Atit books and stories free download online pdf in Marathi

अतीत

अतीत

आज किती वर्षांनी या "बालसुधारक" समाज संस्थेमध्ये मी पाऊल ठेवत आहे. जवळ जवळ पाच-सहा वर्ष झाली असतील, परंतु इथल्या व्यवस्थेमध्ये किती फरक पडला होता. संस्थे समोरील हिरवागार बगीचा,इमारतीच्या गेटवर सुवर्णाक्षरात सोनेरीवर्खाने चमकणारी "बालसुधारक समाज संस्था" म्हणून हि मोठी अक्षरं नजरेला आकर्षित करत होती. पत्र्याच्या आडोशाने उभं असलेलं हे बालमुलांच घरकुल, एक मोठ्या इमारतीच्या स्वरूपात उभं होत. यामध्ये काम करणाऱ्या परिचारिका बर्याचश्या नवीन चेहऱ्याच्या दिसत होत्या. मी क्षणभर भांबावून गेलो आणि इकडे तिकडे नजर फिरवता फिरवता एक मॅम माझ्याच दिशेने येताना दिसली. हसत हसतच म्हणाली " राजू तू आलास, चल बरं झालं----नाहीतर मी म्हटले कि राजुला सुट्टी मिळते कि नाही----? अरे, किती उंच झालास----? ओळखता येत नाही. आता सर्व काही ठीक चाललंय नं----?" मी उत्तर देण्याऐवजी काही क्षण मॅम कडेच पाहत राहिलो. पाच वर्षांपूर्वीच्या मॅम आणि आत्ताच्या मॅम यामध्ये खूपच फरक पडलेला होता. त्यावेळी मी त्यांना मेरी आंटी म्हणून बोलत होतो. मॅम भावना विवश होऊन माझ्याकडे पाहत होत्या. मी त्यांच्या डोळ्यातील भावनांमधून माझ्या भूतकाळातील प्रत्येक क्षणाला निरखू लागलो.

मी झोपडपट्टीच्या वस्तीत राहणारा, दारिद्र्याने पिचलेल्या अशा आई-बापूच्या सोबत काम करून पोट भरणारा असा दहा वर्षाचा राजू. पहाटे पहाटे उठून आई आवाज द्यायची "राजू चल उठ, गोणी घेऊन चल----त्यावेळी डोळ्यावरची झोप कशी बशी बाजूला सारून पाण्याची चूळ भरून गोणी पाठीवर टाकत आईच्या पाठोपाठ काचा वेचत वेचत चालू पडायचो. पोटात भुकेची आग पडायची पण सांगणार कोणाला----? परिस्थितीने समज दिली होती. त्यामुळे आईकडे हट्ट करत नव्हतो. कचरा विकून जेव्हा पैसे हातात पडतील तेव्हा खायला मिळेल, हि समज अंगवळणी पडली होती. चालून चालून पाय दुखायचे. काचा वेचून वेचून ते कोवळे हात रक्ताने जखमी व्हायचे. सकाळी सकाळी शाळेत जाणारी मुलं बघीतली कि शाळेत जायचे मन होत असे. तेव्हा मी आईला म्हणायचो "आई, मला शाळेत टाक नं---- मी सुद्धा शिकेन आणि ऑफिसर होईन, मग तुला कचरा वेचायला नको----" तेव्हा शाळेचं नाव काढलं कि बापू मला खूप मारत असे. मात्र आईचे डोळे भरून यायचे. तेव्हा मीच ठरविले कि कचरा विकून जे पैसे येतील त्यातून थोडे आईला द्यायचे आणि थोडे पैसे जमा करून शाळेसाठी पुस्तकं व कपडे आणायचे. परंतु माझा बेवडा बाप चोरून त्या पैशाची दारू पित असे. पैसे नाही दिले तर खूप मारत असे----

एक दिवस एक दलाल भाई वस्तीत आला आणि वस्तीतल्या लोकांना एकत्र बोलावून मुलांसाठी खाऊ वाटू लागला. बिस्किटाचे पुडे, चॉकलेट्स, केळी सर्वांना दिली आणि म्हणाला मी तुमच्या मुलांना काम देईन. रोज त्यांना शंभर रुपये मिळतील. परंतु त्यांना माझ्याबरोबर पाठवायला लागेल. सगळीजण वस्तीतली बेवारस मुले खुश होऊन तयार झाली. त्यात मी सुद्धा आईची परवानगी घेऊन जायला निघालो. ढुंगणावर फाटलेली चड्डी आईने शिवून दिली. त्यावर कचऱ्यात कोणी टाकलेला शर्ट, तोच घालून मी निघालो. गाडीत कधी बसलो नव्हतो म्हणून खूप मजा वाटत होती. आम्ही वस्तीतील पंधरा-वीस मुलं होतो. रात्री पर्यंत आम्ही छोट्याशा नागपाड्याहून धारावीला आलो. दलाल भाईने आम्हाला एका रूममध्ये बसविले आणि म्हणाला "मुलांनो आता तुम्हाला डाळ-भात मिळेल. तो खाऊन इथेच झोपायचे. सकाळी उठून आपल्याला कामावर जायचे आहे----सर्व आम्ही मुले जेऊन झोपून गेलो.

दुसऱ्या दिवशी आम्हाला चहा नं पिताच दलाल भाई समुद्र किनारी घेऊन गेला. तिथे ढीगभर मासळीच मासळी होती.आम्हाला मोठ्या मासळीतून छोटी मासळी वेगळी करायला सांगितली. पैशाच्या लालसेने आम्ही काम करत होतो. परंतु कोळंबी सोलून सोलून नखातून रक्त येऊ लागले. मासळी वेग वेगळी करून पाण्यात नखं कुजू लागली, बसून बसून मन मोडून यायची, काही मुलांच्या बसून बसून पाठीला पोक येऊ लागले. सकाळी पाच वाजल्यापासून रात्री सात-आठ वाजेपर्यंत आम्हा मुलांना पिळून घेत होते. एवढं काम करूनही एक-दोन वडापाव खायला मिळत होता. तर मूत्र-विसर्जनासाठी सुद्धा जाऊ देत नसत. मूत्र-विसर्जनाची कळ दाबून ठेवल्याने पोट दुखत असे. दिवस भराच्या कामाने अंग दुखत असे. म्हणून काही मुलं चोरून चोरून गुटका खाणे, बीड पिणे अशा व्यसनाच्या विळख्यात अडकू लागली होती. म्हणून एक दिवस मी चोरून लघवीला जायचे आहे असे सांगून तिथून पळ काढला. पळत राहिलो--पळत राहिलो आणि एका उभ्या असलेल्या लॉरी मध्ये लपून बसलो. लॉरी चालू झाली आणि काही वेळाने एका ढाब्यावर थांबली. मी सुद्धा गुपचूप खाली उतरलो. ढाब्यावर गेलो आणि खिशातले दहा रुपये देऊन वडापाव खाऊन तिथेच बसून राहिलो. तोपर्यंत लॉरी निघून गेली होती. मला बघून ढाब्यावरील सेठ गुरगुरला "ए छोकरा, घर जानेका नाही क्या----?" नहीं साब, मुझे काम चाहिये! काम मिलेगा क्या----? तेव्हा सेठ ने वर पासून खालपर्यंत न्याहाळले आणि म्हणाला "तू क्या काम करेगा----" कुछ भी मैं करुंगा ! मैने हात जोडके बोला ! "अच्छा ठीक है, तुम साफ सफाई करो, बरतंन साफ करो, पाणी भरो ! ठीक है----? मी मान हलवली आणि हो म्हणालो. महिना भर काम केले. रोज सकाळी सहा वाजता उठून झाडू मारायचो, भांडी घासून पाणी भरायचो. रात्री अकरा वाजता सुट्टी होत असे. शरीर थकून जात होतं. रूममध्ये फॅन नव्हता. डास चावल्याने झोपहि येत नव्हती. पहाटे पहाटे झोप लागायची तर सेठ शिव्या घालायचा. "ए भडव्या उठ, तेरेको सोनेका पैसा देता हू क्या----? साला सोता रहता है, काम कुछ करता नहीं----! सेठ चा आवाज ऐकून मी खडबडून उठायचो आणि कामाला लागायचो. उकळत्या चहाच्या वासाने चहाची तलफ यायची परंतु सगळी कामं होतं नाही तोपर्यंत चहा मिळत नव्हता. अशा परिस्थितीत आईची आठवण येऊ लागली. म्हणून सुट्टी मागून आईला भेटायला विचार केला. सेठ कडे महिन्याचा पगार मागितला तेव्हा आठशे रुपये हातात ठेवले. ते पैसे बघून मला खूप आनंद झाला. कचरा वेचून सुद्धा एवढे पैसे मिळत नव्हते.सेठने मला नागपाडा एस.टी. मध्ये बसवून दिले. मिळालेल्या पैशातून थोडे पैसे आईला देऊन बाकी पैसे शाळेची पुसतके आणायला होतील असा विचार करत करत मी घरी आलो. बापू बेवडा पिऊन झोपला होता. बाजूला आईचा हार घातलेला फोटो दिसत होता. आई मला सोडून गेली हे बघून मी आ----ई म्हणून हंबरडा फोडून रडू लागलो. कशीही असो ती माझी आई होती. माझ्याकडे असलेल्या पैशातून वस्तीतल्या मुलांना वडापाव खाऊ घालून आईचे दिवस कार्य केले. आई गेली आणि मी अनाथ झालो. आईचा एक आसरा होता तो सुद्धा देवाने हिरावून घेतला म्हणून झोपडीच्या एका कोपऱ्यात आईच्या फोटो समोर बसून रडू लागलो. तेवढ्यात बापू आला आणि म्हणाला "अरे रडतोस कशाला----? मी आहे नं----जा आता आलास आहे तर गोणी घेऊन कचरा वेचून पैसे घेऊन ये-----!" असे म्हणून माझ्या खिशातले पैसे काढून दारू प्यायला गेला. जे पैसे शाळेच्या पुस्तकासाठी ठेवले होते ते सुद्धा गेले.

पुन्हा मी कामं शोधायच्या विचारात बाहेर पडलो तोच रस्त्यात मेरी आंटी भेटली. " राजू, तू कुठे गेला होतास----? तसे तुझ्या आईने मला तुझ्या कामाविषयी सांगितलेच. तू गेलास परंतु तुझी आई खूप आजारी झाली होती. तापातच ती माझ्याकडे आली होती. हा डबा देऊन गेली आणि म्हणाली कि "राजू आला कि त्याला हा डबा द्या----" म्हणून तुला बघून तुझ्या घरीच येत होते." मेरी आंटी म्हणाली. मी लगेच तो डबा उघडला तर त्यात एक चिठी आणि काही पैसे होते. "आता, मला तर वाचता येत नाहीं----" लगेच मेरी आंटीने चिठी उघडून वाचायला सुरवात केली.

"माझ्या राजू बाळा,

तू परत येईपर्यंत मी जिवंत असेन किंवा नसेन म्हणून मी हि चिठी एक दीदींकडूनं लिहून घेत आहे. तुला सोडून जाताना दहा वर्ष लपवलेलं रहस्य तुला सांगून जाते म्हणजे मी शांतीने मरेन. आत्म्याला शांती मिळेल. राजू , मी तुझी खरी आई नाहीं. मी कचरा वेचताना तू मला कचऱ्याच्या पेटींत झोपलेला सापडला. मला मुलं नसल्याने तुला मी घरी आणून तुझा सांभाळ केला. परंतु तू मला माफ कर. मी तुला शिकवू शकले नाहीं. तुला एक इज्जतदार मनुष्य बनवू शकले नाहीं. तरी तुझी शिकायची इच्छा बघून कचऱ्याचे आणि घरकाम करून पाच हजार रुपये जमा केले आहेत. ते तुला उपयोगी पडतील, ते तू घेऊन शाळेत जा आणि खूप मोठा हो---- परंतु या आईला विसरू नकोस. मेरी आंटीला मी सर्व सांगितले आहेच. ती तुला मदत करेलच. मेरी आंटीच्या आश्रमात राहून पुढे शिकत रहा---- बापू कडे जाऊ नकोस. तो तुला शिकू देणार नाहीं. या गरीब आईचा तुला आशीर्वाद आहे—

तुझी दुर्दैवी आई!!!

चिठी वाचून मेरी आंटीच्या आणि माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या.माझ्या जन्मदाती आईने मला कचऱ्याच्या पेटींत फेकले, तिला मी आई म्हणू कि कचरा वेचून मला कचरा पेटीतून उचलून माझा सांभाळ करणाऱ्या आईला मी आई म्हणू----? मेरी आंटीने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसून मला जवळ घेतले आणि हात धरून आश्रमात घेऊन गेली. त्या दिवसापासून मी आश्रमाचा एक सदस्य बनलो आणि मेरी आंटी माझी आई झाली. तिनेच मला लहानाचे मोठे केले. माझ्यावर चांगले संस्कार घडविले. मला शिक्षण देऊन माझे एक चांगले व्यक्तिमत्व घडविले. समाजात मला एक स्थान मिळवून दिले.आज मी नोकरी निमित्त तिच्यापासून दूर झालो. "राजू , कसला विचार करतोस ----? हे शब्द कानावर पडताच मी भानावर आलो, मेरी मॅमचा हातात हात पकडून म्हणालो "मॅम, तुम्ही मला जीवनदान दिले, माझे नशीब घडविले, मला जीवन जगण्याचा रस्ता दाखवला. म्हणून आज मी एक बँकेचा मॅनेजर बनलो. तुमची मला खूप आठवण येत असते. मॅम, माझी कचरा वेचायची गोणी मी अजूनहि सांभाळून ठेवली आहे. त्या गोणीला मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला माझे अतीत माझ्या डोळ्यासमोर दिसते----माझी आई मला आशीर्वाद देत असल्याच्या स्वरूपात दिसत असते----परंतु ज्या आईने मला कचऱ्याच्या पेटींत टाकून दिले आणि मला तिच्यापासून वंचित केले आणि अनाथ बनविले त्या आई विषयी करुणा वाटते त्याच बरोबर संभ्रमही वाटतो कि तिने मला काय म्हणून दूर केले----? अशी तिची काय व्यथा होती----? अशी माझ्यासारखी किती मुले आहेत कि कोणी लुळा आहे, पांगळा आहे, शारीरिक व्यंग आहेत, बलात्काराने जन्मलेली मुले आहेत, अशा मुलांना त्यांचे आई-बाप आपल्यापासून दूर करून अनाथ करतात. आई-बापाच्या प्रेमापासून वंचित करतात. परंतु कोणी असा विचार करत नाहीं कि हीच मुले किती निरागस आहेत.निर्दोष आहेत.त्यांना सुद्धा भावना आहेत. ज्यावेळी त्यांना शिक्षण मिळते, संस्कार मिळतात तेव्हा त्याच मुलांचे जीवन उजळून हसरी फुले बनून जातात. देशाचे उज्वल नागरिक बनतात----" मी भानावर येऊन वाकून मॅम ला नमस्कार केला.

आज "बालसुधार" या सामाजिक संस्थेच्या नव्या इमारतीचे उदघाटन आहे आणि त्यात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून सन्मानित करत आहेत. परंतु हा सन्मान स्वीकार करायला मन तयार होत नव्हते. कारण त्या सन्मानाची भागीदार जिने मला कचरा पेटीतून उचलून माझा सांभाळ केला ती माझी आई आहे----हॉल मध्ये माझ्या समोर तीस-चाळीस दहा ते चौदा वर्षांमधील मुलं बसलेली होती. माझ्या सारखीच कचऱ्यातून उचललेली, तर शारीरिक व्यंगामुळे आई-बापाने आणून सोडलेली, हरवलेली, बलात्कारातून जन्माला आलेली, प्रेमात फसून जन्म दिलेली मुले या घरकुलात आश्रित झालेली होती. तरी सुद्धा आपल्या निरागस, निष्पापतेच्या भावनेमध्ये हसमुख दिसत होती.त्या भावनेत आपल्या आई-बापाच्या वंचित झालेल्या प्रेमाची कमी लपली गेली होती. त्यांना बघून माझ्या गतकाळातील राजुला मी शोधू लागलो. दुसरीकडे माझा फुल-हाराने सन्मान होत होता. मेरी मॅम ने मला दोन शब्द बोलायला सांगितले तेव्हा मी माझा स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगून मुलांना प्रेरित केले आणि मेरी मॅम च्या हातात एक लाखाचा चेक देऊन नमस्कार केला. तेव्हढ्यात एक सुंदर परिचारिका एक मोठा गुलदस्ता घेऊन माझ्या समोर आली. गुलदस्ता देऊन मेरी मॅम च्या पाठी लपली. परंतु तिची एकच नजर मला खूप काही सांगून गेली. तिच्या त्या एका नजरेने मी गोंधळून गेलो. लगेच मेरी मॅम ने तिचा हात माझ्या हातात देऊन आमच्या जीवनाची रेशीमगाठ बांधली.ती परिचारिका म्हणजे सुनंदा कि जिला आपल्या आई-बापाने बालसुधारक घरकुलाच्या पायरीवर सोडून दिले होते.अशा आई-बापाच्या प्रेमाला वंचित होऊनही तिने आपले जीवन यशस्वी केले होते.

मन आनंदाने भरून आले. मनात एकचं भावना उन्मळून आली कि हि अनाथ मुले किती हसरी फुले आहेत----या घरकुलात प्रत्येकाचे जीवन फुलाप्रमाणे फुलत आहे. हे घरकुल रंगीबेरंगी फुलांचे नंदनवन झाले आहे. या मुलांना काय हवे----? तर एक प्रेम हवे, संस्कार हवे, माया हवी आणि हे सारे मेरी आंटी च्या सहयोगाने हे घरकुल बहरून येत आहे. हीच मुले देशाचे उज्वल नागरिक होणार आहेत.