Mulansathi fule - 3 in Marathi Moral Stories by Sane Guruji books and stories PDF | मुलांसाठी फुले- ३

Featured Books
Categories
Share

मुलांसाठी फुले- ३

मुलांसाठी फुले- ३

साहित्यिक = पांडुरंग सदाशिव साने

आई व तिची मुले

ती एक गरीब विधवा होती. मोलाने काम करी व चार कच्च्याबच्च्यांचे पालनपोषण करी. एका लहानशा झोपडीत ती राहत असे. ती सदैव समाधानी असे. सकाळपासून सायंकाळपर्यंत एका क्षणाचाही विसावा तिला मिळत नसे.

त्या दिवशी कोणता तरी सण आला होता. घरोघर आनंद होता. प्रत्येकाच्या घरी आज कोणते ना कोणते तरी पक्वान्न करण्यात येत होते. रामाच्या घरी त्याच्या बापाने श्रीखंडासाठी चक्का आणला होता. मधुकरला बासुंदी आवडे म्हणून त्याच्या आईने कढईत दूध आटत ठेवले होते. गोविंदाच्या घरी पुरणपोळी होती. परंतु आमच्या त्या गरीब मोलकरणीच्या झोपडीत काय करण्यात येणार होते?

त्या मोलकरणीने मोठ्या मिनतवारीने दोन पैसे शिल्लक ठेवले होते. ती आज पुरणपोळी करणार होती. तिने एका परळात कणीक ठेवली होती. परंतु बाजारातून गूळ आणावयाचा होता. दुकानदार लहान मुलांना फसवतात, म्हणून ती गूळ आणण्यासाठी जाण्यास निघाली. ती आपल्या मुलांना म्हणाली, "येथे ही परळात कणीक आहे. मी ह्या घडवंचीवर ती ठेवून जाते. तुम्ही घरातच असा हो! दार उघडे टाकून बाहेर नका जाऊ; कोंबडा-कुत्री घरात शिरतील. मी लवकरच येते गूळ घेऊन. आज तुम्हाला गोड हवं ना. आज तुम्हाला पुरणाची पोळी करणार आहे."

"पुरणाची पोळी? ओहो मजाच!" असे ती मुले आनंदाने टाळ्या वाजवून म्हणाली. त्यांची आई बाहेर गेली. मुले घरात बसली होती.

इतक्यात त्यांच्या बोळातील मुले बाहेर आली व ती त्यांना हाका मारू लागली. "अरे, आज सणाचा दिवस. असे घरात रे काय बसता चूलकोंबड्यासारखे? चला बाहेर खेळायला." बाहेरची मुले हिणवू लागली. आग्रह करू लागली. शेवटी घरातील मुले बाहेर आली. आईने सांगितलेले ती विसरून गेली. मुलेच ती. खेळापुढे त्यांना कसली आठवण नि कसले काय! इतर मुलांबरोबर ती खेळावयास निघून गेली. झोपडीचे दार नीट लावून घेण्यास ती विसरली.

ती पहा एक कोंबडी. कशी दिसते पोक्त व प्रेमळ. ती पहा तिची पिले तिच्याभोवती नाचत आहेत. आज सणावाराचा दिवस, आपल्या पिलांना काय द्यावे, याची जणू तिला चिंता होती. रोज उकिरडे उकरून ती पिलांना खायला देत असे. परंतु आजच्या दिवशी नकोत ते उकिरडे व तेथील ते किडे, असे तिला वाटले. ती पिलांना घेऊन हिंडत त्या गरीब बाईच्या झोपडीजवळ आली, दार उघडेच होते. जणू तिचे स्वागत करण्यासाठीच ते उघडलेले होते. कोंबडी पिले घेऊन आत गेली. कोंबडी शोध करू लागली. तेथे घडवंचीवर तिला परळ दिसला. तिने घडवंचीवर उडी मारली. आपल्या चोचीने ती कणीक तिने खाली फेकण्यास सुरुवात केली. पिले मटामट खाऊ लागली. कोंबडीसुद्धा फराळ करू लागली. परळातील सारी कणीक तिने फिस्कारून टाकली. मायलेकरे स्वस्थपणे सणावाराचे जेवण जेवत होती.

ती गरीब आई बाजारातून गूळ घेऊन झोपडीत शिरली. ती कोंबडी एकदम घाबरली. 'पक् पक्' करू लागली. तिच्या त्या उडण्याच्या धांदलीत तो परळ पडला व फुटला. होती नव्हती कणीक सारी उपडी झाली. ती केरात मिसळली. कोंबडी व तिची पिले पसार झाली. ती गरीब माता खिन्नपणे तेथे उभी राहिली.

तिला मुलांचा राग आला. कोंबडीच्या पिलांनी तेथे सारी घाण केली होती. ती कणीक घेण्यासारखी नव्हती. बाजूची थोडी थोडी तिने गोळा केली. परंतु ती कितीशी पुरणार? माता कणीक गोळा करीत आहे तो मुले धावतच घरी आली. तेथील तो प्रकार पाहून ती अगदी ओशाळली.

"काय आता खाल? आज म्हटलं पुरणपोळी करीन; परंतु नाही तुमच्या निशबी. तरी सांगितले होते की, घरातून जाऊ नका म्हणून. क्षणभर तुमचा पाय घरात टिकत नाही. सतवायला व छळायला आली आहेत कार्टी जन्माला! जरा म्हणून ऐकत नाहीत." ती माता मुलांना रागे भरू लागली.

ती मुले रडू लागली. त्यांचा आनंद पार मावळला. त्यांचा आधार म्हणजे आई. ती आईच रागे भरू लागली; आता कोणाकडे त्यांनी जावे? कोणाकडे बघावे? ती मुसमुसत तेथे अपराध्याप्रमाणे उभी राहिली. आईचे गोड शब्द ऐकण्यासाठी ती भुकेलेली होती. पोटातील दुसरी भूक निघून गेली. परंतु आईच्या प्रेमाची भूक फार लागली होती. शेवटी त्या आईला मुलांचा कळवळा आला. सणावारी आपली मुले रडावीत असे कोणत्या आईला वाटेल? तिने त्या साऱ्यांना जवळ घेतले. त्यांचे ओले डोळे स्वत:च्या पदराने पुसले. सर्वांच्या तोंडावरून, डोळ्यावरून, पाठीवरून तिने प्रेमळ हात फिरवला. ती म्हणाली, "उगी, रडू नका हो. कोंबडीच्या पिलांचा सण झाला. त्यांना नको का चांगले खायला? तुमची आई तुम्हांला गोड देणार, कोंबडी तिच्या पिलांना देणार. घरात थोडे बाजरीचे पीठ आहे. त्यांत ही थोडीशी कणीक आहे ती पण मिसळीन. गूळ घालून त्याचे गाकर करीन. तेलाशी खा कुसकरून. चांगले लागतात. आज सणाचा वासर। करू आपण गाकर।।" असे तिने गाणेच केले.

एका क्षणात मुलांचे दु:ख गेले. ती हसू-खेळू लागली. आईने केलेली कविता त्यांनी आणखी वाढिवली. आज सणाचा वासर। करू आपण गाकर।। रोजची आहे भाकर। खाऊ आज गाकर।। खाती कोंबडीची पिले। खातील आईची मुले।। करू कोंड्याचा मांडा। चला खेळ गोड मांडा।।

आईचे प्रेम पाहून मुले जणू कवीच झाली. चुलीजवळ त्यांची आई गाकर करीत होती. तिच्या अवतीभोवती मुले नाचत होती. तिने त्यांची पाने मांडली. कढत कढत गाकर त्यांना तिने वाढले. मुले आनंदाने खाऊ लागली. मुलांचा आनंद पाहून त्या मातेचे हृदय भरून आले.

***