Antarman अंतर्मन in Marathi Motivational Stories by Jaidutt khile books and stories PDF | अंतर्मन - भाग 1

Featured Books
Categories
Share

अंतर्मन - भाग 1

अंतर्मन - भाग १ : खिशात ४३ रुपये

सकाळचे ८:३९ झाले होते. जग धावत होते. बाहेर गाड्यांचे हॉर्न, ऑफिसचे मेल, आणि लोकांची यंत्रवत गर्दी. पण या सगळ्या गोंगाटात एक आवाज असा असतो जो कोणालाच ऐकू येत नाही. तो आवाज माझ्या आतून येतो. त्याचंच नाव आहे - अंतर्मन.

बीडच्या बस स्टँड मागच्या चहाच्या टपरीवर जय उभा होता. टेबलावरच्या स्टीलच्या डब्यात त्याने सुटे पैसे मोजले. एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये... सगळे मिळून ४३ रुपये. 

४३ रुपयात आजच्या जगात काय येतं? कदाचित एक चहा आणि एक बिस्कीट. पण जयच्या डोक्यात मात्र ४३०० कोटींचा प्लॅन होता.

लोक त्याला वेडा म्हणायचे. "बीडमध्ये राहून कोणी अरबपती होतं का? पुण्याला जा, मुंबईला जा." पण जयला माहीत होतं, पुण्याला किंवा मुंबईला जाण्याआधी आधी मनात मोठं व्हावं लागतं.

त्याच्या टपरीत एक जुना आरसा होता. कपाटाला लावलेला. त्याची काच थोडी धूसर झाली होती. पण तो आरसा साधा नव्हता.

रोज संध्याकाळी जेव्हा टपरीवर गर्दी कमी व्हायची, तेव्हा जय त्या आरशासमोर उभा राहायचा. साधा खाकी कुर्ता, वाढलेली दाढी, डोळ्याखाली काळी वर्तुळं. हाच तो - बीडचा एक बेरोजगार पोरगा.

पण तो आरसा हलकेच धूसर व्हायचा. आणि त्यात दुसराच माणूस दिसायचा.

कोट, टाय, हातात सोनेरी घड्याळ. तोच चेहरा, पण डोळ्यात भूक नाही, आग आहे. आत्मविश्वास आहे. हसू आहे. तोच जय, पण अब्जाधीश झालेला जय.

"हा मीच आहे का?" जय पुटपुटला.

तेव्हा आतून आवाज आला. त्याचं अंतर्मन बोलत होतं.

अंतर्मन म्हणजे काय? ते काही पुस्तकात सापडणारी व्याख्या नाही. बाहेरचं मन जगाला दाखवण्यासाठी असतं. ते हसतं, ते "सगळं ठीक आहे" म्हणतं, ते व्हॉट्सअपवर Good Morning पाठवतं. पण अंतर्मन? ते कधीच खोटं बोलत नाही. ते आरशासारखं असतं. तिथे तू जसा आहेस, तसाच दिसतोस.

अंतर्मनाचे दोन चेहरे असतात. एक असतो खलनायकासारखा. तो सतत घाबरवतो. "तुझ्याने होणार नाही, तू फसशील, लोक काय म्हणतील?" हा आवाज आपल्याला लहान करतो.

आणि दुसरा चेहरा असतो नायकासारखा. तो हळूवारपणे म्हणतो - "थांब, विचार कर, तू वेगळा आहेस." हाच आवाज मला स्वप्न दाखवतो.

खालून आईने आवाज दिला - "जयदत्त, आरशात बघून काय होणार आहे? आरसा भाकरी देत नाही. खाली ये, गिऱ्हाईक आलंय."

जयने वही बंद केली. त्या वहीवर त्याने लिहिलं होतं - "माझी पहिली कंपनी."

त्याने आरशातल्या त्या श्रीमंत माणसाला बघून म्हटलं, "थांब, मी आलोच. चहा देऊन येतो. कारण अरबपती होण्याच्या आधी चहा विकावा लागतो, कधी कधी."

तो आरशातला माणूस खोटा नव्हता. तो त्याचं भविष्य होतं.

खिशात दुष्काळ होता, हे खरं होतं. पण मनात? मनात तर रोज कोटींचा पाऊस पडत होता.

आणि म्हणूनच, माझा सगळ्यात मोठा प्रवास नागपूर ते मुंबईचा नाहीये, तर माझ्या बाहेरच्या मन                       जय खाली उतरला. टपरीवर एक काका बसले होते. त्यांनी विचारलं - "काय रे जय, आज काय नवीन विचारात आहेस?"

जयने चहा बनवता बनवता म्हटलं - "काका, एक दिवस या टपरीवरूनच माझी कंपनी सुरू होईल. लोक इथे चहा प्यायला नाही, तर माझ्याकडून आयडिया घ्यायला येतील."

काका हसले. ते हसणं टोमणा नव्हतं, मायेचं होतं. "होईल रे. मनात आणलंस तर होईल. पण आधी हा चहा चांगला बनव."

जय हसला. त्याला माहीत होतं, मोठ्या स्वप्नांची सुरुवात छोट्या चहापासूनच होते. बाहेरचं जग त्याला आज चहावाला म्हणत होतं, पण त्याचं अंतर्मन त्याला उद्याचा उद्योगपती म्हणत होतं. हीच तर त्याची खरी ताकद होती.

आज खिशात ४३ रुपये होते, पण उद्या काय असेल हे त्याच्या अंतर्मनाला माहीत होतं.हाच तर खरा प्रश्न आहे - खिशातला दुष्काळ संपवायचा की मनातला पाऊस मोठा करायचा? जयने दुसरा रस्ता निवडला होता.कारण जय जिंकणार आहे हा त्याला आत्मविश्वास होता