Ti Chan Aatmbhan - 11 books and stories free download online pdf in Marathi

ती चं आत्मभान .. 11

११. वळण..

वृषाली गोटखिंडीकर.

सकाळचे दहा वाजत आले होते.

सुलभाताई नेहेमी प्रमाणे शाळेच्या इमारतीचा दुसरा मजला चढून वर्गात प्रवेश कर्त्या झाल्या. सर्व मुली आपल्या वह्या पुस्तके उघडून अभ्यासासाठी सज्ज होत्या. ताईंना पाहताच आपापसात चाललेल्या गप्पा संपवुन त्या उठल्या व त्यांनी “गुड मॉर्निंग” अशी सलामी ताईंना दिली. ताई पण हसल्या, बसा बसा ग चला सुरु करू या. मुलीनी होकार भरला. आणि मग तासाला सुरुवात झाली. दोन तास तरी सलग प्रमेय, रायडर, बीजगणित, अंकगणित असा अभ्यास चालणार होता.

गेला महिनाभर सुलभाताई या शाळेत “खास हुशार “मुलीं साठी दहावीची तयारी करून घेत होत्या. सुलभाताई याच शाळेतून मागील वर्षी निवृत्त झाल्या होत्या. गणित विषय शिकवण्यात अत्यंत पारंगत असण्याऱ्या सुलभा ताईनी स्वत:हून दहावीत जाणाऱ्या मुलींच्या तयारी साठी हे वर्ग घ्यायचे ठरवले होते. नुकत्याच नववीची परीक्षा दिलेल्या वीस निवडक मुली त्यांनी निवडल्या होत्या.

दोन महीने शाळेस सुट्टी असल्याने शाळेने पण त्याना या कामासाठी जागा उपलब्ध करून दिली होता. या सर्वच्या सर्व जणी दहावी परीक्षेत शाळेसाठी “मेरीट” खेचून आणतील याची त्यांना खात्री होती.म्हणूनच स्वतचा वेळ खर्च करून त्यांनी हे निशु:ल्क वर्ग सुरु केले होते.गेला महिना भर त्या पहात होत्या मुली खरोखर “एकसे एक” हुशार होत्या त्यामुळे त्याना पण शिकवायचे एक वेगळे समाधान मिळत होते. मुली पण जाम खुश होत्या या वर्गावर. त्यामुळे सुट्टी असली तरी वर्ग नियमित चालत होते. अचानक त्यांच्या लक्षात आले आज भार्गवी कुठे दिसत नाही.“संपदा अग भार्गवी का नाही ग आली आज...?”“ताई ती आजारी आहे म्हणुन येणार नाही असे म्हणाली." सुलभा ताईनी विचार केला उन्हाळा आहे.....असेल जरा उन्हातून जाण्या येण्याचा त्रास म्हणुन नसेल आली. भार्गवी त्यांची आवडती विद्यार्थिनी होती. एका सामान्य घरची भार्गवी अत्यंत हुशार ,समजूतदार, व शांत मुलगी होती. घरी एक बहीण आणि आई होती. वडील नसल्याने आई लोकांच्या घरची कामे करीत घर चालवत होती.भार्गवी आणि पल्लवी या दोन मुलीना शिक्षण देऊन लवकर पायावर उभे करणे हेच तिचे सध्या डोळ्या पुढील ध्येय होते. दुसऱ्या दिवशी नेहेमी प्रमाणे वर्ग सुरु झाला. आज संपदा च्या शेजारी भार्गवी बसली होती. ताईनी तिच्या कडे पाहून हास्य केले आणि वर्ग सुरु झाला. भार्गवी मन लावून गणिते पटापट सोडवीत होती. एका गणिताचे उत्तर तर फक्त तिलाच येत होते.अगदी पायरी, पायरी ने आणि सुवाच्य अक्षरात गणित सोडवणे ही तरतिची“खासियत” होती. वर्गसंपताच भार्गवी त्यांच्यापाशी आल.“का ग काय झाले होते तुला काल..?" ताई नी विचारले.‘ताई डोके खुप दुखत होते माझे ““अग उन्हामुळे झाले असेल,जरा वेळच्या वेळी खात पीत जा ना ,आधीच इतकी बारीक आहेस तु." "हो ताई,मला पण वर्ग नाही चुकवायचा ,तुमचे शिकवणे खुप आवडते मला ,म्हणुन तर इतक्या लांबून येते."खरेच भार्गवी शाळेपासून खुप दूर राहत होती.तिला चालत यायला पंधरा ते वीस मिनिटे लागत. शिवाय परत जाताना बाराच्या कडक उन्हात बाहेर पडावे लागे. अजून दोन तीन दिवस गेले आणि ताईंना अचानक जाणवले की आजकाल भार्गवी अशी अस्वस्थ असते. गणिते वगैरे सोडवते पण थोडी “तडफ“कमी वाटत होती.“भार्गवी उन्हाची काळजी घेतेस ना ?जरा मलूल वाटते आहेस. आजारी वगैरे नको ग पडू...खुप उपयोगी वर्ग घेतेय मी." "हो ताई माहित आहे मला.उन्हासाठी स्कार्फ वापरते आहे मी ,तुम्ही काळजी नका करू." पण पुढील आठवड्यात पण भार्गवीची हीच तऱ्हा होती. ताईंच्या शिकवण्या कडे अजिबात लक्ष नव्हते तिचे.शिवाय मधून मधून खिडकीतून बाहेर पण पाहत होती. ताई शांत राहिल्या.. पाहूया अजून दोन दिवस मग विचारू काय आहे ते असा विचार केला त्यांनी...... दुसऱ्या दिवशी एक अतिमहत्वाचा विषय चालु असताना ताईंचे लक्ष गेले तर पुन्हा भार्गवी खिडकी बाहेर पाहत होती.ताई थोड्या नाराज झाल्या.. "भार्गवी सांग बरे पुढची पायरी.."असे म्हणुन त्यांनी भार्गवीला उभे केल. भार्गवी थोडी शरमली कारण आता सर्व मुलींच्या नजरा तिच्या कडे रोखल्या होत्या. तिला काहीच सांगता येईना, मग ताई नाईलाजाने तिला बस म्हणाल्या इतक्या हुशार मुलीला रागावणे त्यानाही बरे वाटेना. संपदाला, तिच्या मैत्रिणीला पण त्यांनी विचारले पण संपदा पण म्हणाली ,ताई आजकाल तिला काय झालेय समजत नाहीये. माझ्याशी पण नीट बोलत नाहीये." यानंतर दोन तीन दिवस भार्गवी चा पत्ताच नव्हता वर्गात...ताई खुप अस्वस्थ झाल्या, काय झालेय काय या पोरीला ?मग मात्र दोन दिवसांनी त्या संपदाला स्कुटरवर घेऊन ऐन उन्हाच्या भार्गवीच्या घरीच गेल्या. दार तिच्या आईने उघडले.“या ना ताई आत या...” तिची आई म्हणाली.दोन खोल्याच्या त्या घरात बाहेरच्या खाटेवर भार्गवी बसली होतीताईंना पाहताच ती चपापली..“अग भार्गवी काय झालेय तुला? येत का नाहीस वर्गात?"भार्गवी काहीच बोलली नाही आणि खाली मान घालून उभी राहिली “बघा ना ताई डोस्क फिरलंय पोरीच जणुकुन्नाच काय बी ऐकेना झालीय, दोन दिस झाले भाकर बी कशी बशी खातीया. “तुमीच समजावा तिला आता, आज तुमी आला नस्ता तर मीच येनार हुतो तुमाला भेटाया...” पण तरीही भार्गवी काहीच बोलेना. शेवटी ताईंनी मोठा आवाज काढला आणि सांगितले “उद्या सकाळी नेहेमी प्रमाणे वर्गात यायचं कोणतेही कारण मला चालणार नाही,समजले?”भार्गवीने मान हलवली पण अजिबात वर पाहीले नाही.. दुसऱ्या दिवशी मात्र भार्गवी वर्गात आली. व्यवस्थित अभ्यासाकडे लक्ष पण दिले.वर्ग संपून सर्वजणी बाहेर पडल्या आणि ताईंनी भार्गवी ला थांबवून घेतले.“बोल काय झालेय तुला ?का लागत नाही अभ्यासात लक्ष तुझ?"ताईंनी विषय काढताच भार्गवी ओक्साबोक्शी रडायला लागली..आत मात्र ताई गोंधळल्या..काहीतरी वेगळेच दिसतेय हे !!!त्यांनी भार्गवी ला जवळ घेतले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरवात केली.थोडा वेळ हमसून रडल्या वर ती शांत झाली.मग ताईं नी शिपायाकडून लिंबू सरबत मागवले आणि तिला प्यायला दिले.”सांग आता काय झालेय नक्की.”आता भार्गवी बोलू लागली..गेले पंधरा दिवस झाले दोघे तिघे जण तिचा पाठलाग करीत होते.सकाळी वर्गा साठी बाहेर पडली की ते तिच्या मागून येत असत अचकट विचकट बोलत असत..पांचट गाणी म्हणत असत..दुपारी पण वर्ग सुटायच्या वेळी बाहेर उभी असत. पुन्हा चालू पाठलाग..एक दोन वेळ तिने सांगितले “मला त्रास देऊ नका ,मला आवडत नाही तुमचे बोलणे..”पण मग त्यांचां आचरट पणा आणखीन वाढला..“काय करणार आहेस ग तु ? कुणाला सांगणार ?सांग बघू अशीच्या अशी उचलुन घेऊन जाऊ तुला..आणि मस्त मजा करू तुझ्या बरोबर."हे ऐकुन भार्गवीच्या जीवाचा थरकाप उडाला होता !!!!काय करू शकणार होती ती..?खरेच जर उचलून नेले तिला तर ?तिच्या डोळ्यासमोरून “निर्भया"..आणि इतर अनेक बलात्कार झालेल्या मुली तरळून गेल्या..घरी पण कुणी पुरुष माणूस नाही आणि इतर कुणाला सांगावे तर आपलीच बदनामी..!शिवाय आईला समजले तर आई पण खुप घाबरुन जाईल..अशा स्थितीत काय करावे समजेना..आई दिवस भर कामाला जात असे, त्यात पल्लवी ,धाकटी बहीण एकटीच घरात असे..मग काही दिवस तिने बहिणीला मावशीच्या घरी सोडले आणि शाळेत येऊ लागली ,पण किती दिवस तिला तरी दुसऱ्याच्या घरी सोडणार आणि त्यामुळे काय प्रश्न सुटणार ?आता तर पाठलाग करून ती टवाळ कार्टी तिच्या घराच्या आजूबाजूस वावरू लागली आणि भार्गवीची भीती खुप वाढली.शेवटी तिने नाईलाजाने शाळेत वर्गा साठी जायचे बंद केले स्वतः कुठे जाईना.आणि बहिणीला पण कुठे जाऊ देईना. “ताई आता तर इतक्या घाण ,घाण कमेंट्स करतात,ऐकवत नाही अजिबात..रात्र रात्र काळजीने माझा डोळा लागत नाही हो,तशात आईच्या प्रश्नांना काय उत्तरे द्यायचीहेही समजत नाही." आता ताईंना तिचा प्रॉब्लेम समजला. खरेच काय करणार ना बिचारी..साहजिक होते तिचे घाबरून जाणे.. पण असे चालणार नव्हते.असे भिऊन किती दिवस राहणार ?ताई म्हणाल्या,"भार्गवी अशी बावळट आणि घाबरट राहुन आयुष्य काढणार आहेस का ?आणि तुच जर खंबीर नसशील तर तुझी बहीण पल्लवी..तिचे रक्षण कोण करेल? तुला आयुष्यात खंबीर राहायला हवे ,मन आणि त्याबरोबर शरीर पण घट्ट हवे तरच सगळ्या प्रसंगातून तरुन जाशील.कोण कुठली ती मवाली मुले ?काय शामत आहे तुला हात लावायची ?” ताई मला पटते तुम्ही म्हणता ते पण काय करू मी अशी बारीक चणीची अशक्त आणि साधी मुलगी..कसा प्रतिकार करणार ? माझे ऐकशील..? ताई म्हणाल्या..

मी करेन खंबीर तुला..या काळात प्रत्येक मुलीने खंबीर राहायची गरज आहे.कुणावर कोणता प्रसंग कधी ओढवेल नाही सांगता येणार.आता भार्गवी पण थोडी सावरली..“हो ताई तुम्ही सांगाल तशी वागायची आहे तयारी माझी “मग प्रथम मन “खंबीर“कर,मनाची शक्ती सगळ्या पेक्षा जास्त असते. उद्या जर ते मवाली भेटले आणि काही बोलले तर पोलिसाची भीती घाल त्याना..परिणाम वाईट होतील असे सांग..“ बर ताई..उद्यापासुन मी राहीन खंबीर..बघते काय होते ते.."निदान भार्गवीने त्या प्रसंगाशी सामना करायची तयारी दाखवली त्यामुळे ताईंना बरे वाटले.दुसऱ्या दिवशी वर्गाची वेळ होण्या पूर्वीच ताई शाळेत आल्या.आज भार्गवी काय करते याची त्यांना उत्सुकता होती.भार्गवी वर्गात आली पण फारशी ठीक वाटत नव्हती “काय झाल भार्गवी?"“ताई आज तर त्यांनी कमाल केली ,मी त्यांना पोलिसाची भीती दाखवताच ते म्हणाले" ,"कर काय करायचे ते ,आम्ही नाही भीत पोलिसाला आणि तुझ्यासारखी बावळट मुलगी आमचे काय वाकडे करणार आहे ?”आणि चक्क त्यांनी माझा दुपट्टा खेचायचा प्रयत्न केला. भार्गवीचे आणलेले अवसान परत सुटू लागले आणि परत ती हमसून हमसून रडू लागली..मग मात्र त्याना एक वेगळा उपाय सुचला.वर्ग संपताच त्या भार्गवी ला शाळेच्या मागील बाजूस घेऊन गेल्या.“भार्गवी या इमारतीत एक ज्युडो चा वर्ग चालतो.माझी एक भाची तो चालवते. खुप हुशार आणि खंबीर आहे ती.मी घेऊन जाते तुला तिच्याकडे.“पण ताई मी काय करणार तिथे?मला कुठे येते ज्युडो ?आणि मला जमणार नाही मारामारी वगैरे..”“अग आधीच नन्ना चा पाढा नको लाऊ ,तुला या प्रसंगातून बाहेर पडायचे आहे का नाही “?“हो ताई मला तर आता अगदी असह्य झालेय ,असे वाटते त्याना चांगले बुकलून काढावे...भार्गवी रागाने लाल झाली होती.ताई हसू लागल्या.."ये हुई ना बात..असा हवा तुझा attitude..या साठीच तुला घेऊन जातेय तिथे मी." भार्गवीच्या पण चेहऱ्यावर हसू आले.दोघी त्या इमारतीत पोचल्या.पहिल्या मजल्या वर ज्युडो वर्ग चालु होता विविध वयाच्या काही मुली तिथे सराव करीत होत्या.ताईंना पहाताच वर्ग घेणारी मुलगी हसत पुढे आली.पँट आणि टी शर्ट घातलेली ती मुलगी खूपच स्मार्ट होती तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता..आत्ता तिचा चेहेरा घामाने डबडबला होता आणि व्यायामा मुळे लाल लाल झाला होता.“मावशी ये ग आत..."थोडा वेळ मुलीना वेगळा सराव देऊन तिने एका कोपऱ्यात ताईला बसायला खुर्ची दिली.भार्गवी पण ताई सोबत उभी राहीली.“ ही भार्गवी..आमच्या शाळेची हुशार विद्यार्थिनी.पुढील वर्षी दहावीत जाईल..गुणी आणि अभ्यासू आहे."“ हाय भार्गवी !!!..मी नितीका, नुकतीच पदवीधर झालेय, इतर काही कोर्सेस आणि नोकरी साठी प्रयत्न करता करता करता इथे एक तास ज्युडो चे वर्ग पण घेते.तरुण मुलीसाठी आत्मबळआणि शारीरिक बळ दोन्ही हवे. सध्या मी थोडा माझाही हातभार लावते त्यासाठी आणि विनामोबदला हे वर्ग चालवते.”तिला पाहून भार्गवी खुप इम्प्रेस झाली.तिनेही हसुन नितीका बरोबर हस्तांदोलन केल.मग ताईंनी थोडक्यात भार्गवी बरोबर रोज घडणारा प्रकार सांगितला.ते ऐकून नितीका हसली, ”असे प्रकार तर आजकाल सर्रास घडतात.मुलीनी न घाबरता त्याचा सामना करून अशा गाव गुंडाना चांगली “जरब“बसवली पाहिजे."“ हो ग हे सारेतुहीला शिकवावे म्हणुन तर आले हीला घेऊन."ताई म्हणाल्या..“मावशी तु नको काळजी करू दोन आठवड्यात हिला तयार करते बघ. भार्गवी करशील न मी सांगेन तसे?"आता भार्गवी चा चेहेरा उजळला..“ हो नितीका दिदि मी नक्की करेन सगळे. ““डन....! उद्या पासून गणित वर्ग झाला की डायरेक्ट इथे अर्धा तास यायचे. आणि हो आता पासून तब्येती कडे लक्ष द्यायचे. रोज जेवण खाणं व्यवस्थित हव.आणि दुध आणि जमेल तशी स्वस्त फळे पण रोज खायची बर का शक्ती साठी..” दुसऱ्या दिवशी पासून भार्गवी चे नवीन आयुष्य सुरु झाले.व्यवस्थित जेऊन खाऊन दुध पिऊन ती गणित वर्गासाठी निघू लागली.सोबत स्याक मध्ये ज्युडो चा ड्रेस.ते त्रिकुट नेहेमी प्रमाणे तिच्या मागे होतेच. वर्ग संपल्यावर मात्र ती मागील बाजूने डायरेक्ट ज्युडो च्या वर्गात गेली व सराव सुरु केला.त्या दिवशी वर्ग सुटल्या नंतर तिची वाट पाहणाऱ्या त्रिकुटा ला मात्र ती खुप वेळ दिसली नाही तेव्हा कंटाळून ते सारे निघून गेले ,आणि भार्गवीचा त्या दिवशीचा पाठ्लाग संपला. त्यानंतर चार पाच दिवस ते“ त्रिकुट” जणु कुठ तरी गायबच झाले.भार्गवीला पण मनातून थोडे बरे वाटले.आता ती तिच्या नव्या आयुष्यात मस्त रमली होती. सकाळचा वर्ग त्यानंतर तासभर ज्युडोचे धडे.खाणे पिणे व्यवस्थित असल्याने तब्येत पण तरतरीत झाली होती.तशात ज्युडोच्या वर्गातील नवनव्या मैत्रिणी मुळे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळत आणि तिचा “आत्मविश्वास” अजूनच वाढत होता.असेच सुरळीत आठ दहा दिवस पार पडले..या दरम्यान ताई पण तिच्यातील चांगला बदल अनुभवत होत्या.आता तिचे व्यवस्थित जेवण खाण पाहून आईला नवल वाटले. पल्लवीला पण आता तिच्यात सकारात्मक बदल दिसत होता. तिलाही भार्गवी ने जे घडले ते सांगितले होते व आता हळू हळू तिलाही भार्गवी सक्षम होण्यासाठी तयार करायला लागली होती.

काही दिवसझाल्यानंतर भार्गवी ला वाटले आपल्या मागचा त्या मवाली मुलांचा पिच्छा सुटला वाटते... आणि अचानक एके दिवशी ते त्रिकुट परत तिच्या मागावर आले.आणि अचकट विचकट“ताशेरे” सुरु झाले “आयला पक्या आठ दहा दिवस जेलात काय जाऊन आलो पाखरू लैच चिकण दिसाया लागलया."“ व्हय रे अन “गिर्रेबाज“बी झालयां”“मला तर लई विच्छा होतीया हात लाऊन बगायची ““गप रे XXXXX त्ये माज कबुतर हाया..कुनी बी आदी हात नाय लावायचा “भार्गवी ने एक रागीट कटाक्ष टाकला त्यांच्याकडे..“आयला आता तर लैच भारी दिसतंय ह्ये पाखरू..मला आता नाय दम निगनार.. असे म्हणत एका सुनसान वळणावर एकाने तिचा हात धरलाच भार्गवी ने जोरात तो हात ओढून त्याला खाली आपटला..त्याला काय झाले हे पण समजले नाही..आता दुसरा पुढे आला..त्याचे पाउल पुढे पडायच्या आतच भार्गवी ने त्याच्या पायात पाय घालून त्याला “आडवा” केला..हे सारे पाहताच तिसरा पुढे येऊन तिच्या कमरेला धरू लागला..ताबडतोब भार्गवी ने मागे पाय घेऊन त्याच्या पोटात मारला तो पण विव्हळून खाली पडला.तिघे जखमीतर झालेच त्यापेक्षा “चकित “ झालेकाल परवा पर्यंत अगदी “बावळट“वाटणारीही मुलगी अचानक एवढी “रणरागिणी“कशी काय झाले.तिघेही आपल्याला कुठ लागले आहे हे पहात उठून उभे राहिले.भार्गवी परत त्वेषाने त्यांच्या समोर उभी राहिली.कधी नव्हे ते तिच्या तोंडून पण शिव्या बाहेर पडल्या."काय रे XXXXX अजून हवाय का खुराक ?"या मारामारीत तिच्या हातापायातला“जोर“सर्वांनी अनुभवला होता “हा मार बास का दाखवू “पोलिसी हिसका”नुकतेच जेल मधून “पाहुणचार”घेवून बाहेर पडलेले तिघे चांगलेच घाबरले व तिच्या पासून दूर पळायला बघू लागले.पण आता ती थोडीच त्यांचा पाठलाग सोडणार होती आणि पुढील वळणा वर अचानक एका झुंडीच्या तावडीत हे तिघे सापडले आणि मग लोकांनी पण “जमकर“धुलाई केली त्यांची.आणि अक्षरशः त्याना पळता भुई थोडी झाली..हात झटकुन भार्गवी गणिताच्या वर्गा कडे जाण्या साठी वळली.तिला माहित होते आता पुन्हा तिच्या वर हा प्रसंग येणार नव्हता कारण ती स्वत: पण “खंबीर” आणि “सक्षम” बनली होती..आणि त्या त्रिकुटा ने पण तिची “ताकद” अनुभवली होती.आणिही बातमी आता गावभर पसरायलाफारसा वेळ लागणार नव्हता भार्गवी वर्गात पोचली तेव्हा तिच्या एकंदर “अवतारा” वरून ताईंच्या लक्षात आले काहीतरी घडले आहे ,कपड्यांना लागलेली धूळ.लालबुंद चेहेरा ,आणि तिचा आवेश पाहून नक्की काय घडले सावेयाचा “अंदाज “येईना. मग जेव्हा भार्गवी ने सगळ्या वर्गा समोर झाला प्रकार सांगितलं तेव्हा ताई आणि तिच्या सर्व मैत्रिणी पण “थक्क” झाल्या.ताई ना खुप अभिमान वाटला तिचा.तिने स्वतःला फक्त पंधरा दिवसात जे “घडवले“ होते त्याला खरेच तोड नव्हती. मग ताईंनी मिठाई मागवून तिचे आणि सर्व वर्गाचे तोंड गोड केले.मुलीना पण तिच्यामुळे स्फूर्ती आली. यानंतर ताईंच्या सोबत ज्युडो वर्गात गेल्यावर जेव्हा भार्गवीचा हा पराक्रम ताईनी नितीका ला सांगितला तेव्हा नितीका चकितच झाली.खुप थोडक्या दिवसात भार्गवी ने मोठीच “बाजी“मारली होती.ज्युडो वर्गाच्या सर्व मैत्रिणी समोर नितीकाने भार्गवीचे कौतुक करून तिला पाचशे रुपये बक्षीस दिले.तु मावशीच्या गणित वर्गाची “शान“ होतीसच, आता ज्युडो वर्गाची पण शान आणि अभिमान झालीस.!! भार्गवी ताईच्या आणि नितीका च्या पाया पडली.खरेच तुम्हा दोघी मुळे आज माझ्या अंगात हे बळ आलेय.“तुमचे आभार कसे मानू आणि काय “गुरुदक्षिणा“देऊ तुम्हाला हेच समजत नाहीये मला “एका महिलेने एका महिले साठी एका महिले कडून जी मदत केलीये ती अपूर्व आहे.खुप अनपेक्षित हे माझ्या आयुष्य आलेले “वळण“खुप सुखावणारे आहे हे नक्की..”“आमची गुरुदक्षिणा एकच ती म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलीला अथवा बाईला तु तुझ्यासारखेच आचार आणि विचाराने समृद्ध करायचे हो ना ग मावशी..”? नितीका म्हणाली.“अगदी बरोबर बोललीस तु..काय ग भार्गवी देशील न.?" ताई म्हणाल्या “हो ताई..हेच माझे तुम्हा दोघींना “वचन राहील." एवढे बोलून भार्गवी बाहेर पडली..आता एका नवीन वळणा वरून तिचा प्रवास सुरु झाला होता. हे अनपेक्षित वळण तिला खुप सुखावणारे होते.

वृषाली गोटखिंडीकर.