Coffee aani sulabh kahi books and stories free download online pdf in Marathi

कॉफी आणि सुलभ काही

कॉफी आणि 'सुलभ' काही...

आज माझ्यावर भलताच प्रसंग ओढावला त्याचीच गोष्ट मी सांगणार आहे. तत्पुर्वी सुचना अशी की, ही घटना कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडु शकते त्यामुळे टेन्शन न घेता वाचत रहा. तुम्हाला कदाचित हसु येईल, पण असा महाभयंकर प्रसंग शत्रुवरही येऊ नये अशी मी प्रार्थना करेन.

असो तर हा प्रसंग घडला फर्ग्युसन कॉलेज रोडवर. मी नेहमीप्रमाणे या रोडवरून जात असताना अचानक पोटामध्ये कळ आली अन् मेंदुने दोन नंबर बोटाचा इशारा केला तसे मी सुलभ शौचालय शोधु लागलो. आता मोठी पंचाईत झाली कारण भर दुपारी १२ ते साडेबारा दरम्यानची वेळ असल्याने गाडी पार्किंग करायला जागा मिळेना. तोपर्यंत पोटामध्ये आतषबाजी सुरू झाली, त्यामुळे गाडीमध्ये ध्वनी आणि वायुप्रदुषण दोन्ही एकदम व्हायला लागले. एका गोष्टीचे समाधान होते ते म्हणजे गाडीत मी एकटा असल्याच. त्यात माझ्या सुदैवाने गाडी पार्किंगला जागा मिळाली. गाडी पार्क केल्यानंतर मी फ्रेश आणि मोकळा श्वास घेतला. पृथ्वीच्या तापमानवाढीचे एक कारण सापडले.

मग मी सुलभ शौचालय शोधमोहीम चालु केली, पण कुठेच 'सु'गावा लगेना. मग मी दोघा-तिघांना विचारले पण कोणालाच सांगता येईना, इकडे माझी स्थिती अन् परिस्थिती नाजुक होत चालली होती. सुलभ शौचालय सापडेना म्हणुन डोक्यात अ'विचार' आला. गाडीत पाण्याची बाटली होती, बाटली घेऊन् कुठेतरी जाऊन बसावे. शोधले तर देव पण सापडतो, मग त्याच्याच कृपेने ओढावलेल्या या समस्येसाठी कुठेतरी एखादी 'सुलभ' जागा नक्की मिळेल. मग मनात आले जर रेड'हॅन्ड' सापडलो तर? सगळे कसे आणि किती 'धुवतील', असा एक विचार मनात आला. आता अशाही परिस्थितीत मला विदया बालन आठवली. डर्टी सिनेमावाली नाही, शौचलयाच्या जाहिरातीमधील आणि आपले पंतप्रधान मोदीही आठवले स्वच्छता अभियानवाले. मग मी तो बाटलीचा (पाण्याच्या) 'सार्वजनिक' ऑप्शन रद्द केला. मग मी ठरविले शिवाजी नगरला जावे तिकडे सोय होईल. मी गाडीजवळ आलो, बघतो तर दोन अतिसभ्य नागरिकांनी माझ्या गाडीच्या पुढील अन् मागच्या बाजुने गाडया इतक्या चिकटुन लावल्या होत्या कि मला माझी गाडी काढणे कठिण होते. काय करावे सुचेना कारण आतषबाजीची जागा आता स्फोटांनी घेतली होती. त्या स्फोटांचा परिणाम वाट फोडुन बाहेर येऊ पाहत होता. अशा 'कळा' सोसत होतो, जसे डिलिव्हरीअगोदर बाईची आणि नवऱ्याची अवस्था मी अनुभवत होतो. मग मला एक भन्नाट अशी एकमेव कल्पना सुचली.

हॉटेलमध्ये जावे, तिकडे टॉयलेट असते. तसा माझ्याकडे जेवणाचा डब्बा होता, भुकेचा तर विचार पुन्हा कधी येईल की नाही माहित नाही असे वाटत होते. मग मला कॉफी शॉप दिसले, वाटले काही खाण्यापेक्षा कॉफी प्यावी. मी वाऱ्याच्या वेगाने त्या कॉफी शॉपमध्ये गेलो. तिथे काऊंटरवर जाऊन तेथिल 'पुणेरी' इसमाला विचारले टॉयलेट कुठे आहे? त्याने माझ्याकडे असे पाहिले जसे काही मी त्याला हजारची नोट चालेल का विचारले आहे. मी म्हटले टॉयलेट. त्याचा प्रतिप्रश्न टॉयलेट व्यतिरिक्त काय पाहिजे? मला कळुन चुकले हा काय सहज आणि फुकट टॉयलेटकडे जाऊ देणार नाही. मनात विचार आला अरे अशा 'अवघड'लेल्या व्यक्तीची अडवणुक करतोय तुला काही लाज शरम आहे कि नाही, अरे नरकातही टॉयलेट मिळणार नाही तुला. म्हणुन मी त्याला पुणेरी इसम म्हणालो.

मी त्याला म्हणालो कॉफी हवी आहे, त्याअगोदर मला वॉशरूमला जायचे आहे. कृपया मला सांगाल का वॉशरूम कुठे आहे ते? यानंतर त्या पुणेरी इसमाच्या चेहऱ्यावरील भाव थोडे मवाळले. मग तो मला थोडया आदराने म्हणाला सर वॉशरूम तिकडे आहे. तोपर्यंत मी कॉफी सांगतो. त्याने दाखविलेल्या दिशेकडे मी 'टॉप गेअर' टाकुन फुल्ल स्पीडने टॉयलेटकडे गेलो. आतमध्ये जोरदार तोफा उडवुन मोकळा झालो अन् मी 'स्वर्गसुख' अनुभवले. इतका आनंद बादशहा सिकंदरलाही झाला नसेल जग जिंकुन तेवढा मला टॉयलेट वापरून झाला होता. काही वेळाने मी बाहेर आलो, त्या पुणेरी इसमाने लगेच एका टेबलकडे इशारा करून मला बसायला सांगितले. लगेच वेटर कॉफी घेऊन आला, छान असा फेसाळ कॉफीचा मग होता, मोठा होता थोडासा. त्यावर हृदयाच्या आकाराचे क्रीमने डिझाईन केले होते. कॉफीकडे पाहुन सोसलेल्या 'कळा' आणि त्रास मी क्षणभर का होईना विसरलो. आरामात बसुन मी कॉफीचा एक घोट घेतला अन् पुन्हा कळ आली, पोटात नव्हे डोक्यात... रागाची.

कॉफीमध्ये साखर नव्हती, मला एवढा राग येण्याची गरज नव्हती. घरीही बायकोने बिनसाखरेचा चहा दिल्यावर मला एवढा राग येत नाही. कारण तिथ काही बोलु शकत नाही कारण रोज तिच चहा देणार आहे अन् मी मुकाट पिणार आहे. वाटलेच बोलावे तर चहात साखर कमी आहे एवढेच बोलु शकतो. साखर अजिबात नाही हे म्हणुन काही उपयोग नाही अन् ती मान्यही करणार नाही. कॉफीत साखर नाही म्हणुन मी वेटरला बोलावले. तो शांतपणे आला, मी म्हटले मुंग्यांनी साखर खाल्ली की काय सगळी? मला बिनसाखरेची कॉफी दिलीस. तसे तो काऊंटरचा पुणेरी इसम माझ्याकडे पाहुन म्हणाला, सर या कॉफीत साखर वरून टाकावी लागते. मी वर पाहु लागलो छताकडे. वेटर थोडा हसला अन् म्हणाला, साब ये दो पुडिया दि है शक्कर की है. मी थोडा ओशाळलो, दोन्ही पुडया फोडुन मी कॉफीत मिसळल्या. पुन्हा एक घोट घेतला, तरीही कॉफी कडवट लागत होती. मी परत वेटरला बोलावल, अजुन साखर हवी आहे हे सांगितले. त्याने लगेच दोन पुडया दिल्या त्याला अपेक्षित असावे म्हणुन तो घेऊनच आला होता. त्या दोन पुड्यानंतरही कॉफी फिक्की वाटत होती. पुन्हा वेटरला बोलावले, वेटर कॉफी गोड लागत नाही वेगळे काही आहे का कॉफी गोड होण्यासाठी? तो गेला आणि एक चॉकलेटी पुडी घेऊन आला. त्या गोळया मी कॉफीत टाकल्या, कॉफीला थोडीशी चव आली. मग मी अजुन एक पुडी मागुन घेतली. या सगळ्या वेळेत कॉफी थंड झाली. मी मनात म्हटले जाऊ दे कोल्ड कॉफी समजुन पिऊया, मी कॉफी संपवुन काउंटरवर गेलो. किती झाले कॉफीचे? त्या इसमाला विचारले. त्याने कॉम्पुटरवर बिल काढले आणि मला दिले. ते बिल पाहुन मी उडालोच, तिनशे रुपये? एवढी महाग कॉफी कशी काय? मेनुकार्डवर ४० रू. रेट आहे. तसा तो पुणेरी इसम बोलु लागला, ती साधी फिल्टर कॉफी आहे तुम्ही जी पिलात ती स्पेशल कप्याचिनो १५० रु. आहे. मला काही सुचेना काय बोलावे ते, सगळे अवसान एकवटुन मी विचारले कॉफीचे १५० रु. मग जास्तीचे १५० रु. कशाचे लावले? तुम्ही ज्या दोन साखरेच्या पुडया घेतल्या एक्स्ट्रा त्या ३० रू. च्या, आणि चॉकलेट शॉट १२० रू. टोटल ३०० रु.! अरे साखर फ्री असते तरिही पैसे लावले, मी तोंडातल्या तोंडात पुटपुटले. त्याने माझ्याकडे रागीट नजरेने पाहिले. मी म्हणालो, अहो संत्रा, मोसंबी टँगो पंचचे फुटाणे आणि शेंगासकट एवढे बिल कधी आले नाही. तो पुणेरी इसम शांतपणे माझ्याकडे पाहत होता. मी गुपचूप पैसे दिले.

मला पुन्हा बादशहा सिकंदर आठवला, ज्याने सगळे जग जिंकले आणि भारतात त्याचा पराभव झाला. त्या वेळी त्याला जे दुःख झाले तसेच फिलिंग मलाही होत होते. एवढया बिकट स्थितीत मी टॉयलेट मिळवले पण ते महाग पडले. विचार करता करता मी गादी जवळ आलो, गाडी काढायला पुरेशी जागा होती. मी गाडीत बसलो स्वतःशीच हसलो अन गाडी सुरू केली. पुन्हा पोटात जोराची कळ आली, जोरदार तोफ उडाली तसा चॉकलेट शॉटचा 'सुगंध' पसरला आणि गाडीतील २-३ माशा बाहेर उडुन गेल्या.