Vasuche Nutan Varsh books and stories free download online pdf in Marathi

वसूचे नुतन वर्ष

वसूचे नुतन वर्ष !

वसूच्या सर्व बहिनी माहेरी आल्‍यामुळे वसूला तिची आई माहेरी बोलावून घेते. वचाप (म्‍हणजे वसूचा पती) ला नाइलाजाने घरीच थांबावे लागते. रविवारी सकाळी वसूचा फोन येतो.

वसू – हॅलो.... अहो इतकावेळ का लागला फोन उचलायला ? (वचापला बोलू न देताच) मला वाटलच तुम्‍ही दोन नंबरला गेला असाल ! बर, ठीक आहे आजचा पेपर वाचला का ? ( पुर्वी वसूने पेपर वाचलेला तो आठवू लागला पण राशी भिवष्‍या व्‍यतिरीक्‍त तिने इतर कांही वाचल्‍याचे त्‍याला आठवत नव्‍हते. आज नेमकी कोणती बातमी तिला वाचायची आहे असा विचार करत वचापने फोन जवळूनच मानवर करुन दारात पेपर दिसतोका ते पाहिले.

वचाप – हो , आला ....

वसु – मग, मला माझे राशी भविष्‍य वाचुन दाखवा की... अहो, आमच्‍या कडे सॉरी, माझ्या आई कडे नं दै. अमूक तमूक येतो त्‍यातले राशीभविष्‍य मला कांही आवडत नाही. आपल्‍या कडे जो दै. चमक दमक येतो ना, त्‍यातले भविष्‍य मला फार आवडते. तेवढे माझे राशीभविष्‍य फोनवर वाचुन दाखवाल का प्‍लिज.......

(वचाप फोन बाजूला ठेवून पेपर घेउन येतांना वेगळेच भविष्‍य त्‍याच्‍या मनात येते. आता तिची रास कोणती आहे, कसे विचारावे. तिचा वाढदिवस मोबाइल मध्‍ये पकडून ठेवल्‍याने दरवेळेसचा वाढदिवस सुखा समाधानाने साजरा होत होता. गेला वाढ दिवस लक्षात नव्‍हता तर घरात कसे कर्फ्यू लागल्‍या सारखे वाटत होते. पण आता आली का पंचाइत.

वसु – हॅलोssss हॅलोssssss

वचाप – हं बोल.

वसू – अहो इतका वेळ लागतोका हो पेपर आणण्‍या करिता ?

वचाप – अग थांब भविष्‍याचे पान शोधत होतो.

वसु – अहो पुरवणी मध्‍ये असतात हो भविष्‍य.

वचाप – अग तेच शोधतोय. हं सापडले बघ.

वसू – हं वाचा. थांबा मी फोन ठेवते तुम्‍ही फोन लावा, उगीचच आईच्‍या फोनचे बिल वाढत आहे. मी ठेवते तुम्‍ही लवकर फोन लावा बरका ?

वचाप – ठीक आहे (फोन ठेवतो) स्‍वगत: तिची रास कोणती असावी बर..... जाऊ दे कोणतीही रास वाचली तरी तिला थोडेच कळणार आहे. (असा विचार करतांना त्‍याची टयुब लागते आणि वेगळेच विचार त्‍याच्‍या मनात येतात.) चला हिच वेळ आहे तिला तिच्‍या चुका सांगायची. नाही तरी लग्‍न झाल्‍या नंतर समोरा समोर तिने कुठे आपल्‍याला जास्‍त बोलुच दिले नाही. नेहमी तिच माझे भविष्‍य सांगत असते. “तुम्‍हाला येतच काय ? भविष्‍यात तुम्‍ही कांहीच करुशकनार नाहीत. अमुक अमुक तमुक तमुक. वचाप तिचा पचपा काढायचा ठरवतो व फोन लावतो.

वचाप – हॅलो SSSSS

वसु – हं वाचा भविष्‍य.

वचाप – कोण बोलतय ?

वसू – अहो मीच वसू आहे बोलाSSSS आपलं, वाचा भविष्‍य !

वचाप – नव्‍या वर्षाचा पहिला रविवार आहेनं, त्‍यामुळे वर्षभराचे भविष्‍य छापले आहे. फारच विस्‍तृत आहे. वसू – अय्या, छानच की, बघा मी म्‍हणत होतेना आपल्‍या वर्तमाण पत्रात वर्तमाण कमी आणि भविष्‍यच चांगले असते. बर वाचा !

वचाप- (पेपरची घडी करुन बाजूला ठेवत मनात साचलेले अनेक दिवसा पासुनचे वसुचे भविष्‍य सांगायला सुरवात करतो. सध्‍या तुमचे गृहयोगाचे सामर्थ्‍य बलवान असल्‍यामुळे वर्षाची सुरवात निकटवर्तीयांच्‍या सहवासाने होइल. (सुरवातीचे वाक्‍य भक्‍कम व सध्‍याच्‍या परिस्थीतीशी मिळते जुळते ऐकल्‍याने तिचा विश्‍वास व ऐकविल्‍याने त्‍याचात आत्‍मविश्‍वास वाढला.) तुमच्‍या राशीत नुकतेच गुरुचे नक्षत्र संपवून शनीचे नक्षत्रात चंद्राचे आगमन झालेले आहे त्‍यामुळे यापुढे तूमच्‍या डोके दुखीची तक्रार रहाणार नाही. त्‍यामुळे डोक्‍याला गच्‍च कपडा बांधुन अवेळी झोपण्‍याचे सोंग टळेल. नवीन वर्षात खरेदिला आवर घालावा लागेल. त्‍यातल्‍या त्‍यात स्‍वत: करिता वस्‍त्र (साडी), धातू (सोने) च्‍या खरेदिपासून दूर रहा. प्रवास टाळा, घरी कामात जास्‍त लक्ष द्या. गुरु, बुध लाभदायक आहेत जर रोजची कामे वेळीच केली व कामातल्‍या वस्‍तु वेळीच आवरल्‍या तर. उदा. भाजी चिरल्‍यानंतर किंवा निसल्‍या नंतर भाजीचा कचरा ताबडतोब उचलुन टाका. चहात साखर, पत्‍ती टाकल्‍यानंतर डबे परत जागेवर ठेवा. गॅसवर दुध ठेवून टिव्‍ही पहात बसु नका. नळाला पाण्‍याचे भांडे लावुन शेजारणीशी बोलत बसु नका. रवी हा ग्रह अनुकुल राहील जर बाहेरुन आल्‍यानंतर बदललेल्‍या साडीची घडी करुन ताबडतोब आलमारीत ठेवली तर. मंगळ वक्रिअसल्‍याने सकाळी पतीच्‍या किमान एक घंटा आधी झोपेतुन उठल्‍यास पुढचे आयुष्‍य आनंदाचे जाइल.

वसु : अहो, हे सर्व महिलाचेच भविष्‍य आहेका ?

वचाप – अग, महिला करिता वेगळे आणि पुरुषा करिता वेगळे भविष्‍य छापले आहे. मी सध्‍या महिलाचे भविष्‍य वाचत आहे.

वसु – बर बर वाचा !

वचाप - (बाजुचा पेपरचा उगीचच आवाज करतो परत भविष्‍य सांगायला सुरवात करतो )अं अं कुठपर्यंत आलो होतो बर, हं .....आनंदाचे जाइल. भांडीघासने, पोळया, कपडे धूने इत्‍यादी सारखी कामे स्‍वत: केली तर अचानक धन संपत्‍तीत वाढ होईल. शनी, राहु, केतू पासुन सुटका पाहिजे असल्‍यास पतीशी सदैव मृदू भाषेत वार्तालाप करावा म्‍हणजे येणारी बाधा शेकडो मैल दूर जाईल. आपण पतीला परमेश्‍वर मानत नाहीत. पण सध्‍या पती हा घरात एकटाच कमवता असल्‍याने त्‍याला योग्‍य दर्जा द्या.

वसु – अहो, या वेळेसचे भविष्‍य फारच कडक दिसते हो.....

वचाप – अग इतके दिवस तुझे त्‍यांनी चांगले भविष्‍य छापलेचन आत एकदा असे छापले तर काय हरकत आहे. नाही तरी भविष्‍यावर आपला थोडाच विश्‍वास आहे.

वसु – (नाराजनीनेच) हो हो तेही बरोबरच आहे ! बर मी आज निघते बरका. मला स्‍टेशन वर घ्‍यायला या. आणि तो हो पेपर सांभाळून ठेवा.

वचाप – (फोन ठेवतो) स्‍वगत (आता मात्र माझ्या भविष्‍याचे कांही खरे नाही असे म्‍हणत हा पेपर कसा गहाळ करावा या विचारातच तो पेपर मधील स्‍वत: चे भविष्‍य वाचतो त्‍यात सुरवातीचीच ओळ असते, नूतन वर्षाचा प्रारंभ स्‍वत: च्‍या पायावर धोंडा पाडून घेण्‍याच्‍या प्रयत्‍नाने होइल.

******************

रणजीत धर्मापुरीकर, 118, काबरा नगर नांदेड-431606