Katha ek mrugajkachi - 1 books and stories free download online pdf in Marathi

कथा एक मृगजळाची - 1

मृगजळ हा शब्द प्रत्येकाच्या परीचयाचा असेलंच. वाळवंटाच्या तप्त वातावरणात, जिथं दूर पर्यंत पाण्याच्या एका थेंबाचाही अस्तित्व नसतो. अशा ठिकाणी आपल्याला पाण्याचा संपुर्ण स्रोत असल्याचा भास होतो. असाच काही अनुभव मी घेतला. पण तो अनुभव वाळवंटातल्या मृगजळाचा नव्हे, तर माझ्या वाळवंटा समान आयुष्यात आलेला प्रेम नावाच्या मृगजळाचा आहे. कदाचित तुमच्या पैकीही काही जणांनी असा अनुभव घेतला असेल. एखादा व्यक्ती आपल्या सोबत आहे, आपल्यावर प्रेम करतो, असं आपल्याला काही क्षणासाठी वाटतं खरं, पण जस जसं आपण त्या व्यक्तीच्या हृदयाच्या समीप पोहोचतो, तस तसं आपल्याला कळतं की ते प्रेम, ती आपुलकी फक्त आपल्या बुध्दीला झालेला भास आहे. आपल्या डोळ्यांनी पाहिलेला फक्त एक मृगजळ आहे. आपल्याला दिसणारा सुंदर विश्व म्हणजे फक्त मृगजळाप्रमाणे डोळ्यांचा भास आहे. तो आपल्या जवळ आहे, पण तो अस्तित्वात नाही. आपल्या बुध्दीला सर्व प्रथम या गोष्टी कळतात पण आपले मन ते मान्य करत नाही. आपलं मन भ्रमात राहण्याची ईच्छा करतो. बुध्दी त्याला प्रत्येक वळणावर सावध करते. मनाला सर्व काही कळतं, पण न कळाल्या प्रमाणे चुकत राहतो. ज्या क्षणी त्याने पाहिलेल्या भासात आणि सत्यातला फरक कळतो तेव्हा ते मन शरीर स्वरुपी खोलीत एका कोपर्-यात रुसुन बसतो. त्या हृदयाची अवस्था काय असते, तो हृदय काय विचार करतो, हे फक्त त्यालाच कळतं ज्याच्या हृदयाने याचा अनुभव केला असेल. प्रत्येकाला आयुष्यात असे अनेक मृगजळ पाहायला मिळतात.

सर्वप्रथम मी माझी ओळख करुन देतो. मी अमन मेहेता. सुंदर अशा जगा नंतर आलेल्या त्या अंधाराला कंटाळून, हताश होऊन आत्महत्या करायचा विचार केला होता. पण आत्महत्येचा प्रयत्न असफल ठरला. त्या प्रयत्नात मी जवळ जवळ मेलोच होतो. पण नशिब माझं असं होतं की मी अजूनही जिवंत आहे. माझा मित्र संतोष, याला माझी खुप काळजी होती. म्हणून या सगळ्या प्रकारामधून मला कायमचा बाहेर काढण्यासाठी एका वकीलाला माझ्याकडे पाठवलं. ती वकील सुनंदा कोठारी. ती या प्रकरणातून कायद्याच्या क्षेत्रात पदार्पण करणार होती. तिला फक्त मला त्या कायद्याच्या फंद्यात अडकण्यापासून वाचवायचे होते. माझ्या बाजूने लढून ती खरंतर एका गुन्हेगाराला वाचवत होती. हे तिला माहित होते. पण तिचा उद्देश गुन्हेगाराला वाचवने हे नसून, स्वतःच्या करीयरला सुरुवात करने हे होते. त्यासाठी तिने मला भेटायला बोलवले.

ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. किती विचित्र होतं, मला तो केस हारुन स्वतःचं आयुष्य संपवायचं होतं आणि तिला तो केस जिंकून आयुष्याला सुरुवात करायची होती. तिला. माझं आयुष्य संपल्यात जमा होतं. पण तिच्या आयुष्याला चांगली सुरुवात मिळावी म्हणून मी तिला हवी असणारी सर्व मदत करायचं ठरवलं. तिला केस जिंकण्यासाठी माझ्या बद्दल सर्व काही माहिती हवी होती आणि मी तिला माझ्याबद्दल सांगायला सुरुवात केले.

  • अमन मेहेता
  • ***

    मी त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं. त्या पोलीस स्टेशनमध्ये अजींक्य होता. अंजीक्य म्हणजे माझा जुना शत्रू होता. इतका जुना की आता त्याला माझी ओळखही राहिली नव्हती. तो मला पुर्णतः विसरुन गेला होता. तशा तो बर्-याच गोष्टी विसरला होता. मी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा पोहोचलो तेव्हा तो अजींक्य त्याच्या केबीनमध्ये पाकीटातला त्याच्या बायकोचा फोटोकडे एकटक पाहत होता. मी त्या केबीन बाहेरच्या लाकडी बाकावर बसलो होतो. केबीनच्या दाराच्या फटीतून तो मला स्पष्टपणे दिसत होता. अजींक्य हा खरासवाडी पोलीस स्टेशनचा सब इंस्पेक्टर होता. त्याच्या भूतकाळातल्या काही आठवणी त्याला आठवल्या असाव्या. त्या आठवणींना आठवत असताना, टेबलावरच्या फोनची घंटी वाजली. त्याने फोन उचलला. फोन त्याच्या सिनीअर इंस्पेक्टर महेश गायकवाडचा होता.

    “हॅलो,... गुड मॉर्नींग सर...”

    फोन उचलून अजींक्यने बोलायला सुरुवात केली.

    “... हो सर, मी थोड्या वेळात निघणार आहे.... पुर्ण प्रोटेक्शन मिळेल, त्याची काळजी करु नका... फक्त सर रॅलीचा किती वाजता चालू होणार ते तुम्हाला विचारायचं राहून गेलं होतं सर.... ओके सर, मी अर्ध्या तासात पोहोचतो तिथं...”

    अजींक्यने फोन ठेवला आणि टेबलावरची बेल वाजवली. बेलच्या आवाजाने हवलदार डोहिफोडे त्याच्या केबीनमध्ये गेले.

    “मी अर्ध्या तासात रॅलीच्या तय्यारीसाठी जाणार आहे. काकडे हवलदारांना सांगा सामान काढून गाडीत ठेवा आणि त्यांना माझ्या सोबत यावं लागेल हेही सांगा.”

    त्यांच्या बोलण्याचा आवाज मला बाहेर येत होता. दार अर्ध उघडं होतं त्यामुळे आत काय चाललं आहे तेही दिसत होतं. होकारार्थी मान हलवून डोहिफोडे हवलदार बाहेर निघून आले. त्यांच्या बाहेर येताच शिंदे हवलदार केबीनमध्ये गेले.

    “सर, एक मानुस आलाय. त्याला खुनाची तक्रार करायची आहे.”

    “खुनाची तक्रार.... खुनाबद्दल त्याला काय माहिती असेल तर ती लिहून घ्या आणि पंचनाम्याची कागदं तैयार ठेवा.”

    “ सर तो म्हणतोय, खुनाबद्दलची माहिती द्यायची आहे, पण तो ती माहिती फक्त तुम्हालाच देणार आहे. मला तो काहीही सांगायला तय्यार नाही.”

    अजींक्य कोड्यात पडला. एक व्यक्ती खुना बद्दलची माहिती कोणालाही न सांगता फक्त त्याला सांगणार होता. त्यामागील त्या मानसाचा काय उद्देश असा याचा तो विचार करू लागला.

    “सर, मला तो थोडा वेडा वाटतोय. तो याच्या आधीही एकदा आपल्याकडं आला होता. त्याला तुरुंगात राहायचं होतं. त्यावेळी त्याने स्वतः चोरी केल्याचे कबूल केले होते. पण त्याच्याकडे चोरीचा सामान मिळाला नाही आणि त्याच्या विरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदवलेली नव्हती. त्यामुळे त्याला परत पाठवला होता. आणि आताही खुना बद्दलची माहिती सांगायला आला आहे आणि खुशाल हसतोय जणू त्याला खुन झाल्याचा आनंद झाला असावा. तक्रार करायला आला आहे आणि मला तक्रार लिहूनच देत नाहीये. फक्त म्हणतोय की मी सब इंस्पेक्टर अजींक्य यांनाच सांगणार...”

    केबीनच्या दाराच्या फटीतून अजींक्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला -

    “कोण आहे तो. बोलवा त्याला आत.”

    शिंदे हवलदार बाहेर आला आणि मला आत जाण्याचा इशारा करुन तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. मी २८ वर्षाचा तरुण, लहान केस आणि भरदार मिश्या आणि दाढी. मला पाहून कोणालाही मी जुन्या पिक्चर मधला डाकू असल्याचा भास होऊ शकतो. माझ्या पर्सनॅलीटीला खलनायकच शोभला असता असा माझा चेहेरा होता. मी केबीनमध्ये गेलो आणि टेबलाच्या आलीकडे असलेल्या खुर्चीवर बसलो. मी माहिती फक्त अजींक्यला सांगणार होतो. आणि इतरांना तसंही माझ्या माहितीत जास्त इंटरेस्ट नसल्यासारखे बाहेर काम करणारा प्रत्येकजण स्वतःला व्यस्थ असल्याप्रमाणे दाखवत होता. अजींक्यने आधी दोन मिनीट माझे निरीक्षण करण्यात घालवले. आणि निरीक्षण करुन झाल्यावर त्याने विचारले.

    “तर... नाव काय आहे तुझं?”

    “अमन... अमन मेहेता...”

    तो माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होता. पण तो मला ओळखु शकणार नाही याची मला खात्री होती. त्याच्या मनात एक शंकाने जन्म घेतला होता. आणि कदाचीत त्याच्या शंकाचे निरसण त्याने स्वतःनेच केले असावे.

    “तुला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतयं... तू या आधी मला कधी भेटला होता का?”

    “मी या आधीही तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो... पण ते महत्त्वाचं नाही. मी आज इथं एका खुन्याच्या विरोधात तक्रार करायला आलो आहे...”

    अजींक्य माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता. ज्या समाजात खुन झालेलं पाहिल्यानंतर मानसं काहीही न पाहिल्यासारखं वागतात, पोलीस – कोर्ट कचेरी पासून लांब पळतात, आपल्याला शिक्षा होईल म्हणून घाबरतात, अशा समाजातला एक व्यक्ती आपण खुन्या विरुध्द तक्रार करायला आलो आहोत असं सांगतो. हे त्याच्यासाठी विचित्र होतं, विश्वास न ठेवता येण्यासारखं होतं.

    “म्हणजे तुला खुनी कोण आहे ते ही माहित आहे?”

    “खुनी कोण आहे, कोणाचा खुन केला, कधी केला, कसा केला आणि खुन करुन मेलेल्यांच्या डेड बोडीझ् कोठे लपवल्या... सर्व काही माहित आहे”

    माझं बोलणं ऐकल्यावर अजींक्यला असं वाटलं असावं, माझ्या माहिती दिल्यानंतर ते खुनीला काही तासातच पकडून आणतील आणि तुरुंगात टाकतील. पण त्यांना केस जेवढा साधारण आणि सरळ दिसत होता त्याही पेक्षा साधा, सोप्पा होता.

    “तुझ्याकडे खुन्या विरुध्द पुरावे तर आहेत ना... आणि तुला एवढं सगळं कसं माहिती झालं... तू खुन होताना पाहिलंस का?”

    मी त्याला त्यानंतर जे काही सांगितलं त्यानंतर त्याचे डोळे विस्फारले. मी हसून म्हणालो -

    “खुन्या विरुध्द पुरावे कशाला हवेत, खुनी स्वतः इथं येऊन तुमच्या समोर, त्याने केलेल्या खुनाची माहिती देतोय आणि स्वतःने केलेला गुन्हा कबुल करतोय.... तुम्हाला आणखि काय हवयं?”

    माझ्या वाक्याने अजींक्य हादरला. त्याचं काम मी इतकं सोप्प करुन दिलं होतं की त्याला जास्त काहीही करावं लागणार नव्हतं. पण एक मानसाची मानसिकताच असते की ज्या गोष्टी त्याला विना मुल्य मिळतात त्याची किम्मत राहत नाही आणि त्याच्यावर संशय केला जातो. इथंही तेच झालं. त्यालाही माझ्यावर विश्वास बसला नाही.

    “तुला असं बोलायचं आहे की तू खुन केलास आणि स्वतःचीच तक्रार करण्यासाठी तू इथं आला आहेस?”

    “हो, मी तेच तर सांगतोय. मी माझ्या एका मैत्रिणीचा खुन केला आहे, काल संध्याकाळी... ”

    “कोणत्या मैत्रिणीचा खुन केला?”

    “मी माझी मैत्रिण होती. तिचं नाव निधी आहे. ती माझ्या सोबत कॉलेजमध्ये शिकत होती. तिच्याबद्दल माझ्या मनात खुप राग होता. तिने काही वर्षांपुर्वी माझा अपमान केला म्हणून मग काल संध्याकाळी त्या अपमानाचा बदला मी तिला मारुन घेतला. तिला मारुन तिच्या डेड बॉडीला मी माझ्या बंगल्याच्या लॉनमध्ये पुरुली आहे.”

    “पण तू तिचा खुन का केलास... म्हणजे असा कोणता अपमान झाला होता...?”

    “त्याच्या मागे एक कारण होतं ... खुप मोठी स्टोरी आहे. तिने माझा असाकाही अपमान केला की मी तो मी पचवू शकलो नाही. त्याचाच सुड घेतला मी.”

    “कसला अपमान ते मी विचारतोय?”

    “ती माझ्याशी खोटं बोलली होती...”

    “...आणि या कारणामुळे तू तिचा खुन केलास?”

    अजींक्य माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता. त्याला माझं कारण शुल्लक वाटत असावं...

    “का?... एवढं कारण पुरेसं नाहीये का त्याचं खुन करण्यासाठी?”

    मी माझी शंका व्यक्त केली होती. माझ्या बोलण्याच्या पद्धतीवरुन आणि माझ्या त्या वागण्यावरुन त्याने मला बुध्दी भ्रष्ट झालेला व्यक्ती समजलं असणार. तो माझ्या मुर्खपणाची जणू परीक्षाच घेत होता.

    “तू आता पर्यंत एकून किती खुन केलेस?”

    “मी आता पर्यंत कोणालाही मारलं नव्हतं... पण प्रतिशोध घेण्यासाठी मी तिचा खुन केला.”

    “अरे वेड्या, तुला कळतंय का तू काय बोलतोय. हा केवढा मोठा गुन्हा आहे तुला कळतंय का?. तुझ्यावर सिग्नल तोडल्याचा खटला नाही, खुनाचा खटला चालू होईल. तू स्वतःवर लावलेले आरोप सिध्द झाल्यावर तुला न्यायालयात कठोर शिक्षा मिळेल... तुला जाणीव तरी आहे का तू काय बोलतोयस..”

    अजींक्य मला खुप गंभिरतेने समजवत होता पण मी मात्र त्याचं ऐकुन घेण्याच्या मुडमध्ये नव्हतो.

    “तेच तर मी तुम्हाला सांगतोय. मी केलेला गुन्हा हा खुप सिरीअस आहे. तुम्ही मला गांभिर्याने का घेत नाहीये. मला जेल मध्ये टाका, मला दंड द्या.”

    त्याने दोन मिनीटे विचार करण्यासाठी घेतली. कदाचित त्यावेळी हवलदार शिंदेंनी सांगितलेली गोष्ट त्याला आठवली असेल. तो माझ्या बोलण्यावरुन फक्त मला तुरुंगात टाकणार नव्हता म्हणून तो मला म्हणाला –

    “मिस्टर अमन मला कळालं तुम्ही का खुन केलंत ते. पण जो पर्यंत आम्हाला डेड बॉडीझ् मिळत नाहीत तो पर्यंत आम्हाला कोणावरही मर्डरच्या आरोपाखाली खटला दाखल करू शकत नाही.”

    “ मग मी कुठं नाही म्हणतोय... मी दाखवतो की तुम्हाला डेड बॉडी...”

    अजींक्यला माझ्यावर संशय येत होता. त्याला वाटंत होतं, मी खुन केलेच नसेल, मी फक्त त्यांचा समय व्यर्थ करण्यासाठी आलो आहे किंवा माझ्या वय्यक्तीक स्वार्थासाठी मी तुरुंगात जाण्याची इच्छा करत आहे. पण मी सांगितलेल्या जागेवर जाऊन डेड् बॉडी आहे की नाही हे पाहणेही गरजेचे होते. म्हणून मग त्याने मनातल्या मनात एक निर्णय घेतला आणि मला म्हणाला -

    “चालेल तर आधी तुमची माहिती हवलदारला द्या. ते तुमची माहिती लिहून घेतील आणि त्यानंतर तुमच्या सोबत दोन हवलदार तुमच्या बंगल्यावर येतील. त्यांना तुम्ही डेड बॉडी दाखवा. त्यानंतर आम्ही त्या डेड बॉडी आमच्या ताब्यात घेऊ आणि तुमच्यावर खुनाचा खटला चालवू. तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या बाकावर बसा.”

    मी काहीही न बोलता केबीनच्या बाहेर आलो. मी बाहेर येत असताना अजींक्यने त्याच्या टेबलवर ठेवलेली बेल वाजवून हवलदार शिंदेला त्याच्या केबीनमध्ये बोलवले.

    “बाहेर बसलेल्या त्या मानुसाने सांगितलं की त्याने त्याच्या मैत्रिणीचा खुन केला आहे. आणि त्याची तक्रार करायला तो आपल्याकडं आलाय. त्याने खुन करुन डेड् बॉडी कुठं ठेवली आहे, ती जागा तो आता दाखवणार आहे. मला रॅलीच्या तय्यारीसाठी जायचं आहे. तर एक काम करा. हवलदार डोहिफोडेला घेऊन त्याच्यासोबत त्याच्या बंगल्यावर जावा. तसं तिथं काहीही मिळणार नाही. कारण हा व्यक्ती मला पक्का वेडा वाटतोय. तरी सुध्दा त्याच्या सोबत जाऊन पाहून या. आपण आपली ड्युटी पुर्ण करायची म्हणून... जर त्याच्या बंगल्यावर काहीही सापडलं नाही तर त्याला दोन फटके मारुन, त्याला परत पोलीस स्टेशनकडे पाहू सुध्दा नको, असं बजाऊन सांगा.”

    “सर, मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं, हा मानुस वेडा आहे आणि याला काहीही करुन जेलमध्ये जायचं आहे... आधी वाटलं दोन दिवस जेलमध्ये टाकून तर्ड डिगरी द्यावी. त्याने याचं डोकं ठिकाण्यावर येईल. पण मला हा मानुस पैशावाला दिसतोय. उगच उद्या हि बातमी मिडीयामध्ये गेली तर आपली वाट लागेल. म्हणून त्या दिवशी याला मी हाकाललं होतं... आता जाऊन बघतो... काय नवीन नाटक आहे ते...”

    असं म्हणून हवलदार शिंदे बाहेर निघून आला.

    शिंदे आणि डोहिफोडे, ही दोघं हवलदार मी सांगितलेल्या पत्त्यावर निघाले. सोबत फावडा, कुदळ घेतले होते मी त्यांना माझा बंगला दाखवला. माझ्या बंगल्याचा आकार पाहून त्यांचे डोळे मोठे झाले. त्यांना कळून चुकले की मी जरी वेडा वाटत असलो तरी कोणी साधारण मनुष्य नाही. माझा बंगला पांढरा शुभ्र आणि भला मोठा असा होता. आजूबाजूला घरे नव्हती. शहरापासून काही अंतरावर असलेल्या त्या बंगल्याचे परीसर लांबच लांब पसरलेला होता. बंगल्याच्या समोर गेटपर्यंत जाणारा सिमेंटचा रस्ता होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या झाडांनी सजवलेला बगीच्याप्रमाणे लॉन होता. मी त्या हवलदारांना लॉनच्या मधोमध घेऊन आलो. तिथं जवळंच एक छोटसं नारळाचं झाड होतं. मी हवलदारांना त्या नारळाच्या झाडाखालील जमीनीकडे हात दाखवून म्हणालो -

    “या झाडाखाली मी निधीची डेड बॉडी पुरली आहे. तुम्ही खोदून पाहा.”

    त्यांनी सोबत आनलेल्या अवजारांनी खोदायला सुरुवात केली. मी शेजारी उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता. तेही मला काही बोलले नाही. बोलणार तरी काय. मी एवढा श्रीमंत होतो की मला ते खड्डा खोदण्यात मदत कर असं म्हणनार तरी कसे. बर्-याच वेळापर्यंत खोदूनही त्यांना काहीही सापडले नाही. खड्ड्याची खोली वाढतंच चालली होती. पण आत माती आणि दगडांशीवाय काहीही सापडलं नाही. जसं सब इंस्पेक्टर अजींक्यने सांगितले होते त्याच प्रमाणे मी वेडा आहे याची त्यांना प्रचीती आली होती.

    ‘....डेड् बॉडी जर सापडल्या नाही तर दोन फडके मारा आणि परत पोलीस स्टेशनकडे पाहू सुध्दा नको असं बजाऊन सांगा.’ – असं सब इंस्पेक्टरानी पोलीस स्टेशनमधून निघताना त्यांना सांगितलं होतं. पण एवढ्या मोठ्या मानसाला मारायचं आणि ओरडायचं कसं, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. दोन्ही हवलदार एकमेकांकडे पाहून हाच विचार करत होते. ते विचार करत असताना मी खड्ड्यात उतरला आणि आश्चर्याने मातीला हाताने बाजूला करत म्हणाला -

    “हे कसं शक्य आहे. मी त्याला इथंच पुरलं होतं.”

    “हे बघा साहेब. बसं झालं आता. आम्हा दुसरीपण कामं आहेत... गेल्यावेळेस सुध्दा तुम्ही असाच टाईम पास केला होता.”

    “पण मी खरं सांगतोय... मी त्याला इथंच पुरलं होतं...”

    “आम्हाला इथं पाठवताना आमच्या साहेबांनी असं सांगितलं होतं की जर डेड् बॉड्या नाही सापडल्या तर तुम्हाला दोन फटके लावा. पण आम्ही असं काहीही करणार नाही. फक्त आता आम्हाला जाऊद्या...”

    “काय जाऊद्या...” त्याच्या सोबत आलेला दुसरा हवलदार मोठ्या आवाजात बोलला – “तुम्हाला माहित नाही. कायद्याशी अशी मस्करी किती माहागात पडते. तुम्ही आम्हाला इथं खोटं बोलवून आणलं...आमचा वेळ वाया घालवला”

    डोहिफोडेंना रागात असल्याचे दाखवून देत होते. त्याच्या शेजारी उभा असलेला शिंदे हवलदार त्याच्याकडे पाहून शांत राहण्याचा इशारा करत होता. पण डोहिफोडेने वेगळाच काही विचार केला होता. त्याने शिंदेला डोळा मारला आणि गम्मत पाहा असं इशार्-याने सांगुन दिले. अर्थात माझ्याही नजरेने ते चुकलं नाही.

    “मी खरं सांगतो, निधीला मी इथंच पुरलं होतं...”

    मी त्यांच्याशी घाबरलेल्या स्वरातच बोलत होतो. ज्यामुळे त्यांना माझ्यावर संशय येणार नाही असं.

    “आता आम्ही पोलीस स्टेशनला परत जाणार तेव्हा आमचे साहेब आम्हाला विचारणार की डेड बॉडी सापडली का? आम्ही सांगणार नाही. मग आम्हाला ते ओरडणार. आणि तुम्हाला ते तुरुंगात टाकणार...”

    “मला चालेल... मला टाका तुरुंगात...मला तसंही तुरुंगातच जायचं आहे.”

    मी तुरुंगाच नाव ऐकूनच खुश झालो. माझ्या तुरुंगात जाण्याचा उत्साह पाहून हवलदाराने त्याचं वाक्य बदललं.

    “तुम्हाला तर तुरुंग होईल, पण आम्हाला सुध्दा शिक्ष भोगावी लागेल त्याचं काय... आमचाही विचार करा काहितरी...”

    चेहेरा पाडून दोन्ही हवलदार खड्ड्यातून बाहेर आले.

    “मग यासाठी काही उपाय आहे का?”

    त्यापैकी डोहिफोडेने मागे वळून पाहिले. मी अजूनही खड्ड्यातंच उभा होतो.

    “एक मार्ग आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतो की आम्ही सगळीकडं शोधलं पण डेड् बॉडी सापडली नाही. आम्ही त्याला मारलं आणि परत पोलीस स्टेशनमध्ये येऊ नकोस असं सांगितलं...”

    “पण असं केल्यावर मला शिक्षा होणारच नाही. मी तुरुंगात कसा जाणार? मी खरंच त्यांना मारुन इथंच लपवलं होतं.”

    मी खड्ड्यातून बाहेर येत म्हणालो. मी त्यांना माझ्या वेडेपणाचा प्रमाण देत होतो.

    “तुमचं बरोबर आहे... आम्हाला सापडल्या नाही म्हणून आम्ही जास्त लोकं बोलंवणार डेड् बॉड्या शोधायला. तेव्हा डेड् बॉडी सापडली की आम्ही तुम्हाला पकडणार आणि तुरुंगात टाकणार.”

    “असं केलं तरी चालेल. मी पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला माझा फोननंबर तर दिलाच आहे आणि मी कुठं राहतो तेही तुम्हाला कळालेलंच आहे. त्यामुळं मला कधीही तुरुंगात टाकायचं असेल तर मी इथंच आहे. मला कधीही बोलवा किंवा तुम्ही इथं या...”

    मी बंगल्याच्या दिशेने वळालो.

    “थांबा साहेब... आम्ही तुमची एवढी मदत करायची आणि तुम्ही आम्हाला असंच परत पाठवणार का?”

    शिंदेने मला आवाज दिला. मी जाग्यावर थांबलो आणि म्हणाला -

    “तुम्ही मागाल ते देईन.... काय हवयं?”

    दोन्ही हवलदारांनी एकमेकांकडे पाहिले. एकमेकांना नजरेने इशारा करत ते माझ्याकडे वळाले.

    “अं... आम्हाला काहीही नको... पण इतक्या लांब आलोच आहे तर आम्ही विचार करतोय की जेऊनंच जावं.”

    “हो – हो, का नाही. चला मी तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जाईन...”

    मी त्यांना शहरातल्या एका चांगल्या हॉटेलवर घेऊन गेलो आणि त्यांना पोटभर जेवायला घालून मग माझ्या कामाला निघालो.

    ***

    दुसरीकडे अजींक्य रॅलीच्या तय्यारीवरुन पोलीस स्टेशनमध्ये उशीरा आला होता. त्याचं पोलीस स्टेशनमधलं काम उरकून तो घराकडे निघाला. अजींक्य पार्कींगमधून दुचाकी काढत असताना त्याची नजर गेटमधून आत येणार्-या हवलदारावर गेली. दुचाकी स्टँडवर लावत तो हवलदारांच्या दिशेने पुढे आला. डोहिफोडे आणि शिंदे गप्पा मारत निवांत येत होते.

    “काय झालं रे...?”

    अजींक्यचा आवाज ऐकल्यावर हवलदारांनी चालण्याची दिशा त्याच्या दिशेने वळवली.

    “काही नाही सर, तो खोटं बोलत होता. त्याने सांगितलेल्या जागेवर आम्ही खोदून पाहिलं, तसंच बंगल्यात शोधून आलो पण तिथं काहीच सापडलं नाही.”

    “त्याने सांगितलेल्या सगळ्या ठिकाणांवर पाहिलतं?”

    त्यांच्या प्रश्नाच उत्तर देण्या आधी दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि एकमताने खोटं बोलायचं ठरवलं.

    “हो सर, आम्ही सगळीकडे पाहिलं पण कुठंच काही नव्हतं.”

    “त्याला चांगलं समजवलं ना... अशा अफवा पसरवणार्-यांना खरंतर जेलमध्येच टाकायला हवं...”

    “सर, तो वेडा होता. त्याला जेलमध्येच जायचं होतं. म्हणून तर सारखा म्हणायचा, मी खुन केलाय मला जेलमध्ये टाका. त्याला जेलमध्ये टाकून काहीच फायदा नव्हता. म्हणून त्याला तिथंच फटके टाकून चांगलाच समजवला आहे. आधी त्याला आम्ही सांगितलं की पोलीसांना फसवण्याच्या आणि वेळ वाया घालवण्याच्या आरोपा खाली तुला तुरुंगात टाकतो. असं ऐकल्यावर तर तो खुपंच खुश झाला. मग त्याला मी दोन फटके दिले आणि म्हणालो – परत पोलीस स्टेशनकडे फिरकायचं सुध्दा नाही. त्याला चांगलंच समजलं आहे. आता तो परत आपल्या पोलीस स्टेशनकडे पाहणार सुध्दा नाही.”

    संभाषन पुर्ण झाल्याचा इशारा करुन अजींक्य पुन्हा त्यांच्या दुचाकीकडे निघाला. हवलदारही पोलीस स्टेशनच्या दिशेने वळाले. अजींक्यला मध्येच काहीतरी आठवल्याने तो थांबला आणि हवलदारांच्या दिशेने वळाला.

    “अं... शिंदे. त्याचं नाव, पत्ता वगैरे लिहून घेतलं का?”

    “हो सर, त्याची सगळी माहिती लिहून घेतली आहे.?”

    पोलीस स्टेशनकडे निघालेले हवलदार अजींक्यच्या आवाजाने थांबत म्हणाले. अजींक्यला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर तो निघून गेला. डोहिफोडे आणि शिंदे, दोघं तिथेच उभे राहून अजींक्य जाण्याची वाट पाहूत होते. तो निघून गेला.

    “आपण त्या वेड्याबद्दल सरांना सांगून आपण योग्य केलं ना?”

    डोहिफोडेंच्या मनात शंकेने जन्म घेतला. शिंदेला त्याच्या बोलण्याचा अर्थच कळालं नव्हतं किंवा कळाला तरी त्याची शंका नेमकी काय आहे हे समजलं नव्हतं.

    “तुला नक्की काय म्हणायचंय?”

    “मला असं वाटतं की तो अमन गेल्यावेळी सुध्दा आला होता, ही गोष्ट आपण सरांना सांगायला नको होतं... असं मला वाटतं.”

    “अबे, जाऊदेना ... आपण चालत आलो, तर आपण इतक्या लांब कसं गेलो आणि कसं आलो ते सुध्दा विचारलं नाही या मानसाने... बरं झालं त्या अमनने आपल्याला मस्त जेवायला घातलं तरी होतं... नाहीतर, खाया पिया कुछ नही आणि... तसंच झालं असतं.”

    डोहिफोडेनेही तो विषय तिथेच सोडून दिला आणि पोलीस स्टेशनकडे वळत म्हणाला –

    “चल, बघू तो घोरपडे आला का... आणि आला असेल तर आपण पण निघू...”

    शिंदेने सहमती दाखवली आणि दोघे निघाले.

    *****