The Impostor Heir - Part 52 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तोतया वारसदार - भाग 52

Featured Books
Categories
Share

तोतया वारसदार - भाग 52

 तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       सारंग वकिलांचा चपराशी.

सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र.

भाग  ५२      

भाग ५१ वरून पुढे  वाचा....

 

त्या दिवशी, संध्याकाळी वातावरण कुंद झालं होतं आभाळ भरून आलं होतं. केव्हाही पाऊस पडायला सुरवात झाली असती. बबनला खूप जीवावर आलं होतं, पण सुभाषला  भेटणं त्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. म्हणून त्यानीच दुपारी फोन करून सुभाषला बोलावून घेतलं होतं. दुपारी कडक ऊन पडलं होतं आणि आकाशात मुळीच ढग नव्हते. पण नागपूरचा पाऊस असाच असतो. संध्याकाळच्या सुमारास, कुठून तरी अचानक ढग गोळा होतात, आणि पाऊस दमदारपणे कोसळायला लागतो. बबननीच मीटिंग बोलावली असल्याने, त्याचा नाईलाज होता. ठरल्या प्रमाणे बबन आणि सुभाष, इंडियन कॉफी हाऊस मधे भेटले.

“आपण आता पर्यन्त काय काय झालं, आणि आपली तयारी नेमकी कुठवर आली आहे यांचा आढावा घेणं खूप जरूरी आहे, म्हणजे आपल्याला कळेल तरी की कुठे फटी राहिल्या आहेत का, आणि तसं असेल तर त्या बुजवण्यासाठी काय अॅक्शन घ्यायला हवी.” – बबननी आपल्या मनातली खळ खळ बोलून दाखवली.  

“ठीक आहे. ऐक, सर्वात प्रथम बांगलादेशच्या शाळेचं सर्टिफिकेट बनवून घेतलं, पुढची पायरी, तो कागद दाखवून चंद्रपूरच्या शाळे मधे जाऊन दूरुस्ती करवून घेतली मग ते घेऊन माध्यमिक बोर्डात अर्ज केला, नावात झालेल्या चुकीची दुरुस्ती हवी म्हणून. ते दुरुस्त होऊन माझ्या हातात पडलं आहे. मग विद्यापिठात अर्ज करून डिग्री मधे दुरुस्ती करून घ्यायची होती, ती सुद्धा करून झाली. माझ्या हातात यूनिवर्सिटी ची सुधारित डिग्री आलेली आहे. आता ती दाखवून, महापालिकेत नाव दुरुस्त करायला मी अर्ज दिला आहे. ती होईलच. तिथे सगळी आपलीच माणसं आहेत. ती झाल्यावर आपण मालमत्तेवर दावा ठोकायला मोकळे.” – सुभाष.

“अहो इतकं बेकायदेशीर काम केलं तुम्ही? जर भांड फुटलं ना तर सरळ जेल होणार बघा.” बबन आता घाबरला होता. तो सारंग सरांच्या कडेच काम करत होता आणि सारंग सर किती हुशार आणि कडक आहेत ते त्याला माहीत होतं. त्याला बसल्या जागीच घाम फुटला.

“कोण म्हंटतं की हे बेकायदेशीर काम आहे म्हणून? सगळीकडे कायद्या प्रमाणेच अर्ज विनंत्या करून दुरुस्त्या करून घेतल्या आहेत. चुकीची दुरुस्ती हे कायदेशीर काम आहे. एकच कागद खोटा आहे. गोपालगंजचा, पण त्याची शहानिशा बापजन्मांत कोणी करू शकणार नाही. शाळेत, बोर्डात आणि यूनिवर्सिटी मधे चौकशी करून सुद्धा पदरात काही पडणार नाहीये. बबन राव तुम्ही निश्चिंत रहा आणि आता माझ्यावर सोपवा. बघायच मी काय करतो ते.” – सुभाष.

“तुम्ही आता नेमकं काय करणार आहात?” – बबन

आपण एक गोष्ट लक्षात घेतली नव्हती, ती आता करणार आहे.” – सुभाष.

“काय?” -बबन

“अविनाशची आपल्याला काहीच माहिती नाहीये, ती संपूर्ण माहिती आता काढावी लागणार आहे, उद्या जर सारंग सरांनी विचारलं की कोणची डिग्री घेतली होती आणि कुठल्या कॉलेज मधे शिकत होते तर आपल्या जवळ काय उत्तर आहे? तुम्हाला तर काहीच माहीत नाहीये.”   – सुभाष.

“जेवढं सारंग सरांनी फाइल मधे नोटिंग करून ठेवलं, तेवढंच मला माहिती. पण मग? आता?” – बबन.

“मी महापालिकेत असल्याने माझ्या बऱ्याच सिक्युरिटी एजन्सी शी संबंध येतो. त्यापैकीच एकाला मी ही माहिती काढायच काम दिलं आहे. हे काम जरा तिरपागडं असल्याने खर्च जरा जास्तच येणार आहे, पण तो करावाच लागणार आहे. आपली तयारी पूर्ण पाहिजे. निदान त्यांना जेवढी माहिती आहे तेवढी आपल्याला मिळाली, की रिकाम्या जागा भरता येतील.

“मी काय म्हणतो, तुम्हीच का विचारात नाही, मिलिटरी ऑफिस मधे जाऊन? तुम्ही म्हणूच शकता न की माझ्या वडिलांची माहिती हवी आहे म्हणून.” – बबन.

“बबनराव अविनाश बेपत्ता झाला आहे, आणि ते ही बांगला देशात. त्यांनी मलाच पकडलं आणि अविनाश बद्दल माहिती विचारली तर मी काय करणार? आर्मीतून  पळून जाणाऱ्याला कोर्ट मार्शलला सामोरं जावं लागतं. मी माझ्या वडिलांची माहिती दडवून ठेवली असा ठपका ठेऊन मलाच अटक केली तर काय करणार? नाही बबनराव, मला त्यांच्या समोर नाही जाता येणार.” – सुभाष.  

 

“मला असं म्हणायचं आहे, की जितक्या जास्त बाहेरच्या लोकांना आपले प्लॅन्स कळतील, तेवढा धोका वाढत जाणार आहे. ही गोष्ट आपल्या दोघांमधेच राहिली तरच सर्व काही सुरळीत होईल.” – बबन.

“तुमची शंका आणि भीती रास्त आहे. पण मी आर्मीच्या ऑफिस मधे जाण्याचा धोका पत्करू शकत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. कोणचा तरी एक धोका पत्करावाच लागणार आहे.” – सुभाष. 

सुभाष जे म्हणाला ते बबनला पटलं, पण त्याची भीती काही कमी झाली नाही. तो विचार करत होता की हा माणूस दिसतो तेवढा साधा नाही, हा आपल्याला गंडवून सगळी इस्टेट गिळंकृत करू शकतो. बरं तो हे गुपित उघड पण करू शकत नव्हता, फ्रॉड केलं म्हणून तोच सर्वात आधी जेल मधे जाणार, सुभाष सुटणार नाही, पण त्याच्या इतक्या ओळखी आहेत की तो काही तरी शक्कल लढवील आणि सुटून जाईल. अश्या परिस्थितीत काय करायचं, बबन भलत्याच पेचात सापडला होता. शेवटी, जे होईल ते होईल, आता पाय मागे घेता येणं शक्य नाही, असा विचार करून तो सुभाषला म्हणाला

“सुभाष, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे, आमचे साहेब, सारंग सर खूप हुशार आहेत. काळजीपूर्वकच सगळी योजना आखायला हवी.”

“काळजीपूर्वकच करणार आहे, आता बबनराव तुम्ही फक्त एकच काम करा, मला हे सांगा की मी केंव्हा समोर यायचं ते. मगच मला दावा ठोकता येईल.” सुभाष म्हणाला आणि त्यांनी बबनला पुढची योजना नीट समजावून सांगितली.

“परिस्थिती अनुकूल झाली की तुम्हाला सांगतो, शांत रहा, योग्य वेळ साधल्या गेली नाही, तर सगळंच मुसळ केरात जायचं” – बबन

ठीक आहे, माझे सर्व पेपर पूर्ण तयार झाले आहेतच, अभ्यास पण झाला की आपण भेटू आणि मगच पुढचा विचार ठरवू.” – सुभाष. “पण काहो, घर दुरूस्तीचं काम कुठ पर्यन्त आलं आहे? आणि अजून किती वेळ लागणार आहे?”

“आता घराची दुरुस्ती सध्या थांबली आहे. निशांत वाराणसी ला जाऊन आला आहे आणि आता तो नाशिकला जाणार आहे. आणखी जर काही अवचित समोर आलं नाही, तर बहुधा एक दोन आठवड्यात निशांत आल्यावर पुन्हा सुरू होईल. सर्वांच्या साठी एकदम अद्ययावत सोई सुविधा करायच्या आहेत. त्या झाल्या की  मगच  सगळे जमणार आहेत.” – बबन

“साधारण किती दिवस लागतील?” – सुभाष.

“माहीत नाही, पण माझ्या अंदाजा प्रमाणे, चार महीने लागू शकतात. कदाचित दिवाळी उजाडेल.” – बबन

“तेवढा वेळ मला पुरेसा आहे अविनाशची माहिती काढण्या साठी.” – सुभाष.

“अजून एक गोष्ट, मागच्या मिटिंगला मी म्हणालो होतो की कोणा वकिलांची मदत घेतली तर सारंग सरांसमोर तुला अडचण येणार नाही.” – बबन.

अनुभवी वकील पाहिजे आपल्याला. तो कुठून आणायचा? तुझ्या माहितीत आहे का कोणी?” – सुभाष.

मी काय सांगू? मला बरेच माहीत आहेत, पण मी विचारल्यावर पांच मिनिटांच्या आत सारंग सरांना फोन जाईल. मग? तूच पहा.” – बबन.

“बघावं लागेल. पण जर असा कोणी अनुभवी मिळालाच, तर त्याला सर्व कल्पना द्यावी लागेल, मग त्याने सुद्धा जर हिस्सा मागीतला तर काय करायचं?” – सुभाष.

“नाही, ही रिस्क नाही घेता येणार. कारण त्याने हिस्सा जरी मागीतला नाही, पण चुकून कोणाजवळ बोलला आणि ते सारंग सरांपर्यंत पोचलं, तर सगळंच संपेल. फूल स्टॉप” – बबन

“बघू, विचार करू, घाई घाईने काही करू नये हे उत्तम.” – सुभाष. 

तुझे एवढे जबरदस्त कॉन्टॅक्ट्स आहेत, कोणी मुंबई पुण्याचा वकील मिळाला तर त्याला सारंग सरांचं नाव माहीत असण्याची शक्यता नसेल. असा कोणी तरी शोध.” – बबन.

“हूं, हे माझ्या लक्षात नाही आलं, बरं झालं तू बोललास ते. बघतो आता, कोणी ना कोणी मिळूनच जाईल.” – सुभाष.

“नाशिकचं प्रकरण हे शेवटचं समजायचं का?” – सुभाष.

“हो म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे तरी शेवटचं.” – बबन.

म्हणजे, जर नाशिक वाला हो म्हणाला, तर आम्ही दोघं नाही तर मी एकटाच संपत्तीचा वाटेकरी. वा मजा आहे.” – सुभाष.

“जरा सबुरीने, तू आणि इस्टेट यामधे सारंग नावाची भिंत आहे. आणि ही भिंत चीनच्या भिंती पेक्षा कमी नाहीये, हे लक्षात ठेव. उगाच उड्या मारू नकोस, फाजील   आत्मविश्वास बाळगशील आणि भिंतीवर आपटून कपाळमोक्ष व्हायचा, सावध पावलं उचलावी लागणार आहेत.” बबन.

सुभाषने हसून मान डोलावली आणि मीटिंग संपली.   

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com