Patrasumaane...Beautiful Journey - Part 7 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ७

Featured Books
Categories
Share

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ७


प्रिय सोना 

असेच आपले संसाराचे दिवस चालू होते 

कधी अडचणी तर कधी त्यातून मार्ग काढायची खुशी..

घरासाठी सगळीकडून कर्ज काढल्याने आर्थिक अडचणी चालूच असायच्या 

मी माझे दहा बारा तोळ्यांचे सर्व सोन्याचे दागिने आपले घर तयार होत होते तेव्हा 

आर्थिक अडचणी मुळे विकून टाकले होते 

ते पैसे घरासाठी वापरले होते

हे माझं आपल्या संसारासाठी छोटेसे योगदान होते 

त्यात माझी काही वेगळी प्रौढी नव्हती 

तुला मात्र त्याचे खूप कौतुक आणि अप्रूप वाटले होते 

तू म्हणालास बायका नवऱ्याच्या मागे लागून नवीन नवीन सोन्याचे दागिने बनवतात 

तू मात्र आहे ते दागिने विकायला तयार झालीस 

पुढील काळात जरा बरी परिस्थिती झाली की मी तुझे सगळे दागिने तुला परत नव्याने करून देईन 

मी फक्त हसले होते 

कारण असेही मला सोन्याच्या दागिन्यांचा फार शौक नव्हता 

आणि तुझ्या सारखे “अस्सल “सोने माझ्याकडे होते 

मग मला आणखी काय हवे होते

 मधल्या काळात आपली आर्थिक प्रगती होऊन आपल्या दारात नवी कोरी चारचाकी सुद्धा आली होती

ही गाडी घेताना तू मला विचारले गाडी घेऊया का तुला दागिने करूया 

तेव्हा मी प्रथम पसंती गाडीला दिली होती 

कारण मला माहित होते 

चारचाकी गाडी घेणे हे तुझे स्वप्न होते 

तुझे सर्व मित्र खूप श्रीमंत होते 

त्यांच्याकडे आधीच चारचाकी गाड्या होत्या 

ते तुला म्हणत तू गाडी शिक आणि आमची चालव 

पण तू ठरवले होतेस गाडी शिकणार आणि चालवणार ती फक्त स्वतःची.

तसेही बघून बघून तुला गाडीचे तंत्र माहित होते 

पण कितीही जवळचा मित्र असो दुसऱ्याच्या वस्तुला हात लावायचा नाही हे तुझे पक्के होते 

ही गाडी घेण्या आधी आपण एका भयानक अनुभवाला सामोरे गेलो होतो 

झाले होते असे की तुझ्या जवळच्या मित्राने प्रस्ताव आणला की त्याच्या मित्राची सेकंड हँड गाडी तू घ्यावीस 

तुझा खरेतर सेकंड हॅण्ड वस्तुंना विरोध होता 

पण मित्राच्या आग्रहाला नाही म्हणता येईना 

बँकेतून कर्ज घेऊन आपण ती मारुती गाडी विकत घेतली

चार पाच दिवस वापरली आणि अचानक पोलिस येऊन ती गाडी चोरीची आहे असे सांगून गाडी उचलून घेऊन गेले 

आपले तर डोकेच सुन्न झाले 

या वेळेस इतकी वर्षे जिवलग असणारे तुझे सगळे मित्र बाजूला झाले 

मग सुरु झाल्या काम सोडून तुझ्या पोलिस स्टेशनच्या चकरा मारणे 

बँकेत भरपूर चर्चा झाल्या 

कित्येकांनी आपली अक्कल काढली 

माझे आई वडील तर हवालदिल झाले होते 

शेजारी पाजारी नातेवाईक मुद्दाम येऊन बोलावून चौकशा करू लागले 

ते दिवस आपल्याला फार कठीण गेले 

आपली काही चूक नसताना आपली बरीच नाचक्की झाली 

त्या केससाठी तुला बेळगाव ,मुंबई चकरा माराव्या लागल्या 

वकील करावे लागले 

तरीही ती केस कोर्टात तशीच पडली 

ही गाडी बँक कर्जामुळे आपल्या नावावर होती 

पण तिच्या यापूर्वीच्या मालकांचा पत्ता लागत नव्हता 

कारण यापूर्वी कोणी ती आपल्या नावावर केलीच नव्हती 

यामध्ये सामील असणारे सगळे आपले तोंड चुकवत होते 

जणू काही आपण गाडी चोरली असे लोक आपल्याशी वागत होते 

इकडे बँक पण कर्ज फेडा असे म्हणून मागे लागली होती 

आपल्याकडे तर अजिबात पैसा नव्हता त्यात या कोर्ट कचेऱ्या चालू होत्या 

दिवस चालले होते पण मार्ग निघत नव्हता 

अचानक एक दिवस बँकेच्या एका कोर्ट केस साठी मी कोर्टात गेले असता माझा कॉलेज मधील जुना मित्र भेटला जो वकील होता 

सहज म्हणून त्याला हे सांगितल्यावर त्याने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात घालू असे सांगितले 

मी म्हणले बाबा रे आता आमच्याकडे पैसे नाहीत 

ही केस तू जिंकून दिलीस तर मी  तू मागशील ती फी देईन 

पण हरलास तर मात्र एक पैसा मिळणार नाही 

त्याने पण ते आव्हान स्वीकारले 

आणि पंधरा दिवसाच्या आत केस दाखल करून जिंकून दिली 

आपल्याला गेलेल्या पैशाच्या दुप्पट पैसे व्याजासहित परत मिळाले 

जे लोक पूर्वी तोंड चुकवत होते ते स्वतः येऊन पैसे आपल्याकडे देऊन गेले 

तसा कोर्टाचा आदेशच होता 

यानंतर आपण नवीन मारुती इ एक्स घेतली जी खरेच आपल्या आयुष्यातील पहिली नवी गाडी होती 

यानंतर आपण मित्राला त्याने मागितली ती रक्कम फी देऊन 

त्याला मस्त पार्टी सुद्धा दिली 

या सर्व घडामोडीत तुझ्या आठ दहा जवळच्या मित्रांनी मात्र आपल्याकडे पाठ फिरवली होती 

त्यातील कोणीही ना कधी आपली चौकशी केली 

ना काही मदत विचारली 

एखाद दुसरा मित्र असे वागला असता तर विचित्र आहे म्हणून ही बाब सोडून दिली असती 

पण आपली काहीच चूक नसता इतके 

सगळे मित्र असे का वागले हे एक गूढच होते 

कित्येक वर्षे मी या गोष्टीच नवल करीत असे 

तुझे एक दोन अगदी जिवलग मित्र यात सामील होते.

सर्वांनी नंतर सुद्धा आयुष्यात कधीच आपल्याला फोन अथवा आपली चौकशी केली नाही 

हे ही एक आश्चर्य होते 

मी कितीही नवल केले तुला कितीही प्रश्न विचारले

तरी तू शांत होतास 

सोडून दे त्या गोष्टी..

त्यांचे त्यांच्यापाशी 

आपण चांगले होतो आपल्याला दुप्पट पैसे मिळाले 

त्या जुन्या गाडी ऐवजी आपण नवीन कोरी गाडी घेतली 

आणखी काय हवे..

तुझ्या या स्थितप्रध्न्य वागण्याचे खरेच कौतुक होते 

आधी आपल्याला खोचक प्रश्न विचारणारे 

आता नवीन गाडी बघून गप्प झाले होते 

खरेच आयुष्यातली ती एक दीड वर्ष आपल्यासाठी भयानक होती 

पण परमेश्वर कृपेनें आपण त्यातून सहिसलामत सुटलो 

बघता बघता आपला मुलगा दहावीला गेला

दहावीच्या परीक्षेआधी महिनाभर तो निवान्त आपल्या व्हरांड्यात झोपाळ्या वर गाणी ऐकत बसलेला असायचा 

काही विचारले तर माझा अभ्यास तयार आहे म्हणायचा 

त्याचे म्हणणे होते की जर बारावीच्या मार्क्स वर पुढील शिक्षणाचे ठरणार आहे 

तर दहावीला जास्ती मार्क मिळवून काय उपयोग आहे 

मला हे काही पटायचं नाही 

याविषयी तुझ्या कडे तक्रार केली की तू म्हणायचा 

“तो लंबी रेसचा घोडा आहे…”

तो दहावीत असल्यापासून तू त्याचे पुढले प्रवेश क्लासेस या सर्वाचा अभ्यास केला होतास 

त्याला योग्य ते मार्गदर्शन तू स्वतः देत होतास 

शिवाय बाहेर क्लास लावून तेथून सुद्धा सराव केला जावा अशी तू व्यवस्था केली होतीस 

त्याला क्लास कॉलेज मॅनेज करण्या साठी एक स्कूटर पण घेऊन दिलीस..

तो स्वतः पण हुशार होता 

त्याला रिसर्च मध्ये इंटरेस्ट होता 

तू त्याला डॉक्टर होतोस का विचारले होते 

तो मेडिकलला गेला असता तर आयता तुझा दवाखाना, तुझी सेट झालेली प्रॅक्टिस याचा त्याला उपयोग झाला असता 

पण त्याला त्यात रुची नव्हती 

आपण सुद्धा त्याला कसली जबरदस्ती नाही केली 

तो हुशार असल्याने तो बारावी बोर्डाच्या मेरिट लिस्ट मध्ये आला होता

फिजिक्स त्याचा आवडता विषय..

त्यात त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले 

तो ज्या प्रायव्हेट क्लास मधे जात होता 

तिथे त्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि गणित यात दर टेस्टमधे पैकीच्या पैकी मार्क असत 

त्यामुळे आपल्याला तो बोर्ड टॉपर असणार याची खात्री होती 

एका विषयात तर त्याने बोर्डाचे रेकॉर्ड मोडले होते 

त्याच्या या यशाने आपल्याला खुप आनंद झाला होता

दुर्दैवाने कॉलेजने केलेल्या त्याच्या सत्काराला तू आजारी असल्याने येऊ शकला नाहीस