Nirbhaya - part 17 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | निर्भया - १७

निर्भया - १७

           -   निर्भया - १७ -
  दीपाच्या डोळ्यातले अश्रू  थांबत  नव्हते. शिल्पाची वाट पहात उशीला टेकून बसली. तिच्या मस्तकातील विचारचक्र मात्र चालूच होतं. रात्रीचा एक वाजला तरीही  ईशा आली  नव्हती.  मोबाइल वाजू लागला. दीपाने पाहिलं; सुशांतचा फोन  होता.
        "हॅलो! सुशांत! शिल्पा अजून घरी आली नाही. यासाठीच मी तिला रात्री  बाहेर पाठवायला   तयार  नव्हते. पण  तुम्ही कोणीच  माझं ऐकायला  तयार  नव्हता." त्याला  बोलायची  संधी  न  देता दीपा  बोलत  होती. तिचा  आवाज थरथरत होता. 
     "मी ते सांगायलाच फोन केलाय! शिल्पाला आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन  माने व्हॅनमधून  येतायत! तू   काळजी  करत असशील हे मला  माहीत  होतं ; म्हणून फोन केला." सुशांत तिला थांबवत म्हणाला.
दीपाने सुटकेचा श्वास सोडला. सुशांतच्या फोनने तिच्या मनावरचा सर्व ताण हलका केला होता. ती खिडकीतून मानेंच्या व्हॅनची वाट पाहू लागली.
     पण हळू   हळू  पापण्या  जड   होऊ लागल्या  आणि  तिला  गाढ  झोप लागली.
      दीपा  सकाळी  उठली तेव्हा शिल्पा तिच्या कुशीत  झोपली होती. तिला  डायरीची  आठवण   झाली आणि   ती  धडपडून  उठून   बसली.  सुशांतची डायरी  टेबलावर  नव्हती. ती   खोलीच्या  बाहेर  आली. हाॅलमधेही   सुशांत दिसले   नाहीत. " बहुतेक  रात्रभर त्यांना   ड्युटी   करावी लागलीय. म्हणजे ---  डायरी शिल्पाने वाचली की  काय?  दीपाच्या पायाखालची जमीन  सरकली."  या  लहान  वयात  मुलांना  अशा गोष्टी कळल्या,  की त्यांचं  बालपण हरवतं. खूप मोठी चूक  झाली  माझ्या हातून." ती स्वतःला  दोष   देऊ लागली. पण  बाण  भात्यातून सुटला  होता. आता तिच्या  हातात काहीही  राहिलं  नव्हतं.    
  " आता जे होईल त्याला तोंड द्यावं लागेल.माझ्या अशा भूतकाळाची  तिने  कधी  कल्पनाही  केली नसेल. आई म्हणून मी तिच्या नजरेतून  उतरले तर?" दीपाला  सुशांतशी  लग्न करण्यापूर्वीचे दिवस आठवले. तो  मनःस्ताप--- ते  अपमान---  "असं वाटतंय, की माझा भूतकाळ माझी पाठ सोडणार नाही.ते   सत्र परत माझ्या आयुष्यात अवतरणार आहे."
  क्षणाक्षणाला नवीन भीति तिला वाकुल्या दाखवत होती. 
                                             ********
सासुबाई नेहमीप्रमाणेच  लवकर  उठल्या  होत्या. "कशी आहे  तुझी  तब्येत आता? डोकं दुखायचं थांबलं का? गरम गरम चहा घे. तुला बरं वाटेल." त्या मायेने म्हणाल्या. 
   त्यांचं प्रेम पाहून दीपाचे डोळे भरून आले. "खरंच!  गेली काही वर्षे यांनी  मला मुलीचं प्रेम  दिलं. पण  मी  मात्र  सुशांतचं  ऐकलं, आणि  त्यांना कधी विश्वासात  घेतलं नाही; ही  किती  मोठी  चूक   झालीय  माझ्याकडून!  जर  शिल्पाने सगळ्यांच्या समोर डायरी दाखवून तिच्यातील मजकुराबद्दल मला विचारलं, तर  त्या  क्षणापासून  यांच्या  मायेला  मी  पारखी  होईन. त्यांच्या प्रेमाचा मी  गैरफायदा घेतला  असं म्हणतील त्या!  " ती मनाशी म्हणाली. 
       सासूबाईंनी  हातात दिलेला चहा ती प्याली. थोडी तरतरी आली. " बघू शिल्पा उठली  की तिला नीट  समजावायला  हवं.  वरून  सुंदर  दिसणा-या  जगाची विद्रूप  बाजू तिला कळली हे एका  प्रकारे बरंच झालं. मी ती डायरी वाचली, आणि  सुशांतना   त्यांच्या  प्रश्नांचं  उत्तर   द्यायचं  ठरवलं ,  तेव्हाच सगळ्यांपासून  दूर  जायची  तयारी  ठेवली  होती. या  घराने  जे सुंदर  क्षण दिले, त्या शिदोरीवर पुढचं आयुष्य काढायचं आहे." दीपा  येणा-या प्रसंगाला तोंड द्यायची मनोमन तयारी करत होती.
        तिच्याकडे  पाहून  आजही   तिची मनःस्थिती बरी नाही, हे सासूबाईंनी ओळखलं, आणि  नाश्ता बनवायला घेतला. दीपाने  काल  रात्रीपासून काही खाल्लं नाही,  हे  त्या विसरल्या नव्हत्या. तिला जबरदस्तीने  खायला लावून  त्या म्हणाल्या, " मी जरा बाजारात जाऊन येते. फ्रीज रिकामी झालाय. थोडी  भाजी  घेऊन  येते.  तुला अजून बरं  वाटत नाही असं दिसतंय. तू विश्रांती घे.  सुशांत  येईलच   इतक्यात! त्याच्या   चहा-पाण्याचं  मात्र  बघ. रात्रभर त्याची झोपही झाली  नाही. थकला असेल!" 
    बाहेर पडताना त्या थबकल्या, आणि बोलू लागल्या,
    " मी  तुला  सांगायला विसरले! नितीनचा फोन  आला होता. तो सिद्धेशला घेऊन संध्याकाळी येतोय. त्याच्या शाळेसाठी त्याला  सकाळीच  घेऊन  येणार  होता, पण  काल  पार्टी खूप  वेळ चालली, त्यामुळे सिद्धेश अजून उठला नाही, असं म्हणत होता."  यावर दीपाने फक्त होकारार्थी मान हलवली.
    त्या घरातून बाहेर पडल्या, आणि शिल्पा बाहेर आली. तिने दीपाला मिठी  मारली आणि म्हणाली,   " साॅरी  आई ! मी  काल  उगाच   चिडले तुझ्यावर ! तुला एवढी  काळजी का वाटतेय हे  कळत  नव्हतं   मला! " 
 "शिल्पा! लहान आहेस तू अजून!  हट्ट  करण्याचं  वय  आहे  तुझं! पण  एक  गोष्ट  कायम  लक्षात  ठेव. आई- बाबा  मुलांच्या काळजीपोटीच  कधी- कधी एखाद्या    गोष्टीसाठी   मनाई  करतात;  त्यामागे  मुलांच्या  हिताचाच  विचार असतो. तुमचं मन दुखावलं तरी काही अप्रिय निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. ते सर्व विसर आता! कसा झाला कालचा  कार्यक्रम? तुझी वाट पाहता पाहता मला  झोप   लागली. किती वाजता आलीस तू?"  तिने डायरी  वाचलीय  की  नाही  याचा  अंदाज  घेण्यासाठी  तिच्या  चेह-याकडे  निरखून  बघत  दीपाने चौकशी केली.
  "मला यायला दोन वाजले. इतकी गर्दी होती, की  माझ्या   मैत्रिणींशी माझी चुकामूक  झाली. त्यांना खूप   शोधलं, पण  काळोख  आणि  तिथली    गर्दी यामुळे त्यांना मी शोधू   शकले  नाही. एवढ्या काळोखात एकटीने फिरताना  प्राण कंठाशी आले  होते. शेवटी तू  सांगितल्याप्रमाणे पप्पांना मोबाइलवरून फोन केला. घरचे लोक फोन सतत फोन  करतील, म्हणून  मोबाइल  घ्यायचे नाहीत असं आमचं ठरलं होतं, पण तू  मला निघताना जबरदस्तीने  मोबाइल घ्यायला लावला होतास, म्हणून बरं झालं. नाहीतर  मी  काय  केलं  असतं? पप्पांनी मी नक्की   कुठे  आहे;   ते  विचारून  घेतलं आणि  माने  काकांना  पाठवून मला व्हॅनमधून घरी आणायची व्यवस्था  केली. माझ्या मैत्रिणींनाही शोधून काढलं, आणि  बरोबर घेतलं. त्यसुद्धा  खूप घाबरल्या होत्या. माझ्या काळजीने कासावीस झाल्या होत्या. मी तर एवढी  घाबरले  होते, की कुठून   इथे  आले, असं वाटत  होतं. सतत  तुझी आठवण  येत   होती. तू रात्रीच्या वेळी जुहूला  जायला  नको  का  म्हणत  होतीस; याची जाणीव तेव्हा मला  झाली."  शिल्पा  हे सर्व सांगतानाही शहारली  होती. 
   शिल्पाच्या बोलण्यावरून तिने सुशांतची डायरी वाचली असेल असं दिसत नव्हतं. तरीही दीपाने  शेवटी  न रहावून विचारलं,
" बेडरूममध्ये   टेबलावर पप्पांची डायरी होती;  तू उचलून कुठे ठेवलीस का?"
      आता शिल्पाने खाली मान घातली होती. 
" हो! डायरीतला मजकूर  तू वाचलायस हे पप्पांना कळू नये म्हणून मी तिथून उचलली, आणि माझ्या पुस्तकांंबरोबर ठेवली.  मला माफ कर. मी जेव्हा घरी  आले  तेव्हा तुला झोप  लागली होती. पण आजी -आजोबा जागे  होते. काल  चांदणी रात्र होती नं! टेरेसवर खुर्च्या  घेऊन  दोघं बसली होती, असं  म्हणाली; पण मला चांगलंच माहीत  आहे;  ती दोघंही माझीच  वाट बघत बसली  होती.  त्यांनी दरवाजा उघडला. मी आत येताना पाहिलं तुझ्या  बेडरूमचं  दार उघडं    होतं.  मला वाटलं  तू  जागी  असशील, म्हणून आत  डोकावलं, तेव्हा डायरी दिसली. कुतुहल म्हणून मी वाचली, आणि  सुन्न झाले. किती  सहन  केलंयस   तू!  पण  तरीही तुझ्या चेह-यावर  कधी कडवटपणा पहिला  नाही. तू  खरंच  ग्रेट  आहेस. जगाचे एवढे वाईट अनुभव  येऊनही तुझ्यातली माणुसकी मेली नाही. गेल्याच  आठवड्यात    एस. टी.चा   मोठा  अॅक्सिडेंट   झाला  होता. मोठ्या  संख्येने जखमी   लोकांना हाॅस्पिटलमध्ये  अॅडमिट  केलं होतं. तुला इमर्जन्सी म्हणून  हाॅस्पिटलमध्ये  बोलावून घेतलं होतं; तू  घरीही न येता, चार दिवस रात्रंदिवस सेवा  केलीस. आई, खरंच तुझा मला खूप अभिमान वाटतो. झालेल्या आघातातून तू फक्त स्वतःला सावरलंव नाहीस; तर  मनात  राग  न ठेवता सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला सावरलंस. खरंच! पुरूष  किती वाईट असतात; नाही का गं? तू जे सोसलंयस, ते कळल्यावर मी  आता  कुठल्याच मुलावर विश्वास ठेऊ शकणार नाही. "
   दीपाची भिती खरी ठरली होती.सुशांतची डायरी वाचल्यावर शिल्पावर हा परिणाम  होईल हा  तिचा कयास खरा ठरला होता.कालची अल्लड शिल्पा आज प्रौढ झाल्यासारखी बोलत होती. या नको त्या विचारांमुळे  तिचं पुढचं आयुष्य नीरस होण्याची शक्यता होती."हिला वेळीच सावरलं पाहिजे." दीपा  मनाशी म्हणाली.
    "असं नसतं बाळ! या  सगळे  पुरूष वाईट असतात  असं  म्हणणं  म्हणजे जगातल्या  चांगल्या  माणसांवर  अन्याय  होईल. माझं  आयुष्य अंधःकारमय करणारे जसे पुरूष होते, पण  मला  सावरण्यासाठी  हात देणारे तुझे  पप्पाही पुरूषच  होते. जगात   वावरताना  चांगली-वाईट    दोन्ही   प्रकारची   माणसं भेटतात. आणि  समोर स्त्री असो  वा  पुरुष, जात, धर्म, वंश  याविषयी मनात किल्मिष न ठेवता,भल्या- बु-या माणसांची परीक्षा करत आपल्याला पुढे जावं ओलागतं.जर मनात अढी ठेऊन बाहेरच्या जगात वावरलो, तर आपली प्रगती होणं कठीण होईल. अशाच  पूर्वग्रहांमुळे स्रियांवर पुर्वी  जाचक निर्बंध घातले गेले  होते.  त्या  रुढींबाहेर  पडायला   शेकडो  वर्षे लागली. स्त्रियांना  शिक्षण मिळावं,  घातक रूढींच्या  विळख्यातून त्यांची  सुटका  व्हावी  म्हणून  अनेक  समाजसेवकांना  लढा   द्यावा  लागला,  त्यासाठी   समाजाचा  रोष पत्करावा लागला. पण त्यांचे प्रयत्न फळाला आले. स्त्रियांनी सर्व  क्षेत्रांमध्ये कर्तबगारी दाखवली.आता मागे फिरायचं नाही. पुढे जात रहायचं, पण डोळे उघडे ठेऊन- खंबीरपणे. मी जर त्या रात्री चौपाटीलाच थांबण्यासाठी  खंबीर राहिले  असते, राकेशच्या गाडीत न बसता ट्रेनने घरी  गेले  असते, तर  पुढचा  प्रसंग  वाचला असता. पण मी राकेशबरोबर माझं लग्न ठरलं  आहे -- त्याला राग येईल असं वागायचं  नाही, या पारंपारिक  विचारामधे  अडकून बसले, ही  माझीही चूक होती. घराबाहेर  सगळ्यांबरोबर  वावरणं  आपल्याला   क्रमप्राप्त आहे ; पण डोळसपणाने!  "  दीपा  शिल्पाला समजावत म्हणाली. " स्त्री असो वा पुरूष, माणसातला स्वार्थ   कधी   डोकं  वर  काढेल,  हे सांगता  येत  नाही. माणूस  कोणत्या  वेळी कसा  वागेल  हे सांगणं कठीण  असतं. नेहमी सावध  रहाणं,  ही  एकच  गोष्ट  आपल्या   हातात   आहे.   त्यासाठीच  मी   तुला   रात्रीच्या  पिकनिकला जायला नको म्हणत होते.
     "  यापुढे  असा  चुकीचा हट्ट मी  कधी करणार नाही. तू जे  निर्णय घेशील   ते  नेहमीच   माझ्या  चांगल्यासाठीच असतील."  हे बोलताना शिल्पाचे डोळे भरून आले होते. तिच्या पाठीवर हात फिरवत दीपा म्हणाली,
   " होत्याचं नव्हतं व्हायला  वेळ नाही  लागत, बेटा!   प्रथम  स्वतःला  जपणं  महत्वाचं   असतं. आणि आपली  काळजी  आपणच  घ्यायची असते. कारण  ज्यांच्यावर विश्वास ठेऊन आपण स्वतःचं अस्तित्व पणाला लावतो, ती माणसं त्यांच्या  पाठबळाची  आपल्याला  गरज   असते,  तेव्हा  आपल्यापासून  दूर    गेलेली   असतात.  आणि  आपल्या  रक्ताची   नाती   आपलं    दुःख  आणि लोकापवाद यांना तोंड  देत असतात.  आणि शेवटी  रागाच्या भरात  आपण  मरण्याचा किंवा मारण्याचा  आततायीपणा करतो.रागाच्या भरात राकेशच्या सरबतात  विष  मिसळण्याची  चूक  मीच  केली  होती, आणि नंतर कितीही पश्चात्ताप झाला, तरी काहीही उपयोग नव्हता. भावनेच्या भरात हातून कृती    घडून    गेल्यावर    'पश्चात्   बुद्धी'ने  परिस्थिती   बदलत   नाही." त्या  तरल  मनस्थितीत   शिल्पाला  समजावताना, दीपा  अनवधानाने  नको  त्या  गोष्टी तिला कधी सांगून  गेली,  ते  तिला  कळलं  नाही. हे  लक्षात आल्यावर मात्र   ती चपापली. 
                                      ********         contd -----         Part -18.

Rate & Review

Prakash Gonji

Prakash Gonji 2 years ago

Sumati Gaonkar

Sumati Gaonkar 3 years ago

Vibhavari Satambekar
Varsha

Varsha 3 years ago

nice

Jayshri

Jayshri 3 years ago