सकाळी सकाळी साखरझोपेत असतानाच विवेकचा फोन आला. मोबाईलची रिंगटोन जरी मनाला भावत असली तरी त्यावेळेस ती जणू कर्कश वाटायला लागली.
झोपमोड झाल्याने मी काही अनुत्साहातच मोबाईल हाती घेतला आणि डोळे चोळत मोबाईल स्क्रीनकडे बघितले. विवेकचं नाव दिसताच थोडा हबकलो. कारण एवढ्या सकाळी काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय हा फोन करणार नाही हे तर मला माहीत होतच.
फोन उचलत मी “हॅलो, बोल आज सकाळी सकाळी कॉल केला, ठीक तर आहेस ना!” असे एकदम बोललो. तर लगेच अगदी उत्साहात विवेकचा आवाज आला, “अरे मी ठीक आहे, पटकन तयारी करून कृतिकाच्या घरी ये! सर्वजण पोहोचत आहेत, आणि हो, घरी नाश्ता नको करू, मी कृतिकाच्या मम्मीला सांगितलंय नाश्ता बनवायला, खूप छान बनवतात.”
“सर्वजण पोहोचत आहेत म्हणजे? काही विशेष आहे का?” मी थोडं आश्चर्याने विचारलं. तर लगेच तिकडून विवेकचा आवाज आला, “तू ये, कॉलवरच चौकशी नको करू” असे बोलत विवेकने फोन कट केला. थोडा आळस देतच मी अंथरुणावरून उठलो आणि वाशरूमकडे वळलो.
आमचा पाच मित्र-मैत्रिणींचा ग्रुप. सायली, मी, कृतिका, विवेक आणि अभ्या (त्याचे नाव अभिजित आहे हे आम्हालाही आठवत नाही!) अगदी शालेय जीवनापासूनच आम्ही सोबत होतो. त्यामुळे आमच्या सर्वांच्या घरी आम्ही एवढे सहज होतो की, आमच्या पालकांपैकी कोणीच आम्हाला फॅमिलीच्या वेगळं समजत नसे.
त्यातही कृतिकाची मम्मी म्हणजे आमची हक्काची काकू. आमच्या स्वतःच्या आईनेही एवढे आमचे लाड पुरवले नसतील जेवढे कृतिकाच्या मम्मीने पुरवले.
वाशरूमवरून आल्यावर आणि सर्व तयारी झाल्यावर मी माझ्या आईला सांगितले की, मला कृतिकाच्या घरी जायचं आहे तिथे सर्वजण येणार आहेत, तर तू नाश्ता वगैरे बनवू नको मी तिकडेच करणार आहे.
असे म्हणत मी आपल्या टू-व्हीलरची चावी घेत घराबाहेर पडलो आणि गाडीला किक मारत रस्त्याने जाऊ लागलो. मनात सारखे विचार सुरू होते, कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र येणार होतो.
नुकतेच सगळ्यांनी आपल्या वेगवेगळ्या वाटा निवडल्या होत्या. विवेक आणि सायली हे दोघे पुण्यात IT कंपनीमध्ये जॉबला होते, तर कृतिका अजूनही मेडिकलचा अभ्यास करत होती.
अभ्याने मात्र आपल्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय अगदी चोखपणे सांभाळलेला होता. या पाचजणांमध्ये फक्त मीच ना जॉब करत होतो ना व्यवसाय. घराची शेती बघत स्पर्धा परीक्षा देत असल्यामुळे मला फार वेळ मिळत नसे.
डोक्यात विचार सुरू असताना मनात आनंदही होता. बऱ्याच दिवसानंतर सगळे एकत्र येणार होतो. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली, माहीतच होतं की हा कॉल विवेकचाच असेल; त्यामुळे कॉल न उचलता मी कृतिकाच्या घराजवळ आलो आणि गाडी उभी करत आत शिरलो.
तोच विवेकला मी दिसताच त्याने आरोळी ठोकली, “ये आला बघ, दिव्या!” (तसे माझे नाव दिवाकर, पण शॉर्टमध्ये सगळे मला “दिव्या” म्हणायचे). असे म्हणत माझ्याकडे बघून “किती वेळ लावतो रे” असे म्हणत सोफ्यावर थोडा बाजूला सरकला आणि मला बसायला जागा दिली. तोच मी सोफ्यावर बसून “काय झालं एवढं? एवढ्या तातडीने बोलावलं मला!”
तेवढ्यात कृतिका माझ्यासाठी पाणी घेऊन आली आणि बोलू लागली, “अरे, काही नाही! विवेक आणि सायली दोघांना पण सुट्ट्या आहेत ना, तर आपण कुठेतरी ट्रेकिंगसाठी जायचं म्हणतोय हा विवेक!”
मी विवेककडे थोडं रोषाने आणि थोडे डोळे मोठे करून, “कसे सुचतात रे IT वाल्यांना हे चोचले? माझ्यासोबत शेतावर ये आणि दोन-चार दिवस मला पाणी देऊ लाग गव्हाला..” मी असे म्हणताच किचनमधून सायली आणि अभ्याचा हसण्याचा आवाज येऊ लागला.
अभ्या किचनच्या दारावर येऊन माझ्याकडे थंब दाखवत “एकच नंबर भाई!” म्हणून परत आत गेला. कृतिका गालातल्या गालात हसत माझ्यासमोरचा ग्लास उचलून नेत होती.
विवेक माझ्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला, “तू दिवसभर निसर्गाचा आनंद घेतोस, तसं आम्ही नाही घेत. बिल्डिंगच्या जंगलात दिवसभर लॅपटॉपसमोर तोंड खुपसून बसावं लागतं.
म्हणून असं ट्रेकिंग-बिकिंगचं डोक्यात येतं. आणि दुसरी गोष्ट आहे की सायली आणि मी लग्न करणार आहोत, तर तिची इच्छा आहे की नवरा व्हायच्या आधी एक फ्रेंड म्हणून आपण सर्व मिळून कुठेतरी फिरायला जायचं आहे!”
ही गोष्ट ऐकताच एका क्षणासाठी कमालीची शांतता पसरली. मी सोफ्यावर बसलेल्या विवेककडे बघत होतो, तर कृतिका आणि काकूंची रिॲक्शन काहीच नव्हती; जणू त्यांना आधीच माहीत आहे.
काही क्षणाच्या शांततेनंतर किचनमधून अभ्याचा आवाज ऐकू आला, “हे कधी झालं?” तो किचनमध्ये सायलीकडे आश्चर्याने बघत होता. सायली खाली मान घालून गालात हसत थोडी लाजत होती.
मी विवेककडे आश्चर्याने बघत होतो, कारण एवढ्या वर्षांच्या सहवासात कधीच कोणाला असं जाणवलं नाही की विवेक किंवा सायलीच्या मनात प्रेमाची भावना फुलत असावी.
आणि कॉलेजमध्ये असताना सायलीला समीर (आमच्या वर्गातील टॉपर मुलगा) खूप आवडायचा. जरी ती कधी यावर व्यक्त झाली नव्हती, तरी ते आमच्या नजरेतून कधीच सुटलं नव्हतं.
मग हे अचानक विवेक आणि सायली एकमेकांच्या प्रेमात कधी पडले असतील? त्यांनी आपल्याला एकदाही सांगितलं का नाही? कारण जरी सोबत नसलो तरी कॉल, मेसेज, ग्रुप मेसेजवर कायम बोलणं व्हायचं.