Kaali Bahuli in Marathi Horror Stories by kalyan mhaslekar books and stories PDF | काळी बाहुली - भाग 5

Featured Books
Categories
Share

काळी बाहुली - भाग 5

काळी बाहुलीभाग ५ जुन्या घराची गोष्ट

आजीचे शेवटचे शब्द ऐकून निखिल काही क्षण तिथेच उभा राहिला. माळ्यावरच्या अंधाऱ्या खोलीत जुन्या लाकडाचा वास, ओलसर मातीचा गंध आणि बंद जागेत साचलेली कुबट हवा पसरली होती. त्याच्या हातातला मोबाईल थरथरत होता. कपाटाच्या वर ठेवलेली काळी बाहुली अजूनही त्याच्याकडे पाठ करून बसली होती. तिच्या पाठीवर लाल धाग्याने शिवलेलं गौरी हे नाव स्पष्ट दिसत होतं. पण आजी म्हणत होती की ती बाहुली गौरीची नव्हती. मग ती तिच्या नावाने इथे का ठेवली होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेशी तिचा नेमका संबंध काय होता.निखिलने हळू आवाजात विचारलं, आजी, तू म्हणालीस तो माणूस अजून जिवंत आहे. कोण आहे तो. आजीने लगेच उत्तर दिलं नाही. तिने जिन्याकडे पाहिलं आणि मग माळ्याच्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे. तिच्या चेहऱ्यावर अशी भीती होती जणू त्या माणसाचं नाव उच्चारलं तरी तो कुठूनतरी समोर येईल. ती शेवटी म्हणाली, त्याचं नाव घेतलं की जुनं सगळं परत जागं होतं. निखिलने विचारलं, पण मला खरं काय आहे  कळायला हवं. ही बाहुली माझ्या हातात का आली आहे. ती माझ्या मागे का लागली आहे. आता मी काहीही न कळता राहू शकत नाही.आजी काही क्षण शांत राहिली. मग तिने माळ्यावरच्या जुन्या कपाटाकडे पाहिलं. ती म्हणाली, त्या काळी गाव आजच्यासारखं नव्हतं. रात्री सगळीकडे काळोख असायचा. वीज नव्हती. लोक सूर्य मावळला की घरात बसायचे. आमच्या घराच्या मागे मोठं मोकळं मैदान होतं आणि त्याच्या पलीकडे वडाचं झाड. त्या झाडापासून पुढे कोणी जायचं नाही. पण गावात एक माणूस होता, जो रात्री तिथे जायचा. लोक त्याच्याबद्दल उघड बोलत नसत. पण लपून त्याच्या बद्दल चर्चा करायचे .त्याचं नाव रघुनाथ होतं.निखिलने विचारलं, तो काय करायचा. आजीने मान खाली घातली. कुणाला नीट माहीत नव्हतं. कधी देवळात बसलेला दिसायचा, कधी विहिरीजवळ. गावातल्या लोकांना त्याच्याबद्दल संशय होता, पण त्याच्याशी उघड वाद घ्यायला कोणी तयार नव्हतं. कारण त्याच्याकडे काही जुन्या वस्तू होत्या, आणि त्या वस्तूंचा संबंध काही विचित्र घटनांशी जोडला जात होता. आजी थांबली आणि हळू आवाजात म्हणाली, गौरी गायब होण्याच्या काही दिवस आधी रघुनाथ आमच्या घराजवळ आला होता.निखिलने विचारलं, तो गौरीला ओळखत होता का. आजीने होकार दिला. तो तिला नेहमी बोलवायचा. कधी फळ द्यायचा, कधी खेळणं. पण गौरी त्याच्यापासून लांब राहायची. एकदा तिने मला सांगितलं होतं की रघुनाथकाकांच्या घरात रात्री कुणीतरी रडतं. आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. लहान मुलं कधी कधी कल्पना करतात असं म्हणून  सगळ्यांनी तीच्याकडे दुर्लक्ष केलं.निखिलच्या मनात काळी बाहुली आली. त्याने विचारलं, मग ती बाहुली. आजीने हळूहळू उत्तर दिलं, गौरी गायब होण्याच्या तीन दिवस आधी तिने ती बाहुली मला दाखवली होती. ती कुठून आली हे तिलाही माहीत नव्हतं. ती म्हणाली होती की रघुनाथने तिला ती बाहुली दिली. पण दुसऱ्या दिवशी रघुनाथने सगळ्यांसमोर सांगितलं की त्याने गौरीला काहीही दिलं नाही. तेव्हा आम्ही गोंधळलो. गौरी मात्र सतत एकच गोष्ट सांगत होती. बाहुली स्वतःहून तिच्याजवळ आली.निखिल काही क्षण स्तब्ध झाला. त्याला त्या रात्रीचा विचार आला, जेव्हा बाहुली कपाटातून गायब होऊन पलंगाखाली सापडली होती. त्याने आजीकडे पाहिलं. तू तेव्हा त्या बाहुलीला पाहिलं होतंस का. आजी म्हणाली, हो. पण तेव्हा मला वाटलं होतं ती फक्त खेळणी आहे. मला काय माहीत होतं की त्या वस्तूमुळे पुढची अनेक वर्षं आमच्या घरावर भीतीची सावली राहणार आहे.माळ्यावर अचानक लाकूड चरकलं. दोघेही दचकले. निखिलने मोबाईलची टॉर्च फिरवली. अंधाऱ्या कोपऱ्यात काहीही नव्हतं. पण कपाटाच्या वरची बाहुली आता तिथे नव्हती. निखिलचा श्वास अडकला. तो पुढे झाला आणि खाली पाहिलं. बाहुली जमिनीवर पडलेली होती. तिचं तोंड आता जिन्याकडे होतं. जणू ती खाली जाणाऱ्या मार्गाकडे पाहत होती.आजीने निखिलला थांबवलं. तिला हात लावू नकोस. निखिलने तिच्याकडे पाहिलं. पण आजी, ती स्वतःहून इथे आली आहे. आपण तिच्यापासून पळत राहिलो तर हे कधी थांबणार. आजीने काही उत्तर दिलं नाही. तिने फक्त खाली जाण्यासाठी इशारा केला. दोघे हळूहळू माळ्यावरून खाली आले.खाली आल्यावर आजीने घराचा मुख्य दरवाजा बंद केला आणि सगळ्या खिडक्या तपासल्या. पहाट जवळ आली होती. आकाशाच्या कडेला फिकट प्रकाश दिसू लागला होता. निखिलला वाटलं की आता काहीतरी शांत होईल. पण घराच्या मागच्या खोलीतून पुन्हा आवाज आला. जणू एखादं लहान मूल जमिनीवर खेळण्याने काहीतरी आपटत होतं.टक.टक.टक.निखिल त्या दिशेने वळला.आजीने त्याचा हात पकडला. ती म्हणाली, अजून नाही. दिवस उजाडू दे. निखिल थांबला. काही वेळाने आवाज बंद झाला. सकाळी घरातले बाकीचे लोक उठले तेव्हा रात्री काय घडलं याची कुणालाच कल्पना नव्हती. निखिल मात्र संपूर्ण रात्र झोपला नव्हता.सूर्य वर आला तेव्हा आजी त्याला गावाच्या जुन्या मंदिरामागे घेऊन गेली. तिथे एक वृद्ध माणूस बसलेला होता. त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते आणि हातात जुन्या लाकडी काठीचा आधार होता. आजीने त्याच्याकडे पाहून सांगितलं, हा गणपत काका. यांना रघुनाथबद्दल बरंच काही माहीत आहे.गणपत काकांनी निखिलकडे बराच वेळ पाहिलं. मग त्यांच्या नजरेत भीती उमटली. त्यांनी विचारलं, तूच  ती बाहुली घरात आणलीस. निखिलने होकार दिला. गणपत काकांनी डोकं हलवलं. ते म्हणाले, मग वेळ पुन्हा फिरायला लागली आहे.निखिलने विचारलं, तुम्हाला या बाहुलीबद्दल काय माहीत आहे. गणपत काका काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. चाळीस वर्षांपूर्वी गौरी गायब झाली त्या रात्री गावात आणखी एक माणूस गायब झाला होता. रघुनाथ. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला. त्याच्या कपड्यांवर चिखल होता आणि हातावर खोल ओरखडे होते. लोकांनी विचारलं तरी त्याने काही सांगितलं नाही. फक्त एकच वाक्य म्हणाला, ती वस्तू पुन्हा कुणाच्या हातात गेली तर गावात शांतता राहणार नाही.निखिलने विचारलं, कोणती वस्तू. गणपत काकांनी त्याच्याकडे सरळ पाहिलं. तीच काळी बाहुली.निखिलच्या अंगावर काटा आला.गणपत काका पुढे म्हणाले, आम्ही सगळ्यांनी वडाखाली शोध घेतला. पण बाहुली सापडली नाही. काही दिवसांनी रघुनाथ गाव सोडून गेला. गौरी मात्र परत आली नाही. तिचं शरीरही कधी सापडलं नाही. त्यामुळे लोकांनी हळूहळू ती गोष्ट विसरून जाण्याचा प्रयत्न केला.निखिलने विचारलं, मग माझ्या आजीचा यात काय संबंध आहे.गणपत काकांनी आजीकडे पाहिलं. आजीने नजर खाली केली.गणपत काका म्हणाले, हा प्रश्न तू तिलाच विचार. कारण गौरी गायब होण्याच्या रात्री शेवटची व्यक्ती जिच्यासोबत ती दिसली होती, ती तुझी आजी होती.निखिलला जणू कुणीतरी छातीत जोरात ठोसा मारल्यासारखं वाटलं. त्याने आजीकडे पाहिलं. आजीच्या डोळ्यांत अश्रू आले होते.निखिल म्हणाला, तू मला हे का सांगितलं नाहीस.आजी काही बोलली नाही.गणपत काका हळू आवाजात म्हणाले, कारण तुझी आजी त्या रात्रीपासून एकच गोष्ट सांगत आली आहे. तिने गौरीला वडाखाली नेलं नव्हतं. पण गौरीच्या हातातली काळी बाहुली तिने स्वतः तिच्याकडून घेतली होती.निखिलने आजीकडे पाहिलं.आजीने डोळे बंद केले.आणि पहिल्यांदा तिच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले.हो, निखिल. गौरी गायब होण्याच्या आधी काळी बाहुली माझ्या हातात होती.निखिल काही बोलण्याआधीच मंदिराच्या मागच्या झाडीतून एखाद्या मुलीच्या हसण्याचा आवाज आला.दोघांनीही त्या दिशेने पाहिलं.झाडीत कोणीही नव्हतं.पण मातीवर एक लहान काळा पायाचा ठसा उमटला होता.मग त्याच्या शेजारी दुसरा ठसा उमटला.गणपत काकांच्या चेहऱ्यावरची भीती पाहून निखिलला समजलं की हे त्यांच्यासाठीही नवीन नव्हतं.गणपत काका कुजबुजले, ती इथे आली आहे.निखिलने विचारलं, कोण.गणपत काकांनी उत्तर दिलं नाही.झाडीतून पुन्हा तोच मुलीचा आवाज आला. यावेळी आवाज खूप जवळून आला.माझी बाहुली परत दे.आजी अचानक मागे सरकली.निखिलने तिच्याकडे पाहिलं.आजीच्या डोळ्यांत अश्रू होते.पण ती घाबरलेली नव्हती.ती जणू एखाद्या जुन्या आठवणीसमोर उभी होती.तिने हळू आवाजात निखिलला सांगितलं, ही बाहुली मी त्या रात्री गौरीकडून घेतली होती. पण मी ती कुठे पुरली, हे आजपर्यंत कुणालाच माहीत नव्हतं.निखिलने थरथरत विचारलं, मग ती वडाखाली कशी आली.आजीने त्याच्याकडे पाहिलं.मला माहीत नाही.पण निखिल, जर ती बाहुली तुझ्या हाताने पुन्हा बाहेर आली असेल, तर गौरी आता फक्त बाहुली मागायला आलेली नाही.इतक्यात झाडीतून जोरात फांदी तुटल्याचा आवाज झाला.निखिलने त्या दिशेने टॉर्च टाकली.काहीच नव्हतं.पण जमिनीवर ताजी माती दिसत होती.त्या मातीत एक जुना काळा धागा पडला होता.आजीने तो पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला.ती कुजबुजली, हा धागा मी स्वतः तिच्या हाताला बांधला होता.निखिलने धाग्याकडे पाहिलं.धाग्याच्या टोकाला माती चिकटलेली होती.आणि त्या मातीतून एक छोटासा कागदाचा तुकडा बाहेर दिसत होता.निखिलने तो उचलला.कागदावर फक्त चार शब्द लिहिले होते.आजीने मला पुरलं होतं.क्रमश: