Chaprak books and stories free download online pdf in Marathi

चपराक

धड-धड-धड-धड असा आवाज करत घराकडे निघालेली जनता एस्कलेटर वरून उतरून कार्ड पंचिंग साठी लाईनीत उभी राहत होती. बघता बघता लाईन लांबच-लांब लांबत गेली. यांत्रिकी नियमाप्रमाणे समिधा पुन्हा उठली आणि कार्ड पंच करून गुहेतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला हसऱ्या चहेऱ्याने हाय- हॅलो करत फक्त दोन मिनिटाच्या वेळेसाठी आर्जव करत होती. दोन काय अगदी एका मिनिट हि लागणार नव्हता तिला, क्रेडिट कार्ड ची माहिती सांगण्यासाठी.तीच हे रोजच्च काम, 'क्रेडिट कार्ड विकणे'. पण लोकांना घरी जायची इतकी गडबड कि ते समिधाला अगदी हाताने दूर लोटत तिला ओलांडून समोर जात होती. याही गाडीत तिला कुठलच सावज भेटलं नव्हतं. हो 'सावजच', असे तिच नव्हे तर तिच्या बॉसचे म्हणन होत. त्याच्या लेखी प्रत्येक ट्रिप मागे कमीत कमी पाच जणांची शिकार व्हायलाच हवी. खूपच डिमांडिंग होता समिधाचा बॉस.

मेट्रोतील प्रवासी पटापट स्टेशनच्या बाहेर गेली आणि मेट्रो स्टेशन लगेच सामसूम झाल. समिधाला काही क्षणाची उसंत मिळाली. ती पुन्हा बाकड्यावर निवांत बसली. दोन महिन्या पूर्वीचा तिला तिचा जॉइनिंगचा दिवस आठवला. तिच्या आवडत्या लकी आकाशी पंजाबी ड्रेस मध्ये ती खर तर केवळ इंटरव्हिव देण्यासाठी म्हणून ऑफिसात आली होती. इंटरव्हिव छान झाला. त्यांनी तिला लगेच जॉईन हो म्हणून सांगितल. ती पण बऱ्याच दिवसापासून बेकार होती, म्हणून तिने जॉईन होण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसाच ओरिएन्टेशन आणि प्रॉडक्ट ट्रेनिंग झाल्यावर तिला फिल्ड वर पाठवण्यात आल. तीच काम म्हणजे क्रेडिट कार्ड ची माहिती सांगून, ती कार्ड विकणे.

सुरवातीचे काही दिवस बरे गेले, सिनियर ऑफिसर सोबत असल्याने तिचा सेल चांगला झाला. मग मात्र बॉसनी ह्या पूर्ण स्टेशनची जिम्मेदारी तिच्या एकटीवर सोपवली. सिनियर ऑफिसरचा सपोर्ट नसल्याने तिला मात्र हि जिम्मेदारी निभावणे अवघड जात होत. कामाचा आढावा घेण्यासाठी बॉस रोज संध्याकाळी फोन करायचा आणि मग काय पुढची पाच मिनिटे फक्त आणि फक्त त्याच झापण चालायचं. मग जास्त सेल्स साठी काहीबाही सूचना देत सुटायचा.

इतक्यात दुसरी मेट्रो आली आणि धड -धड आवाजाने समिधाची तंद्री भंगली. पुन्हा एकदा समिधा यंत्रावत होत कार्ड सेल्स साठीची कामे करू लागली. पण याही खेपेला तिच्या हाती काहीही लागले नाही आणि थोडी कोमेजूनच ती परत बाकड्यावर स्थानापन्न झाली. पर्स मधील नॅपकिन काढून तिने घामाने कोमेजून गेलेला चेहरा खसखसून पुसला. घाम पुसतापुसता तिला बॉसच्या सेल्ससाठीच्या सूचनांची आठवण झाली आणि तिच्या ओठावर हसू फुटले. बॉस तिला कधी हेअर स्टाईल चांगले करायला सांगायचा तरी कधी ड्रेससिंग चेंज करून बघ म्हणायचा. फिट जीन्स आणि टीशर्टचा पण सुझाव त्याने तिला दिला होता. हे सगळं करण्यासारख असल्याने समिधाला त्यात काही गैर वाटत नसे, म्हणून तिने ते आत्मसात पण केलं. अगदी तंगीच्या काळातही तिने दोन जीन्स आणि टीशर्टस खरेदी केल्या होत्या. ह्याचा तिला फायदाही झाला, काही कार्ड्स खरंच विकल्या गेली. पण जीन्सचा परिणाम जास्त काळ टिकला नाही, पुन्हा तिचा सेल डाऊन झाला.

वेळेनुसार पुन्हा तिसरी गाडी आली. नाही म्हणायला एक दोन जणांनी विचारपूस केली पण. 'कार्ड लाइफ टाईम फ्री आहे का?' आणि ह्यावर तिनेही राजा हरिश्चंद्राच्या पोरीप्रमाणे खर काय ते उत्तर दिल. आणि मग काय शेवटी तिच्या हाती ह्या हि खेपेला अपयश आलं. पुन्हा ती बाकड्यावर टेकली. ती बॉसचा कालच्या आलेल्या कॉल बद्दल विचार करू लागली. तिचा चेहेरा रागाने लाल झाला. तिने बॉसला दोन चार शिव्या झाडात दात ओठ खालले. ती विचार करू लागली 'बॉस असशील ऑफिसामध्ये. हा काय समजतो काय मला. म्हणे उद्या मिनीज घालून ये, मग कस्टमर कसे खेचले जातील ते बघ ' तिला तिचे गावाकडचे दिवस आठवले. तीच ते सोबर राहणीमान आणि ड्रेसिंग-सेन्सची कॉलेजचे प्रोफेसर नेहमी स्तुती करायचे. काय मजाल होती तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची. तिच्या सभ्यतेचा दराराच होता तसा. आणि हा बॉस म्हणतो मिनीज घाल म्हणून'. खरंच तिला बॉसचा खूप राग आला होता. तसल्या रागातच तिला गाडी आल्याचा आवाज आला, पुढची मेट्रो आली होती.

तिने पुन्हा कार्ड विक्रीसाठीचा प्रयत्न चालू केला. रागाने असेल कदाचित पण या खेपेला ती जरा जास्त अग्रेसिव्ह होती. आणि तिला एक आशेचा किरण गवसला. कुणी तरी तीच ऐकून घेण्याची तयारी दर्शवत होत. त्याने समोरच्या बाकड्यावर बसून बोलू अशी स्वतःहून तयार दाखवली. समिधाच्या चेहऱ्यावर छान स्मित झळकल. मग दोघेपण बाकड्याकडे सरसावले. माणूस चांगला निवांत वाटला तिला. आता कसं हि करून क्रेडिट कार्ड विकायचंच हे तिने मनाशी पक्क केलं. माणूस पेहराव्यावरून तरी बरा वाटत होता. मराठी थोडी अस्पष्ट बोलत होता, बहुधा अमराठी असावा. तिने मग संभाषण हिंदीमध्येच चालू केलं. कार्ड संबंधी इतंभूत माहिती तिने त्याला सांगितली. त्याचा हावभावरून तरी त्याला सर्व गोष्टी पाटल्या असाव्यात असा तिने अन्दाज केला आणि फॉर्म भरायचं का म्हणून विचारले. ह्यावर त्याने होकार देत, स्वतः फॉर्म भरतो म्हणून तिच्याकडून पेन आणि फॉर्म मागितला. समिधा फॉर्म देत असताना मात्र त्याने जाणूनबुजून तिच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

समिधाला हे बिलकुल पटलं नाही, तिने झटदिशी हात मागे घेत नाराजी दर्शवली. आणि 'सॉरी सर' म्हणून फॉर्म भरण्यास सांगितलं. ह्यावर तो बेशरम कुचकट हसाल आणि फॉर्म भरण्यास सुरवात करत तिला अगदी खेटून बसला. फॉर्म वाचल्यासारख करत मग त्याने तिला निरर्थक प्रश्न विचारण्यास सुरवात केली. समिधाला त्याचा फार राग येत होता पण तिने तो आवरता घेतला. कारण जर रागराग केला आणि हा हि कस्टमर हातचा गेला तर तिला ते परवडण्यासारखं नव्हतं. मग बॉस ने तिला धारेवर धरल असत.

इकडे हा मात्र चेकाळला होता समिधाकडून विरोध नसल्याचं समजून तो जास्तच शेफारला होता. आणि संधीसाधून त्या माणसाने तिच्या मांडीवर हळूच हात ठेवला. आता मात्र समिधाचा संयम सुटला. तिच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्याचं तिला जाणवलं. तिच्या कानशिलावरची नस ताड ताड उडत होती. नाकाचा शेंडा आणि गाल घुश्याने लालबुंद झाले. ती कापऱ्या स्वरातच किंकाळली "स्टॉप धिस नॉन्सेन्स". पण ह्यावर तो निर्लज्ज माणूस न घाबरता तिच्या कडे झुकत तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला. आणि दुसऱ्याच क्षणी "धाडकन" अस आवाज आला. समिधाने अगदी मोकळ्या हाताने त्या फडतूस माणसाचा गालफाड लालबुंद करून टाकले होते. तो मात्र गाल चोळत-चोळत चोरासारखा पळून जाण्याच्या तयारीत होता पण इतक्यात सेक्युरिटीने तिकडे येऊन त्याला ताब्यात घेतल.

उभी असलेली समिधा पूर्णपणे बिथरली होती, तिने जवळच्या बाकड्याचा आधार घेत स्वतःला सावरलं. हळूहळू ती स्थिर होत शांत झाली. तिला जाणवलं ह्या असल्या विनयभंगाला मोडीत काढायचं असेल तर "चपराक" हेच योग्य अस्त्र आहे. विजयी मुद्रेनेच समिधा शांतपणे बाकड्यावर बसली, पण अगदी ऐटीत . आणि एकदम तिला स्वतः 'आयर्न लेडी इंदिरा गांधी' असल्याचा भास झाला.

मनिष वसंतराव वसेकर,

परभणी