Bhorpi from Konkan - Part 4 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | कोकणातले भोरपी - भाग 4

Featured Books
Categories
Share

कोकणातले भोरपी - भाग 4

कोकणातले भोरपी - भाग़ ४

दोन तुकड्याची साडी नेसलेल्या बाईने त्यातली बरीशी साडी  उचलून आशाळभूत चेहेरा करीत  म्हटले. “ मावशी , माजं ह्ये कापाड – नेसूचं लुगड  अक्शी  निमता पुरतं  ऱ्हायलया बगा...... ह्ये कापाड म्यां घ्येतो , माजं दोन  मोसम निभतील...... न्हाई म्हणू  नुको . वाकळीच्या मजुरीस्नं झालं तरी  पैसं कापून घिया........” त्यावर हसून आई म्हणाली,  “अगो  तीचा पदर विरला होता म्हणून तो फाडून टाकलाहे पुऱ्या  लांबीचं  नाहिये ते. ” क्षणाचीही उसंत न लावता   मोठी  भोरपिणी म्हणाली,  “ तेला काय करणार, भण माजी बारकुड्या अंगाची हाय  त्याला  होईत बरोबर. आता अंगावर हा त्येच्या पक्षा जादा भरतंय .....”

          आई म्हणाली,  “मी तुला दुसरं चांगलं लुगडं देत्ये, नी तिने आक्काला खूण केली.” आमचा एक मामा देवीच्या देवस्थानात  सेवेकरी म्हणून काम करायचा, त्याने  देवीला नेसवलेल्या  लुगड्यापैकी  एक सहावारी  हिरवं काठ पदराचं  लुगडं  आमच्या  आक्कासाठी म्हणून आणून दिलेलं होतं. त्यावेळी  लग्न न झालेल्या मुली  असे रंग  वापरीत नसत. अक्का ताई  दोघीना तिची आली होती. त्यानी ते नवं कोरं लुगडं   तिच्या हातात  दिल्याल्यावर  तिला काय बोलावं सुधरेच ना. हर्शोत्फुल्ल  नजरेनी  तीने त्या साडीचा वास घेतला  सोबतच्या बाईला म्हणाली,“ह्ये अक्षी  नवं कोरं  हाय आक्का .......” नी  आनंदाने तिच्या डोळ्यातून  पाणी  ओघळलं. मोठी बाई बोलली. “ही माजीच भन  हाई...... सा म्हैन्या मागे माज्या धकट्या दीराला  ही करून  घेटलो...... तिला  लग्नात पण  नवा कापड भेटलेला नाय. मी माजा जरा बरां कापाड  तेला दिला  म्हनू   डोळ्यान पानी काडला तेनी......” त्यानंतर आईने दुसरा दणका दिला. 

             आई   शिवण काम  करायची .  मामा  अधून मधून खण पाठवायचा . देवीला दिलेल्या तोकड्या खणात चोळी  बसत नसे.पण  आई  एका खणात आढलक पुढलक (मागचा  पुढचा भाग)  नी  दुसऱ्या खणात  हातोपे  बसवी. पाठ नी पुढा एरवी तरी बराचसा पदराखाली  झाकला जात असे. अशा चोळ्या पोलकी ती मोफत शिलाईचा पैसाही न घेता  गर्जू बायाना देत असे. तीने  अंदाजाने आपली बोचक्यातून  भोरपीणीला होईल अशा बेताची नवी चोळी तिला दिली. आता तर ती भलतीच हरखली. आक्का सोबत मागच्या पडवीत जावून ती नवीन साडीचोळी  लेऊन आली. तीने सहावारी साडी काष्टा मारून नेसली. नऊवारी साडी इतकी पायघोळ नसली तरी आढीच्या दोन तुकड्याचा साडीपेक्षा लांब ढोपरं झाकून पोटरीपर्यंत लांब पोचली.   आल्यावर आईला  चार चारदा वाकून  नमस्कार केला.  आमच्या आईचा अंदाज पक्का होता. चोळी तीला  बरोब्बर झाली. एरवीही तिच्याकडे  बायका  चोळ्या पोलकी शिवायला आल्या तर कोणाचंही  माप न घेता  केवळ नजरेच्या अंदाजावर नी नग उभा करी नी तो नीट मापाप्रमाणे बसायचा. क्वचित एखाद्याच माप ती घेई, टेपवरचे  इंग्रजी आकडे ती आम्हाला विचारून   घेई नी ते लिहून न घेता लक्षात ठेवून  कपडा शिवीत असे. 

          दोन्ही  बायानी  साडीची दुघडी अंथरून त्याच्या  अर्ध्या भागावर एकापुढे एक असे धडपे शिस्तीत जुळवून घेतले. जादाचा   भाग  त्या कोयती वरच  कापणार असत्या पण आईने थांबवून कात्री आणून दिली . गोधडीच्या पोटातलं भरवण   घालून झाल्यावर  त्यावर दुघडीचं  अर्धूक घातल्यावर दोघीनी मिळून  एकेका गोधडीची कडण  मारून घेतली . साडेबारा च्या दरम्याने आईने  दोन मोठ्या केळीच्या फाळक्यांवर  भला खासा भाताचा ढीग , दोन दोन भाकऱ्या ,  चवळीची  आठिळा  घातलेली उसळ  , मोठ्या  वाडग्यातून  आमटी   नी    अल्युमिनीयमच्या   कथलीतून  ताक, एका फाळक्यावरून चवडाभर खारातल्या मिर्च्या (कोकणात  ओल्या  मिर्च्या मधे दोन भाग करून मोहरी, मेथी , मीठ नी तेल घालून एक प्रकारचं  लोणचं घालतात) वाढून आणून ठेवली. पोरं लगेच पुढे धावली. त्याना दटावीत आई म्हणाली, “ रे  आधी थांबा जरा, जा गो,  आधी त्यांचे हात पाय , तोंड धुवून आण” पोराना मागच्या पडवीत नेवून हातपाय  धुवून आल्यावर  दोघीनी एकेका पोराला  आपल्या पानात बसवलं  भाताच्या एका कडेला थोडी आमटी ओतून  जरा कोलसावल्या सारखं करून पोरं  झेलवीत झेलवीत त्याचा चेंडू  करून मोठे मोटे घास कोंबीत.  मग त्यानी  अर्धी अर्धी भाकरी खाल्ली त्याना तोंड धुवून आणल्यावर भोरपिणी जेवायला बसल्या.   खारातल्या मिर्च्या  घरी न्यायला  म्हणून पुरचुंडी  बांधून बाजुला  ठेवल्या.

                 मग त्यानी  लाल तिखट मागून घेवून  एक चमचा भातावर  नी एक चमचा उसळीर घालून घेतलं .त्यानी आधी भाकरी खाल्ली नी मग भात खायला सुरुवात केली. आई  भात घेवून आली. भोरपीण म्हणाली,  “ भाजीत फणसाच्या  घोट्या  (आठिळा-  बीया) व्हत्या   ना मावशी ?  लई  ब्येस लागत्यात बटाट्यावानी........ ”  त्या नको नको म्हणत होत्या तरी आईने बचक बचक भात वाढला. त्यानी तोडा भात त्यावर ताक ओतून खाल्ला. जेवण झाल्यावर पानं गोठ्या म्हशीच्या तोडात देवून मोठी बाई शेण गोळा घेवून आली . पानं ठेवल्या जागी शेण बोळा  फिरवून  आल्यावर  पोराना  भिंतीच्या कडेला  गोणपाट  अंथरू  त्यावर  आडवी केल्यावर दोघंही लुक्कन झोपली. आता दोघीनी ही  खेपेन दहा सुया चालवीत बोट बोट अंतरावर  पट्टीने  आखल्यासारखी एका  रेषेत  झरा झर  टीप चालवली . त्यांचा प्रत्येक टाका सारख्या लांबीचा. मशिन मारावी इतकी  उज्जू  नी त्याच गतीने   चौकोनी घेर पुरा  करीत  शिलाई  अंतर्भागाकडे जात  होती  तसतशी  लांबी कमी कमी होत  चालली. चार वाजता त्याना चहा दिला. पोरं अजून उठलेलीच नव्हती . संध्याकाळला निम्मे काम पुरं झालं  दोन्ही   गोधड्या  मुसळाभोवती  घट्ट  गुंडालून खुंटीवर ठेवून  त्या उठल्या. “आता उद्या सकाळी  बेतावारी  येवून दोपारच्याला काम फुरं करतू ” असं बोलून पोरं काखोटीला मारून त्या  निघून गेल्या. (क्रमश:)