Maanus books and stories free download online pdf in Marathi

माणूस

माणूस

(वि. सु. : हा लेख जातीवाद नव्हे तर आपल्यातील माणूसपण चिथविण्याचा एक प्रयत्न आहे.)

मनुष्य जातीत जन्म घेतला म्हणून जसे तो लगेच माणूस होतोच, असं काही नाही तसे आहे हे -

परवा असाच नाक्यावर उभा होतो आणि समोरून माझा पाटील नावाचा मित्र माझ्याकडे येत होता. इतक्यात (त्याच्या मर्दानी चालीने बहुधा) झोपमोड झालेलं रस्त्यावरच कुत्र त्याच्या अंगावर घुरघुर करत अंगावर चाल करून गेलं. पाटलाची पार टरकली. तो चळाचळा कापायला लागला. भर थंडीत त्याला दरदरून घाम फुटला. बर-तर-बर, त्या कुत्र्याला बाजूने जाण्याऱ्या कुत्रीची चाहूल लागली अन अनर्थ टळला. संकट निवळलं तसा तो माझ्या समोर येऊन उभा टाकला आणि मला म्हणतो कसा " आम्ही शूर मराठा, आम्हाला काय कुणाची भीती!!"

ह्यावर मला काही हसू आवरता आलं नाही बुआ!

काही वेळाने आमचा एक कांबळे मित्र तिथे डुलत डुलत येऊन आम्हाला धडकला. एकीकडे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर दिवसाचे अठरा अठरा तास कामात बुडून उज्वल भारताचे शिल्प बनविण्यात मग्न असायचे अन आमचा हा मित्र मिळेल ती दारू ढोसून दिवसाचे अठरा अठरा तास गटारात बुडून असतो. आणि जेव्हा होश मध्ये असेल तेव्हा 'स्वतःला आंबेडकरवादी क्रांतीसूर्य समजून जयभीम चा नारा ठोकीत असतो.

इथे तर मला, खरंच रडायला येत!!

अशी विरोधाभासी उदाहरणे पुष्कळ आहेत पण मुद्दा तो नाही म्हणून इथेच थांबतो. विशेष म्हणजे माझ्या बाबतीत तर अशी उदाहरणे सांगायलाच नको. तेव्हा तुम्ही पुरे-पुरे म्हणण्यापूर्वी मीच आवरत घेत मूळ गाभ्याला हात घालतो.

थोर लोकांची नावे घेत आपापल्या जातीच्या टिमक्या मारत, जातीयवाद वाढविणाऱ्यांचा सध्या आपल्याकडे फार सुळसुळाट झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजे संभाजी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बसवेश्वर महाराज अशा महान मंडळींना जातीचे लेबल लावून खरंतर त्यांच्या उद्दात्त विचारधारेला आपण सध्या बांध घालत आहोत. ह्या माहात्म्यांना खरतर "माणूस" ह्या सर्वोच्च उपाधिने ओळखणे क्रमप्राप्त आहे.

आज या ठिकाणी मला जातीवादामुळे समाज आणि मनुष्यातील माणूसपणाला आलेल्या आवकळेबद्दल गप्पा ठोकायच्यात. आता तुम्ही म्हणाल, ह्या बद्दल तर खूप चर्चा झाली आहे, मोठमोठया बुद्धिवंतांनी अन लेखक-विचारवंतांनी आपले विचार समाजासमोर ठेवलेले आहेत. तर पुन्हा हा खटाटोप कशासाठी. तर त्याच असं आहे आमच्या परभणीत महिन्यातून दोन वेळा म्हणजे दर पंधरा दिवसांनी नळाला पाणी येत. असं असून मी रोज नळाची तोटी फिरवून नळाला पाणी आल आहे का ते चेक करत असतो. न जाणो, माझ्या हाताला यश लागेल, अन रिकामे झालेले घरचे भांडे, टाकी पाण्याने भरता येतील.

जातीवादा बाबतीतही मी असाच आशावादी आहे. तर असो-

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजे संभाजी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बसवेश्वर महाराज ह्या सर्वांची तुलना करायची तर सूर्य-चंद्र अन ताऱ्यांचा संदर्भ घ्यावा लागेल. पण ह्या थोरांची नावे घेत नेतेगीरी करणाऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे कि माझ्यासारख्या गरिबांना जर आपण दिवे किंवा पणती अशी नावे दिली तर कृपा करून या पणत्यांना आपल्या विचारांच्या मशालरूपी ज्वालेने आगेचा भडका उठवण्या ऐवजी ते दिवे किंवा पणती सतत समाज उजळून टाकतील एवढ्याच पेटत्या ठेवाव्यात.

समाजात पुढारी आणि नेत्यांना विचारधारेचा स्रोत समजलं जात, म्हणून तुम्ही लोकांनी ह्या विचारधारेच्या पाण्यानी कुठलाही समाजरुपी तलाव (किंवा डबक म्हणा हवं तर) अधिक कलुषित होणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी.

दुसर असं कि, एकेकाळी सवर्ण आणि उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या समाजाची सध्या मागास म्हणून घेण्या इतपत दुर्दशा का झाली हे समजणे जरुरीचे आहे. तशी कारणे बरीच असतील पण आपण त्यातील तुरळक विचारात घेऊ.

लग्न आणि त्या अनुषंगाने असलेली हुंडा हि पद्धती हे प्रमुख कारण ह्या मागासलेपणासाठी करणीभूत आहे असे मी समजतो. मी जे पाहिलं, समजलं त्यावरून मी हे सांगू शकतो कि आमच्या मराठवाडा आणि विदर्भात जिथे पिण्यासाठी पाणी नाही तिथे शेतकरी शेतीला काय पाणी देणार आणि घरच्या जनावरांना काय पोसणार. म्हणून आमदनी पण देवभरोसे, आणि देव का कुणी पाहिला आहे. ह्यात संसार म्हटलं कि आईवडील, लेकरबाळ हे सगळे आलेच. मग दिवाळी-दसरा म्हणू नका, ईद म्हणू नका हे सगळे ह्या गरीबांच्या वाट्याला प्रत्येक वर्षी दत्त म्हणून उभे टाकतात. मग शिक्षण आणि त्यांच्या राक्षसी फिया, त्यात तर गरीब माणसाचं (कुठल्याही जातीचा असो) कंबरडं मोडलच म्हणून समजा. त्यातच काही दिवसात त्यांच्या पोरींची (पोरांची) लग्न घटिका जवळ येते. दिवाळी-दसरा अशा सणावारीत आणि पोरांच्या शिक्षणात आधीच पार बुडालेला गरीब भाबडा पुन्हा परलोकी जाण्याचं तिकीट इन ऍडव्हान्स काढून ठेवतो. मुलाकडची मंडळी मुलीच्या गरीब बापाकडून वरदक्षिणेच्या नावाने हुंड्याची मागणी करतात. त्यातही रेट ठरलेले, मराठा लोकात हा हुंड्याचा आकडा अगदी सॉफ्टवेर कंपनीतल्या गलेगठ्ठ वार्षिक पगाराला लाजवेल इतका भयंकर असतो. मग हा कर्जबाजारी मुलीचा बाप मुलीच्या ख़ुशीसाठी सर्व गोष्टी गहाण ठेवून झाल्या असल्यामुळे, अखेर आपला जीव त्या वर बसलेल्या सावकाराकडे गहाण ठेवून मुलीच्या लग्नाची तयारी करतो.

मला अश्या फुकट फुशारक्या मारणाऱ्या दोघांना, म्हणजे वरपिता आणि वधूपिता याना सांगायचं आहे कि हि हुंड्याची प्रथा कुठे तरी थांबवा. ह्यात कमीत-कमी एका गरीब कुटुंबाचा हकनाक बळी जातो. वरपिता हक्काने ने हुंडा मागतो आणि वधू पिता तो देण्यासाठी लागेल ती तजवीज करण्यासाठी झटतो. आणि मग कर्जाचा डोंगर आणखीनच वाढवत तो खोल खाईत घसरला जातो. ह्यामधूनच मग कर्जबाजारी शेतकरी आणि सामान्य माणसे सुटकेसाठी आत्महत्येसारखा मार्ग निवडतात. आणि हि हुंड्याची प्रथा तशी सर्वच जातीत फोफावली आहे पण ती मराठ्यांमध्ये जरा जास्त जाणवते. तेव्हा कृपा करून ह्या हुंडा पद्धतीचा नायनाट मराठ्यांनी करून, सर्व मानव जाती समोर एक आदर्श ठेवावा आणि ह्यातच खरा मर्द पण आहे हे जाणून घ्यावे.

दारू आणि नशाबाजी हा एक असा सामाजिक अजात शत्रू आहे कि तो जो समाज वर येऊ पाहत आहे त्यांना कायमचा अजगरासारखा जखडून खाली खेचत आहे. आता हि नशाबाजी पण सर्वत्र पसरली आहे. पण हिचे प्रमाण जास्त आहे ते अशा लोकात जे कायम स्वतःलाच कमी लेखत नेहमीच दुःखसागरात बुडलेले असतात. अशा स्वतःच मागास समजल्या जाणाऱ्याना सदानकदा असं वाटत असत कि उच्चवर्णीय आपला फक्त पाणउतारा करत आहेत आणि आपल्यावर फक्त अन्याय होत आहे आणि मग ह्या विरोधात त्यांनी काहीतरी ज्वलंत प्रतिकार केला पाहिजे, उठाव केला पाहिजेल.

प्रतिकार करणे न जमणारे सामान्य माणसं मग दारू च्या अड्ड्यावर चढउतार करतात आणि घरी बायको पोरांवर हात उचलून उठाव केल्याची असुरितृप्ती मिळवतात. आणि जे पुढारी, आंबेडकरी चळवळी बलवान म्हणवतात ते मग अन्यायाविरुद्ध उठाव बोलतात आणि त्यासाठी जमेलतेवढी उद्रेकी भाषणे ठोकून देतात. मी हे मान्य करतो कि काहीठिकाणी तुरळक अन्याय होत हि असेल पण सरसकट तशी परिस्थिती नसावी किंवा नसते. आणि उठाव करणाऱ्यांनी हे हि लक्षात घेणे जरुरी आहे कि उठाव करा, पण हि काळजी घ्या कि ह्या उठाव मूळे कुणाचं जीवन किंवा घराचा उठया होता कामा नय. अशा संयमी चळवळी आणि उठाव मानवजातीच्या विकासाला पूरक आहेत. आणि कृपया कुणीही स्वतःला किंवा कुणालाही कमी लेखू नका, ह्यातच समतेचं मूळ आहे. (पण स्वतःला उंच समजून शिरजोरी करणेही तितकेच समाजघातक आहे)

बाकी माझे मराठी भारतीय मुळातच समजूतदार आणि सज्जन आहेतच. आणि मला विश्वास आहे कि माणसाचा इतिहास जितका जाज्वल आहे तितकाच तो आणि त्याच भविष्य उज्वल आहे. आता बस! पुढील पंक्ती गुणगुणत मी माझे पाल्हाळ पुरे करतो आणि आतापरेंत सॊबत केली म्हणून आपणास धन्यवाद करतो.

असं आहे बघा,

घोडा मैदान सामने आहे,

आणि मला खात्री आहे,

ही वेळ नक्की येईल.

वकील, डॉक्टर, अभियंता,

मामलेदार, सावकार अन नेता,

याहीपेक्षा माणसाला 'माणूस'

हीच उपाधी सर्वोच्च होईल!!

मनिष वसेकर, परभणी

9821338941