Nirbhaya - 16 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | निर्भया - 16

निर्भया - 16

   निर्भया - १६

   दीपाची मानसिक अवस्था  इतकी वाईट  झाली  होती  की  ती सोसायटीच्या  कार्यक्रमालाही  गेली  नाही. तिचं  डोकं  सुन्न   झालं  होतं. पंधरा वर्षांपूर्वीच्या-  आठवणी तिच्याभोवती फेर धरून विकट हास्य  करत होत्या. तिला बरं  वाटत नाही, हे पाहून सुशांतच्या आई-बाबांनीही कार्यक्रमाला जाण्याचा बेत रद्द केला. सासू- सासऱ्यांना कसंबसं  जेवायला  वाढून ती  बेडरूममध्ये जाऊन  झोपली. पण जुन्या   आठवणी  पाठ सोडत नव्हत्या.
     पडल्या- पडल्या  तिला  झोप  लागली.  तिच्या मनातले  विचार  स्वप्नांमध्ये मूर्तरूप   घेऊ लागले. स्वप्नात ती जीव तोडून धावत होती. पण  दुस-याच क्षणी तिला स्वतःच्या  जागी  शिल्पा   दिसू  लागली. तिला   नराधमांनी   घेरलं   होतं आणि ती दीपाला जिवच्या आकांताने हाका मारत होती. "आई--आई--"

        दीपा  खडबडून   जागी   झाली.  शिल्पा  अजून  आली   नव्हती. दीपाने  घड्याळात.  पाहिलं. बारा वाजून  गेले होते.  "एवढा  वेळ   तिला   का  लागला असेल?   ती सुखरूप असेल  नं? ती  अजून लहान आहे. रात्रीच्या   काळोखात जर तिची  मैत्रिणींबरोबर  चुकामुक  झाली तर काय  करेल? देवा! माझी  शिल्पा सुखरूपरत येऊ दे!" दीपाची छाती धडधडत होती.  तिचे विचारचक्र चालू होते. 
" सुशांत  इतके  बिनधास्त  कसे   राहू   शकतात? पोलिसांच्या कार्यक्षमतेलाही काही मर्यादा आहेत!  रात्रीच्या  वेळी   कोणावर  लक्ष  ठेवणं  इतकं  सोपं आहे का? पोलीस गुन्हेगाराला  पकडू  शकतात. पण  पीडित  व्यक्तीचं  विस्कटलेलं  आयुष्य कधी  पूर्वीसारखं होऊ शकतं कां? गुन्हा घडण्यापूर्वीच  शक्य  तितकेे स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला नको का?मला नशिबाने सुशांतसारखा आधार मिळाला. प्रत्येकाच्या बाबतीत असं होईलच असं नाही." भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या, आणि तिच्या अंगावर काटा आला. ती पुढे विचार करू लागली,
         "राकेशच्या  केसचं   कोडं  सुशांतसारख्या कुशाग्र बुद्धीच्या इन्स्पेक्टरला खरोखरच उलगडलं   नसेल का? त्यांनी कधीही  राकेशचा उल्लेख केला नाही  पण  त्या   केसमध्ये   शेवटी   त्यांनी  काय  निष्कर्ष काढला,  याविषयी   कधी   मला    काही   सांगितलंही    नाही.  त्यांच्या मनातला  हा  कप्पा  नेहमीच  बंद राहिला. त्यावेळी मला तो कटू  विषय  नको  होता, म्हणून मी  काही  विचारलं  नाही. पण आज  असं   वाटतंय   की,  वास्तव  जाणून   घेणं  आवश्यक   होतं. तेव्हा  काय  झालं  हे    मला  आता  कसं  कळणार?  एवढ्या  वर्षांनी   त्यांना विचारणंही   बरं दिसणार नाही." दीपाचं विचारचक्र चालू  होतं.      
       सुशांत त्यांच्या प्रत्येक  केसचे डिटेल्स  एका   डायरीत लिहितात हे तिला माहीत होतं. ती उठली आणि  डायरी शोधू लागली. त्यावेळी काय झालं याचा  सुगावा  त्या  डायरीत  नक्कीच   मिळेल याची तिला   खात्री  होती.  ती   जुने कागदपत्र ठेवलेली  बॅग  शोधू लागली. पण त्यात ती  डायरी  नव्हती. त्यांच्या टेबलाचा ड्रॉवर बंद होता. तो ड्राॅव्हर तिने कधीच उघडला नव्हता. तिला चावी फार शोधावी लागली नाही. तिने तो ड्रॉवर उघडला. त्या खणात     ती  डायरी पाहूनच तिची  छाती धडधडू  लागली. धीर  करून  तिने डायरी उघडली. त्या  जाडजूड   डायरीत  सुशांतने तो  नोकरीला  लागल्यापासूनच्या   सर्व   केसेस  कशा सोडवल्या, याचं विस्ताराने विवरण केलं होतं. त्यांच्या व्यवस्थितपणाच्या या  सवयीमुळेच  त्यांना  जुन्या  केसेसचे  संदर्भ  लगेच  मिळत  असत  आणि  नवीन   केसेस   सोडवायलाही  मदत   होत     असे.  तारीखवार  शोधल्यावर   राकेशच्या   केस  विषयीचं   त्याचं   विवरण  मिळायला   वेळ  लागला   नाही. पंचनाम्याचं   टिपण, त्यांच्या घराचं वर्णन, इत्यादी  गोष्टी   होत्याच, पण  त्याचे आई-वडील  आणि  इतर  लोकांचेही  बारकाईने  वर्णन केलं होतं. दीपाविषयी त्यांनी   लिहिलं  होतं,
    " मी चौकशीसाठी तिच्या घरी गेलो तेव्हा राकेश च्या घरी रात्री-बेरात्री एकटी जाणारी मुलगी कशी असेल याविषयी मी मनाशी चित्र रंगवलं होतं. ही  एकादी  छचोर मुलगी असेल असं मला वाटलं होतं. आणि त्याचबरोबर राकेशचे शेजारी तिच्याविषयी  एवढ्या  आपुलकीने  बोलत  होते,  याचं  आश्चर्यही  वाटत  होतं. त्याला   शेवटचं  जिवंत  पाहिलेली  ती  एकटी  व्यक्ती  होती. त्यामुळे  prime  suspect म्हणून.  मी  तिचं नाव निश्चित केलं होतं. पहिली भेट तिच्या आईशी झाली. इतक्या घरंदाज स्त्रीची  मुलगी  अशी  कशी  असू  शकते? आणि जेव्हा  दीपाला  पाहिलं, तेव्हा  माझा  विश्वास   बसेना,  की   ही  तीच  मुलगी  असेल!  सुंदर  पण  तरीही अत्यंत   साधी,  निष्पाप चेह-याची ही  मुलगी कोणाचा खून करू शकेल असं वाटेना! रात्रीच्या वेळी एखाद्या मुलाला त्याच्या घरी भेटणा-या मुलीच्या डोळयात जो बेफिकिरपणा  मला अपेक्षित होता; त्या ऐवजी तिच्या नजरेत मला वेदना जाणवत होती. तिची नजर स्वच्छ होती.
            राकेशच्या  आईवडिलांना भेटलो; तिच्या बाबतीत घडलेला अमानुष   प्रकार  कळला  आणि   राकेशच्या   आईकडून   तिचा   झालेला  अपमानही  समजला, आणि तिच्याविषयी  मनात करुणा  दाटून  आली.  एवढे  शारीरिक  आणि  मानसिक आघात सहन   करूनही सदैव हसतमुख  असणा-या तिच्या चेह-यामागील वेदना समजून घ्यावी;  तिला  आधार  द्यावा  असं  वाटू लागलं. त्या  नराधमांना  पकडून    गजाआड  करायचं. "असा निर्धार मी केला.

        ज्या ग्रँट- रोड  पोलीस   ठाण्यात  तिच्यावर झालेल्या बलात्काराची नोंद  झाली होती तिथून मी ती फाईल  मिळवली. त्या  फाईल  मधून   मला कळलं की ते  तिघेजण होते. मरणोन्मुख  अवस्थेत  त्यांनी तिला त्या हैंगिंग गार्डनच्या  बाकावर  सोडलं होतं. कदाचित् बदनामीच्या भीतीने  असेल, दीपाने केस पुढे  चालवण्यास नकार  दिला  होता. त्यामुळे ती फाईल बंद करण्यात आली होती.
       ती  फाईल    वाचली,  आणि   मालाडमध्ये   एकाच   वेळी  विषप्रयोगाने मृत्युमुखी पडलेले ते तिघे तरुण  आठवले.  त्यांच्यापैकी   एकाचा  भाऊ  एक लोकप्रिय नेता आहे, मलबार हिलवर रहातो हे त्या फाइलमधे नमूद केलेलं होतं. ते तिघे तरुण तिच्यावर अत्याचार करणारे नराधम  तर  नसतील?  त्यांचा मृत्यू आइस-बाॅक्समधल्या पालीच्या विषाने  झाला  असा  निष्कर्ष होता. अॅक्सिडेंट केस म्हणून ती केस बंद केली होती. पण एका  स्त्रीच्या  सँडलचे  ठसे तिथल्या   ओल्या मातीत मिळाल्याची    नोंद होती.
       ती स्त्री म्हणजे दीपाच असेल का?
      आईसबाॅक्समध्ये पाल दीपाने टाकली असेल? की  त्या  तिघांच्या काळ्या  कारनाम्यांची   माहिती   असणाऱ्या  तिसऱ्याच   कुणीतरी   हे   काम   केलेलं  असेल? कदाचित्  त्यांनी अत्याचार  केलेली  दीपा ही एकच मुलगी नसेल; तर  ही  शक्यता   नाकारता येणार नाही.
     सुशांतची डायरी  वाचताना दीपाच्या डोळ्यातून  अश्रू वहात होते. सुशांतने पुढे लिहिले होते,
    " दीपाच्या  त्या  तिघां  विषयीच्या  भावना मी समजू शकतो; पण राकेशला मारण्याचा प्रयत्न ती का करेल? त्याच्यावर तर तिचं प्रेम होतं!....   ह्या प्रश्नांची उत्तरे मी शोधत असतानाच माझी ट्रान्स्फर नाशिकला झाली.  आता  ती  केस   दुसरे इन्स्पेक्टर  हाताळू    लागले. पण त्यांनी  राकेशचा मृत्यू  नैसर्गिक  हार्ट - अटॅकने  झाला  असल्याचा निष्कर्ष काढला, आणि ती केस बंद केली. त्यांच्या रिपोर्टप्रमाणे राकेशने आत्महत्या करण्यासाठी  सरबतात विष  घातलेलं  होतं;  पण  ते   सरबत  पिण्यापूर्वीच त्याला   heart attack  आला. त्या सरबतात  विष  त्याने  घातलं  होतं   की   दुसऱ्या  कोणी ? हा  प्रश्न  अनुत्तरितच राहिला. मी दीपाशी  कधी  चर्चा   केली   नाही. आता   कुठं  ती   सगळं   विसरण्याचा  प्रयत्न करतेय. तिच्या  कटू स्मृतींना परत उजाळा देण्याची माझी  इच्छा  नाही. पण माझ्या कारकीर्दीत ही एकच अशी  केस आहे, की  जिच्या  मुळापर्यंत मी जाऊ शकलो नाही. असं तर झालं नसेल, की  दीपावर जीव  जडल्यामुळे  मी काही  गोष्टींकडे जाणून-बुजून  दुर्लक्ष केलं  असेल? नाही- नाही,  मला  खात्री आहे,  की  माझ्या  हातून   असं  काहीही  घडलेलं  नाही. मी  माझ्या  वर्दीशी प्रामाणिक आहे."
   दीपाने   डायरी  बाजूला    ठेवली.   तिच्या  डोळ्यातून  अश्रू   वहात   होते.     "  म्हणजे  जे  काही घडलं त्याविषयी   सुशांतच्या  मनात  शंका  आहे  पण  त्यांनी  मला कधीच  काही  विचारलं  नाही. माझ्या  मनाची ते किती काळजी घेतात!  सुशांतना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच  हवीत. त्यांची  ही  केस अनुत्तरित रहाता कामा नये. नशिबाने मी त्या  दिवशी  अविचारी  कृत्य करूनही त्यातून  सहीसलामत बाहेर पडले. मला असं वाटलं होतं, की ते सरबत  राकेश प्याला नाही... इथेच गोष्टीचा शेवट झाला. पण नाही...माझ्या नशिबाचे  फेरे संपलेले नाहीत. सुशांतना त्याा दिवशी काय घडलं ते सांगावंच लागेल! अशी  शक्यता आहे; की कर्तव्यादक्ष सुशांत सत्य  कळल्यावर मला दोषी ठरवतील ....... ....आमच्यामध्ये दुरावा निर्माण होईल. जरी  मला  कायद्याने   शिक्षा  झाली   नाही; तरी  या  घरापासून   दूर रहाणं; हीच माझ्यासाठी  मोठी   शिक्षा असेल. पण आता सत्याला सामोरं  जायलाच  हवं. हा  ताण मी फार काळ सहन करू शकणार नाही."
                                        *******

                                                               contd .......part- 17.. 

Rate & Review

Rupali

Rupali 1 year ago

Vishal Gorivale

Vishal Gorivale 3 years ago

Sandeep Kadam

Sandeep Kadam 3 years ago

Sumati Gaonkar

Sumati Gaonkar 3 years ago

Pragati Jaiswal

Pragati Jaiswal 3 years ago