Nishad Parva - Part 7 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | निषाद पर्व - भाग 7

Featured Books
Categories
Share

निषाद पर्व - भाग 7

             निषाद पर्व भाग ७

 

 

ज्यांच्याकडे पाहून आपल्या जवळच्या कातीव कोरीव इंद्रधनुष्यी रंग छटा असलेल्या धनुष्यांशी अन् नाजूक सुबक आखीव रेखीव बाणांशी तुलना करीत तुम्ही नाके मुरडून कुचेष्टा केलीत... तो कामठा नी ते तीरसुद्धा मी स्वतः बनविलेले होते. शस्त्रशाळेतील पोटार्थी कारागिरांनी घडविलेली नक्षीदार धनुष्ये आणि आखीव रेखीव बाण आयते वापरणाऱ्या तुला क्षत्रियालाया मागचे तत्व तरी कसे कळावे? धनुष्य हे स्त्री सारखे आहे. त्याच्या वरपांगी सौंदर्यावरुन त्याचे श्रेष्ठत्व ठरत नसते. ज्या धनुर्धराला तीरकामठा स्वतः बनविता येत नाही, तो शरसंधानातले कौशल्य कसे काय हस्तगत करणार...?"

"तिरकामठा स्वतःबनविल्यावरच लक्ष्यवेधातले खरे इंगित समजते. 'धनुर्विद्यारहस्या' सारख्या तुझ्या जडजंबाल ग्रंथराजांच्या वाटेलाही न गेलेला मी अक्षर शत्रू निषाद! पण तिरकामठ्याचे माझे शास्त्र मी बसविले आहे. माझा वेत्रकाष्ठापासून बनविलेला हा कामठा सात पेरांचा आहे. प्रत्येक पेरातील अंतर तर समान आहेच पण काष्ठाची गोलाईसुद्धा सारखी आहे. त्याची लांबी साडे सहा 'वितस्ती' आहे. लक्ष्यवेधामध्ये वध्य लक्ष्य,त्याचीशरीरस्थिती,धनुर्धरापासूनचेअंतर आणि वेध घेण्याचा प्रकार....म्हणजे त्याला जीवे मारायचे की फक्त इजा करायची,एखादाअवयव छेदावयाचा की केवळ बद्ध करायचे हे ध्यानात घेऊन काष्ठाची लांबी कमी जास्तअसावी लागते.साधारणपणे तीन भिन्न लांबीची काष्ठे उपयोगी पडतात. दरवेळी इतक्या प्रकारची काष्ठे बरोबर कशी वागविणार?म्हणून मी या पूर्ण लांबीच्या वेत्रकाष्ठाला दोन्ही बाजूंनी समान अंतरावर तीन/तीन छेद घेऊन सोईप्रमाणे कमी जास्त लांबीची प्रत्यंचा फक्त बदलतो."

"प्रत्यंचेसाठी घोरपडीच्या आणि गव्याच्या आतड्याचा वापर मी करतो. ही आखूड प्रत्यंचा घोरपडीच्या आतड्याची असून ती कंबरेभोवती वेष्ठून मी सोबत वागवितो. अर्थात अलिकडे प्रत्यंचा न बदलताही इष्ट परिणाम साध्य करायचे कसब अंगवळणी पडले आहे हे खरे! आता हे तीर पहा. या तीरांसाठी वापरलेले दंड १२ मुष्टी, ११ मुष्टी, ९ मुष्टी, ७ मुष्टी अशा भिन्न लांबीचे आहेत.त्यांची गोलाई अन् वजने ही कमी जास्त असावी लागतात. आखूड पल्ल्यासाठी जड तीर तर लांब पल्ल्यासाठी हलके तीर वापरणे इष्ट असते. शरचक्रातील तीर वजनाने अत्यंत हलके, पुच्छाची लांबी जास्त असलेले, तीक्ष्ण अग्रांचेआहेत.म्हणून ते अधिक काळापर्यंत आवर्तने घेऊ शकतात. तीरासाठी निवडावयाचा दंड पूर्ण वाढ झालेला, विशिष्टनक्षत्रावर तोडलेला असतो. तीरांची अग्रे सुद्धा परिणाम लक्षात घेऊन भिन्न धातूंची अन् आकारांची आहेत. सूचीकाग्र तीर पक्षांच्या मृगयेसाठी वापरतो.हा चंद्रकोरीच्या आकाराप्रमाणे अग्र असणारा तीर पहा. भूमीवर सरपटणारे जनावर त्याला इजा ही न पोचवता या तीराने स्थान बद्ध करता येते. अग्राची दोन्हीटोके भूमीत घट्ट रुतून सर्पवर्गीय प्राणी जागच्या जागी अडकतो. तीराचा मध्यभाग गुळगुळीत आहे.म्हणून सर्पाला इजा होत नाही पण त्याला मागे पुढे जाताही येत नाही."

"अर्जुना, माझ्या शरसंधानातले महत्त्वाचे इंगित तीराच्या पुच्छामध्ये आहे. पुच्छाची लांबी, वापरावयाची पिसे कोणत्या पक्षाच्या, कोणत्या अवयवाची हे मी अनुमानाने अन् अनुभवाने ठरविले आहे. गृघ्र, गरूड, ससाणा, हंस आणि कावळ्याची पिसे ही मी पुच्छासाठी वापरतो. पुच्छामध्ये अडकविलेली पिसे उलट सुलट दोन्ही दिशांनी कार्य करणारी आहेत म्हणून लक्ष वेध करून माझे तीर माघारी येतात; अर्थात तीर सोडतानाचे विशिष्ट तंत्र आहे. त्यामुळेही विशिष्ट अंतरावर लक्ष वेधकेल्यावर तीराला विरुद्ध दिशा मिळते. अर्जुना, ही सगळी तंत्रेतीं शिकलेल्या शास्त्राला सम्मत नसतीलही पण ती अनुभव सिद्ध आहेत. आम्हा निषांदाचा तिरकामठा प्राण ओतून सिद्ध केलेला असतो. म्हणून कोणताही निषाद प्रसंगी प्राण देईल पण स्वतःचा तिरकामठा देणार नाही. आमच्या जमातीत एखाद्या निषादाला मृत्यू आला की त्याच्या शवासोबत त्याच्या तिरकामठ्यालाही श्रद्धेने अन् सन्मानाने मूठमाती देण्याचा रिवाज आहे."

"अर्जुना! माझे श्वानमुखीचे शरसंधान पाहून गुरू द्रोणांच्या मार्गदर्शनाखाली त्याहीपेक्षा वरचढ अशी कौशल्ये प्राप्त करणे तुला सहज शक्य होते. पण तू मात्र माझा द्वेषच केलास, अन् परिणाम स्वरूप मला अंगुष्ठ गमवावा लागला. अर्जुना, त्यावेळी माझे काळीज तीक्ष्ण शराने विंधले असतेत तरी चालले असते परंतु सत्तामदाने बेहोश झालेल्या तुम्हा राजपुत्रांना मला सुखाने मरण देण्यापेक्षाही मला हतप्रभ करून असहाय्यतेने आयुष्यभर मरणभोग सहन करीत जीवनाच्या आनंदापासून वंचित करण्यातच अधिक स्वारस्य वाटले.अन्म्हणून माझा अगुंष्ठ छेदून माझा जणू जीवन रस शोषून कायमपणे निराशेच्या गर्तेत लोटून तुम्ही हास्य विनोद करीत निघून गेलात. पण अर्जुना! सृष्टीत जसे क्रौर्य आहे तशी करूणासुद्धा आहे. मला असहाय्य अगतिक करून तुम्ही अरण्याबाहेर गेला असाल नसाल... त्यावेळी तुमच्या मृगया क्रीडांमध्ये लक्ष्य वेध चुकल्यामुळे एक पंख अर्धवट तुटून लोंबत असलेल्या स्थितीतही उडणारे आंगठ्याएवढे पाखरू मला दिसले, अन् त्याच क्षणी माझ्या समोरचा अंधःकार दूर झाला."

    "अंगठा तुटला म्हणून काय बिघडले? प्रत्यंचेवर ठेवलेला तीर पकडण्यासाठी हाताच्या पंजावर केवळ दोन बोटे उरली तरी पुरेशी आहेत हा विचार...ही प्रेरणा त्या पंख छेदलेल्या पाखराने मला दिली. अर्जुना! तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगुली यापेकी कोणत्याही दोहोंचा उलट सुलट वापर करून मी तीर सोडू शकतो. एवढेच कशाला? डाव्या उजव्या कोणत्याही हाताचा वापर मी करू शकतो. अर्जुना! असा अचंबित होऊनकोस.माझ्या सगळ्या कसबांचे कथन अजून पूर्ण झालेले नाही. आता प्रत्यक्ष बघच!" (क्रमश:)