Zen Goshti books and stories free download online pdf in Marathi

झेन गोष्टी

झेन गोष्टी

Prepared by : Harshavardhan

Email : harsh8609@gmail.com

Phone number: +1 409 767 6226

Source: 101zenstories

Contents

गोष्ट पहिली4

चहाचा कप4

गोष्ट दुसरी5

सुवर्णसंधी5

गोष्ट तिसरी7

"असं आहे का?"7

गोष्ट चौथी8

आज्ञापालन8

गोष्ट पाचवी9

प्रेम9

गोष्ट सहावी10

प्रेमळ दयाळूपणाचा अभाव10

गोष्ट सातवी11

घोषणा11

गोष्ट आठवी12

विशाल लाटा12

गोष्ट नववी14

चंद्र14

गोष्ट दहावी15

चिखलवाट15

गोष्ट अकरावी16

काही नियम16

गोष्ट बारावी17

स्वर्गाचे द्वार !!17

हे पान जाणीवपूर्वक रिकामे सोडण्यात आले आहे.


गोष्ट पहिली

चहाचा कप

नान -इन, मेईजी कालखंडातील (१८६८ - १९१२) एक जापनीस शिक्षक, यांनी एकदा झेन विषयी चौकशी करण्यास्तव आलेल्या प्राध्यापकांचे स्वागत केले. (काही संभाषणानंतर)

नान-इन ह्यांनी चहा टाकला. प्राध्यापकांचा कप त्यांनी पूर्ण भरला आणि तरीही त्यांनी चहा ओतणे सुरूच ठेवले.

संयम शिगेला पोहोचेस्तोवर प्राध्यापकांनी त्या भरून वाहत असलेल्या कपाकडे बघितले, (आणि शेवटी बोलले) " तो पूर्ण भरला आहे. त्यात आणखीन (चहा) मावणार नाही."

नान इन उद्गारले " या कापसाराखेच तुम्हीही तुमच्या मतांनी आणि तर्कांनी पूर्ण आहात. मी कसे बरे तुम्हाला झेन बद्दल काही सांगू शकेन, जो पर्यंत तुम्ही प्रथम तुमचा कप रिकामा करत नाही?

तात्पर्य: काही गोष्टी (तत्व , विचार) नव्याने जाणून घेण्यासाठी प्रथम त्याबाबतीतले आपले पूर्वीचे तर्क वितर्क बाजूला ठेवले पाहिजे किंवा

पूर्वीचे तर्क वितर्क बाजूला ठेवल्याशिवाय काही गोष्टी (तत्व, विचार) नव्याने जाणून घेता येत नाही.

संदर्भ झेन गोष्टी : http://www.101zenstories.com/index.php?story=1


गोष्ट दुसरी

सुवर्णसंधी

गुडो हे त्यांच्या काळातील राजांच्या दरबारातील राजगुरू. गुडो हे भिक्शुकांसारखे एकटेच भटकत असे. एकदा एदो (एदो हे शहर शोगुनाते राज्याचे सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र) शहराकडे वाटचाल करत असताना त्यांना ताकेनाका नावाचे छोटेसे गाव लागले. संध्याकाळ पसरली होती आणि मुसळधार पाउस पडत होता. गुडो ओले चिंब झाले होते आणि त्यांचा चपलेचे बारा वाजले होते. गावाजवळ असलेल्या एका घरातील खिडकीत त्यांना चपलेचे चार-पाच जोड दिसले, त्यातला एक कोरडा असलेला जोड विकत घेण्याचे ठरवले. गुडोला इतकं ओलं असलेले बघितल्यानंतर ज्या बाईने त्यांना चपलेचे जोड विकले त्याच बाईने त्यांना त्यांच्या घरी एक रात्र काढण्याचे आमंत्रण दिले. गुडोने आभारपूर्वक ते आमंत्रण स्वीकारले.

गुडो त्यांच्या घरी गेले आणि देवघरासमोर त्यांनी मंत्रोच्चार केले. नंतर महिलेची आई आणि मुलं यांच्याशी गुडोंचा परिचय झाला. घरातील मंडळी उदास आणि चिंताजनक दिसत होती, हे गुडोंच्या लक्षात येताच त्यांनी त्याबाबत विचारले.

महिलेने सांगितले " माझा नवरा जुगार आणि दारूच्या खूप अधीन आहे. तो जेव्हा जुगारात जिंकतो तेव्हा तो खूप दारू पितो आणि शिवीगाळ करतो. आणि जेव्हा हरतो तेव्हा इतरांकडून पैसे उसने घेऊन खेळतो. कधी कधी जेव्हा तो खूप नशेत असताना घरीही येत नाही. मी काय करू?"

"मी त्यांना मदत करीन." गुडोंनी दिलासा दिला. "हे घ्या काही पैसे. मला ३.४ लिटर चांगल्या प्रतीची वाईन आणि त्यासोबत काहीतरी चांगले खाण्यासाठी घेऊन या. आणि नंतर तुम्ही जाऊ शकता. मी इथे बसून देवघरासोमोर ध्यान लावतो."

मध्यरात्रीच्या सुमारास त्या महिलेचा नवरा घरी आला आणि मोठ्याने ओरडला " बाई, मी घरी आलोय. माझ्यासाठी काही खायला आहे का?"

"माझ्याकडे काहीतरी आहे" गुडो उद्गारले. " मी मुसळधार पावसात अडकलो होतो. तेव्हा तुझ्या बायकोने मला इथे एक रात्र काढण्याचे आमंत्रण दिले. आणि त्याची परतफेड म्हणून मी वाईन आणि काही मासे तुमच्यासाठी आणले आहेत तुम्हीही घेऊ शकता."

महिलेचा नवरा खुष झाला. त्याने एका दमात सगळी वाईन फस्त केली आणि तिथेच आडवा झाला. गुडो तिथेच त्याच्या बाजूला ध्यान लाऊन बसले.

दुस-या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा रात्रीचे त्याला काहीच आठवत नव्हते. "कोण आहात तुम्ही?", "तुम्ही कुठले?" त्याने अजूनही ध्यान करीत बसलेल्या गुडोंना विचारले.

"मी गुडो, क्योटो शहरातून, सध्या एदो शहराकडे वाटचाल करतोय" झेन गुरु बोलले. काल झालेल्या प्रकारची त्या माणसाला खूप लाज वाटली. त्याने मनापासून त्या राजगुरूंची क्षमा मागितली.

गुडो हसले "आयुष्यात सारे काही क्षणिक आहे." त्यांनी समजावले " जीवन लहान आहे. जर तुम्ही तुमचा जुगार आणि व्यसन असेच चालू ठेवले तर काही दुसरं साध्य करण्यासाठी तुमच्याकडे वेळच उरणार नाही, आणि तुमच्या कुटुंबालाही याचा त्रास होईल"

त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धी अशी काही जागृत झाली की जणूकाही तो स्वप्नातूनच जागा झाला. "तुमचे अगदी बरोबर आहे". त्याचे मत त्याने प्रकट केले. "मी ह्या अनमोल शिकवणीची परतफेड कशी करू? चला मी तुम्हाला निरोप देण्यासाठी तुमचे सामान काही अंतर घेऊन येतो."

"जशी तुमची इच्छा" गुडो बोलले.

त्या दोघांनी सुरुवात केली. काही अंतर गेल्या नंतर गुडोंनी त्याला परत घरी जाण्यास सांगितले. "फक्त पाचच मैल येतो" त्या माणसाने गुडोंकडे विनंती केली. दोघांनी प्रवास चालूच ठेवला.

"तुम्ही आता जाऊ शकता" गुडोंनी सांगितले.

"दहा मैल झाले की जातो" तो बोलला.

"आता परत जा" दहा मैल झाल्यानंतर गुडो बोलले.

" आयुष्य भर तुमचा मार्ग अनुसरण्याचा माझा निश्चय आहे." माणूस उद्गारला.

अश्या रीतीने जपानमध्ये नव्या झेन पिढीचा उदय झाला त्याची सुरवात प्रख्यात झेन गुरू कडून झाली की जे गुडोंचे शिष्य होते.

आणि त्या प्रख्यात गुरुचे नाव मु-नान असे होते ज्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

तात्पर्य : आयुष्यात जेव्हा सुवर्ण संधी चालून येते आणि आयुष्य जेव्हा समृद्ध होत असतं तेव्हा मागे वळून पाहण्याची गरजच भासत नाही.



गोष्ट तिसरी

"असं आहे का?"

हाकुईन नावाच्या एका झेन गुरूची त्याच्या राहणी-मानाबद्दल शेजा-यांकडून अत्यंत प्रशंसा होत असे. एक सुंदर मुलगी आणि तिचे आई-वडील यांचे घर, झेन गुरूंच्या अगदी जवळच होते. त्यांच्या मालकीचे एक खाद्य-पदार्थांचे दुकान होते.

एकदा अचानक त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुलगी गर्भधार आहे. बाळाचे वडील कोण हे सांगण्यास मुलगी तयार नाही हे कळताच, क्रोधीत आई वडीलांनी तिचा छळ करण्यास सुरवात केली. शेवटी नाईलाजाने त्या मुलीने हाकुईनचे नाव घेतले.

तावातावाने ते क्रोधीत पालक हाकुईनकडे गेले. "असं आहे का?" झेन गुरू फक्त एवढेच बोलले.


बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याल हाकुईनकडे सोपवण्यात आले. हाकुईनची नालस्ती आधीच झाली होती, पण त्याचा काहीही फरक झेन गुरूंवर पडला नाही. उलट त्यांनी त्या बाळाची अतिशय चांगली काळजी घेतली. त्यांनी शेजा-यांकडून दूध घेतले आणि इतरही काही गोष्टी ज्या काही प्रमाणातच लागत होत्या.


एका वर्ष उलटून गेल्यानंतर त्या बाळाच्या आईला राहवले नाही. तिने तिच्या पालकांना खरे काय ते सांगितले- की त्या बाळाचे खरे वडील हा एक तरुण मुलगा होता, जो मासे-मंडईत काम करतो.


ताबडतोब त्या मुलीचे पालक हाकुईनकडे त्यांची क्षमा मागण्यासाठी गेले, झालेल्या प्रकारची त्यांनी माफी मागितली आणि, बाळाला आपल्या स्वाधीन करण्याची त्यांनी विनंती केली.


हाकुईन तयार झाले. बाळाला त्यांच्याकडे सोपवताना गुरू इतकच बोलले; "असं आहे का?"


तात्पर्य: आलेल्या परिस्थितीतून जरा सुटका नसेल तर त्यातनं उद्भवलेल्या जवाबदा-या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत, कारण सत्य लपून राहत नाही.



गोष्ट चौथी

आज्ञापालन

गुरू बेन्केई यांच्या भाषणाला फक्त झेन विद्यार्थी उपस्थीत नसत पण सर्व धर्माचे आणि वर्णाचे लोकही येत असत. गुरूंनी कधीही उपदेश केला नाही किंवा विवाद्पूर्ण नितीप्रचुर ग्रंथनिर्मिती करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांच्या श्रोत्यांशी त्यांचे हृदयाचे नाते जोडले जात असत.

एकदा बेन्केईचे श्रोते एका नाचीरेण धर्माच्या पुरोहीतावर रागावले होते, कारण त्यांच्यानुसार झेन समुदाय हा परावलंबी लोकांसाठी आहे असा होता. अत्यंत स्वाभिमानी असलेले नाचीरेणच्या त्या पुरोहितानी झेन मंदिराला भेट देण्याचे ठरविले, बेन्केईशी वाद घालण्याची त्यांची निष्ठा होती.


"अर्रे!! झेन शिक्षका" त्या पुरोहिताने आवाज दिला " काही क्षण थांब. जो कुणी तुला मान देतो तो तुझ्या आज्ञेचं पालन करतो. पण माझ्यासारखा माणूस तुला मानत नाही. तुझ्याकडून हे शक्य आहे का, की तू मला तुझ्या आज्ञेचं पालन करायला लावशील?"


"या तुम्ही वर या, माझ्या बाजूला या, मी तुम्हाला सांगतो" बेन्केई बोलले.


अभिमानाने तो पुरोहित गर्दीला लोटून वाट काढत बेन्केई जवळ पोहोचला.


बेन्केई हसले "या माझ्या डावीकडे या" पुरोहिताने आज्ञा पालन केले. "नाही" बेन्केई बोलले "आपण जरा व्यवस्थित बोलू शकू जर तुम्ही माझ्या उजवीकडे बसलात तर, या ह्या बाजूला या" पुरोहित उजवीकडे गेला.

"बघितलंत तुम्ही" बेन्केई बोलले "तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन केले आणि माझ्या मते तुम्ही खूप विनम्र आहात. आणि आता खाली बसा आणि ऐका".


तात्पर्य : कुणालाच कमी लेखू नये.




गोष्ट पाचवी

प्रेम

२० तपस्वी आणि एक तपस्विन, जिचे नाव होते एशून, हे सगळे एका झेन गुरूंकडून ध्यान धारणेचे धडे शिकत होते.

एशून च्या डोक्यावर केस नसले आणि साधे कपडे जरी घातलेले असले तरी ती सुंदर दिसत होती. बरेचसे तपस्वी मनोमन तिच्या प्रेमात पडले होते.

त्यतल्या एकाने तिला प्रेमपत्र लिहिले, एकांतात भेटण्यासाठी आर्जव करणारं.

एशून ने उत्तर दिले नाही. पुढच्या दिवशी गुरूंनी त्या सर्वांना व्याख्यान दिले, आणि व्याख्यान संपल्यानंतर एशून उभी राहिली. ज्या कुणी तिला प्रेमपत्र लिहिलं होतं त्याला उद्देशून ती बोलली "तुझं जर माझ्यावर खरोखरच प्रेम असेल तर ये आणि मला आत्ता मीठीत घे!"


तात्पर्य : प्रेम लपून छपून करता येत नाही. प्रेमातही धाडस लागतं.



गोष्ट सहावी

प्रेमळ दयाळूपणाचा अभाव

चायनात एक वृद्ध महिला राहत असे, ती एका संन्यासाला वीस वर्षांहून अधिक काळ मदत करत होती. तिने त्याच्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली आणि तो ध्यान धारणा करीत असताना त्याच्या खाण्या-पिण्याची सोयही ती करत असे. कालांतराने त्या संन्यासाची प्रगती जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या मनात जागृत झाली.


तिने एका तीव्र इच्छा असलेल्या तरुणीची मदत घेण्याचे ठरवले. " जा आणि त्याला कवेत घे." वृद्ध महिला त्या तरुणीला बोलली "आणि नंतर त्याल अचानक विचार; आता पुढे काय?"


त्या तरुणीला बोलावण्यात आले आणि कशाचाही विचार न करता तिने त्या संन्यासाला आपल्या कवेत घेतले आणि विचारले की तो आता काय करणार?


काव्यात्मक उत्तर देताना संन्यासी म्हणाला " एक जुना वृक्ष वाढतो थंड खडकावर, ऋतू शिशिर, नाही थोडासाही उबदार."


तरुणी परत आली आणि तिचा दृष्टीकोन त्या वृद्ध महिलेजवळ मांडला.


"मी त्या माणसाला २० वर्षे पोसले!" क्रोधीत वृद्ध महिला उद्गारली, " त्याने तुझ्या भावनांची अजिबात कदर केली नाही, नाही तुझ्या परिस्थितीची विचारपूस केली, त्याला तुझ्या प्रेमाचा स्वीकार करण्याची कारज नवती, पण त्याने कमीत-कमी थोडा दयाळूपणा तरी दाखवायला हवा होता"


ती वृद्ध महिला ताबडतोब त्या संन्यास्याच्या झोपडीपाशी गेली आणि तिला आग लावली.


तात्पर्य : प्रेमळ नाही तर कमीत कमी दयाळूतरी असावे.

गोष्ट सातवी

घोषणा

तंझानने त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी ६० पत्रं लिहिली होती, आणि एका शिष्याला ती पत्र टपाल पेटीत टाकण्यास सांगितले. नंतर त्यांनी प्राण सोडले.


पत्रातील मजकूर कशी असा होता:

"मी ह्या जगाचा निरोप घेत आहे. ही माझी शेवटची घोषणा."

तंझान: जुलै २७, १८९२


तात्पर्य : ज्याची सुरवात होते त्याला अंतही असतो. अंताची वाट बघत बसू नका. (तंझानच्या सर्व कर्तव्य आणि इच्छा पूर्ण झाल्या होत्या, शेवट फक्त शिल्लक होता आणि त्याचीच तर त्यांनी घोषणा केली)




गोष्ट आठवी

विशाल लाटा

मेईजी कालखंडाच्या सुरवातीला जपान मध्ये एक ओनामी नावचा मल्ल योद्धा राहत असे. ओनामी चा अर्थ विशाल लाटा असा होतो.

ओनामी हा प्रचंड ताकदीचा आणि माल्लयुद्धाची कला अवगत असलेला होता. त्याच्या खाजगी कुस्ती स्पर्धेत ओनामीने त्याच्या गुरुलाही मात केले होते, पण हे फक्त त्याच्या मित्र परिवारातच, सामाजात अन्य ठिकाणी तो अत्यंत लाजाळू होता, इतका की शाळेत जाणारे विद्यार्थी देखील त्याची टिंगल उडवायचे.

यावर उपाय म्हणून त्याने झेन गुरूंची मदत घेण्याचे ठरविले. हाकुजू नावाच्या एका भिक्षुक झेन गुरुनी जवळच असलेल्या एका मंदिरात आश्रय घेतला होता. ओनामी त्याना भेटला आणि आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली.

“विशाल लाटा हे तुझे नाव आहे.” गुरुंनी सल्ला दिला, आणि सांगितले “ तर तू आजची रात्र ह्या मंदिरात रहा. आणि अशी कल्पना कर की तू एक लाट आहेस. तू आता लाजाळू माल्लयोद्धा नाही. तू आता त्या विशाल लाटा आहेस ज्या वाटेत आलेल्या सर्व काही नेस्तनाबूत करून टाकतात. अशी कल्पना कर आणी तू ह्या भूतलावरचा महान मल्लयोद्धा होशील.

गुरु तेथून निघून गेले. ओनामी ध्यानार्थ बसला जणू काही तो एक विशाल लाट आहे. सुरवातीला त्याच्या मनात बरेच विचार आलेत पण हळू हळू आपण एक मोठी लाट आहोत असंच त्याला वाटू लागले. जशी जशी रात्र वाढत गेली, लाटा मोठ्या होत गेल्या. आजूबाजूचा सगळा परीसर त्या लाटांनी सामावून घेतला. इतकच काय तर बुद्धाच्या मूर्तीलाही तडे गेले. पहाटेच्यापूर्वी त्या मंदिराचे रुपांतर एका विशाल सागरात झाले होते.

सकाळी गुरूंनी, ओनामीला ध्यानार्थ बसलेले बघितले. ओनामिच्या चेह-यावर एक स्मितहास्य होते. त्यांनी ओनामिच्या पाठीवर हाथ ठेवत म्हंटले आता कुणीही तुला त्रास देऊ शकणार नाही. तू एक अशी भव्य लाट आहेस की तुझ्यासमोर आलेल्या प्रत्येकाला सावरू शकेल.

त्याच दिवशी ओनामी मल्लयुद्धाच्या स्पर्धेत उतरला आणि जिंकला. आणि त्यानंतर जपान मध्ये कुणीच त्याला हरवू शकले नाही

तात्पर्य : नाजूक मनासमोर बळकट शरीर काही कामाचे नाही. बळकट मनासमोर शरीर नाजूक ही का असेना विजयाच्या शिखरावर पोहोचू शकते.


गोष्ट नववी

चंद्र

रायोकून नावाचा झेन गुरु अगदी सामान्य जीवन जगत असे. त्यांची झोपडी एका डोंगराच्या पायथ्याशी होती. एकदा एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने त्या झोपडीत शिरला पण निराशे शिवाय त्याच्या हाती काहीच आले नाही. रायोकूनने त्या चोराला बघितले आणि बोलले की "तुम्ही दूरचा प्रवास करून इथे आला आहात. मी तुम्हाला रित्या हाती जाऊ नाही देणार. माझे कपडे तुम्ही तेवढे घेऊन जाऊ शकता एक भेट म्हणून". चोर थोडा बावचळला आणि कपडे घेऊन पळून गेला. रायोकून उघडेच बसले आणि त्यांनी विचार केला 'बिचारा चोर, माझी इच्छा होती की मी त्याला हा सुंदर चंद्र देऊ '

तात्पर्य : काय आहे ह्या जगात की जे फक्त आपलेच आहे?


गोष्ट दहावी


चिखलवाट

तानाझान आणि एकीडो एकदा एका चिखलाने भरलेल्या वाटेवरून चालत होते. मुसळधार पाउसही पडत होता. एका वळणावर त्यांना एक सुंदर तरुणी एका सुंदर पोशाखात दिसली. तिला वाट ओलांडताना अडचण येत होती.

" चल ! ये इकडे" तानझान चटकन बोलले. त्या मुलीला आपल्या हातने उचलून त्यांनी तिला चिखलवाटेवरून नेले. आणि तिची अडचण सोडवली.

एकीडो बराच वेळ काहीच बोलला नाही. दिवसाच्या शेवटी ते एका मंदिरात पोहोचले. आणि एकीडोला रहावले नाही आणि त्याने तानझानला विचारले "आपण साधू आहोत आणि आपण कधी स्त्रियांच्या जवळ जात नाही" एकीडो बोलला

" आणि तेही तरुण, सुंदर असणा-या मुलीजवळ तर नाहीच नाही. हे खूप धोकादायक आहे. का तिला तू उचलून नेलेस?"

"मी त्या मुलीला तिथेच सोडले " तानझान बोलले "तू अजूनही तिला उचलून धरले आहेस का?"

तात्पर्य : सुकर्म करण्यात कसली लाज आणि कसले नियम?




गोष्ट अकरावी


काही नियम

सोईन शोकु; हे पहिले झेन गुरु जे अमेरिकेत आले ; ते एकदा बोलले "माझे हृदय क्रोधाग्नी आहे आणि आणि डोळे निस्तेज जणू काही राख झाले आहेत" त्यासाठी त्यांनी आपल्या दिनचर्येत काही नियम लागू केले ते असे :

  • सकाळी तयार होण्यापूर्वी; हलक्या अश्या सुगंधात चिंतने करणे.
  • योग्य वेळेत काम पूर्ण करणे, वेळेवर आहार घेणे. आणि आवश्यक तेवढेच खाणे.
  • पाहुण्यांचे आदराथित्य करताना तसेच वागणे जसे इतर वेळेला एकटे असताना. आणि एकटे असताना तसेच वागणे जसे पाहुण्यांसमोर असताना.
  • लक्षपूर्वक बोलणे आणि जे बोलले आहे तसेच करणे.
  • आलेल्या संधीला असेच जाऊ देऊ नये , परंतु काहीही करण्या आधी दोनदा विचार करणे.
  • भूतकाळात झालेल्या गोष्टीवर शोक करत बसू नये. भविष्याचा विचार करणे.
  • स्वभावात निर्भयता असली पाहिजे एखाद्या शूरवीरासारखी आणि तितकेच प्रेमळ असावे एखाद्या लहान मुलासारखे
  • दिवसभराचे काम झाल्यानंतर असे झोपावे की आपली ही शेवटचीच झोप आहे. आणि उठल्यानंतर त्वरित जागा सोडावी जसे काही जुन्या चपलांचा जोड सोडून देतोय.



  • गोष्ट बारावी


    स्वर्गाचे द्वार !!


    नाबुशिके नावाचा सैनिक हकुइनला भेटायला येतो आणि विचारतो " खरोखर स्वर्ग आणि नर्क असा काही आहे का?"

    "कोण आहेस तू?" हाकून त्या सैनिकाला विचारतो

    "मी एक सैनिक(समुराय) आहे " सैनिक उत्तर देतो

    "तू!! आणि एक सैनिक!! " मोठ्या आश्चर्याने हकुइन विचारतो "कुणी तुला सैनिक म्हणून ठेवून घेतले? तुझा चेहरा बघितलास एका भिक-यासारखा दिसतो"

    हे ऐकताच नाबुशिकेच्या तळपायातील आग मस्तकात जाते आणि तो तलवार काढणार तितक्यातच हकुइन सांगतो

    "अच्छा तर !! तुझ्याकडे तलवारही आहे, बघ जर त्याची धार, खूपच बोथट आहे माझा डोकं कापण्यासाठी."

    नाबुशिके त्याची तलवार बाहेर काढतो आणि हे लक्षात येताच हकुइन बोलतात "आणि हे पहा नर्काचे द्वार उघडलेत!!"

    आणि हे ऐकताच नाबुशिकेला हकुइनच्या पदाची प्रचीती येते आणि तो तलवार म्यानेत ठेवून हकुइनसमोर नम्र उभा राहतो

    " आणि इथेच स्वर्गाचे दार उघडले!! " हकुइन बोलतात.


    Prepared by : Harshavardhan

    Email : harsh8609@gmail.com

    Phone number: +1 409 767 6226

    Source: 101zenstories