आम्ही ते मी चा प्रवास - 1 in Marathi Drama by mimi books and stories PDF | आम्ही ते मी चा प्रवास - 1

The Author
Featured Books
Categories
Share

आम्ही ते मी चा प्रवास - 1

   नमस्कार मी मिनल. माझ्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी घडल्यात त्यातली ही एक. माझ्या घरात मी आई- बाबा, दादा वाहिनी आणि त्यांची दोन मुलं असे राहतो. दादा- वहिनी त्यांच्या मुलांमध्ये आणि आई बाबा त्या चौघांमध्ये खुश आहेत. मी पण खुश आहे पण मी त्यांच्यात येत नाही काय करणार लहानपणी भरपूर लाड झालेत अस म्हणून आता माझ्याकडे जरा कमी लक्ष असत. असो हे होत माझं घर आता माझ्या मित्र- मैत्रिणींची ओळख करून देते. माझा एक छान ग्रुप आहे ज्यात दोन मुली, चार मुलं आणि मी असे आम्ही सात जण आहोत. सगळे नमुनेच आहेत सांगते अगदी एकापेक्षा एक.   

    पहिली नेहा अगदी शांत स्वभावाची पण आमच्यासोबत असली की आमच्या डोक्याला होणारा एक ताप. तिला सगळ्या मुलांच्या खबरा असतात. सहा सात वर्ष ज्यांच्याशी संबंध, संपर्क नसतो तरी त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे ते तिला अगदी बरोब्बर समजायच. थोडक्यात आमची खबरी.   

    दुसरी कावेरी, जसं नाव आहे त्यापेक्षा खूप विरुद्ध तिला हे नाव शोभत नाही हे तिलाच कळलं म्हणून स्वतःच पेट नेम म्हणून ती स्वतःला 'किवी' म्हणते. हे आमचं सार्वजनिक फुलपाखरू म्हणजेच सोशल बटरफ्लाय थोडक्यात जिथे जाल तिथे ह्यांची ओळख. अगदी चप्पल दुरुस्त करणाऱ्यापासून ते सोनाऱ्यापर्यंत. हिचा एक प्रियकर होता पण जिथे जायचा तिथे त्याला हेच विचारायचे 'तू किवी चा प्रियकर ना?' ह्या प्रश्नाला उत्तर देऊन देऊन शेवटी कंटाळून त्याने हिला सोडलं. जरी खोट वाटत असलं तरी हेच खर आहे.   

      तिसरा सौरभ, प्रत्येक मुलीच्या मुखी असलेले हे एक नाव, तसा आहेच तो देखणा, सुंदर मुलींचा आदर करणारा, काळजी घेणारा अगदी स्वप्नातल्या राजकुमारा सारखा .पण अतिशय पापी माणूस त्याचा पापांचा घडा नाही तर ड्रम होता. तोही कधीही न भरणारा जिथे जाईल तिथे पाप करायचा. आमची भेटही झाली ती सुद्धा ह्यानी केलेल्या या पापामुळे एकतर त्याची ती चुकीच्या ठिकाणी चुकीची म्हण वापरण्याची सवय. त्याला म्हणी माहिती आहेत पण यांचा अर्थ नाही तर काहींचा अर्थ माहिती आहे पण म्हण नाही. त्याला साधी, सरळ उत्तर देता येतच नाही काही ना काही उलटं बोलायचचं असत.

    चौथा माधव उर्फ मॅडी. अगदी महान व्यक्ती घरच्यांच्या शब्दाबाहेर न जाणारा हा मनुष्य. कुठे जायच ठरलं की ह्याच सुरू व्हायचं' घरी विचारावं लागेल ते जा म्हणाले तर मी येईन नाही तर तुम्ही जा' पण आम्ही त्याला उचलून गाडीत बसवायचो, नाही तर' इथेच जायचंय मॉल मध्ये' म्हणून न्यायचोत आणि हो हाच मनुष्य आमच्या पेक्षा जास्त ट्रिपचा आनंद घ्यायचा.

      पाचवा पंकज उर्फ पक्या. अतिशय मस्तीखोर आणि हसता खेळता राहणारा प्राणी मी आणि हा स्वतःला बहिण- भाऊ म्हणायचोत. सगळ्यात जास्त आमची भांडण व्हायची आणि ती सुद्धा शुल्लक कारणावरून जसे एका बिस्किटावरून, आधी घराबाहेर कोण जातय, एखाद दिलेल काम टाळण्यावरून आणि बरंच. त्याला एक बहीण आहे पण ती लहान आणि गोड असल्यामुळे तिला कधी टपली मारावी अस त्याला वाटलं नाही आश्चर्य आहे ना पण हे खरय कारण त्याला जर राग आला तर तो माझ्याशी भांडण करून हात साफ करायचा. बावळट.   

     सहावा सचिन म्हणजेच सच्या. हा मात्र जरा शांत होता. नेहासारखा नाही तर हा मुळातच शांत स्वभावाचा कधी कधी आम्हाला वाटायचं हा माणूस आमच्यासारख्या जनावरांमध्ये राहतो कसा पण नंतर समजू लागले कि ह्याची गरज होतीच तशी. काही कांड झाला कि बाहेर पडायचा रस्ता म्हणजे सचिन. ह्याच्याकडे आमच्यापेक्षा चार पैसे जास्त असायचे पण त्या गोष्टीचा कधी गर्व नाही केला उलटं हलकट आमच्यासोबत फिरायचे ठरल्यावर आहेत त्यातले पैसे पण कमी करून सांगायचा पण सगळ्यांना त्यात पण मजा यायची.  

      आणि सातवी मी मिनल मी कशी आहे हे सांगितलच नाही. मी अगदी नाजूक मनाची. कोणी माझ्यावर आवाज वाढवला तरी लगेच डोळ्यांतून पाणी येत, पण तोंडावर ताबा नाही जे आहे खरं खोटं तोंडावर बोलून मोकळी होते आणि म्हणून या सहा जणांशिवाय माझ कोणी नाही. थोडी रागीट, प्रेमळ पण प्रेम सुद्धा रागातूनच व्यक्त करते मला ना व्यक्त होता येत नाही मी माझं मत सांगू शकते पण मनात काय चाललय ते नाही. अतिविचार करणारी आणि स्वतःला self independ म्हणणारी मी. 

  ही होती नमुन्यांची ओळख आता पुढे काय होतंय ते पाहूया पुढच्या भागात.