनं कपाशीचे बियाणे हातात घेतले व लावायला सुरुवात केली. जेव्हा जमिनीत ते बी मी रोपत होते त्यावेळी हाताच्या नखांमध्ये माती जाऊन ती नख 🔥 आग होऊ लागले मी आईकडे वळून पाहिलं आईचे हात पूर्ण चिखलाचे भरलेले होते आई साडीच्या पदराने घाम पुसत होती. मी क्षणभर आईकडे पाहतच राहिले... आईचे लक्ष माझ्यावर गेलं आई म्हणाली काय पाहतेस ग चिमे भूक लागली की काय मी म्हणाले नाही गाई मग काय पाहतेस ..अगं तु एवढ्या उन्हात कसं काम करते शेतात. आज माझ्या लक्षात आले की शेतकऱ्याचे जीवन लय अवघड आहे बाई. खूप कष्ट घ्यावे लागतात. आई हसून म्हणाली चल तुला एवढं कळलं हेच माझ्यासाठी भरपूर झालं. चल तुला भूक लागली असेल जेवण करु..

    आता जेवण करण्यासाठी मी पाणी आणले आईने रुमालात बांधलेली भाकरी सोडली व आई बांधावरती जेवणाला बसले आईजवळ मीही जेवण करायला बसले. आईने जवळ असलेला रुमाल माझ्या डोक्यावर टाकला व मला म्हणाली की लई ऊन आहे, लई ऊन आहे करते आहे केव्हाची डोक्यावर रुमाल घे नाहीतर आजारी पडशील... आई माझी काळजी करतेस आणि तुझ्या डोक्यावर तर काहीच नाही आई म्हणाली मी पदर घेतेस की डोक्यावर आणि तो साडीचा बारीक पदर आईने डोक्यावर घेतला. आईसोबत शेताच्या बांधावर बसून आम्ही चटणी भाकर खाल्ली. मी आईला प्रश्न केला आई आपण जे बी लावतो आहे याच्यातून कापूस निघेल का गं. आई म्हणाली नाही गं वेडे याच्यातून एक रोपट तयार होईल, त्याच झाड होईल, त्याला कैऱ्या लागतील व त्या कैऱ्या फुटल्यावर त्यातून कापूस निघेल. माझ्या लक्षात आले हो आई हा तोच कापूस ना ज्यांच्या आपण देवपूजेसाठी वाती तयार करतो हो हो बरोबर तोच..

   मी आकाशाकडे बघून भगवंताला हात जोडले देवा खरच किती श्रेष्ठ आहेस तू एवढीशी जमिनीत टाकलेली बी तिच्यापासून झाड तयार करतो व त्याला असंख्य असे कापसाचे बोंड उगवतो आता तर तुला रोज दिवा लावणं भागच आहे कारण तुझ्या दिव्याच्या वाती वरतीच आमचे जीवन आहे असे म्हणायला हरकत नाही..

   आई म्हणाली बाई तुला शेतात ये म्हटलं तर तू खूपच ज्ञानी झाली. हो आई तू किती कष्ट करतेस हे मला आज कळालं. तू जेवण सुद्धा उन्हात करतेस हे मला आज कळालं. आजपासून तू सांगशील तसं मी वागिन आई म्हणाली तुम्ही फक्त लेकरांनी अभ्यास करावा एवढीच माझी इच्छा.बाकी काम करायला तुमची आई आहे की अजून खंबीर उभी तुमच्या पाठीशी .

    आईचे ते शब्द ऐकून माझे डोळे पाणावले व मी ठरवलं की माझ्या आईच्या कष्टाची फेड मी नक्कीच करेन व मी सतत अभ्यास करेल तिच्या कष्टाची जाणीव मला मी अनुभवलं तेव्हा झाली.

   तुकोबारायांचं एक वाक्य आठवलं तुकोबाराय म्हणायचे की ..जावे त्याच्या वंशा तेव्हाकळे...जेव्हा आपण ते काम करतो तेव्हा आपल्याला त्या कामाचं महत्त्व कळत जसं मला आज माझ्या आईच्या कष्टाची जाणीव झाली .

   प्रत्येक शेतकरी आईवडिलांना माझी विनंती आहे. आपल्या लेकरांना आपण केलेलं काम दाखवा व त्यांनाही ते काम सुट्टीच्या दिवशी करू द्या जेणेकरून त्यांना तुमच्या कष्टाची नक्कीच जाणीव असेल म्हणजे पुढे जाऊन ते चुकीच्या मार्गाला तरी जाणार नाही. एवढा चांगला संदेश माझ्या या छोट्याशा लेखणीतून घेतला तरी भरपूर आहे. ही लेखणी फक्त माझ्या कष्टकरी माऊलींसाठीच आहे. 

   या लेखणीत मी काही दुसरे लिहिलेले नाही. माझा अनुभव लिहिलेला आहे . माझा लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद...🙏

तुमचीच मैत्रीण...

नम्रता आळंदीकर..🥰