The Impersonator Heir - Part 51 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तोतया वारसदार - भाग 51

Featured Books
Categories
Share

तोतया वारसदार - भाग 51

 तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                      शोधकर्ता.

दिनकर                      सखाराम पंताचा भाऊ, महादेव रावांचा मुलगा.

सुधाकर गोखले                निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा                     सुधाकररावांची बायको.

विशाल                      सुधाकर रावांचा मेहुणा, विशाखाचा भाऊ.

भाग  ५१     

भाग ५० वरून पुढे  वाचा....

 

दिनेश म्हणाला “आमची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा म्हणजे काही अडचण येणार नाही.”

“अरे नको, त्यापेक्षा टॅक्सी बूक करून दे, कारण  जर तिथून अजून कुठे जायचं असेल तर तुमची गाडी अडकून पडेल. उगाच तुमचं खोळंबा व्हायचा, नकोच ते. टॅक्सीच बरी. तू फक्त बूक करून दे.” – निशांत.

दुसऱ्या दिवशी सकाळी निशांतने रत्नागिरीला फोन केला आणि विचारलं, “मी निशांत बोलतो आहे, कानपूरच्या सुधाकरराव गोखल्यांनी तुमचा नंबर दिला आहे, तुम्हाला भेटायचं आहे तुमच्या सोई नुसार आम्ही केंव्हा आलं तर चालेल?”

“हो हो मला सुधाकररावांनी कल्पना दिली होती की तुमचा  फोन येईल म्हणून. ऑफिस सुटल्यावर साधारण पणे संध्याकाळी सहा नंतर मी मोकळाच असतो. तेंव्हा संध्याकाळी तुम्ही या. मी वाट बघतो. कुठून येणार आहात तुम्ही?” – विशाल, सुधाकररावांचा मेहुणा.

“आम्ही साताऱ्यावरून.” – निशांत.

“ठीक आहे, साधारण ५ तास लागतील, त्या प्रमाणे निघा.”- विशाल

निशांत आणि रोहन १२ वाजता जेवून निघाले. मधे चहा पाण्यासाठी थोडा वेळ गेला, पण सव्वा सहाला रत्नागिरीला पोचले. विशालच्या घरी पोचले तेंव्हा साडे सहा झाले होते.

“या या, तुमचीच वाट बघत होतो. बसा, चहा पाणी झाल्यावर मग आरामात बोलू आपण.” – विशाल.

“आधी मी ओळख करून देतो. मी निशांत आणि हे रोहन गोखले. हे लंडनला असतात. आणि याच कारणा साठी इथे आले आहेत.” – निशांत.

“मला सुधाकररावांनी सगळी कल्पना दिली आहे, तुमच्या बद्दल खूप कौतुकानी बोलत होते. तुम्हाला ती ऐतिहासिक वही बघायची आहे न? ती वही खूप म्हणजे जवळ जवळ १०० सव्वाशे वर्ष जुनी आहे, कागद खूपच जीर्ण झाला होता, म्हणून मागच्या वर्षी मी ती स्कॅन करून कम्प्युटर मधे सेव केली. काल गोखल्यांचा  फोन आल्यावर मी त्यांची झेरॉक्स काढायला सांगितली होती. आता माझा मुलगा गेला आहे ती झेरॉक्स आणायला, येईलच तो इतक्यात.” – विशाल.

एक १० मिनिटांत विशालचा मुलगा झेरॉक्स घेऊनच आला. “मला असं वाटतं की आधी तुम्ही यातला मजकूर वाचा, मग आपण बोलू.” – विशाल.

“बापरे इतकी सारी पानं वाचायची म्हणजे एक पूर्ण दिवस जाईल.” – रोहन.

“नाही नाही संपूर्ण वही वाचायची जरूर नाहीये. दिनकररावांशी संबंधित जी काही पानं आहेत, त्यांचे पेज नंबर मी पहिल्या पानावर नमूद केले आहेत, तेवढं वाचलं की तुमचं काम होईल.” – विशाल.

रोहन आणि निशांतनी ती पानं वाचली. युद्धा मधे शांताराम आणि दिनकर एकाच तुकडी मधे बरोबरच होते. जनरल हवेलॉक बरोबर तुंबळ लढाई झाली आणि त्यामध्ये मराठ्यांची हार झाली. त्याच लढाईत दिनकर जबर जखमी झाला. इंग्रज सैनिकांचा ससेमिरा टाळून, जखमी दिनकरला सतत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात, शांतारामांची खूप दमछाक होत होती, त्यांची स्वत:ची प्रकृती सुद्धा सततच्या धावपळीमुळे हळू हळू ढासळत होती. लढाईत जरी पराभव झाला असला, तरी युद्धात भाग घेतलेल्यांना जनतेची अपार सहानुभूति आणि मदत मिळत होती. त्या लोकांच्या मदती मुळेच, शांताराम आणि दिनकर लपत छपत, मजल दरमजल करत नीवेन्डीला म्हणजे शांतारांमांच्या गावाला येऊन पोहोचले. कोकणातलं नीवेन्डी हे रत्नागिरी जवळचं निसर्ग रम्य गाव होतं. जेमतेम ५० उंबरठ्यांचं हे गाव, याच गावात,शांतारामाचं पैतृक घर आणि शेती होती. नीवेन्डी गाव कोकणात दुर्गम भागात असल्याने, इथे इंग्रज शिपायांची भीती नव्हती. नीवेन्डीला आल्यावर जरा शांतता लाभली. शांतारामाचं लग्न ठरलं आणि झालं पण. दिनकरची प्रकृती पण आता बरीच सुधारली होती, त्यामुळे त्याला शांतारामच्या आधारावर जगणं अवघड वाटायला लागलं होतं. शांतारामच्या भावाच्या काही ओळखी रत्नागिरी मधे होत्या, त्यांच्या मदतीने दिनकरला रत्नागिरीच्या  एका व्यापाऱ्याकडे नोकरी लागली. दिनकर रत्नागिरीला घर करून राहायला लागला. लवकरच त्याचं बस्तान बसलं. शांतारामची धाकटी बहीण माघारी आली होती, तिच्या नवऱ्याने तिला टाकली होती, तेंव्हा पासून ती शांतारामच्या घरीच होती. त्या वेळेस शांतारामचे आई वडील पण हयात होते. कसं कोण जाणे पण तिचं आणि दिनकरचं सुत जमलं. शांतारामला  जेंव्हा हे कळलं तेंव्हा तो हादरून गेला. पण दिनकरने त्याला विश्वास दिला की तो त्यांच्या बहि‍णीला सुखात ठेवेल. दिनकरचा स्वभाव माहीत असल्याने त्याचा विरोध मावळला. पण त्यावेळेची सामाजिक परिस्थितीच अशी होती, की घरून परवानगी मिळालीच नसती. दिनकरने वेळणेश्वरला जाण्याचा विचार बोलून दाखवला पण शांतारामने तो खोडून काढला. त्याने दिनकरला समजावलं, दिनकरचे मोठे बंधु, सखाराम पंत एक प्रसिद्ध आणि निष्णात वैद्य होते, त्यांना हे लग्न मान्य होण्याची सुतराम शक्यता नव्हती. दिनकरला पण ते पटलं. मग एक दिवस दिनकर आणि रेणुका यांनी पळून मुंबईला जावं, तिथे लग्न करून सुखात राहावं असा प्रस्ताव शांतारामने मांडला. त्यासाठी त्याने एका मित्राचा पत्ता पण दिला. आणि पत्र पण दिलं. ठरल्या प्रमाणे दोघेही मुंबईला गेले. मुंबईला गेल्यावर दिनकरची  पुढची वाटचाल काय आणि कशी झाली, याबद्दल काहीच उल्लेख नव्हता.

निशांतनी वही खाली ठेवली. दिनकरचा पत्ता लागला होता पण अर्धवटच. गोंधळात मात्र भर पडली होती.

“दिनकर बद्दल काहीच माहिती मिळाली नसती, तर प्रश्न नव्हता, पण आता त्याचा शोध घेणं क्रमप्राप्त दिसत आहे.” – निशांत.

“हो, बरोबर बोलतो आहेस तू. पण मुंबई सारख्या अफाट शहरात त्याचा शोध लागणार कसा? आज २००० साल सुरू आहे, सव्वाशे वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यात जमीन अस्मानाचा  फरक आहे. माझं तर डोकच चालत नाहीये.” – रोहन.

“हूं, आता मात्र वाट बिकट झाली आहे.” – निशांत.

“मुंबईला नेमके कुठे उतरले होते हे लोकं, म्हणजे, मुंबईच्या कुठल्या भागात वगैरे, काही कल्पना आहे का? जो पत्ता आणि पत्र दिलं होतं त्या बद्दल काही माहिती आहे का?” – निशांत.

“अहो, चार पिढ्या होऊन गेल्या, जेवढं वहीत आहे, त्याच्या पलीकडे काहीच कल्पना नाही. पत्त्याचा उल्लेख आहे, पण पत्ता लिहिला नाही.” – विशाल.

रात्रीचे साडे आठ वाजले होते, विशालची मुलगी सांगत आली की पान वाढली आहेत, जेवायला चला. निशांत आणि रोहनने थोडे आढे वेढे घेतले, पण शेवटी त्यांना विशालच्या आग्रहापुढे झुकावच लागलं. जेवण झाल्यावर थोड्या गप्पा झाल्या, मग विशालचे आभार मानून निशांत आणि रोहन हॉटेल वर आले.

“आपण तसंही वेळणेश्वर ला जायचा प्लॅन करताच होतो, तर उद्या तिकडे जाऊन बघू.”- रोहन

“तसा प्लॅन आपण केला होता हे खरंय, पण शे सव्वाशे वर्षांपूर्वी वेळणेश्वर जेमतेम ५०-६० घरांचं एक छोटसं गाव होतं, आता काय परिस्थिती आहे, ते तिथे गेल्यावरच कळेल. आणखी एक गोष्ट आपल्याला पत्ता माहितीच नाहीये, वंशावळी आणि वृत्तान्त दोन्ही मधे  ते काही नमूद केलेलं नाहीये.” – निशांत.

“अरे काय निशांत, असे हात पाय गाळलेस तर कसं होईल? तुझ्या कडून हे अपेक्षित नाहीये.” – रोहन.

“अरे, नाही नाही, तू समजतोस तसं काही नाहीये, पण मी विचार करत होतो. तू एक काम कर, तुझ्या बाबांना किंवा काकांना फोन लाव, त्यांना कदाचित माहीत असेल पत्ता. एखादे वेळेस ते जाऊन पण आले असतील. कोणी सांगावं?” – निशांत.

“यस. यू आर राइट. मी आत्ताच काकांना फोन लावतो.” – रोहन.

दोघंही मग PCO वर गेले.

“हेलो काका, रोहन बोलतोय”

“बोल बोल, कसं चाललंय तिकडे? काय प्रगती? दिनकरचा काही पत्ता लागला का? साताऱ्याच्या  मंडळींची काय हाल हवाल?” – व्यंकटेश.

“इकडे सर्व ठीक आहे, फोन एवढ्या साठी केला, की वेळणेश्वरचा पत्ता माहीत आहे का? तुम्ही लोकं कधी आपल्या घरी गेले होते का?” – रोहन.

“नाही आम्ही कधीच गेलो नाही. बाबांनी केव्हा तरी ओझरता उल्लेख केला होता वेळणेश्वर बद्दल. बाबांनी लिहिलेल्या वंशावळी आणि डायरी बद्दल सुद्धा आता सारंग ने पाठवली तेंव्हा कळलं.” – व्यंकटेश.

एक जी शेवटची आशा होती, पत्ता मिळण्याची, ती सुद्धा मावळली. आता काय करायचं?

निशांत आणि रोहन हॉटेल वर परतले. दोघंही विचारात गढले होते.

बिछान्यावर दोघंही पडले होते, पण झोप येत नव्हती. हा गुंता कसा सोडवायचा याचाच विचार डोक्यात होता. रात्री केंव्हातरी निशांत उठून बसला, त्यांच्या हालचालीने रोहनला पण जाग आली.

“काय रे काय झालं? स्वप्न पडलं का काय? पण घाबरल्या सारखा तर दिसत नाहीये. मग काय झालं?” – रोहन.

“युरेका. युरेका” – निशांत.

“म्हणजे?” – रोहन.

“युरेका म्हणजे एक शास्त्रज्ञ होता,....” – निशांत.

त्याला मध्येच थांबवत रोहन म्हणाला, ते सगळं मला माहीत आहे. युरेका म्हणजे काय ते सांगण्याची जरूर नाही. तुला काय आठवलंय  ते सांग.” – रोहन.

“उद्या आपण इथल्या पटवारीला जाऊन भेटू. त्यांच्याकडे जमिनीवरचे सर्व जुने, नवीन उतारे असतात. बघूया काही शोध लागतोय का ते.” – निशांत.

“ब्रीलीयंट आयडिया. वा निशांत, तू खरंच डिटेक्टिव आहेस, हे सिद्ध झालं आहे. पण हा पटवारी कुठे भेटेल?” रोहन.

“ते काय, चार लोकांत चौकशी केल्यावर त्याची  माहिती मिळून जाईल.” – निशांत.

“चला म्हणजे आता मिशन पटवारी. गुड.” – रोहन.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com