निषाद पर्व - भाग 1 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | निषाद पर्व - भाग 1

Featured Books
Categories
Share

निषाद पर्व - भाग 1

निषादपर्व  भाग १

“प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ लागला. यादवीतून वाचलेले वृध्द, नारीजन आणि बालके यांना पार्थाने द्वारकेतून हस्तिनापुरात आणावे. त्यांचा प्रतिपाळ करावयाची जबाबदारी योगेश्वर श्रीकृष्णानी पार्थावर सोपवलेली आहे...” दारूकाच्या मुखातून हे वृत्त ऐकून पांडव शोकाकुल झाले. श्रीकृष्णांनी सोपविलेले कार्य आपल्या हातून पार पडेल की नाही या शंकेने पार्थ ग्रासला त्याच्या सर्वांगाला कंप सुटला, हृदयाचे स्पंदन वाढले. आपण वृद्ध झाल्याची जाणीव त्याला प्रकर्षाने होऊ लागली. केवळ कर्तव्य भावनेनेच पार्थ प्रवासाला सिद्ध झाला. प्रवास दीर्घ पल्ल्याचा! अरण्य मार्गात हिंस्त्र श्वापदे, दस्यू आणि वनवासी लुटारू यांचाही धोका संभवत होता. म्हणून गांडीव धनुष्य, अक्षय भाता यासह सज्ज होऊन पार्थाने रथारूढ होऊन द्वारकेकडे प्रयाण केले.

सुवर्ण रौप्यादि अमुल्य द्रव्य शकटांमध्ये भरून, गोधनासह सारा लवाजमा द्वारके बाहेर पडला. कुरूकुलाची ध्वजा फडकवीत पार्थाचा रथ जथ्याच्या मध्य भागातून दौडत चालला. निश्चिन्त मनाने मार्गक्रमणा करीत लवाजमा पंचनद प्रांतीच्या वन प्रदेशात शिरला. अन् अकस्मातपणे घनदाट वृक्ष राजींमधून तीक्ष्ण शरांचा वर्षाव सुरू झाला. जथ्याच्या अग्रभागी असलेले गोधन शराघातांनी विंधित झाले. भयाने हंबरडे फोडीत गोधन सैरभैर उधळले. घाबरलेला नारी समूह, बालके, हल्ल्याच्या भीतीमुळे आक्रंदन करू लागली. सर्वत्र एवढा कोलाहल सुरू झाला की, क्षणभर पार्थही दिड्गमूढ झाला. चहू बाजूंनी वेध घेत गांडीव धनुष्यावर प्रत्यंचा चढविण्याची सिद्धता करण्यात पार्थ मग्न झाला. या पूर्वी त्याच्या गांडीवाचा प्रलयकांरी टणत्कार ऐकूनच निधड्या छातीचे महावीरही गलितगात्र व्हायचे, पण आता...?

त्या अवघड क्षणी टणत्कार दूरच... साधी प्रत्यंचा चढवितानाही पार्थाच्या सर्वांगावर अतिकष्टामुळे स्वेदबिंदू जमा झाले. थरथरत्या हातांनी धनुष्याचा दंड वाकवून प्रत्यंचा चढविण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असताना दस्यू नायकाने हृदयाचा थरकाप उडविणारी सांकेतिक आरोळी मारली. प्रतिपक्षाकडून कोणतेच प्रत्युत्तर प्रतिहल्ला न झाल्याने जथ्यात शिरून लूट करावयाचा इशारा दस्यूंना मिळाला. आडोशा बाहेर येत दस्यू वीरांनी यादव समूहाला चारी बाजूंनी कोंडीत धरले. खुद्द संघनायक पार्थाच्या रथाकडे निघाला. समूहात केवळ स्त्रिया, वृद्ध, बालके यांचाच भरणा... रथारुढ वृद्धाखेरीज कोणीही शस्त्रधारी रक्षक जथ्यात नाही हे लक्षात येताच चेकाळलेल्या दस्यूंनी निश्चिंत मनाने लुटालूट सुरू केली. वस्त्राच्छादित शकटांवरील आवरणे दूर झाली. अपरिमित रौप्य सुवर्णराशी पाहताच दस्यूंचे चेहरे हर्षोत्फुल्ल झाले. लुटारुंचे आक्रमण झाले तरीही पार्थ निष्क्रिय कसा? या शंकेने शोकाकूल यादव नारी, वृद्ध "पार्था वाचव... अर्जुना तुझ्या शरवर्षावाने लुटारूंचे निखंदन कर..." असा टाहो फोडू लागले.

नारी जनांचा करुण विलाप कानी येताच अती शर्थीच्या प्रयत्नांनी पार्थाने कशीबशी प्रत्यंचा चढविली. अतीव परिश्रमांनी क्लांत होऊन धापा टाकीत पार्थ किंचित काल स्तब्ध राहिला. रथारुढवृद्धाची धनुष्यावर प्रत्यंचा चढविताना उडालेली त्रेधा पाहून संघनायक निश्चिंत झालेला. मात्र त्याने प्रत्यंचा चढविली, नारी समूहातून अर्जुनाचा उल्लेख झाला तेव्हा रथावर नजर ठेवणारा संघनायक घोड्याला टाच देऊन रथापासून दूर-सुरक्षित अंतरावर जाऊन थांबला. पार्थाने अक्षय भात्यातून बाण काढला. तो धनुष्यावर चढविला. शरसज्ज गांडीव मस्तकी टेकीत त्याने अस्त्राचे स्मरण केले. पण मंत्रातले एक अक्षर ही त्याला आठवेना! अस्त्र नाही तर निदान प्रत्युत्तरादाखल तरी शरसंधान करावे असा विचार करून अश्वारुढ दस्यू नायकाचा वेध घेत पार्थाने बाण सोडला. "बद्दऽ भुस्स्ऽऽऽऽ स्स्" असा घोंगळ ध्वनी घुमला. वेगहीन शर वेडावाकडा जात लक्ष्यापासून निम्म्या पल्ल्यावर थडथडत भूमीवर पडला. आता ताळतंत्र सुटलेला पार्थ एका मागून एक असे भसाभसा बाण सोडू लागला. पण हे बाण पहिल्या बाणाचा टप्पाही गाठू शकले नाहीत.

अजाण शिशुला शोभेलसे रथारूढ वृद्धाचे शरसंधान पाहताच दस्यू संघनायक खदाखदा हसू लागला. निर्धास्त होऊन तो सहकाऱ्यांच्या दिशेला निघाला. प्राणभयाने थरथर कापणाऱ्या नारी शिशुवर्गादिंच्या अंगावरील आभुषणे दस्यू हिसकावू लागले. मिळालेल्या लुटींची गाठोडी बांधायचे काम सुरु झाले. एवढ्यात संघनायकाचे लक्ष एका कमनीय यादव नारीकडे गेले. तिला बळाने उचलून त्याने आपल्या पुढ्यात अश्वाच्या पाठीवर टाकले. नायकाचे हे कृत्य पाहून अन्य दस्यूनीसुद्धा समुहातील नारींचे अपहरण सुरू केले. आता दस्यू नायकाने सहकाऱ्यांना परतीचा इशारा केला. द्रव्यपूर्ण शकट आणि अपहृत नारींसह दस्यू लुटारुंचा समूह मार्गस्थ होऊ लागला. असहाय्य पार्थाचे हृदय शतशः विदीर्ण झाले.

घटनास्थळापासून किंचित दूर असलेल्या कदंब वृक्षावर बसलेल्या एका वृद्ध निषादाने हे दृश्य पाहिले. निषादाहाती झालेला कृष्णाचा वध आणि सिंधुसागरात लुप्त होणारी द्वारका या वृत्तामुळे त्यालाही विमनस्कता आलेली. द्वारकेहून हस्तिनापूरला मार्गस्थ होत असलेल्या यदुवंशीयांवर हल्ला करण्यासाठी सज्ज झालेली दस्यू लूटांरुची टोळी त्याने पाहिली. खरे तर पंचनदप्रातांत नेहमी घडणाऱ्या अशा घटनांमध्ये त्या निषादाला काडीमात्र स्वारस्य नव्हते. परंतु काही अनाकलनीय अंतःप्रेरणेने त्याला घटनास्थळी जखडून ठेवलेले! शांतपणे मार्गक्रमणा करणारा यादव नारी, बालके, वृद्ध, रथ, शकट आणि गोधन असा लवाजमा वनप्रदेशा पासून दूर असतानाच त्याने हेरला. सारा लवाजमा दृष्टी पथात येताच मध्यभागी दौडणाऱ्या रथावरील कुरू कुलाची राजमुद्रा मिरविणारी ध्वजपताका त्याला दिसली. यादव समूहासोबत महाप्रतापी धनुर्धर अर्जुन समक्ष आहे याची खात्री पटून तो निश्चिंत झाला.(क्रमश: )