Maitrin ki girlfriend books and stories free download online pdf in Marathi

मैत्रिण कि गर्लफ्रेंड..?

“hi”

“hi”

“अरे एकटा का बसला आहे अनू कुठंय?”

“मला काय माहिती कुठं गेलीय?”

“अरे कुठे गेलीय म्हणजे काय? गर्लफ्रेंड आहे ना तुझी मग?”

“hmmm..”

“hmmm काय? ते म्हशीसारखं hmmm hmmm करणं बंद कर. आधी सांग कुठे गेलीय ती.. माझं काम आहे तिच्याकडे”

नेहा ऋषीला विचारत होती पण तो काहीच बोलायला तयार नव्हता.

“पुन्हा भांडलात की काय दोघं?” नेहानं विचारलं.

यावर ऋषी काहीच बोलला नाही. त्यांचं शांत बसणं नेहाला बरंच काही सांगून गेलं.

“अरे किती भांडता तुम्ही दोघंही… सतत भांडणं सुरू असतात तुमची.. भांडतच बसणार की प्रेम पण करणार तुम्ही?” नेहानं ऋषीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

“मग काय करू ती सतत चिडलेली असते. राग तर तिच्या नाकावर असतो. मी फोन उचलला नाही. तिला १० मिनिटं वाट बघावी लागली म्हणून चिडून गेलीय. मला न भेटता. अग मी बाईक चालवत होतो. ट्रॅफिक होतं त्यात हिचे फोनवर फोन. म्हणालो पाच मिनिटं थांब तर बरोबर पाच मिनिटांनी पुन्हा फोन

करायला लागली. एकतर पावसाचे दिवस आहे, किती रिस्की आहे खड्ड्यातून टू व्हिलर चालवणं, हिला कळतच नाही. बघ मी त्या नाक्याजवळ पडलो, गाडीची साईड मिरर पण फुटला आणि हाताला पण लागलंय.” एकदाचं भडाभडा बोलून झाल्यावर ऋषीने आपला खरचटलेला हात नेहापुढे केला.

“बघ किती लागलंय, पण अनूला काही पडलं नसणार. मला दहा मिनिटं उशीर झालाय याचा राग डोक्यात घालून बसली असणार ती.. आता फोन लावतोय तर मॅडमचा फोन स्विच ऑफ”

“हो हो शांत शांत..”

“तो हात बघू.. दाखव मला इकडे” नेहानं ऋषीचा उजवा हात हातात घेतला. बरंच खरचटलं होतं त्याला. शर्टही कोपऱ्याकडे फाटला होता.

“अरे बापरे किती लागलंय तुला”

“आ…. अगं हळू दुखतंय” ऋषी जोरात ओरडला. आजूबाजूचे सगळेच त्यांच्याकडे बघू लागले.

”सॉरी… सॉरी”

“ऐक ना ऋषी आपण आधी डॉक्टरकडे जाऊ ना!”

“अगं ए बाई… एवढं काही झालं नाही डॉक्टरांकडे जायला..chill…”

“chill वगैरे काही नाही. तू ऊठ. आपण आधी डॉक्टरांकडे जातोय” नेहानं आपली स्लिंग बॅग खांद्याला अडकली.

“ऊठ ऋषी.. ते नेने डॉक्टर असतील, त्यांच्याकडे जाऊ आपण. तुझी जखम साफ करून देतील ते…” नेहा म्हणाली.

”आ … आई गं.. मेलो मेलो…” ऋषी ओरडतच खुर्ची वरून उठला.

“वा.. पायाला पण लागलंय तर.. हे कधी सांगणार आणि असाच तू अनूला भेटायला जाणार होतास”

“मग काय करू ती चिडलीय ना…” ऋषी लंगडत लंगडत चालत होता.

“अरे किती भांडता तुम्ही? अनूचं मग बघू. मी बोलते तिच्याशी. आधी आपण डॉक्टरकडे जाऊ या”

“अग पण जाणार कसे? मला नाही वाटतं मी गाडी चालवू शकेन.”

“तू शांत बस मी नेईन बरोबर तुला. चावी दे आधी तू गाडीची”

“ए हॅलो.. चावी दे काय? ती काय अॅक्टिव्हा किंवा स्कूटी नाही.. बुलेट आहे. तुला झेपणार तरी आहे का चालवायला?” ऋषी नेहाकडे पाहून जोरात हसला. खरंतर त्याच्या कुत्सित हसण्यावर ती चिडली होती, पण ती काहीच बोलली नाही. ऋषीच्या हातातली चावी तिने घेतली आणि तरातरा पावलं टाकतं ती पॉर्किंगकडे गेली.

ऋषी लंगडत लंगडत कसाबसा चालू लागला.

“ही बाई चावी घेऊन गेलीय. हिला बुलेटच वजन झेपणार तरी आहे का? मला डॉक्टरांकडे घेऊन जातेय खरी पण असं नको व्हायला मलाच हिलाच डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल.” ऋषी मनातल्या मनात म्हणला. एवढ्यात तिथून बुलेटचा जोरात आवाज आला. त्यानं उजवीकडे पाहिलं…. नेहा चक्क बुलेट चालवत येत होती. ऋषीचं तोंड उघडंच राहिलं. फिकट निळ्या रंगाची जिन्स, त्यावर पांढऱ्या रंगांचं टीशर्ट, गळ्यातून एका बाजूला हेलकावे खाणारी तिची लेदर बॅग, डोळ्यावर फिक्कट गुलाबी रंगाचं एव्हिएटर सनग्लासेस आणि वाऱ्यावर उडणारे तिचे मोकळे केस. ती सरळ येत होती एकदम फिल्मी सिन वगैरे सुरू असल्यासारखं.

“कसली सॉलीड दिसतेय नेहा बुलेट चालवताना, एकदम आर्चीसारखी.. छे आर्चीपेक्षाही भारी” तो तोंड उघडं ठेवून तिच्याकडे बघत बसला.

“बघतोस काय? बस आता” नेहानं त्याच्या पुढ्यात बुलेट थांबवली.

ऋषी शांतपणे तिच्या मागे बसला. तिने गाडी सुरू केली. रस्त्यात सगळेच त्यांच्याकडे वळून वळून पाहू लागले. मुलगी बुलेट चालवते यात तसं काही नवीन नाही, पण काही लोकांना मात्र फारच अप्रुप वाटत होतं.

“नेहा बघ आज सगळे तुझ्याकडे बघतायेत” ऋषी तिला चिडवण्यासाठी बोलत होता.

“बघू दे, मला तू डिस्टर्ब करू नको… मला गाडी चालवू दे” नेहा बुलेट चालवत होती.

“ऐ पण हे भारीय, तुला बुलेट चालवायला येते हे मला माहितीच नव्हतं” ऋषीनं कुतूहलानं विचारलं.

“हो येते मग.. संकेत दादाने शिकवली”

“यंदा पाडव्याच्या रॅलीत मी गिरगावात संकेतदादाची बुलेटच घेऊन गेले होते. तुला नाही माहिती का?”

“अग मी इथे होतो का पाडव्याला?”

“बरं… पण मला येते हो चालवायला आणि तुझ्यापेक्षा मी नक्कीच चांगली चालवते बाईक बरं का!” नेहाने हळूच ऋषीला टोमणा मारला.

पुढच्या दहा मिनिटांत दोघंही नेने डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचले.

“काय झालंय?” नेने डॉक्टरांनी ऋषीकडे विचारून पाहिलं.

नेने नेहाला आधीपासूनच ओळखंत होते.

“काही नाही डॉक्टरकाका बाईकवरून पडलाय तो हाताला आणि पायाला खरचटलंय त्याच्या.”

“जरा हळू चालवत जा रे गाडी… तुम्ही आजकालची मुलं ना सगळीकडे तुमची घाई….”

नेने डॉक्टर आता लेक्चर देणार हे समजताचं ऋषी रागानं नेहाकडे पाहू लागला.

“जखम साफ करून ड्रेसिंग करून देतो” म्हणत डॉक्टरांनी नर्सला सूचना केली.

नर्सने अँटेसेप्टिक लिक्विडने ऋषीची जखम साफ करायला घेतली. ऋषीची जखम चांगली झोंबत होती तो वेदनेने ओरडत होता. त्याचं लहान मुलांसारखं ओरडणं पाहून नेहाला गम्मत वाटू लागली.

एवढ्यात ऋषीचा फोन वाजला. उजव्या हाताला ड्रेसिंग करत असल्यानं त्याला काही तो फोन घेता येईना.

“थांब मी घेते.” नेहाने ऋषीच्या बॅगमधून फोन बाहेर काढला.

“अरे अनूचा आहे फोन.. थांब मी बोलते तिच्याशी.” ती फोन घेऊन बाहेर गेली.

“हॅलो”

“हॅलो”

“ऋषी?”

“कोण बोलतंय?” मुलीचा आवाज ऐकल्यानं अनू थोडी गोंधळली.

“अनू नेहा बोलतेय”

“ऋषी कुठेय? आणि तू का फोन उचललास त्याचा”

“अगं आम्ही डॉक्टरांकडे आलोय.”

अनू पलीकडून काहीच बोलली नाही.

“ऋषीची बाईक स्लीप झाली. त्याला लागलंय म्हणून त्याला डॉक्टरकडे घेऊन आलेय”

“बरं त्याचं झालं की त्याला फोन करायला सांग”

“अगं…”

नेहा पुढे काही बोलणार एवढ्यात अनूने फोन ठेवून दिला.

“कमाल आहे बुवा या मुलीची.. किती चिडते ही. ऋषी कसाय हे साधं विचारलं ही नाही तिने. कसा सहन करतो या मुलीचे नखरे देव जाणे”

“काय बोलली अनू?” ऋषीचं ड्रेसिंग पूर्ण झालं होतं तो दवाखान्यातून बाहेर आला.

“काही नाही तुला फोन करायला सांगितला आहे”

“चिडली आहे का?”

“नाही” नेहानं उगाच खोटं सांगितलं.

ऋषीने लगेच अनूला फोन लावला. तिने तो उचलला नाही. तीन चारदा फोन केल्यानंतर शेवटी अनूने फोन उचलला.

“हॅलो?”

“काय आहे?” अनू तिकडून चिडून बोलली.

“अगं फोन करतोय तुला.. उचललास का नाही?”

“मी मगाशी फोन केले तेव्हा तू माझे फोन उचलेस का?” तिने चिडून त्याला विचारलं.

“अगं बच्चा मी बाईकवर होतो, गाडी स्लिप झाली लागलंय मला..”

“मग मी काय करू?”

“अगं खरंच लागलंय मला, आता दवाखान्यात आलोय”

“बरं…”

“बच्चा तू असं का वागतेस.. लागलंय मला तू विचारणारही नाही का मला?”

“मी कशाला विचारू? सो कॉल्ड मैत्रिण आहे ना तुझी काळजी करायला.. तिने नेलंय ना तुला डॉक्टरांकडे. झालं मग.. मी विचारून काय करू? आणि मला तुझ्याशी बोलायचं नाहीय.”

अनूने फोन ठेवला. खरंतर अनूला नेहा अजिबातच आवडायची नाही. पण ऋषीसमोर तिनं हे कधीच बोलून दाखवलं नाही. नेहा ऋषीची खूप चांगली मैत्रिण होती हे अनूला माहिती होतं. अनेकदा ऋषी आणि अनूची भांडणं नेहाच सोडवायची. या दोघांचं प्रेम टिकून होतं ते नेहामुळे. पण तरीही का कोण जाणे नेहा अनूला आवडेनाशी झाली होती. मनातल्या मनात अनेकदा अनू नेहाशी आपली तुलना करायची. नेहा ऋषीच्या जवळ गेली की ती आतून खूपच अस्वस्थ व्हायची. एक वेगळीच भीती तिला वाटायची. तिच्याबद्दलची असुया मनात घर करून होती.. एवढंच की तिने ते ऋषी आणि नेहाला जाणवू दिलं नव्हतं.

“चल मी निघतो?”

“कुठे? अनूकडे चाललोय?”

“अरे पण तुला लागलंय ना? असाच कुठे चाललास?” नेहानं काळजीनं विचारलं.

“असू दे पण अनू चिडलीय, जातो मी”

“बरं थांब मी सोडते. तुला ड्रॉप करुन तुझी बुलेट बिल्डिंगखाली पार्क करते, तू ये मग टॅक्सीने”

नेहाशी वाद घालण्यात काही अर्थ नाही म्हटल्यावर ऋषी गपगुमानं मागं बसला. नेहानं ऋषीला अनूच्या बिल्डिंगखाली ड्रॉप केलं आणि ती पुढे निघून गेली.

“हॅलो”

“हॅलो बच्चा, लवकर खाली ये ना!”

“कशाला?”

“अगं कशाला काय मी आलोय तुला भेटायला”

“मी नाही.. मी चिडलीये तुझ्यावर”

“ये आता खाली नाही तर मी वर येईन हा”

“नको नको आले थांब”

अनू बिल्डिंगखाली आली. ऋषीचं अनूवर जीवापाड प्रेम होतं. इतकं की ती म्हणेल ते करायलाही तो मागे पुढे पाहायचा नाही, पण कधी कधी अनू अतीच करायची. दोघांची भांडणं झाली की कधीही नमतं घ्यायची नाही. चूक कोणाचीही असली तरी ऋषी येईलच ना असा तिचा अॅटिट्यूड होता आणि आताही तिच्या मनासारखं झालं होतं. ऋषी तिची समजूत घालायला आला होता.

अनू खाली आली. तिला पाहाताच ऋषीने नेहमीप्रमाणे तिला हग केलं. ती काही बोलणार एवढ्यात ऋषीनं चॉकलेट तिच्या हातात ठेवलं. मुली रागावल्या की एक चॉकलेट घेऊन जायचं की त्यांची कळी लगेच खुलते हा फंडा ऋषीला माहिती होता, चॉकलेटची मात्रा बरोबर लागू पडली आणि अनूची कळी खुलली.

“सॉरी बच्चा तुला वाट पाहावी लागली, I promise पुन्हा अशी वाट पाहावी लागणार नाही”

“Its okay, मीच खूप चिडले” अनू लाडे लाडे बोलली.

“तू ठिक आहेस ना? फार नाही ना लागलं तुला?” अनूने ड्रेसिंग केलेल्या ऋषीच्या हाताकडे पाहिलं

“नाही गं.. तुझं प्रेमच एवढं आहे माझ्यावर मला काहीही होणार नाही”

“हो का मस्का मारू नको हा उगाच”

“चल बरं आता निघतो, जरा आराम करतो. हात दुखतोय तुला भेटायला आलो होतो.”

“ओके उद्या भेटुयात”

“बाय” अनूने ऋषीला हग केलं आणि ती निघून गेली. ऋषीही टॅक्सीत बसला आणि घरी यायला निघाला.

त्याने मोबाईल चेक केला. नेहाचे मेसेज होते. नेहा किती अती करते ना… नुसती आईसारखी काळजी करत बसते.. तो मनातल्या मनात म्हणाला. पुढच्या अर्ध्या तासात तो घरी बिल्डिंगखाली पोहोचला. नेहाने गाडी व्यवस्थित पार्क केली होती.

नेहा आणि ऋषी दोघंही शाळेत असल्यापासून एकत्र होते. नेहाचं बाबा वारल्यानंतर तिची आई, मोठा भाऊ आणि ती मुंबईत आले. शाळेत असल्यापासून ऋषी आणि नेहाची जी गट्टी जमली ती कॉलेजनंतरही कायम होती. ऋषीचं अनेकदा नेहाच्या घरी येणं जाणं असायचं. हे दोघं मोठं झाल्यावर एकमेकांशी लग्न करतील असं दोघांच्या कुटुंबियांना वाटायचं पण तसं काही झालंच नाही.. ऋषीला कॉलेजमध्ये अनू भेटली, पण अनू आल्यानंतरही दोघांनी एकमेकांशी मैत्री काही सोडली नव्हती, अनेकदा अनू आणि ऋषी बाहेर जायचा प्लान करत असले की नेहा सोबत असायचीच.

तिने नकार दिला तरी ऋषी तिला घेऊन जायचाच.. ऋषी नेहमी म्हणायचा मी अनू आणि नेहाशिवाय माझ्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. अनूवर त्याचं जीवापाड प्रेम होतं आणि नेहा त्याची जीवाभावाची मैत्रिणी होती.

त्या दिवशी नेहाचा २५ वा वाढदिवस होता. तिला वाढदिवसाबद्दल जेवढी एक्साइटमेंट नव्हती तेवढी ऋषीला होती. नेहासाठी त्याला काहीतरी स्पेशल करायचं होतं. त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली. त्याने लगेच अनूला फोन लावला.

“हॅलो”

“बोल रे”

“फ्री आहेस का संध्याकाळी?”

“का रे?” अनूने पलिकडून विचारलं.

“आधी सांग ना!”

“हो आहे”

“मस्त! मी तुला पाच वाजता पिकअप करायला येतो, उद्या नेहाचा वाढदिवस आहे तिच्यासाठी मला स्पेशल काहीतरी करायचं आहे.”

“ओके”

खरंतर अनूला नेहाचा वाढदिवस साजरा करण्यात काडीमात्र इन्ट्रेस्ट नव्हता. तिच्यासाठी ऋषी एवढी का धावपळ करतोय? हा प्रश्न तिला अस्वस्थ करत होता. पण तरीही ती काही बोलली नाही. आपण ऋषीला बोलून दाखवलं तर तो चिडेल हे तिला माहिती होतं तेव्हा ती गप्प बसली. ऋषी आणि अनू दोघंही मॉलमध्ये गेले. नेहासाठी काय काय घ्यायचं होतं याची यादी त्याच्याकडे तयारच होती. नेहाचा पंचविसावा वाढदिवस होता तेव्हा त्याने तिच्यासाठी २५ गिफ्ट घ्यायचं हे पक्क ठरवलं होतं. अनूसोबत असल्याने त्याला फार काही वेळ लागला नाही. दोघांनी पटापट शॉपिंग उरकली.

“झाली एकदाची नेहाच्या बर्थडेची शॉपिंग, आता मला जाम भूक लागली आहे. ऋषी चल जेवायला जाऊ” अनूने बाहेर जेवणाचा हट्ट धरला.

ऋषीने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. “साडेनऊ वाजले होते. आता कुठे जेवायला गेलो तर सगळं आवरेपर्यंत अकरा वाजतील. त्यातून नेहासाठी केकही घ्यायचा आहे. अकरा वाजता काही केकशॉप उघडी नसतील तेव्हा आपला सगळा प्लॅनच फसेल. ऋषीच्या डोक्यात पटापट आकडेमोड सुरू झाली.”

“ऐक ना बच्चा आपण नंतर कधीतरी जाऊ ना जेवायला, आपल्याला १२ वाजता नेहाच्या घरी जायचं आहे. तू घरी जाऊन काहीतरी खा ना. मी तुला नंतर पिक अप करायला येतो” ऋषी समजूत काढत होता.

“मी तुझ्याबरोबर नेहासाठी संध्याकाळपासून फिरतेय आणि तुला त्याचं काहीच नाही… कशाला करायला पाहिजे एवढं..”

अनू कशाला म्हणजे काय? अग आपली मैत्रिण आहे ती

“आपली? मैत्रिण तुझी असेल माझी नाही..” अनू चिडून म्हणाली.

“असं का बोलतेस अनू, अग तू माझ्या आयुष्यात आली ते नेहामुळे विसरलीस का?” ऋषीने तिला आठवण करून दिली.

“हो मग तिला सतत कुरवाळत बसायचं का? बघावं तेव्हा नेहा नेहा सुरू असतं. सतत ती आपल्यासोबत असते. का? कशासाठी? एकावर एक फ्री असल्यासारखं वाटतं जेव्हा ती सोबत असते तेव्हा. गेल्या सात एक वर्षांत ती सतत आपल्यासोबत असतेच, जरा म्हणून एकांत मिळालायं का आपल्याला? कुठे बाहेर जायचं म्हणजे ती आलीच… तिला स्वत:ला बॉयफ्रेंड नाही तर माझ्या बॉयफ्रेंडच्या मागे मागे फिरत असते. उगाच त्याची काळजी असल्यासारखं” इतक्या वर्षांपासून नेहाविषयी मनात ठेवलेला राग एकदाचा बाहेर आला होता.

ऋषीला अनूचं वागणं अगदी अनपेक्षित होतं. नेहाविषयी एवढा राग तिच्या मनात होता याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती आणि अचानक अनूचं हे रुप पाहून ऋषीला धक्का बसला.

“तूझं नेहाशी भांडण झालंय का अनू?” ऋषीने विचारलं.

“नाही”

“मग तू का चिडतेस एवढी?”

“मला ते काही माहिती नाही, तू काही नेहाचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करणार नाहीस” अनू गंभीर चेहरा करून बोलली.

“पण का? काय झालंय असं तुला?”

“बस.. मला यावर काही बोलायचं नाही तू नेहाच्या घरी जाणार नाहीस, ना तिला गिफ्ट देणार”

“बच्चा असं कसं होईल आपण तर तिचे फ्रेंड्स आहोत ना! आपल्या बर्थडेला ती येते ना! मग असं वागून कसं चालेल?”

“मला काही माहिती नाही, यापुढे तिच्याकडे जायचं नाही, तू तिच्याशी बोलणंही कमी करणार आहे आणि तू तिचा वाढदिवसही साजरा करणार नाही”

“अनू तू का असं वागतेस ?मला खरंच समजत नाही. तुझ्याकडून हे वागणं अपेक्षित नव्हतं. नेहा आणि आम्ही शाळेपासूनचं मित्र मैत्रिण आहोत. तिच्याशी बोलणं बंद कर असं तू कसं म्हणतेस?”

“ते मला काही सांगू नकोस, तू ठरव तुला माझं ऐकायचं की नेहाच्या मागे मागे करायचं आहे.”

ऋषी यावर अनूची काही समजूत घालणार एवढ्यात तिने समोरची रिक्षा थांबवली आणि ती निघूनही गेली. ऋषी तिच्याकडे बघतच बसला. अचानक काय घडलं याचा त्याला अर्थही लावता येईना. त्याने अनूला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण तिने काही उचलला नाही. आता जर आपण अनूच्या मागे तिची समजूत काढायला गेलो तर नेहाला सरप्राईज देण्याचा प्लॅन पुरता फसेल हे त्याला माहिती होतं. तो शांत बसला. अनूने तशाच टाकून दिलेल्या गिफ्ट्च्या पिशव्या त्याने उचलल्या. आपल्या गाडीच्या हँडलला त्या पिशव्या अडकवल्या आणि निघाला. अनूच्या वागण्याचा अर्थ त्याला लागतंच नव्हता. सात वर्षांपासून ते दोघंही रिलेशनशिपमध्ये पण अनूने त्या दोघांच्या मैत्रीवर कधीच आक्षेप घेतला नव्हता. अनू नेहावर अनेकदा चिडायची पण हा कदाचित तिच्या चिडखोर स्वभावाचा भाग असेल असं ऋषीला वाटलं. पण आता ऋषीला सारं लक्षात येत होतं. अनूला नेहा कधीच आवडायची नाही. विचार सुरू असताना त्याने केकशॉपच्या बाहेर गाडी थांबवली. नेहासाठी छानसा केक घेतला. नेहाच्या आईला फोन करून येणार असल्याची त्याने कल्पना दिली होती.

बारा वाजायला पाच मिनिटं होती. ऋषीच्या एका हातात केक होता. गिफ्टस त्याने गाडीजवळच ठेवले होते. नेहा गाढ झोपली असणार हे त्याला माहिती होतं. तो घड्याळ्याच्या काट्याकडे बघत होता. फक्त तीन मिनिटं उरली होती. त्याने काकूंना फोन केला. दरवाज्याची बेल वाजवली तर नेहाला जाग येईल म्हणून त्याने ही युक्ती वापरली. काकूंनी हळूच दरवाजा उघडला.

केक घेऊन ऋषी नेहाच्या बेडरुमध्ये गेला. नेहा झोपली होती. ५ , ४ , ३, २, १

“हॅप्पी बर्थ डे…..” ऋषी जोरात ओरडला… ऋषीच्या ओरडण्याने नेहा दचकून उठली.

“ऋषी तू इथे काय करतोय.?”

“काय करतोय म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थ डे आहे तो ही पंचविसावा … स्पेशल काहीतरी करायलाच हवं ना!”

नेहा फक्त हसली. नेहाच्या हातात त्याने सुरी दिली. “चल केक काप…”

नेहाच्या आईनं आणि ऋषीनं छान गाणं म्हटलं आणि बर्थडेचा केक कापला.

आपण नेहासाठी गिफ्ट आणलेत हे तो विसरालाच होता..

“ए थांब मी आलो”

“कुठे जातोय रे?” नेहानं विचारलं.

“अगं आलोच दोन मिनिटांत.”

ऋषी बाहेर गेला आणि गिफ्टच्या पिशव्या घेऊन आत आला.

“अरे हे आणखी काय?” काकूंनी आश्चर्याने विचारलं.

“काही नाही गिफ्ट्स आहेत.”

ऋषी बेडरुमध्ये गेला. नेहा बेडवरच बसून होती. त्याने गिफ्ट्च्या पिशव्या नेहाच्या हातात दिल्या,

“हे काय? एवढ्या पिशव्या.”

“गिफ्ट्स आहेत तुझ्यासाठी, I hope you like it”

“एवढे गिफ्टस..”

नेहाने गिफ्ट मोजायला सुरूवात केली. तिला विश्वासच बसत नव्हता. ऋषीने तिच्यासाठी २५ गिफ्ट्स आणले होते.

“एवढा खर्च का केलास तू?”

“अग तुझा पंचविसावा बर्थ डे आहे. स्पेशल नको का करायला?” ऋषी हसत म्हणाला.

नेहाने ऋषीला मिठी मारली. तिनी मिठी मारणं ऋषीला अनपेक्षित होतं. तो थोडासा कचरला. तिला हात लावावा की नाही असा संभ्रम त्याला होता. एवढ्यात तीच बाजूला झाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं.

“मला वाटलंही नव्हतं, माझा हा वाढदिवस एवढा स्पेशल होईल ऋषी थॅक्यू यू सो मच” नेहाच्या या वाक्यावर ऋषी फक्त हसला.

“चल निघतो मी, उशीर झालाय तू झोप” ऋषी नेहाच्या रुममधून बाहेर पडला.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नेहा बघत होती त्यानं जाऊ नये, असं तिला फार वाटत होतं. ती म्हणाली असती तर तो थांबला ही असता आणि आफ्टर ऑल आज तिचा बर्थडे आहे म्हटल्यावर त्यानं तिची ही विश नक्की पूर्ण केली असती. पण पटकन तिच्या मनात अनूचा विचार आला, अनूला त्याचं इथे थांबणं आवडलं नाही तर…? तिने तो विचार तिथेच थांबवला.

“बाय ऋषी, अँड वन्स अगेन थॅक्यू सो मच फॉर दिस वंडरफूल सरप्राईज. नीट जा, पोहोचल्यावर एक मेसेज कर. मी आहे जागी”

ऋषीनं पाठी वळून एक छान स्माईल दिली आणि तो बाहेर पडला. नेहाच्या बिल्डिंगखाली तो उतरल्या उतरल्याच मुसळधार पावसाला सुरूवात झाली.

“शिट लागली वाट, यालापण आताच यायचं होतं. त्यानं हातातल्या घडाळ्याकडं पाहिलं, रात्रीचा पाऊण वाजला होता, रेनकोटही नव्हता. एवढ्या रात्री भिजत गाडी चालवायची म्हणजे काही साधी गोष्ट नाही.”

एवढ्यात नेहाच्या आईचा फोन वाजला.

“अरे कुठे आहे?”

“काकू कुठे असणार अजून खालीच उभा आहे. पाऊस आला रेनकोट नाही. बाईक चालवू कशी”

“बरं, तू वर ये आधी… आज इथेच राहा. मी सांगते आईला फोन करून”

त्याचा नाईलाज होता तो तसाच वर गेला. शेवटी नेहाच्या मनातलं देवानं ऐकलं होतं. ऋषी आजची रात्र घरी जाणार नव्हता. तो तिच्याचकडे राहणार होता.

ऋषीला पाहून नेहाला खूप आनंद झाला. तिनं मनातल्या मनात शंभरवेळा तरी देवाचे आभार मानले होते.

“ऋषी थोडा अवघडल्यासारखा बसून होता. त्याचा तो अवघडलेपणा नेहाच्या पटकन लक्षात आला.

“ऋषी तुला आठवतंय, लहानपणी दिवाळीच्या किंवा मे महिन्याच्या सुट्टीत तू सारखा माझ्याघरी राहायला यायचा हट्ट करायचा आणि मग एकदा आला की घरी जायलाही ऐकायचा नाही”

“हो ना, लहानपणीचे दिवसच काही और होते. खूप धम्माल केली आपण दोघांनी.. आणि काकूंना फार त्रासही दिला. काय मस्त मैत्री होती नाही का आपली…” ऋषी पटकन बोलून गेला.

“होती म्हणजे? अजूनही आहे की….” नेहानं पटकन ऋषीचं वाक्य खोडलं..

ऋषी काहीच रिअॅक्ट झाला नाही..

“काय झालं अचानक गप्प का झालास? तुला अजूनही अवघडल्यासारखं वाटतंय का? एरव्ही तर घरात वावरत असतोच. आज काय झालंय एवढं अवघडायला…? घाबरू नकोस मी तुला काही करणार नाही.” नेहा उगाचच त्याची गंम्मत करत होती.

पण त्यावरही ऋषी काहीच बोलला नाही. अनू त्याला मगाशी जे काही बोलली होती ते त्याला खूपच हर्ट झालं होतं. एकीकडे अनू आणि दुसरीकडे नेहासोबात लहापणापासून घालवले क्षण तो आठवता होता. “जर खरंच अनूने नेहाशी बोलणं बंद करायला सांगितल्यावर आपण काय करायचं?” हा विचार त्याला फारच अस्वस्थ करत होता.

त्यातून मगाशीच अनूचा मेसेज पाहिल्यावर त्याची अवस्था आणखीच वाईट झाली होती. मगासपासून नेहासमोर तो आनंदी असल्याचा मुखवटा लावून वावरत होता, पण आता तसं करणं त्याला शक्य नव्हतं.

“नेहाच्या घरी गेलास तर मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल” असा मेसेज तिने केला होता. अनू किती बालिश आहे हे त्याला चांगलं माहिती होतं. अजूनही आपण कॉलेजमध्येच आहोत अशीच ती वागत होती. त्यातून आपण पूर्ण रात्र नेहाच्या घरी राहिलो हे तिला समजल्यावर तर ती काय करेल या विचारानं तो आणखी अस्वस्थ झाला होता. शेवटी नेहानंच विचारलं

“अरे ऋषी काही झालंय का? खरं सांग? अनूशी पुन्हा भांडलास ना? तिने मला बर्थ डे विश केलं नाही यावरूनच मी समजून गेले. तुमचं नक्की भांडण झालं असणार. सांग आता कशावरून भांडलात तुम्ही?” नेहानं विचारलं.

“तुझ्यामुळे भांडलो…” असं ऋषीला बोलायचं होतं पण तो शांत बसला कारण आज नेहाचा वाढदिवस होता आणि त्याला तिला दुखवायचं नव्हतं. पण नेहा म्हणजे मनकवडी आहे. तिच्यापासून काही लपून ठेवण्यात अर्थ नाही. शिवाय ती आपली चांगली मैत्रिण आहे तेव्हा आपण सांगितलंच पाहिजे आणि तिही समजूतदार आहे तेव्हा ती यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल याची ऋषीला खात्री होती.

“नेहा.. एक सांगू तुला राग नाही ना येणार?”

“तू मला २५ वर्षांपासून ओळखतो. कधी रागावले आहे का मी तुझ्यावर?”

“नेहा.. माझ्यात आणि अनूमध्ये भांडण झालंय. पण यावेळी मात्र भांडणाचं कारण तू होतीस?”

“मी?” नेहाला आश्चर्याचा धक्का बसला…

“नेहा अनूला तू आवडत नाहीस.. तुझ्याशी कायमचं बोलणं बंद कर असं सांगत होती. ती हे आताच का बोलली, कशासाठी बोलली मला माहिती नाही… पण ती हट्टाला अडून बसली आहे… तुझ्याशी बोलणं बंद नाही केलं तर कायमची सोडून जाईल असं म्हणली. आता तूच सांग यावर मी काय करू? तुला माहितीय ना माझं अनूवर किती प्रेम आहे ते… तिच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकतं. ती माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही नेहा… पण तूही मला खूप महत्त्वाची आहेस. तू आणि मी एकत्र वाढलो. कोणालाही हेवा वाटेल अशी आपली मैत्री आणि ती अशी या स्टेजला मोडून टाकणं माझ्यासाठी अवघड आहे… आता तूच सांग मी काय मार्ग काढू”

नेहा यावर काहीवेळ काहीच बोलली नाही… कदाचित अनू असं वागणार हे तिला कधीना ना कधी अपेक्षित होतंच. मुलाच्या आयुष्यात गर्लफ्रेंड आल्यावर तिला त्याच्या मैत्रिणींचा कधीना कधी त्रास होतोच. सगळ्याच काही चांगल्या नसतात. कधी कधी त्यांनाही इनसिक्युरिटी वाटतेच ना! त्यातून नेहासारखी सुंदर आणि आपल्यापेक्षाही वरचढ ठरणारी मुलगी असेल तर कोणत्याही मुलीला इनसिक्युरिटी वाटणारच ना! नेहा फारच समजूतदार असल्यानं तिने अनूच्या वागण्याचा कोणातही अर्थ काढला नाही..

बराचवेळ विचार केल्यानंतर ती शांतपणे म्हणाली..

“ऋषी तुझं अनूवर खूप प्रेम आहे ना? तू तिचा कोणताच शब्द पडू दिला नाही. तेव्हा तू यावेळीही तिचंच ऐक. तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करु नकोस आणि तुला तिच्यासोबत अख्ख आयुष्य काढायचंय. मी काय आज आहे उद्या माझं लग्न झाल्यावर मी निघून जाईन. पण तिची साथ तुला आयुष्यभर पुरणार आहे तेव्हा तू तिच….”

पुढंच बोलपर्यंत नेहाचे डोळे काठोकाठ भरले होते. तिला पुढे एकही शब्द बोलता येईना.. तिनं आवंढा गिळला.. ती कितीही समजूतदार असली तरी शेवटी ऋषीचं तिच्या आयुष्यातलं स्थान खूप वेगळं होतं आणि एका फटक्यात त्याला दूर करणं तिच्यासाठी साधी गोष्ट नव्हती. पण ऋषीसाठी ती गप्प बसली. वाढदिवसाच्या दिवशी दोन अनपेक्षित धक्के मिळतील याची पुसटशी कल्पनाही तिनं केली नव्हती. उद्यापासून ऋषी आयुष्यात नसेल. तेव्हा त्याच्याशिवाय जगायंच ही मानसिक तयारी करण्यासाठी तिला पुरेसा वेळही तिला मिळाला नव्हता.

पण या शेवटच्या क्षणी तिला ऋषीला काहीतरी सांगायचं होतं.. हे आता नाही सांगितलं तर आयुष्यात कधीच तिला आपल्या मनातल्या भावना सांगायची संधी मिळाली नसती. तेव्हा तिनं एक दीर्घ श्वास घेतला.

“ऋषी जाता जाता एक गोष्ट सांगायची होती, जी मी तुला कधीच सांगितली नाही. पण आता या क्षणी सांगावीशी वाटते… सांगू?”

ऋषीनं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि मान डोलावली.

“ऋषी मला तू खूप आवडतो. आताच नाही पण शाळेपासूनच.. सगळयांना वाटायंचं की तुझं माझं लग्न व्हावं पण… असो माझ्यासाठी तू मित्रापेक्षाही खूप काही आहे. कदाचित माझ्या मनात तुझ्याविषयी असणारं प्रेम अनूलाही कळलं असलं तेव्हा मी तुझ्यात गुंतू नये म्हणून एक गर्लफेंड जो पझेसिव्हपणा दाखवते तोच तिनंही दाखवला असेल आणि यात तिची चूक नाही. मी अजूनही सिंगल आहे यासाठी कारण मी प्रत्येक मुलात ऋषी शोधत होते..”

आता मात्र जे नेहाच्या तोंडून ऐकायला मिळालं तो ऋषीसाठी मोठा धक्का होता. यावर काय रिअॅक्ट करावं हे त्याला कळत नव्हतं.

नेहाला त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा नव्हती.

“नेहा तू हे आधी का नाही सांगितंलस?”

“आधी सांगून काय होणार होतं. कॉलेजच्या पहिल्याच वर्षांत तूला अनू आवडली. तू माझ्याबद्दल निव्वळ चांगल्या मैत्रिणीपलिकडे काहीच विचार केला नाही. तेव्हा मी माझ्या मनातलं सांगितलं असतं आणि तू नाही म्हणाला असतास तर..? ही भीती मला होती. तू माझ्याशी बोलणं बंद केलं असतंस तर? ही दुसरी भीतीही मला होतीच. त्यामुळे तुला गमावण्याच्या भितीनं कधी हृदयातली गोष्ट ओठांवर आलीच नाही..”

नेहाचा डोळे पाणावले. तिने हातानं डोळ्याच्या कडा पुसल्या. ऋषीनं काहीच विचार न करता नेहाला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातले अश्रू अलगत तिच्या चेहऱ्यावर ओघळले.

तिनं मोठ्या मुश्किलीनं ऋषीच्या मिठीतून स्वत:ला सोडवलं.

“ऋषी आता मला तुला गमावण्याची भीती नाही.. तू दादाच्या रुममध्ये जाऊन झोप आणि प्लीज उद्या मी उठायच्या आधी निघून जा.. नाहीतर मला खूप अवघड जाईल…’

तिने उशीत आपलं तोंड लपवलं. चादर तोंडावर घेतली आणि झोपण्याचं नाटक करू लागली… ऋषी उठला आणि तिच्या बेडरुममधून बाहेर पडला… तिनं चादरी खालून त्याला शेवटंच डोळेभरून पाहून घेतलं आणि आपल्या आसवांना मोकळी वाट करून दिली.